Scroll to top

सोशल मेडिया आणि वैद्यकीय अफवांचे रान


vinayakhingane - February 21, 2015 - 3 comments

सोशल मेडिया आणि स्मार्ट फोन ह्यांमुळे माहितीच्या प्रसारात खूप वाढ झाली आहे. आज कुठलीही माहिती अगदी सहज आणि अगदी वेगात  उपलब्घ होऊ शकते तसेच माहिती अनेक लोकांपर्यंत सहज पसरू शकते . ह्या उत्क्रांती मुळे जग छोटे झाले आहे . पण ह्याच्या फायद्या सोबतच काही तोटेही झाले आहेत . ज्ञान व माहिती च्या प्रसारा सोबतच अफवांचा प्रसार अगदी वेगात होतो आहे . ह्या अफवा सामाजिक, आर्थिक व आरोग्यविषयक समस्या निर्माण करतात . सोशल मेडियाचा वापर करताना ह्या गोष्टींचे भान ठेवणे फार आवश्यक आहे . आज आपण सोशल मेडिया व त्यातून निर्माण होणारे गैरसमज ह्याच्याविषयी थोडी चर्चा करूया .

इबोला हा एक भयावह असा आजार असून त्यासाठी कुठलीही लस वा रामबाण औषधे उपलब्ध नाहीत . ह्या आजाराची साथ आफ्रिकेतील तीन देशांमध्ये आली असून जगभरातील वैद्यक क्षेत्र जागरूक झाले आहे . भारताने स्वाइन फ्लू ह्या आजाराची साथ अनुभवल्यानंतर अशा गंभीर आजाराबद्दल सर्वसामन्यांच्या मनात भीती असणे स्वाभाविक आहे . पण हा वायरल आजार आफ्रिकेतून भारतात येण्यासाठी इबोला चा रुग्ण भारतात दाखल होणे आवश्यक आहे व कुठलीही दक्षता न घेता त्याला हाताळल्यास व रुग्णाच्या शरीर स्त्रावाशी किंवा रक्ताशी संबंध आल्यास हा आजार होऊ शकतो . अशा वेळी सोशल मेडिया वर भारतात इबोला रुग्ण दाखल झाल्याच्या अफवांना उधान आले आहे . पहिला रुग्ण पुणे , मुंबई तसेच कर्नाटक मध्ये असल्याच्या अफवा सर्रास येऊ लागल्या आहेत . हा लेख लिहिताना तरी इबोला मुळे मृत्यू झाल्याचे खात्रीशीर वृत्त सरकार किंवा एखाद्या वैद्यकीय संस्थेने प्रसारित केलेले नाही . अशा वेळी भारतात इबोला रोग आला आहे अशी अफवा कोणीतरी पसरवून लोकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार करत आहे . आणि लोक घाबरून असे मेसेज पुढे पाठवून ही भीती अधिकच वाढवण्यासाठी मदतच  करीत आहेत. इबोलाचे हे उदाहरण त्ताजे व बोलके आहे म्हणून ह्याची चर्चा इथे केली आहे. परंतु इबोला सारख्या अनेक इतर आजारांविषयी अफवा पसरवून दहशत निर्माण करण्यात येते . मधे एक फोटो सोशल मेडियावर खूप गाजला . त्वचेवर विद्रूप असे फोड आलेले दाखवणारा हा फोटो बनावट होता . असा आजार अमुक एक सौंदर्य प्रसाधन वापरल्यामुळे होतो असे सुद्धा तेथे नमूद केलेले होते. एड्स किंवा हच आय व्ही संबंधीही खूप अफवा असतात . असे मेसेज प्रसारित झाल्याने आरोग्यविषयक दहशत निर्माण होते . अमुक तमुक गोष्ट / पदार्थ वापरल्याने कन्सर होतो असे सांगणारे मेसेज तुम्ही वाचलेच असतील . अशा घाबरवून टाकणाऱ्या मेसेजेसला बळी पडलेल्या लोकांची तारांबळ उडते .किरकोळ आजारच्या लक्षणाने सुद्धा भीतीने थरकाप उडतो व रुग्णालयातील गर्दी वाढते . मानसिक आणि आर्थिक नुकसान होऊन बसते . गरज नसतानाही काही गोष्टींचा वापर टाळला जातो . आपल्या आजूबाजूची प्रत्येक गोष्टच आपल्याला घातक आहे आणि आपण सतत संकटात वावरतो आहोत असा अतिरेकी गैरसमज होऊन बसतो
खोटी भीती पसरवणे ह्याशिवाय खोटा दिलासा देण्याचे कामही सोशल मेडिया वर सुरु असते . उदा : इबोला ह्या आजारात तुळसीची पाने हा रामबाण उपाय आहे किंवा हृदयविकाराचा झटका  आल्यावर जोरात खोकला केल्यास जीव वाचू शकतो इत्यादी . खरेतर इबोलावर सध्यातरी औषध उपलब्ध नाही . व भारतात आतापर्यंत इबोला चा रुग्ण कधीही आढळलेला नसल्यामुळे तुलसी चा त्यावर  प्रभाव होण्याचा काही पुरावा आपल्याकडे उपलब्ध नाही .हृदयविकाराचा झटका आल्यावर खोकून काहीही फायदा होत नाही व आपल्याला तात्काळ वैद्यकीय मदतीची गरज असते .  कुठलाही सबळ असा पुरावा(शास्त्रीय किंवा वैद्यकीय )नसताना केलेली अशी वक्तव्ये एखाद्या रुग्णाला अडचणीत आणू शकतात . महत्वाचा असा वेळ उपयोगी नसलेल्या किंवा प्रसंगी घातक असलेल्या गोष्टीमध्ये वाया जाऊ शकतो, उपयुक्त इलाजांपासून रुग्ण वंचित राहू शकतो किवा टाळता येणाऱ्या दुष्परीनामाना बळी पडू शकतो . काही प्रसंगी भोंदू लोक प्रचारासाठी सोशल मेडिया चा वापर करतात . अमुक अमुक आजारात खात्रीशीर इलाज करणाऱ्या जाहिराती जनजागृतीच्या नावाने सर्सास खपवल्या जातात . अशा मेसेजेस वर डोळे झाकून विश्वास ठेवणारे लोक स्वतःचा काही स्वार्थ नसताना नकळत भोंदू लोकांचा प्रचार करतात . साध्या घरगुती उपयांपासून ते आधुनिक उपायांपर्यंत दिशाभूल करणाऱ्या मेसेजेस पासून सावध असणे आवश्यक आहे .
वरील दोन्ही प्रकारच्या माहितीमुळे रुग्णांना  व नातेवाईकांना बराच त्रास सहन करावा लागू शकतो . काही मेसेजेस हे तितकेसे उपद्रवी नसले तरीही चुकीची माहिती प्रसारित करणारे असतात . त्यामुळे रुग्णाच्या आजारात किंवा उपचारात फरक पडत नाही पण लोकांच्या मनात शरीर विषयक तसेच रोग विषयक चुकीच्या संकल्पना होण्यात भर पडते . जेवताना पाणी पिल्याने पोटातील अग्नी विझतो व त्यामुळे वेगवेगळे आजार होतात असे ठासून सांगणारा एक मेसेज मी वाचला .आजच्या शरीरशास्त्रात अशी संकल्पना कुठेही नाही . लोक अशा मेसेजेस मधून  आपल्या आरोग्यविषयक संकल्पना दृढ करतात व त्यामुळे प्रसंगी गोंधळ उडतात . पाणी भरपूर पिल्याने किडनी स्व्च्छ होते असा समज झाल्याने किडनीचा आजार झालेल्या एका रुग्णाने भरपूर पाणी पिले .किडनीचे काम कमी झालेले असल्यामुळे पाण्याचा निचरा झाला नाही व त्यामुळे सूज वाढली व रुग्णाची परिस्थिती खालावली . त्यामुळे आरोग्यविषयक माहिती ही अपुरी किंवा अतिरंजक नसून परिपूर्ण असल्यास असा गोंधळ होण्याची शक्यता कमी असते .
काही मेसेजेस हे एखाद्या डॉक्टर किंवा रुग्णाच्या खासगी अनुभवांवर आधारित असतात . त्यांचा निष्कर्ष सरसकट सगळ्यांनाच लावणे हे चुकीचे ठरू शकते . पण असे मेसेजेस उदाहरण म्हणून जोरात फोरवर्ड केले जातात .वैद्यकीयसंदर्भातील विडीयो मेसेजेस हे सुद्धा अतिशय उत्साहाने फोरवर्ड केले जातात. ह्यातील काही मेसेजेस हे किळसवाणे असतात. रुग्णाला अत्यवश्यक असलेले काही उपाय जसे सी पी आर हे एखाद्याला नवीन असल्यास ते दृश्य भीतीदायक असू शकते . ह्या गोष्टींमुळे कधी कधी नकारात्मक भावना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आपण करत असतो . काही वैद्यकीय दृश्ये योग्य माहितीच्या किंवा मार्गदर्शना अभावी गैरसमज उत्पन्न करू शकतात . एका लहान मुलाला इंजेक्शन देतानाचा एक विडीयो पाहण्यात आला . तो  मुलगा जोरात रडत होता व गावाकडील भाषेत नर्स वर ओरडत होता . एक चेष्टेचा विषय म्हणून हा मेसेज फोरवर्ड होत आहे . पण इंजेक्शन ची भीती असलेले कितीतरी लोक आपलीही अशी थट्टा होत असेल म्हणून खजील होत असतील व इंजेक्शन सारख्या कितीतरी उपयांपासून अधिक दूर जात असतील ह्याचा विचार आपण असा विडीयो फोरवर्ड करताना करत नाही . काही मेसेजेस मध्ये रुग्णाच्या गोपनीयते बाबतीत काहीच काळजी घेतलेली नसते. हे त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे असते . मेडिकल जर्नल किंवा पुस्तकात त्या रुग्णाची ओळख लपवून व त्याची परवानगी असेल तरच त्याचा फोटो दिला जातो . असे न केल्यास तो एक गुन्हा ठरतो . डॉक्टरांच्या सोबतच रुग्णाच्या नातेवाईकांनी सुद्धा ह्या गोष्टीची दखल घेऊन असे वैद्यकीय विडीयो किंवा फोटो चुकीच्या पद्धतीने प्रसारित करू नये .
आजच्या काळात वैद्यकीय शिक्षण व आरोग्य शिक्षणाच्या क्षेत्रात सोशल मेडिया व माहिती तंत्रज्ञानाचा फार मोठा वाटा आहे . आरोग्य शिक्षणाच्या दृष्टीने काही विशेष मेसेज व विडीयो तयार करून ते प्रसारित केल्या जातात . हे मेसेजेस तज्ञ लोकांनी तयार केलेले असतात व त्यांना योग्य संदर्भांची पुष्टी असते . अशा मेसेजेसमुळे ज्ञानात भर पडते व सकारात्मक संदेश जनतेपर्यंत पोहोचवला जातो . ही चांगल्या मेसेजेसची लक्षणे आहेत . परंतु प्रत्येक मेसेज पुढे पाठवताना किंवा प्रसारित करताना आपण भान ठेवणे आवश्यक आहे . मेसेज मधील माहिती आधी पडताळून बघायला हवी . इंटरनेट उपलब्ध असल्यानी मेसेज मधील माहितीची शहनिशा करणे सोपे जाते . विकीपेडिया किंवा गुगल सारख्या संकेतस्थळांवर अशी माहिती पडताळून बघता येते . ही माहिती पडताळून बघताना त्याचा संदर्भ व स्त्रोत हा पण पडताळून बघता येतो . वैज्ञानिक जर्नल , पुस्तके अधिकृत संस्था व अधिकृत संकेतस्थळे तसेच दर्जेदार वृत्तपत्रे ह्यांचा दाखला किंवा संदर्भ असणारी माहिती खात्रीशीर असते . काही मेसेजेसमध्ये  लोकांचा विश्वास बसावा म्हणून चुकीचे संदर्भ व स्त्रोत टाकलेले असतात . ते पडताळून बघण्याची गरज असते . बरेचदा असे संदर्भ पडताळून बघताना मेसेज किती खोटी  आहे हे लगेच कळते . त्यासोबतच नवीन व खरी अशी माहितीही आपल्याला मिळते .( मला अशा मेसेजेस च्या पडताळणी तून आपल्या इतिहासाच्या बाबतीत बर्याच गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या  ) . काही लोक मेसेजेस अशा पद्धतीने पडताळून बघतात तर काही लोक आपल्या ओळखीच्या डॉक्टरांना विचारून माहितीचा खरेपणा तपासून बघतात . माहिती खोटी असल्यास ज्याने पाठवली आहे त्याला संदर्भ व स्त्रोत सांगून योग्य माहिती पुरवतात . अशा मुळे अफवा पसरवण्यास प्रतिबंध होतो . माहितीचा खरेपणा तपासून बघितल्यानंतर ती माहिती व्यवहारात उपयोगात आणताना सुद्धा सतर्क असणे आवश्यक असते . उपचारासंबंधी किंवा रोगनिदाना संबंधी निर्णय घेताना तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते . विडीयो किंवा फोटो फोरवर्ड करताना आपण कुणाच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर अतिक्रमण तर करत नाही आहोत किंवा नकारात्मक भावना तर नाही न पसरवत आहोत हे बघावे . आपण सोशल मेडिया साठी सेन्सोर बोर्ड जरी बसवू शकणार नसलो तरी आपण स्वतः सेन्सोर बोर्ड होऊ शकतो . उत्तम दर्जा चे आरोग्यशिक्ष विषयक मेसेज आणि माहिती ही  समाजाच्या विकासाची किल्ली आहे तर अफवा व चुकीची माहिती तितकीच घातक आहे. आपली सतर्कता आपल्याला वाचवू शकते . सोशल मेडिया वरील आपली सजगता ही आपल्या सुजन नागरिकत्वाची एक नवीन जबाबदारी आहे .
Contact Us
close slider

    ×

    Hello!

    Click one of our representatives below to chat on WhatsApp or send us an email to vinayakhingane@gmail.com

    ×
    %d bloggers like this: