Scroll to top

जाडोबा अन रडोबा 


vinayakhingane - July 8, 2015 - 6 comments

Laurelhardyutopia'51PD
आपल्या वजनाबद्दल सारखी चिंता करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. मी लठ्ठ म्हणून काळजीचा भार वाहणारे बरेच तर माझे वजन किती कमी म्हणून चिंतातूर झालेलेही पुष्कळ. वजन किंवा आपल्या शरीरयष्टी संबंधी काळजी करणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे असे भासते. प्रसिद्धी माध्यमांपासून ते जाहिरातीच्या जवळपास सगळ्या माध्यमांमध्ये ‘वजन वाढवा किंवा कमी करा’ (अर्थातच विनासायास व खात्रीशीर ) अशा जाहिरातींचा सुळसुळाट झालेला दिसतो. बरेच लोक आपली शरीरयष्टी बदलण्यासाठी , तसेच वजन कमी जास्त करण्यासाठी काहीतरी उपाय करताना आपल्याला दिसतात . हे उपाय घरगुती व अगदी विनामूल्य अशा स्वरूपापासून महागड्या व क्लिष्ट स्वरूपाचे असू शकतात. अशा उपाय करणाऱ्या मंडळीना ह्या उपायांची खरच गरज असते का हा महत्वाचा मुद्दा आहे . जाड असणे किंवा बारीक असणे हे आरोग्यासाठी वाईट असे आपण सरसकट म्हणतो . पण आरोग्यासाठी वाईट असलेला लठ्ठपणा किंवा बारीकपणा म्हणजे नक्की काय असतो ह्याविषयी आपण आज जरा चर्चा करूया.
लठ्ठपणा व कुपोषण हे आपल्या समाजासमोरील मोठे प्रश्न आहेत. पण सामान्य जनतेसमोर हे प्रश्न विविध रूपांमध्ये येतात व आपण हे प्रश्न सोडवताना थोडे गोंधळून जातो . लठ्ठ व बारीक कोणाला म्हणायचे ह्या प्रश्नापासून आपण सुरुवात करूया .
अगदी रटाळ झालेली म्हण : व्यक्ती तितक्या प्रवृत्ती . वजनाच्या बाबतीत ह्यापेक्षा चपखल बसणारी म्हण कदाचित सापडणार नाही . प्रत्येक व्यक्तीची बांधणी आणि वजन अगदी वेगळे असणार . आपण एक उदा बघू . एका वर्गातली शंभर मुले बघितली तर त्यांचे वजन अन ठेवण वेगळी असते . ही मुले साधारण एकाच वयाची आणि एकाच भौगोलिक परिस्थितीतली असतात . आणि ह्यातील बहुतांशी  निरोगीही असतात . अशा वेळी आपण कोणाला बारीक व कोणाला लठ्ठ म्हणायचे असा प्रश्न पडतो . आपल्या स्मरणात  रेफरन्स म्हणून जाड्या रड्या किंवा लौरेल अन हार्डी ची चित्रे असतात . त्यांच्याशी तुलना करून आपण ह्या वर्गातील मुलांना जाड किंवा बारीक म्हणू शकतो . किंवा आपण चित्रपटातील नायक अन नायिका ह्यांच्या ‘परफेक्ट ‘ शरीरयष्टी शी तुलना करून त्यांना लठ्ठ किंवा बारीक ठरवू शकतो . ह्या दोन्ही प्रकारे केलेली विभागणी चुकीची ठरण्याची शक्यता जास्त असते . म्हणून शास्त्रीय पद्धतीत निरोगी लोकांचे वजन ,उंची ,वय ,लिंग, भौगोलिक परिस्थिती इत्यादी लक्षात घेऊन एक तक्ता बनवण्यात येतो . व त्या वयासाठी ,त्या लिंगाच्या, त्या उंचीच्या व्यक्तीसाठी साधारण काय वजन अपेक्षित आहे ह्याचे भाकीत करण्यात येते . आपले वजन ह्या भाकिताच्या जवळपास असणे योग्य असे म्हटले जाते . ही शास्त्रीय प्रक्रिया किचकट असली तरीही काही निष्कर्ष सोपे आणि आपल्याला उपयोगाचे आहेत .
 बी एम आय किंवा बोडी मास इंडेक्स .
बी एम आय = (तुमचे वजन कि ग्रा )/(उंची मीटर चा वर्ग )
BMI = weight in Kg / square of height in meter
प्रौढ भारतीय व्यक्तीचा बी एम आय हा १८.५ ते २३ ह्या पातळीत नॉर्मल समजल्या जातो . १६ पेक्षा कमी व २७ पेक्षा जास्त  बी एम आय असणे हे आरोग्यासाठी काळजीचे समजल्या जाते . (जागतिक लोकसंखे साठी हे आकडे थोडे वेगळे म्हणजे बी एम आय १८.५ ते २५ हा नॉर्मल तसेच >३० हा काळजीचा समजल्या जातो ). बी एम आय काढून देणारी साधने इंटरनेट वर सहज उपलब्ध आहेत . बी एम आय खेरीज उंचीनुसार व वयानुसार  वजनाचे तक्ते सुद्धा उपलब्ध असतात . याशिवाय भारतीय पुरुषांचा कमरेचा घेर ९० सेमी पेक्षा जास्त तसेच स्त्रियांच्या कमरेचा घेर ८० सेमी पेक्षा जास्त असणे हे लठ्ठपणाचे समजल्या जाते .
आरोग्यासाठी काळजीचे कारण हे  फक्त वरील मोज्मापांवर अवलंबून नसून तुमच्या जीवनशैली , व्यसने, तसेच काही आजार जसे मधुमेह किंवा उच्च रक्तदाब इत्यादीवर सुद्धा अवलंबून असते . त्यामुळे आपण स्वतः किंवा एखादी व्यक्ती लठ्ठ किंवा बारीक आहे व ते आरोग्यासाठी काळजीचे आहे किंवा कसे हे आपण ठरवण्याआधी त्या व्यक्तीचा बी एम आय तपासून घ्यावा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा .अर्थातच सर्वांनी योग्य आहार व नियमित शारीरिक व्यायाम असलेली निरोगी जीवनशैली अवलंबावी. तुमचा बी एम आय सामान्य असेल आणि तुम्हाला आरोग्यविषयक कुठलीही तक्रार नसेल तर तुम्ही थोडे स्थूल दिसत असा किंवा थोडे बारीक दिसत असा , तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही.
आपला दृष्टीकोन बरेचदा जाड्या रड्या किंवा नायक-नायिका ह्यांचाशी तुलना करण्याकडे असतो . जाड्या रड्या सारखी दिसणारी मंडळी ही रोगी किंवा आजारी असतातच असे नाही . कधी थोडी स्थूल दिसणारी किंवा  कृश दिसणारी मंडळी चारचौघांपेक्षा काटक असू शकतात . त्यामुळे फक्त दिसण्यावर जाऊन चालणार नाही . सिने नायक व नायिका ह्याचाशी तुलना करून आपली शरीरयष्टी ही त्यांच्यासारखी असावी असा प्रयत्न बरेच लोक करतात . खासकरून तरुण व लहान वयोगटात ह्याचे प्रमाण जास्त दिसते . ही ‘क्रेझ’ दर नवीन नायक नायिकेसोबत बदलत असते . इतर प्रसारमाध्यमे जसे इंटरनेट व टीवी  वरील जाहिराती , मुलांची खेळणी , सुपर हिरोज , इत्यादीमधून सुद्धा ही ‘क्रेझ’ निर्माण केली जाते .कधी कधी तर माध्यमांतून चालणारी ही क्रेझ आरोग्याच्या दृष्टीने घातकही असते . विशेषतहा लहान मुले  अशा गोष्टीना बळी पडतात . आपली शरीरयष्टी हि अमुक अशी असावी असे चित्र त्यांच्या मनात तयार झाल्यावर ते स्वतःची शरीरयष्टी योग्य असली तरी त्यांच्या नायका-नायिकेसारखी नाही म्हणून चुकीची मानतात . टीवी वर दिसणाऱ्या मोडेल सारखी शरीरयष्टी मिळवण्यासाठी कुपोषित होणारी काही केसेस कधीतरी हॉस्पिटल मध्ये बघायला मिळतात .
टीव्ही वर किंवा इतर माध्यमांमधून ज्याप्रमाणे एक इमेज किंवा क्रेझ तयार होते त्याचप्रमाणे आरोग्यविषयक आहार किंवा हेल्थ साप्लीमेंट विकणाऱ्या जाहिराती सुद्धा बरेचदा दिशाभूल करतात . हाय क्यालरीज किंवा उच्च उष्मांक घेण्याची प्रत्येक बारीक व्यक्तीला  गरज नसते तसेच  शुगर फ्री घेण्याची प्रत्येक स्थूल व्यक्तीला  गरज नसते . पण अशा व्यक्तींच्या न्युनगंडाचा फायदा घेऊन किंवा त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अशा गोष्टी त्यांचा गळ्यात उतरवल्या जातात .  प्रसारमाध्यमामध्ये बरेचदा फिटनेस आणि वजन ह्यांची सांगड घातल्या जाते . तुमचा बी एम आय हा सामान्य असणे उत्तमच पण फिटनेस हा त्याहून वेगळा असतो . तुम्ही शारीरक श्रम किती सहन करू शकता व तुमची व्यायामाची क्षमता कशी आहे ह्याचा सुद्धा त्यात समावेश होतो . थोडे स्थूल असलेले किंवा बारीक दिसणारे पण फीट असलेले कितीतरी क्रीडापटू आपण बघतो . तेव्हा प्रसारमाध्यमे, चित्रपट ह्यांना आपल्या शरीरयष्टीच्या संकल्पनेत व वजन नियंत्रणाच्या बाबतीत ढवळाढवळ न करू देणेच योग्य . घरातील लहानग्यांशी ह्या बाबतीत बोलावे व इतर गोष्टींप्रमाणे ह्या बाबतीतही मार्गदर्शन करावे .
वजनाच्या बाबतीत संवेदनशील असणार्यांमध्ये एक समूह  म्हणजे लग्नासाठीचे उमेदवार . ह्यांना त्यांच्या वजनाविषयी कमालीची चिंता असते . निरोगी असूनही लग्न जुळत नाही म्हणून वजन कमी किंवा बरेचदा वजन वाढवण्यासाठी हि मंडळी धावपळ करताना दिसते . ह्या धावपळीत वजन लगेच वाढत किंवा कमी होत नाही . कारण नैसर्गिक रित्या वजन कमी किंवा जास्त होण्यास शरीर तसे तयार व्हावे लागते व ह्या प्रक्रियेस वेळ लागतो . परिणामी ह्या मुलांना नैराश्य येते व न्यूनगंड तयार  होतो . बरेचदा हि मंडळी वजन कमी जास्त करण्यासाठी औषधांचा वापर करण्याचा प्रयत्न करतात . माझा एक मित्र असाच लग्नाआधी वजन वाढावे म्हणून खूप प्रयत्न करत होता . लग्न होईपर्यंत वजन फार काही वाढले नाही पण आता लग्नानंतर त्याचा त्या प्रयत्नांची फळे दिसतात आहे व आता तो लठ्ठपणा शी झगडतो आहे . बारीक मुला मुलींची लग्न जुळत नाहीत असे बरेचदा ऐकायला मिळते . पण ही मुले बहुतांशी निरोगी असतात . त्यामुळे फक्त बारीक दिसते किंवा दिसतो म्हणून नाकार देणे हे कितपत योग्य म्हणावे?
फक्त छान दिसण्यासाठी थोडे बारीक किंवा थोडे जाड होण्यात वाईट काय हा प्रश्न आपल्याला कधीतरी पडू शकतो. सौंदर्यासाठी आपण कित्येक गोष्टी करतो . त्यासारखेच वजन कोस्मेटिक कारणांसाठी नियंत्रित करण्यात काय वाईट? ह्याचे उत्तर थोडे किचकट आहे.शारीरिक वाढ पूर्ण झाल्यावर आपले शरीर व मेंदू आपले वजन एका ठराविक पातळीवर ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करत असते . आपण एक नियमित जीवनशैली अवलंबिल्यास आपले वजन साधारण स्थिर राहते . आपण आहारात  बदल केले तरीही शरीर आपले वजन स्थिर ठेवण्यासाठी झगडत असते . त्यासाठी आपले शरीर रासायनिक व सम्प्रेरिक बदल घडवून आणते . ह्यामुळे आपल्या शरीरातील उर्जेचा वापर कमी अधिक होऊन आपले वजन बदलू नये ह्याचा प्रयत्न होत असतो . म्हणून आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असताना वजन लगेच कमी होत नाही किंवा कमी झाल्यास लगेच पूर्ववत होते . परंतु खूप काल वजन हळूहळू कमी होत गेल्यास आपल्या शरीराचे नवीन आदर्श वजन तयार होते व मग ते वजन स्थिर ठेवण्यासाठी शरीर प्रयत्न करायला लागते . ह्याच्या अगदी उलट वजन वाढवण्याचा प्रयत्न करताना होते . पण हे होताना शरीराचा नाजूक असा समतोल बिघडण्याचा संभव असतो . बरेचदा वजन वाढायला लागल्यावर ते नियंत्रित करणे कठीण होऊन बसते व लठ्ठपणा येतो . आणि  अशा लठ्ठपणा सोबत इतरही आजार येतात . नॉर्मल वजन असलेल्या व्यक्तीने वजन कमी करण्याचा प्रयत्न केल्यास आहार सत्वे कमी पडून त्यासंबंधी कमतरतेचे (जसे अनेमिया , जीवनसत्वांची कमतरता  इत्यादी )आजार होण्याची शक्यता असते . म्हणून कोस्मेटिक कारणांसाठी वजन कमी जास्त करण्याचा निर्णय खूप काळजीपूर्वक व त्यातील धोके समजून घ्यावा .
बारीक किंवा स्थूल दिसणे हा एक चेष्टेचा विषय झालेला आहे .  बारीक किंवा स्थूल म्हणजे सरसकट रोगी असा समाज आज वाढतो आहे .आपली प्रसारमाध्यमे व जाहिरातदार असे समाज वाढवण्यात गुंतलेले आहेत . त्यामुळे ह्या व्यक्ती न्युनगंडाला बळी पडता , निराश होतात. हा न्यूनगंड खरेतर त्यांच्या वजनापेक्षा त्यांना जास्त त्रासदायक असतो . आपला दृष्टीकोन थोडा बदलल्यास आपण  ह्या निराश गर्तेतून बाहेर येऊ शकतो  आणि कितीतरी निराश लोकांना सावरू शकतो .
Contact Us
close slider

    Discover more from Vinayak Hingane

    Subscribe now to keep reading and get access to the full archive.

    Continue reading

    ×

    Hello!

    Click one of our representatives below to chat on WhatsApp or send us an email to vinayakhingane@gmail.com

    ×