सध्या भारतात डेंगू चे रुग्ण दगावल्या मुळे सगळीकडे दहशतीचे वातावरण असल्याचे चित्र वृत्तवाहिन्यांवर दिसते आहे . डेंगू विषयी माहितीच्या अभावामुळे ह्या आजाराविषयीची भीती जास्त वाढते. डेंगू आणि काही गैरसमज ह्याविषयी आपण आज थोडक्यात जाणून घेऊया.
डेंगू हा विषाणू मुळे होणारा आजार आहे . हे विषाणू एडीस नावाच्या डासामुळे पसरतात. हे डास स्वछ पाण्यात अंडी घालतात आणि वाढतात . घरात पाण्याचा साठा केल्यास ह्या डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता जास्त असते . त्याचप्रमाणे पावसाळ्यात पाणी साचून त्यात हे डास वाढतात. उन्हाळ्यात कुलर च्या पाण्यातही हे डास वाढू शकतात. घर व परिसरात डास होणार नाहीत ह्याचा प्रयत्न केल्यास डेंगू व मलेरिया ह्या दोन आजारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. हे डास दिवसा चावतात . त्यामुळे रात्रीप्रमाणे दिवसासुद्धा डासांपासून संरक्षणाची गरज असते .
डेंगू चे तीन प्रकार बघायला मिळतात . सोप्या भाषेत सांगायचे झाले तर पहिला प्रकार हा थोडा सौम्य असतो . ह्यात ताप , डोकेदुखी , उलटी व अंगदुखी अशी लक्षणे दिसतात .
दुसरा प्रकार हा जास्त तीव्र असतो व त्यात पहिल्या प्रकारातील लक्षणा सोबतच रक्तस्त्राव होऊ शकतो .
तिसरा प्रकार हा तीव्र स्वरूपाचा असून त्यात रुग्ण अत्यवस्थ होऊ शकतो. अशा स्वरूपाच्या डेंगू मुळे रुग्ण दगावू शकतो. तीव्र स्वरूपातील डेंगू ची धोक्याची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत .
१. पोटात दुखणे
२. सारखी उलटी होणे
३. रक्तस्त्राव होणे
४. बिपी कमी होणे
५. लघवी कमी होणे
६. हातपाय थंड पडणे
७. दम लागणे
८. लहान बाळाने सारखे रडणे
वरील लक्षणे दिसल्यास डॉक्टरांना त्वरित दाखवावे .
तीव्र आजारात डॉक्टर रुग्णाची तपासणी करून आजाराची गंभीरता बघतात . मध्यम गंभीरतेच्या आजाराचे रुपांतर अतिशय गंभीर आजारात लवकर होऊ शकते . म्हणून अशा रुग्णांना दवाखान्यात ठेवण्यात येते . अत्यवस्थ रुग्णांना आय सी यु मध्ये ठेवण्यात येते. पण साधा आजार असेल तर घरी पाठवून परत तपासणी साठी बोलावणे हे सुद्धा डॉक्टर सुचवू शकतात. ताप साधारणता तीन ते चार दिवस असतो व धोक्याची लक्षणे ताप गेल्यानंतर दिसू शकतात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला मानून फोलो अप ठेवावा . धोक्याची लक्षणे दिसल्यास लगेच वैद्यकीय सल्ला घ्यावा .
साध्या डेंगू मुळे फारसा त्रास होत नाही . बरचसे रुग्ण तर डॉक्टरांकडे जाणेही टाळतात तरी बरे होतात . फक्त ताप व अंगदुखी साठी क्रोसिन ची गोळी पुरेशी ठरते व फारसा औषधोपचार करावा लागत नाही. डेंगू च्या वायरस किवा विषाणू साठी वेगळे काही औषध घ्यावे लागत नाही. डेंगू च्या सौम्य आजारात कमी होणार्या प्लेटलेट ह्या आपोआप सुधारतात. त्याला कुठलेही औषध द्यावे लागत नाही . ताप गेल्यानंतर प्लेटलेट पेशी कमी व्हायला लागतात व साधारण तीन ते चार दिवसानी परत वाढायला लागतात . एकदा प्लेट लेट पेशी वाढायला लागल्या कि त्यांचा वाढण्याचा दर फास्ट असतो . प्लेटलेट पेशी जर १०हजार च्या खाली गेल्या तर रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते म्हणून डॉक्टर प्लेट लेट पेशी देतात .हा एक तात्पुरता उपाय आहे तोही धोका टाळण्यासाठी. पण प्लेटलेट पेशी कमी होणे हे डेंगू च्या तीव्रतेचे लक्षण नाही. ब्लड प्रेशर किंवा बी पी कमी होणे , हातपाय थंड पडणे , लघवी कमी होणे हे गंभीरतेचे लक्षण आहे . शरीराच्या प्रतिकार शक्तीच्या परिणामांमुळे हे गंभीर परिणाम होतात व त्यांचा प्रभाव शरीरातील अवयवांवर होतो. गंभीर डेंगूचे प्रमाण(टक्केवारी) कमी असते. डेंगू झालेल्या थोड्या रुग्णांनाच गंभीर आजार होतो तरी त्यामुळे धोका होऊ शकतो . ह्याचा उपचार हा अतिशय सतर्कतेने करणे आवश्यक असते .
बहुतांशी रुग्णांमध्ये डेंगू फारसा त्रासदायक नसतो . त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नसते . त्याच प्रमाणे प्रत्येक रुग्णालाच दवाखान्यात भरती करण्याचीही गरज नसते
डेंगू ची तीव्रता ही प्लेटलेट पेशींच्या संख्येवर अवलंबून नसते. प्रत्येक रुग्णाला प्लेट लेट पेशी देण्याची गरज नसते . प्लेटलेट पेशी आपोआप वाढतात (काहीही औषध न देता). त्यामुळे पपई च्या पानांचा रस किंवा इतर कुठलेही औषध दिल्यामुळे काही फायदा होईल असे नाही . त्याचप्रमाणे गंभीर डेंगू मध्ये अशा पानांचा काही उपयोग झाल्याचे वैज्ञानिक उदाहरण नाही. आता तर पपई च्या पानांचा अर्क असलेल्या महाग गोळ्या उपलब्ध झाल्या आहेत . वैज्ञानिक दृष्ट्या त्यांचा काहीही उपयोग होण्याची शक्यता नाही.
डासांचा बंदोबस्त करणे व धोक्याची लक्षणे ओळखून डॉक्टरांचा सल्ला घेणे हे अतिशय महत्वाचे उपाय आपल्या हातात आहेत . ह्या उपायांवर लक्ष केंद्रित करणे आणि बाकी घरगुती उपचाराच्या मर्यादा समजून घेणे हे महत्वाचे!
डॉ विनायक हिंगणे
Thank you for simple yet helpful analysis of dengue
LikeLiked by 1 person
very well written in such a silmple way…
LikeLike
धन्यवाद!☺
LikeLike
Thank you
LikeLike
very well written in such a silmple way…
LikeLike
Thank you!☺
LikeLike
सर तुम्ही खुप चागल्या प्रकारे माहिती दिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार….
LikeLike