Scroll to top

गोष्ट एका लढाईची


vinayakhingane - October 17, 2015 - 7 comments

IMG_5633

तू युयु ह्यांना मलेरियावर औषध शोधून काढल्याबद्दल नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे . ह्यानिमित्ताने मलेरिया कडे पुन्हा लक्ष वेधल्या गेले . मलेरिया हा अगदी जुना आजार . १६३२ मध्ये बार्नाबे दे कोबो ह्या मिशनरी ने चीन्चोना नावाची वनस्पती मलेरिया वर उपयोगी म्हणून पेरू मधून स्पेन मध्ये आणली . तेव्हा पासून मलेरिया वर भरपूर संशोधन झाले. ह्या ज्ञानाचा उपयोग करून  १९५१ मध्ये यु एस ए मलेरिया मुक्त झाला . ह्या मोठ्या विजयानंतरही आज मलेरिया जगातील एक मोठे आव्हान आहे . तू युयु ह्यांनी ह्यांच्या औषधांनी जगातील डॉक्टरांना एक मोठा दिलासा मिळाला आहे . त्यांचा औषधाने बरेच जीव वाचले आहेत . जेनेटिक्स व बायोतेक्नोलोजी च्या काळात मलेरिया सारख्या जुन्या विषयावरील संशोधनाला मिळालेले नोबेल हे त्या संशोधनाचे महत्व अधोरेखित करते .  मलेरियाची गोष्ट ही एका मोठ्या लढाईची गोष्ट आहे .

जुन्या काळात जेव्हा आपले आजारांविषयी चे ज्ञान खूपच सीमित होते त्या काळात मलेरिया ला थांबून परत येणारा ताप (इंटर मीतंत फिवर ) किंवा हिवताप म्हणून ओळखायचे . दलदलीच्या भागात आढळणारा हा ताप दुषित हवेमुळे होतो असा त्या काळी समज होता . त्या काळात बरेचशे आजार हे वाईट हवेमुळे होतात असा समज असल्यामुळे चांगल्या हवेच्या ठिकाणी राहायला जाने हा उपाय समजल्या जायचा. अशा काळात चीन्चोना नावाची वनस्पती हिवतापावर गुणकारी आहे असे समजून बार्बाने दे कोबो ह्या व्यक्तीने १६३२ मध्ये चीन्चोना वनस्पती पेरू मधून स्पेन मध्ये आणली . पुढे युरोपातील केमिस्ट  कावेन्तु आणि पेलेतीयर ह्यांनी चीन्चोना मधील अर्कातून क्विनीन हे औषध द्रव्य १८२० मध्ये शोधून काढले . ह्या औषधाचा उपयोग मलेरिया च्या इलाजासाठी जरी होत असला तरी मलेरिया का व कसा होतो ह्याचे उत्तर मिळायला पुढील बरीच वर्षे शास्त्रज्ञांना मेहनत करावी लागली .
अशाच शास्त्रज्ञांपैकी फ्रेंच डॉक्टर चार्ल्स लुईस अल्फान्सो लेवेरण ह्यांनी मलेरिया कशामुळे होतो ह्याचा छडा लावायचा ध्यास घेतला. मलेरिया च्या रुग्णांच्या रक्ताचा त्यांनी अभ्यास सुरु केला. त्या काळातील अतिशय प्राथमिक अशा उपकरणांच्या मदतीने ते रक्ताचा अभ्यास करीत . हा अभ्यास करताना त्यांना लाल रक्तपेशींमध्ये काही परजीवी किंवा जंतू दिसून आले . त्या काळातील असा शोध हा वाखाणण्या सारखा होता. मलेरिया हा दुषित हवेतून होणारा आजार नसून विशिष्ट जंतूमुळे होणारा आजार आहे हे सिद्ध झाले . अल्फान्सो लेवेरण हे एवढे करून थांबले नाहीत तर हे जंतू माणसाच्या शरीरात कसे येतात ह्याचा शोध लावण्याचा त्यांनी प्रयत्न सुरु केला . वातावरणातील माती पाणी इत्यादी घटकांमध्ये मलेरियाचे जंतू सापडतात का ह्याचा शोध ते घेऊ लागले . पण त्यांच्या शोधाला यश मिळण्यापूर्वी त्यांची बदली झाली आणि त्यांचा अभ्यास थांबवावा लागला . मलेरिया चे जंतू माणसाच्या शरीरात कसे येतात ह्याचे गूढ अनुत्तरीतच राहिले  . पुढे  कॅमिलीओ गोल्गी ह्या इटालियन शास्त्रज्ञाने मलेरिया चे वेगवेगळे प्रकार असून त्यात वेगवेगळ्या कालावधीचा ताप येतो  असे शोधून काढले . त्यांनी क्विनीन चा मलेरियावर काय परिणाम होतो ह्याचा सुद्धा अभ्यास केला . Golgi tendon apparatus व  Golgi body ह्या पेशीतील घटकाचा शोध लावणारे न्युरो शास्त्रज्ञ हेच  गोल्गी .
ह्याच सुमारास भारतात  काम करणारे ब्रिटीश डॉक्टर रोनाल्ड रोस ह्यांनी मलेरिया चा भारतात अभ्यास केला . डासांच्या चावण्यामुळे मलेरिया होतो असा अंदाज बांधून मलेरियाचे जंतू डासामध्ये सापडतात का हे त्यांनी अभ्यासून पहिले. डास व मलेरियाचे सूक्ष्म जंतू ह्याचा अभ्यास करणे हे त्या काळी अतिशय कठीण व किचकट असे काम होते . त्यांनी अथक प्रयत्नानंतर मलेरिया चे परजीवी डासामध्ये असतात हे १८९७ मध्ये  सिद्ध केले . त्यांनी पक्ष्यांमधील मलेरिया वर सुद्धा संशोधन केले . मालेरीचे जंतू डासांमध्ये त्यांच्या जीवनचक्रातील एक भाग पूर्ण करतात व नंतर डासांच्या लाळेतून माणसाच्या शरीरात प्रवेश करतात.  सर रोनाल्ड रोस व अल्फान्सो लेवेरण ह्यांना त्यांचा शोधाबद्दल पुढे नोबेल पारितोषिक देण्यात आले .
वरवर बघता हे शोध साधे वाटतील . पण ह्या शोधांनी करोडो जीव वाचवले आहेत . माणसाच्या इतिहासातील मोठ्या शत्रूवर मात करण्यासाठी ह्या शोधानी मोलाची मदत केली आहे . मलेरिया डासांमुळे पसरतो हे समजल्यावर पनामा कालव्याचा कामाच्या वेळी ह्या ज्ञानाचा उपयोग झाला . १९०६ ते १९१० च्या सुमारास साठलेल्या पाण्याचा निचरा करून आणि मच्छरदानीचा उपयोग करून मलेरिया चा उपद्रव खूप प्रमाणात कमी झाला . पुढे १९३९ मध्ये पोल म्युलर ने DDT चा शोध लावला . ह्या शोधामुळे डासांचा नायनाट करून अमेरिका १९५१ मध्ये मलेरिया मुक्त झाली . म्युलर ह्यानासुद्धा नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे . आज   DDT च्या दुष्परिणामांमुळे व डासामधील प्रतिकार शक्तीमुळे नवीन रसायने उपयोगात आणल्या जातात . डासांचा बंदोबस्त व योग्य औषधोपचार ह्याच्या मदतीने  अनेक देश मलेरिया मुक्त झालेत . तरीही आजही अनेक विकसनशील देश मालेरीयाशी झुंज देतात आहेत . भारतात १९५३ मध्ये मलेरिया विरोधी कार्यक्रम सुरु करण्यात आला . १९५८ व १९६१ मध्ये मलेरिया वर नियंत्रण मिळवण्यात छान यश मिळाले पण मग कुठे माशी शिंकली हे कळले नाही . मलेरिया चे प्रमाण वाढले . राजकीय किंवा सामाजिक समस्या, भौगोलिक मर्यादा  असो किंवा यंत्रणेत गडबड असो आपला मलेरिया विरोधी कार्यक्रम कुठेतरी कमी पडला .मलेरिया विषयी  भारतातील सरकारी आकडे व बिगर सरकारी आकडे व शास्त्रीय अंदाज ह्यात खूपच तफावत आहे . पण प्रक्टिस करणाऱ्या डॉक्टरांचा अनुभव गृहीत धरला तर भारतात मलेरियामुळे खूप लोक आजारी पडतात व मृत्यूही होतात ह्याविषयी दुमत होणार नाही . आपल्या स्थानिक सरकारवर मलेरिया पसरू नये ह्यासाठी दडपण आणणे चुकीचे ठरणार नाही  त्याचप्रमाणे आपल्या परीने डासांचे नियंत्रण करण्याचा प्रयत्न करणे आपल्या हातात आहे . डासांपासून संरक्षणासाठी रसायन  फवारलेली मच्छरदानी अतिशय उपयुक्त आणि सुरक्षित असते असे अभ्यासात आढळून आले आहे. डासांपासून बचावासोबत थंडीताप आल्यास काळजी घेऊन योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे .
योग्य उपचार झाला नाही तर मलेरिया उग्र रूप धरण करू शकतो. रक्तातील हिमोग्लोबिन कमी होणे , किडनीवर व इतर अवयवांवर परिणाम होणे व जीवास धोका होण्यापर्यंत मलेरिया गंभीर होऊ शकतो . फ्याल्सिप्यारम नावाची मलेरियाची एक जात मेंदूवर परिणाम करण्यासाठी व गंभीर आजार करण्यासाठी कुख्यात आहे . पण योग्य इलाज झाल्यास मलेरिया लगेच ठीक होऊ शकतो . मलेरिया ची चाचणी करण्यासाठी आरोग्यसेवक गावोगाव फिरून रक्ताचे नमुने गोळा करतात व औषधही पुरवतात . त्यांच्यामुळे मलेरिया चा अटकाव होण्यास मोठी मदत होते.
 मलेरिया चे काही जंतू क्लोरोक्वीन ला जुमानत नाहीत . अशा वेळी कठीण परिस्थिती उद्भवू शकते . अशा वेळी तू युयु ह्यांनी जुन्या चायनीज औषधी गुण असलेल्या वनस्पती मधून शोधून काढलेल्या औषधांची मदत होते . त्यांनी शोधून काढलेल्या औषधांचा उपयोग इतर औषधांसोबत करून मलेरिया च्या जंतूंचा प्रतिकार मोडून काढता येतो . फ्याल्सिप्यारम सारख्या डेंजर जन्तुवर हे प्रभावी औषध आहे . कितीतरी गंभीर रुग्णांना वाचवण्याचे श्रेय ह्या औषधाला व परिणामी तू युयु ह्यांना जाते .
काही दशकांपूर्वी शास्त्रज्ञानी मलेरिया ची त्वरित होणारी Rapid malaria test शोधून काढली . ह्या तपासणी मुळे मलेरिया चे निदान चोख व त्वरित होऊ लागले . त्यासाठी खूप अनुभवी तंत्रज्ञ असण्याची गरज न राहता मलेरिया ची तपासणी सहज झाली. लवकर व चोख उपचार होण्याची संधी मिळू लागली .
हे सगळे शास्त्रज्ञ मलेरिया विरुद्ध च्या आपल्या लढाईतील शूरवीर आहेत . ही लढाई अजून संपलेली नसून अजूनही नवीन शास्त्रज्ञ नवीन उपचार ,लसी प्रतिबंधात्मक उपाय शोधून काढण्यासाठी झटतात आहेत . तू युयु ह्यांच्या नोबेल च्या निमित्ताने ह्या सगळ्यांची आठवण करावी असे वाटले . ह्या सगळ्यांना सलाम .
Contact Us
close slider

    ×

    Hello!

    Click one of our representatives below to chat on WhatsApp or send us an email to vinayakhingane@gmail.com

    ×
    %d bloggers like this: