Scroll to top

“रिस्क ” चा इतिहास


vinayakhingane - December 22, 2015 - 9 comments

IMG_4596

हेल्थी लाईफ स्टाईल किंवा निरोगी जीवनशैली हा आपल्या सगळ्यांचा आवडता विषय आहे . पु ल देशपांडे बटाट्याच्या चाळीत वजन कमी करण्यासाठी लोक कायकाय सल्ले देतात ह्याचे वर्णन काय उत्तम करतात . ते सल्ले आपल्याला आजही कुणीतरी देतातच . भात सोडा , स्मोकिंग सोडा , बोलणे सोडा इतकाच काय तर बटाट्याची चाळ सोडा . ह्याशिवाय हे खा , असा व्यायाम करा असे योग करा , हे च्यवनप्राश खा, तमुक दुध प्या . आरोग्यविषयक सल्ल्यांपासून आपली काही सुटका नाही . आजीच्या बटव्यापासून ते ताईच्या स्कीन केयर पर्यंत किंवा आजोबांच्या योगसाधनेतून कमावलेल्या शरीरसंपदे पासून ते डॉक्टरांनी दिलेल्या तंबी पर्यंत बरेच सल्ले आपण ऐकत मोठे झालेले असतो . घराबाहेरील प्रत्येक व्यक्तीची ‘निरोगी जीवनशैली’ विषयी वेगळीच कल्पना असते . एखाद्या गोष्टीबद्दल “काही नाई व्हत न बे” पासून तर “मरशीन न बे “अशा टोकाच्या कल्पना असू  शकतात . त्यामुळे आपण “निरोगी जीवनशैली ” किंवा हेल्थी लाईफ स्टाईल काय असते ह्याबद्दल साशंक होणे स्वाभाविक असते .  आपण शेवटी आपल्या अनुभवानुसार काय करणे हेल्थी आणि काय अनहेल्थी हे ठरवू लागतो . आपल्याला ज्या गोष्टींची भीती वाटते त्या गोष्टी वाईट किंवा अनहेल्थी आणि ज्याची भीती वाटत नाही किंवा आपण ज्या गोष्टीशी कम्फर्टेबल आहोत त्या गोष्टी हेल्थी असा समज करून घेणे सहज शक्य आहे . वेस्टर्न किंवा पश्याच्त संस्कृती आरोग्यासाठी  वाईट ( किंवा मुळात ती संस्कृतीच नाही ) असे आपल्याला भारतात नेहमीच ऐकायला मिळते .आपल्याकडे पाश्यात्य पद्धतीचे जेवण व फास्ट फूड चे प्रमाण हल्ली वाढले आहे व हृदयविकाराचे प्रमाणही वाढले आहे . त्यामुळे पाश्यात्य जीवनशैलीशी निगडीत सगळ्याच गोष्टी अनहेल्थी असाव्यात असा पूर्वग्रह आपल्या मनात असू शकतो . तो माझ्याही मनात होता . पण  भारतातील सरासरी जीवनमानापेक्षा पाश्यात्य सरासरी जीवनमान बरेच जास्त आहे . इंग्लंड मधील बरीचशी वयस्कर मंडळी८० किंवा ९० वर्षांची होऊनही काटक असलेली बघण्यात आली . त्यामुळे खरच पाश्यात्य संस्कृती आरोग्यासाठी वाईट आहे का असा प्रश्न मला पडला . त्यातूनच ‘निरोगी जीवनशैली ‘ ही संकल्पना शास्त्रीय भाषेत कशी आली ह्याचा विचार मनात आला . ह्या निरोगी जीवनशैलीचा इतिहास मनोरंजक आहे .

निरोगी जीवनशैली म्हटली की आयुर्वेदाचा उल्लेख येणारच . आयुर्वेदात निरोगी जीवनशैली कशी असावी किंवा काय करावे आणि काय टाळावे ह्याबद्दल मार्गदर्शन आहे . ह्यातील काही गोष्टी आजही उपयोगी ठरतात आणि काही गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत असे माझ्या काही आयुर्वेदात तज्ञ असलेल्या डॉक्टर मित्रांचे मत आहे . माझा आयुर्वेदात अभ्यास नसल्यामुळे मी त्यावर काही बोलणे टाळिन . पण आजकालच्या अल्योप्याथी किंवा आधुनिक मेडिसिन मध्ये आपण निरोगी जीवनशैली हा शब्द्प्रचार मुख्यत्वे हृदयविकाराच्या, डायबेटीस  किंवा स्ट्रोक (अर्धांगवाय किंवा लकवा)ह्यांच्या संदर्भात करतो . हे आजार जीवनशैलीशी निगडीत आजार म्हणून ओळखले जातात आणि म्हणून ह्या आजारांपासून बचाव करणारी जीवनशैली चांगली व ज्या गोष्टींमुळे हे आजार होण्याची शक्यता वाढते त्या गोष्टी वाईट . ह्या आजारांपैकी संशोधकांचे लक्ष वेधले ते हृदयरोगाने .
१८१२ मध्ये ज्योन वॉरेन ह्या डॉक्टरने लिहिलेला एक लेख माझ्या वाचण्यात आला . हृदयविकारामुळे छातीत दुखण्याला अंजायना म्हणतात . अंजायनाचे प्राथमिक वैद्यकीय वर्णन ह्या लेखामध्ये केलेले आहे . त्या काळात छातीत दुखण्याचे कारण किंवा त्याचा परिणाम ह्याची फारशी माहिती डॉक्टरांना नव्हती . फार काय तर आपले हृदय कसे काम करते ह्याबद्दल  माहितीही वैद्यकशास्त्राला तशी नवीनच होती . विलियम हार्वे ह्यांनी सतराव्या शतकात हृद्य आणि रक्तवाहिन्या कश्या काम करतात हे प्रयोगानुसार सिद्ध केल्यानंतरच  थोडेफार कळू लागले . त्याआधी आपले हृद्य ‘न्युमा’ नावाचे जीवनद्र्व्य तयार करते असा काहीसा समज होता . असो . पुढे रक्ताभिसरण कसे होते हे चांगले कळण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले. १८१२ च्या लेखात छातीत दुखणाऱ्या रुग्णाच्या रक्तवाहिन्या मध्ये काहीतरी दोष असून हृदयात बिघाड झाल्याची शक्यता मांडली आहे . त्या काळातील काही इलाज आज अतिशय विचित्र वाटतात . उदाहरणार्थ त्या काळात अशा रुग्णाचे रक्त काढल्या जाई .त्या काळात  रक्त काढणे हा बर्याच आजारांवर उपाय समजल्या जाई . काही वेळेस रक्त काढल्याने हृदयावरील ताण कमी होऊन काही रुग्णांना थोडाफार फायदाही होऊ शकेल पण बर्याच रुग्णांची तब्येतही ढासळत असे . हे रक्त किती प्रमाणात काढायचे हे डॉक्टर ठरवत . ही प्रथा बरीच प्रचलित होती . काही लोक तर रक्त काढणे (ब्लड लेटींग) हे रोग टाळण्यासाठी उत्तम म्हणून निरोगी लोकांचेही रक्त काढीत . रोबिन हूड च्या गोष्टीतही रोबिन हूड म्हातारा झाल्यावर अशा पद्धतीने त्याचे रक्त काढल्याचा उल्लेख आहे .हे रक्त काढण्यासाठी नस कापन्याशिवाय इतरही उपाय लोक करीत . शरीरातील रक्त काढण्यासाठी लीच किंवा जळवांचा वापर करण्याची प्रथा ही तिथून आली . निरोगी जीवनशैलीची ही संकल्पना आजच्या काळात अगदीच चुकीची वाटते .
१८१२ मध्ये अंजायना विषयी लेख प्रकाशित झाल्यानंतर तब्बल एका शतकानंतर १९१२ मध्ये जेम्स हेरिक नावाच्या डॉक्टरांनी हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये रक्त गोठल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो हे सिद्ध केले . हृदयविकाराच्या आजाराच्या संशोधनात हा लेख क्रांतिकारी ठरला . त्या काळातील हृदयरोगावरील उपचार हे आजच्या मानाने अगदीच प्राथमिक स्वरूपाचे होते  पण  त्यांच्या संशोधनामुळे  हृदयरोग किंवा हार्ट अटयाक कसा होतो हे आता समजू लागले होते . तरीही तो कशामुळे होतो हे अजून कोडेच होते . बरेचशे आजार हे जीवजंतू मुळे होतात पण हृदयरोग किंवा रक्तवाहिन्यांचे आजार (अथेरोस्क्लेरोसीस ) हे जीवजंतूमुळे होत नाहीत . ते वाढत्या वयानुसार होणार्या बदलांमुळे होतात असा एक समाज होता . पण हृदयविकार व स्ट्रोक ह्यांचे वाढते प्रमाण बघून अमेरिकेतील फ्रेमिन्घम ह्या गावात १९४२ मध्ये  एक प्रयोग सुरु करण्यात आला. हा प्रयोग म्हणजे खूप हायफाय तंत्रज्ञान वगैरे किंवा चित्रपटाला शोभेसा वैज्ञानिक प्रकल्प नव्हता . फ्रेमिन्घम  मधील ५२०९ स्त्री-पुरुषांना निवडण्यात आले. ही मंडळी ३० ते ६२ वर्षे ह्या वयोगटातील होती . पुढील २० वर्षे ह्या लोकांच्या आरोग्यविषयक नोंदी ठेवायच्या . बस . एवढाच हा प्रयोग . अगदी निरस वाटावा असा हा प्रयोग आहे . पण आजच्या वैद्यकशस्त्रापासून ते घराघरापर्यंत ह्या प्रयोगाचा प्रभाव पडला आहे . साध्या कल्पना जग गाजवतात त्याचे हे उदाहरण म्हणता येईल  . ३० ते६२ ह्या वयातील मंडळींची वैद्यकीय तपासणी व जीवनशैलीतील महत्वाच्या घटकांची नोंद करण्यात आली . त्यानंतर ठराविक अंतराने त्यांच्या पुन्हा पुन्हा मुलाखती घेऊन त्यांच्या जीवनशैली आणि वैद्यकीय नोंदी ठेवण्यात आल्या . ह्यात लोकांना अमुक करावे , तमुक करू नये असे बंधन नव्हते . अर्थातच प्रत्येकाची वैयक्तिक माहिती नावासकट उघड होणार नाही ह्याची हमी आणि काळजी घेण्यात आली .काळानुसार काही लोकांना हृदयविकार झाला आणि काहीना झाला नाही . त्यामुळे ज्यांना हृदयविकार झाला त्या लोकांच्या आणि ज्यांना झाला नाही त्या लोकांच्या जीवनशैलीत काय साम्य आहे आणि काय वेगळेपण आहे ह्याचा अभ्यास करणे शक्य झाले . ह्यातून जीवनशैलीतील काही घटक हे हृदयविकारासाठी घातक किंवा ‘रिस्की’ आहेत असे दिसून आले . स्मोकिंग हा सर्वप्रथम ओळखला गेलेला रिस्क घटक . त्यानंतर ह्या प्रयोगातून मिळालेल्या माहितीतून कोलेस्तेरोल ची वाढलेली पातळी, उच्च रक्तदाब किंवा हाय ब्लड प्रेशर  असल्यास हृदयविकार होण्याची शक्यता वाढते हे कळले . त्याचप्रमाणे एच डी एल कोलेस्टेरोल आणि शारीरिक व्यायाम ह्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो हे कळले . वीस वर्षे मेहनत करून व वरवर रटाळ व निरस वाटणाऱ्या प्रयोगातून जी माहिती मिळाली त्यामुळे रक्तवाहिनीतील आजारांचे गुपित उघडायला सुरुवात झाली . ह्या माहितीच्या आधारे खात्रीशीर अंदाज बांधता येऊ लागले आणि ह्या प्रयोगाचे महत्व जगाला कळू लागले . २० वर्षानंतर हा प्रयोग बंद न करता सुरु ठेवण्यात आला . पुढच्या पिढ्या आणि फ्रेमिन्घम मध्ये स्थलांतरित झालेले नवीन लोकही ह्या प्रयोगात सामील करण्यात आले . पुढे वेगवेगळ्या छोट्या प्रयोगांमधून ही माहिती पडताळून बघण्यात आली . डॉक्टर आपल्या रुग्णामधील जीवनशैलीतील घटक ह्या रिस्क घटकांशी पडताळून पाहू लागले . ह्यातून आपल्या जीवनशैलीतील काही घटक चांगले आणि काही घटक वाईट असे म्हणयला सुरुवात झाली आहे . फ्रेमिन्घम हार्ट स्टडी मधील रिस्क घटक एकत्र करून एक ‘रिस्क स्कोर ‘ बनवण्यात आला आहे . इंटरनेटवर आपण स्वतः आपला रिस्क स्कोर काढून बघू शकतो . ह्यात आपले वय , स्त्री /पुरुष, आपले वजन आणि उंची (बी एम आय), डायबेटीस किंवा हाय ब्लड प्रेशर आहे किंवा नाही , स्मोकिंग , आणि कोलेस्टेरोल अशी माहिती लागते . त्यातून पुढील १० वर्षात आपल्याला हृदयविकार होण्याची किती टक्के रिस्क आहे हे आपल्याला मोजता येते .
क़्यु रिस्क २ नावाचे (QRISK2) नावाचे आणखी एक रिस्क क्याल्क्युलेतर नेटवर उपलब्ध आहे . ह्यात आपल्याला हृदयविकार व डायबेटीस ची रिस्क किंवा पुढील दहा वर्षात आपल्याला डायबेटीस होण्याचा किती टक्के धोका आहे हे काढता येईल .
वाढलेले वजन , धुम्रपान , कोलेस्तेरोल , डायबेटीस किंवा हाय बी पी ह्या मुळे हृदयविकार होतोच असे नाही . तुम्ही स्मोकिंग केल्यानी तुम्हाला लगेच हृदयविकार होईल किंवा हार्ट अटयाक येईल असे नाही . पण स्मोकिंगमुळे पुढील १० वर्षात किंवा पुढील ३० वर्षात तुम्हाला हृदयविकार होण्याची रिस्क किती टक्के वाढते हे तुम्ही स्वतः मोजू शकता . तुमचे वजन कमी केल्याने किती टक्के धोका कमी होतो हे सुद्धा तुम्ही बघू शकता . वय किंवा तुम्ही स्त्री आहात कि पुरुष हे आपण  बदलू शकत नाही पण जीवनशैलीतील काही घटक आपण नक्कीच बदलू शकतो  व हृदयविकाराची रिस्क कमी करू शकतो .
जीवनशैलीतील ह्या रिस्क घटकांकडे आपले लक्ष फ्रेमिन्घम हार्ट स्टुडी ने वेधले . त्यानंतर जीवनशैलीशी निगडीत इतर आजारांच्या बाबतीत ह्या घटकांची तुलना होऊ लागली .उदाहरणार्थ  स्मोकिंग्मुळे  कर्करोग होण्याची रिस्क वाढते हे काही अभ्यासकांच्या लक्षात आले . आज जीवनशैलीतील काही घटक चांगले किंवा काही घातक असे आपण शास्त्रीय माहितीच्या आधारावर म्हणू शकतो . पण अनेक घटक चांगले किंवा वाईट म्हणावेत असा शास्त्रीय पुरावा अजूनही आपल्याकडे नाही . फ्रेमिन्घम स्टडी सारखे प्रयोग आपले ज्ञान वाढवत आहेत . आपले ज्ञान असेच वाढो आणि पुढच्या पिढ्यांना त्याचा उपयोग होवो !
Contact Us
close slider

    Discover more from Vinayak Hingane

    Subscribe now to keep reading and get access to the full archive.

    Continue reading

    ×

    Hello!

    Click one of our representatives below to chat on WhatsApp or send us an email to vinayakhingane@gmail.com

    ×