मराठीदिनानिमित्त

IMG_20160220_133619

मराठी ही माझी पहिली भाषा. घरची अन शाळेतलीसुद्धा. माझं प्राथमिक शिक्षण पूर्ण मराठीत झालं. त्यानंतर शाळेत इंग्रजी शिकलो. मेडिकल कॉलेज ला वैद्यकीय इंग्रजी शिकलो. ही इंग्रजी नेहमीच्या इंग्रजीपेक्षा जरा वेगळी आहे. त्याला लोक मेडिकल जारगन असे म्हणतात. ही वैद्यकीय इंग्रजी इंग्लंड मधील साधारण लोकांना सुद्धा कळत नाही. अशा किचकट भाषेत शिकायचे म्हणजे एक मजाच असते. इंग्रजी माध्यमात शिकलेले असोत किंवा कुठल्याही प्रादेशिक भाषेत शिकलेले विद्यार्थी असोत, वैद्यकीय इंग्रजी शिकताना सगळ्यांचीच बोबडी वळते. उच्चार, स्पेलिंग त्या शब्दांचा उगम सगळंच चमत्कारिक वाटतं. पुढे चालून हीच भाषा इतकी अंगवळणी पडते की नवीन माणसाला पूर्ण चक्रावून टाकणारी वाक्ये किचकट वैज्ञानिक संकल्पना पटकन समजावून जातात. वैद्यकीय ज्ञान ह्या भाषेमुळे सोपं वाटायला लागतं. शरीररचना, शरीर प्रक्रिया, रोग, आजार , उपचार इत्यादींच्या संकल्पना ह्या वैद्यकीय इंग्रजीत अगदी तोंडपाठ होतात. खरी मजा येते ती तुम्ही रुग्ण किंवा नातेवाईकांशी बोलताना. डॉक्टर आणि पेशंट एकमेकांना आपलं म्हणणं समजवण्याचा आणि एकमेकांचं म्हणणं सजून घेण्याचा खूप प्रयत्न करतात. कधी कधी हे सहज होऊन जातं, तर कधी कधी सगळा जांगडबुत्ता होऊन जातो. काळानुसार जसे जसे  डॉक्टर आणि पेशंट अनुभवी होत जातात तसे संभाषण सुरळीत होऊ लागते. डॉक्टर पेशंट संभाषणाला खूप पैलू असतात. अर्थातच भाषा हा एक फार महत्वाचा पैलू आहे. प्रादेशिक भाषा आणि बोलीभाषा ह्यांची चांगली समज असणे एका डॉक्टरसाठी अनिवार्य असते तर डॉक्टर मंडळीही भाषेला वेगवेगळ्या शब्दांची आणि संकल्पनांची देण करत असतात. मराठीची आवड आणि डॉक्टरकी ह्या दोन्हीमुळे भाषेच्या मजेचे असे काही प्रसंग लक्षात राहतात.

मराठीत काही विलक्षण शब्द आहेत. त्या शब्दांचे समानार्थी आणि समान भावार्थ असलेले शब्द इतर भाषांमध्ये सापडणे कठीण असते. त्यातल्या त्यात इंग्रजीमध्ये असे समानार्थी शद्ब शोधताना आपले इंग्रजी शब्दकोशचाचे थोडके ज्ञान अडचणीत भरच टाकते. पेशंटला माहिती त्याच्या भाषेत विचारायची आणि त्याच्या लक्षणांची नोंद मराठीत करायची अशी कसरत आम्ही डॉक्टर करत असतो. एकदा माझ्या एका वरिष्ठ डॉक्टरांनी मला विचारले की पेशंटला ठसका लागला तर त्याला इंग्रजीत काय म्हणणार? मी म्हटलं cough . ते म्हणाले पण cough म्हणजे खोकला. वाचनाराला कसे कळणार की मला ठसका म्हणायचंय? ह्या प्रश्नाचं नीट उत्तर मला काही देता आलं नाही. दात आणि हिरड्या सळसळणे ही काही लोकांची तक्रार असते. ह्या सळसळणे ला इंग्रजीत काय म्हणायचे? पोटात ढवळणे हा पण असाच शब्द. दुखणं अंगावर काढणे आणि दुखण्याकडे दुर्लक्ष करणे ह्यात जो बारीकसा फरक आहे तो इंग्रजीत दाखवणे कठीण जाते. अशा वेळी मला ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ मधल्या बबण्याची आठवण येते.इंग्लिश जॉनरावला कुंडली, गोत्र आणि बस्ता इत्यादी मराठी गोष्टी समजवताना त्याची जशी तारांबळ उडते तशीच डॉक्टरांचीही उडते.

लक्षणांच्या संकल्पना ही वेगवेगळ्या असतात. त्या समजून घेणे आवश्यक असते. आमच्या बुलडाण्याकडे कडे ‘पोटात गाठ जाणे ‘असा वाक्प्रचार आहे. माझ्या पोटात गाठ गेली म्हणजे पोटात cramp किंवा कळ आली आणि ह्याचा tumor वाल्या गाठीशी संबंध नाही. असे वाक्प्रचार कधीकधी नवीन  डॉक्टरांना चक्रावून टाकू शकतात. ‘ऊन लागणे ‘ म्हणजे फक्त हिट स्ट्रोक नसून हिट इलनेस आहे.  उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांपैकी heat stroke हा सर्वात गंभीर प्रकारचा आजार आहे. उष्णतेमुळे होणारे इतरही त्रास असतात. जसे Heat exhaustionकिंवा थकवा.उन्हामुळे होणाऱ्या कुठल्याही त्रासाला पेशंट ऊन लागले असे म्हणू शकतो.कधी कधी तर उन्हाशी संबंधित नसलेले त्रासही पेशंट ‘ऊन लागले’ म्हणून सांगू शकतात. अशा वेळी नीट चौकशी करून नेमके काय होते आहे हे शोधावे लागते.

रुग्णांशी व नातेवाईकांशी बोलून बोलून नवीन शब्द कळत जातात आणि डॉक्टरांचा शब्दकोश वाढत जातो.  जुलाब होणारा रुग्ण , ढाळ, पडसाकडेला लागणे,हगवण लागणे, संडास लागणे,पोट बिघडणे यासारखा कुठलाही शब्द वापरू शकतो. दुःखाच्या आणि दुखण्याचा जितक्या छटा डॉक्टर ला बघाव्या लागतात तेवढ्या खचितच कुणाला बघाव्या लागत असतील. डॉक्टर वेदनांच्या वेगवेगळ्या प्रकारांचा उपयोग निदान करण्यासाठी करतात. वेगवेगळ्या आजारात वेदनेचा प्रकार आणि तीव्रता वेगळी असते, त्यावरून आजाराचं निदान करता येतं. ह्याचा आणखी फायदा म्हणजे कथा कादंबरी वाचताना किंवा नाटक बघताना त्यातील दुःखाच्या शब्दछटाही चटकन कळतात. एखाद्याचे ठसठसणारे दुःख आणि एखाद्याला आलेली कळ हे कसे वेगळे असतील हे दृश्य अगदी डोळ्यासमोर तरळून जाते. काव्य शास्त्र विनोदप्रमाणे लोकांशी संभाषणही आपल्या अनुभवांना खूप समृद्ध करते यात काही शंका नाही.
रुग्णाशी किंवा नातेवाईकांशी बोलताना वैद्यकीय माहिती त्यांना मराठीत समजावून सांगणे हेसुद्धा तेवढेच आव्हानात्मक असते. काही वैद्यकीय संकल्पना मराठीत सांगताना फक्त भाषांतर न करता कल्पकता वापरून सोपे पण नवीन जोडशब्द तयार करावे लागतात. इतक्यात मी माझ्या सासऱ्यांशी मराठीतील वैद्यकीय लेखावर चर्चा करत असताना त्यांनी shock ह्या संकल्पनेला मराठीत समजवण्यासाठी ‘पेशींना पडलेला दुष्काळ’ असा शब्दप्रयोग सुचवला. तो अतिशय चपखल आहे. कधी कधी इंग्रजी शब्दच रुग्णांना सोपे वाटतात. यकृत पेक्षा लिवर चटकन समजते. न्यूमोनिया , मलेरिया, कॅन्सर इत्यादी आजारांची नावे मराठीत रुळली आहेत. त्यांना पर्यायी शब्द आहेत. पण सर्वसामान्य रुग्ण बोलताना कर्करोगा ऐवजी कॅन्सरच म्हणतात. अशा वेळी बोलताना मराठी भाषांतर न करता हे रुळलेले शब्द वापरून संभाषण सोपे करणेच योग्य असते. पण आरोग्यविषयक लेख लिहिताना मराठी शब्द वापरायचे की मराठीत रुळलेले इंग्रजी शब्द वापरायचे हा संभ्रम कधीकधी पडतो. मी शक्यतोवर लेख हा संभाषणासारखा असावा म्हणून सोपे आणि रुळलेले शब्द वापरण्याचा प्रयत्न करतो. कधीकधी मराठीतील वैद्यकीय शब्द आणि रुळलेले शब्द असे दोन्ही वापरून घेण्यची संधी मिळते. प्लिहा किंवा स्वादुपिंड अशा अवयवांचे उल्लेख आले कि मी त्यांचे इंग्रजी नाव आणि त्यांचे थोडक्यात वर्णन टाकून ते शब्द सगळ्यांना समजणे सोपे जाईल याची काळजी घेतो.

वैद्यकीय ज्ञान हे मराठीत रूपांतरित करणे हे आज फार आवश्यक आहे. मराठी लोकसंख्या मोठी आहे. वैद्यकीय ज्ञान ह्या लोकसंख्येपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना मराठीत उपलब्ध करून देणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. इंग्लड मध्ये patient.co.uk आणि nhs.uk अशा वेबसाईटवर सोप्या इंग्रजीत वैद्यकीय माहिती उपलब्ध असते. ही माहिती सोप्या शब्दात असली तरीही तिचा दर्जा उत्तम असतो. माहिती सोपी करताना त्यातील सार चुकीचा होऊ नये किंवा गाळल्या जाऊ नये ह्याची खात्री केली जाते. वेळोवेळी बदल करून ही माहिती ताजी ठेवली जाते. ह्या वेबसाईट डॉक्टर सुद्धा वापरतात. आपल्याकडेही मराठीत अशी दर्जेदार वैद्यकीय माहिती असण्याची गरज आहे. ह्यात खारीचा वाटा म्हणून मी मराठीतून आरोग्यलिखान सुरु ठेवण्याचा निश्चय आज मराठीदिनी करतो आहे. आपणही आपल्या क्षेत्रात जमेल तसा मराठीचा वापर करून मराठी अधिक समृद्ध करण्यास हातभार लावावा ही विनंती

अंतर्दृष्टी: आजाराच्या निदानामागची प्रक्रिया

IMG_20150526_184212
आपण डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर आपल्या आजाराचे निदान करतात. आपल्याला वेगवेगळे त्रास होतात, बरीच लक्षणे दिसतात आणि त्यातून डॉक्टर नेमका आजार शोधतात. आपल्याला त्रास का झाला ह्याचं उत्तर मिळते. सोबतच त्या आजाराचा ठराविक उपचार करता येतो. हे निदान करताना डॉक्टरांच्या डोक्यात काय प्रक्रिया चालते ह्याचं कुतूहल बऱ्याच लोकांना वाटतं. अगदी सखोल तर नाही पण ह्या प्रक्रियेचं एक रेखाचित्र तुमच्यासमोर मांडणार आहे. सोबतच निदानासाठी आवश्यक तपासण्यांबद्दल थोडेसे सांगणार आहे.

आजारांच्या निदानाचा पाया असतो वैद्यकीय ज्ञान. आजाराचे आणि आपल्या शरीराचे वेगवेगळे पैलू शिकून हे ज्ञान मिळते. याची सुरुवात जरी वैद्यकीय महाविद्यालयात झाली तरी आयुष्यभरात डॉक्टर शिकतच असतात. ह्या ज्ञानाचा वापर निदान आणि उपचार करताना करण्यासाठी बरीच कौशल्ये वापरावी लागतात. कारण निदानासाठी आवश्यक असलेली माहिती सहज मिळत नाही. ती बरेचदा शोधावी लागते.

निरीक्षण कौशल्य:

डॉक्टरांना त्यांच्या ज्ञानासोबतच इतर अनेक कौशल्यांची गरज असते . त्यातील एक महत्वाचे कौशल्य म्हणजे निरीक्षण . एखाद्या कुशल नजरेतून खूप महत्वाची माहिती टिपल्या जाते. जितकी जास्त माहिती, तितके अचूक निदान! आर्थर कोनन डॉयल ह्यांनी जगतील सर्वात प्रसिद्ध काल्पनिक पात्र तयार केले. डिटेक्टीव शेरलॉक होल्म्स आजही खूप फेमस आहे. आपल्याला छोट्या बारकाव्यावरून क्लिष्ट गुपिते उलगडणाऱ्या शर्लोक होल्म्सचे कौतुक वाटते ! हे काल्पनिक पात्र खरे म्हणजे एका डॉक्टर वर आधारित आहे.

आपल्या एका डॉक्टर गुरूंच्या निरीक्षण कौशल्याने प्रभावित होऊन डॉयल ह्यांनी ‘शर्लोक होल्म्स’ चे पात्र उभे केले. शर्लोक होल्म्स चे निरीक्षण कौशल्य आणि त्या निरीक्षणांवरून तर्कसंगत अनुमान काढण्याची क्षमता जबरदस्त आहे. आर्थर कोनन डॉयल ह्यांचे गुरुवर्य असेच प्रतिभावंत होते . ते रुग्णाला फक्त बघूनच त्याचा व्यवसाय, त्याचे सामाजिक व आर्थिक जीवन कसे आहे , त्याला काय व्यसने आहेत इत्यादी अचूक ओळखून सगळ्यांना चकित करत . त्याकाळातील इतर डॉक्टरही अशा निरीक्षण कलेत निपुण असत . आजही वैद्यकीय शिक्षणात निरीक्षणासाठी नजर तरबेज करण्यावर बराच भर दिला जातो.

पेशंट खोलीत शिरताना पासून त्याचे निरीक्षण करणे आवश्यक असते . तो कसा चालतो , कसा उभा राहतो , कसा बोलतो ह्यावरून वेगवेगळ्या आजारांची लक्षणे ओळखता येतात . काही अंदाज बांधणे सोपे असते. उदा: धाप लागल्यामुळे एक वाक्यही बोलू न शकणाऱ्याला श्वास घ्यायला त्रास होतोय . किंवा पोटावर हात धरून कळवळनाऱ्या रुग्णाच्या पोटात दुखत असेल हे ओळखणे तसे सोपे असते . पण काही लक्षणे ह्यापेक्षा छुपी असतात . चाणाक्ष आणि अनुभवी डॉक्टरांची नजर अशी लक्षणे हेरते . पण फक्त अशा निरीक्षणातून निदान नेहमीच अचूक होते असे नाही. अधिक माहिती मिळवण्यासाठी अधिक कौशल्याची गरज पडते.

शारीरिक तपासणी:

निदान अचूक होण्यासाठी जास्तीत जास्त माहितीची गरज असते. निरिक्षणातून मिळालेल्या माहिती पेक्षा जास्त माहिती मिळविण्यासाठी डॉक्टर शारीरिक तपासणी करतात . हात लावून पोट दाबून बघतात , स्टेथोस्कोप लावून आवाज ऐकून बघतात . बोटांनी ठोकून आवाज करून तपासतात . ह्याला पर्कशन म्हणतात . ही पद्धत ब्यारल मध्ये किती पाणी/द्रव आहे हे बघण्यासाठी ते ठोकून बघण्याचा क्लुप्तीवरून आली आहे . ह्या सगळ्या तपासण्या शरीराच्या आत काय चालले आहे हे बघण्यासाठी चाललेली धडपड असते . जे डोळ्यांनी दिसत नाही त्याचा अंदाज इतर ज्ञानेद्रीये वापरून करायचा .

शरीराच्या आत काय चालले आहे ह्याचा जितका चांगला अंदाज डॉक्टर बांधू शकेल तितके निदान चांगले होते . म्हणून डोळ्यांसोबतच कान आणि हात कुशल होणे आवश्यक असते . शरीराचे विच्छेदन करून शरीररचना जाणून घेणे किंवा वेगवेगळ्या अवयवांमध्ये काय दोष आहेत हे बघणे सोपे असते . पण जिवंत माणसाच्या पोटात किंवा छातीत काय सुरु आहे हे कसे बघायचे ह्या धडपडीतून तपासणीच्या वेगवेगळ्या कौशल्यांचा जन्म झाला .

ही चिकित्सेची कौशल्ये निदानाच्या प्रक्रियेत खूप महत्वाची असतात . पण त्यांना बऱ्याच मर्यादाही पडतात . कौशल्य हे व्यक्तीनुसार बदलते . काही लोक कमी तर काही जास्त कुशल असू शकतात . एखादे कौशल्य मिळवण्यासाठी बराच काळ मेहनत करावी लागते. तोपर्यंत त्या व्यक्तीला बर्याच चुकांमधून शिकावे लागते. चिकित्सेच्या कौशल्याचे स्वतः चे अनुभव दुसऱ्याला समजावून सांगणे हे सुद्धा एक आव्हानच असते . वैद्यक शास्त्राने ह्या कलेला एका शास्त्रात रुपांतरीत करण्यासाठी खूप प्रयत्न आणि कष्ट केले . तरीही ह्या पद्धतीने केलेले निदान अचूक होण्याची शक्यता कमी असते . अशा वेळी तंत्रज्ञान उपयोगी पडते . वैद्यकशास्त्राने तंत्रज्ञानाचा सढळ हाताने उपयोग केल्याने आजचे जीवन सोपे झाले आहे .
निदान आणि तंत्रज्ञान:

विल्हेम रोएंटजन ह्या जर्मन वैज्ञानिकाने १८९५ मध्ये क्ष किरणांचा (X rays) शोध लावला आणि एका नवीन वैद्यकीय क्रांतीची सुरुवात झाली . क्ष किरणांच्या मदतीने शरीराचा आत बघण्याची एक नवीन दृष्टी आपल्याला मिळाली. शरीरातील हाडांची परिस्थिती , त्यांना झालेली इजा , फुफ्फुसात झालेला न्यूमोनिया , हृदयाभोवती जमा झालेले पाणी , पोटातील आजार ह्यासारख्या बर्याच गोष्टींचे सरळ फोटोच काढता यायला लागले. अर्थातच आपल्या साध्या डोळ्यांना लगेच कळतील असे हे फोटो नसले तरीही थोड्या सरावाने शरीराच्या आतील अवयव व हाडे ह्यांची खुशाली आपल्याला कळू शकते . क्ष किरणांमुळे निदान सोपे आणि बिनचूक होऊ लागले . शतकानंतर आजही क्ष किरण वैद्यकीय निदानाचा अविभाज्य घटक आहे .

क्ष किरणानंतर बऱ्याच कालावधीने सोनोग्राफीच्या किंवा अल्ट्रासाउंड तंत्रज्ञानाचा उपयोग वैद्यक शास्त्रात व्हायला लागला . जे काही अवयव क्ष किरणांनी पुरेसे नीटसे दिसत नव्हते ते सोनोग्राफीने दिसू लागले . क्ष किरणांपेक्षा खुपच सुरक्षित असलेले हे तंत्रज्ञान गरोदर आई आणि बाळांसाठी वरदान ठरले. पोटातील अवयव बघण्यासाठी ह्याचा सढळ उपयोग होऊ लागला . आता शरीराच्या आतील अवयवांचा विडीयो बघणे शक्य झाले . हृदय कसे सुरु आहे हे साक्षात बघणे सहज शक्य झाले .(ह्यालाच इको किंवा इकोकार्डीओग्राफी म्हणतात) . अवयवांची रचनाच नाही तर अवयवांची क्रिया कशी चालते ह्याची बरीचनवीन माहिती ह्या तंत्रज्ञानाने आपल्याला कळली .आजारांचे निदान आणखी सोपे होऊ लागले .

क्ष किरण आणि सोनोग्राफी सारख्या तंत्रज्ञानालाही मर्यादा आहेत पण त्या मर्यादांसहितही ते खूपच उपयोगी आहे . त्यांनी निदानाची प्रक्रिया इतकी सोपी झाली की कौशल्यांवर विसंबून राहण्याची गरजच थोडी कमी झाली. आता थोडी कमी कौशल्य असेलेले (पण सारखेच ज्ञान असलेले) डॉक्टर उत्तम निदान करू लागले . निदानामध्ये मतभेद होण्याची शक्यता कमी झाली . निदान लवकर आणि बिनचूक होऊ लागले . शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय प्रक्रिया जास्त सुरक्षित झाल्या.

थोडे विचार करण्यासारखे:

वैद्यकीय ज्ञान , कौशल्ये व आधुनिक तंत्रज्ञान ह्यांच्या समन्वयातून आपण आज गंभीर आजारांवर मात करू शकतो, जटील शस्त्रक्रिया पार पाडू शकतो आणि अत्यवस्थ रुग्णाचा जीव वाचवू शकतो . ज्ञान, कौशल्ये आणि तंत्रज्ञान ह्यातील कुठल्याही एका बाबतीत हलगर्जी करून चालणार नाही. उपचार हे रुग्णासाठी सुरक्षित असले पाहिजे ह्यावर सगळ्यांचे एकमत आहे . म्हणूनच अनुभवी आणि कुशल डॉक्टर सुद्धा वेळोवेळी तंत्रज्ञान आणि तपासण्यांचा उपयोग करतात. क्ष किरण आणि सोनोग्राफी हे डॉक्टरांचे नवीन ज्ञानेंद्रिय झाले आहे .

विकसित देशांमध्ये सगळ्याच डॉक्टरांना सोनोग्राफीचा वापर करायला प्रोत्साहित केल्या जाते . इंग्लंड मध्ये छोट्या वैद्यकीय प्रक्रिया जसे पोटातून किंवा छातीतून पाणी काढणे किंवा मानेतील शिरेतून नळी टाकणे अशा प्रक्रियांसाठी सोनोग्राफीची मदत घेणे अनिवार्य असते . ह्यामुळे रुग्णाला इजा होण्याचा धोका कमी होतो. अत्यवस्थ रुग्णांच्या तपासणीमध्ये आणि उपचारात सोनोग्राफी मुळे खूप मदत होते . अगदी मृत्युच्या दाढेतून बाहेर येण्याची संधी रुग्णाला मिळू शकते. उदा: रोड अपघातानंतर रुग्णाच्या पोटात रक्तस्त्राव होत असेल तर तो बाहेरून दिसत नाही . अशा वेळी अपघात विभागात सोनोग्राफी असेल तर लगेच निदान होऊन त्वरित सर्जरी झाल्यास रुग्ण वाचू शकतो . नाहीतर तासभर उशिर झाला तर हाच रुग्ण दगावू शकतो .
सोनोग्राफीचा उपयोग जगभरात सर्वत्र रुग्णसेवेसाठी सर्रास केला जात असताना आपल्याकडे मात्र सोनोग्राफी शापित ठरली आहे . गर्भात असताना मुलगी आहे हे ओळखून गर्भपात करण्यासाठी सोनोग्राफीचा वापर करण्यात येतो . हा वेडेपणा आहे . हा वेडेपणा थांबवण्यासाठी शासनाने गर्भाचे लिंगनिदान रोखण्यासाठी कायदा केला . ह्या कायद्यामुळे सोनोग्राफीच्या वापरावर बंधने आली . आज सगळ्याच महत्वाच्या वैद्यकीय शाखांमधील डॉक्टरांना सोनोग्राफीमध्ये पारंगत असण्याची गरज असताना आपल्याला सोनोग्राफी मशिनी बंद करण्याची वेळ आली आहे . प्रश्न गंभीर आहे आणि गुंतागुंतीचा आहे . कायदा करूनही स्त्री भृणहत्या होतेच आहे . मुलीचे आणि स्त्रियांचे हाल होतातच आहेत . मुलगी झाली म्हणून स्त्रीला त्रास देणारे परिवार आपल्याला सगळ्यांना दिसतातच . ह्या लोकांचे प्रमाण कदाचित खूप थोडे असेल . पण अशा लोकांमुळे आपल्या समाजाला मोठा धोका आहे. बऱ्याच देशांमध्ये गर्भाचे लिंगनिदान हवे असल्यास करून मिळते . लोक आपल्या मुलाची किंवा मुलीची नावे जन्माआधी ठरवतात, बाळासाठी त्यानुसार कपडे आणि खेळणी घेतात , बाळाच्या जन्माच्या आधीच स्वागतासाठी मुलगा असेल तर खोली निळ्या रंगात आणि मुलीसाठी गुलाबी रंगात रंगवतात . मुलगा असो की मुलगी ,बाळाचे स्वागत तितक्याच उत्साहाने करतात . आणि आपल्याकडे मुलींना पोटातच मारून टाकल्या जाते .

सोनोग्राफी वर बंधने घालून ह्या मानसिकतेवर त्यामुळे काही बंधने येतील का हा शंकास्पद मुद्दा आहे. सोनोग्राफी वरील बंधनांमुळे रुग्ण सुरक्षितता मात्र नक्कीच धोक्यात येणार आहे . असंख्य रुग्णांना आपण उपचारापासून वंचित ठेवतो आहोत . टाळता येणाऱ्या इजेपासून वाचवण्या ऐवजी धोक्यात टाकतो आहोत .

ह्या मुद्द्यांमुळे कदाचित न्यायालय ह्या कायद्यात सुधारणा करेल आणि गर्भलिंगनिदान सोडून इतर सोनोग्राफीचा वापर सोपा व सहज होईल अशी आशा करूया . सोबतच अशा दिवसाची वाट पाहूया की ज्या दिवशी आपल्याला अशा कायद्याची गरजच पडणार नाही .

डॉ विनायक हिंगणे