
आपण डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर आपल्या आजाराचे निदान करतात. आपल्याला वेगवेगळे त्रास होतात, बरीच लक्षणे दिसतात आणि त्यातून डॉक्टर नेमका आजार शोधतात. आपल्याला त्रास का झाला ह्याचं उत्तर मिळते. सोबतच त्या आजाराचा ठराविक उपचार करता येतो. हे निदान करताना डॉक्टरांच्या डोक्यात काय प्रक्रिया चालते ह्याचं कुतूहल बऱ्याच लोकांना वाटतं. अगदी सखोल तर नाही पण ह्या प्रक्रियेचं एक रेखाचित्र तुमच्यासमोर मांडणार आहे. सोबतच निदानासाठी आवश्यक तपासण्यांबद्दल थोडेसे सांगणार आहे.
आजारांच्या निदानाचा पाया असतो वैद्यकीय ज्ञान. आजाराचे आणि आपल्या शरीराचे वेगवेगळे पैलू शिकून हे ज्ञान मिळते. याची सुरुवात जरी वैद्यकीय महाविद्यालयात झाली तरी आयुष्यभरात डॉक्टर शिकतच असतात. ह्या ज्ञानाचा वापर निदान आणि उपचार करताना करण्यासाठी बरीच कौशल्ये वापरावी लागतात. कारण निदानासाठी आवश्यक असलेली माहिती सहज मिळत नाही. ती बरेचदा शोधावी लागते.
निरीक्षण कौशल्य:
डॉक्टरांना त्यांच्या ज्ञानासोबतच इतर अनेक कौशल्यांची गरज असते . त्यातील एक महत्वाचे कौशल्य म्हणजे निरीक्षण . एखाद्या कुशल नजरेतून खूप महत्वाची माहिती टिपल्या जाते. जितकी जास्त माहिती, तितके अचूक निदान! आर्थर कोनन डॉयल ह्यांनी जगतील सर्वात प्रसिद्ध काल्पनिक पात्र तयार केले. डिटेक्टीव शेरलॉक होल्म्स आजही खूप फेमस आहे. आपल्याला छोट्या बारकाव्यावरून क्लिष्ट गुपिते उलगडणाऱ्या शर्लोक होल्म्सचे कौतुक वाटते ! हे काल्पनिक पात्र खरे म्हणजे एका डॉक्टर वर आधारित आहे.
आपल्या एका डॉक्टर गुरूंच्या निरीक्षण कौशल्याने प्रभावित होऊन डॉयल ह्यांनी ‘शर्लोक होल्म्स’ चे पात्र उभे केले. शर्लोक होल्म्स चे निरीक्षण कौशल्य आणि त्या निरीक्षणांवरून तर्कसंगत अनुमान काढण्याची क्षमता जबरदस्त आहे. आर्थर कोनन डॉयल ह्यांचे गुरुवर्य असेच प्रतिभावंत होते . ते रुग्णाला फक्त बघूनच त्याचा व्यवसाय, त्याचे सामाजिक व आर्थिक जीवन कसे आहे , त्याला काय व्यसने आहेत इत्यादी अचूक ओळखून सगळ्यांना चकित करत . त्याकाळातील इतर डॉक्टरही अशा निरीक्षण कलेत निपुण असत . आजही वैद्यकीय शिक्षणात निरीक्षणासाठी नजर तरबेज करण्यावर बराच भर दिला जातो.
पेशंट खोलीत शिरताना पासून त्याचे निरीक्षण करणे आवश्यक असते . तो कसा चालतो , कसा उभा राहतो , कसा बोलतो ह्यावरून वेगवेगळ्या आजारांची लक्षणे ओळखता येतात . काही अंदाज बांधणे सोपे असते. उदा: धाप लागल्यामुळे एक वाक्यही बोलू न शकणाऱ्याला श्वास घ्यायला त्रास होतोय . किंवा पोटावर हात धरून कळवळनाऱ्या रुग्णाच्या पोटात दुखत असेल हे ओळखणे तसे सोपे असते . पण काही लक्षणे ह्यापेक्षा छुपी असतात . चाणाक्ष आणि अनुभवी डॉक्टरांची नजर अशी लक्षणे हेरते . पण फक्त अशा निरीक्षणातून निदान नेहमीच अचूक होते असे नाही. अधिक माहिती मिळवण्यासाठी अधिक कौशल्याची गरज पडते.
शारीरिक तपासणी:
निदान अचूक होण्यासाठी जास्तीत जास्त माहितीची गरज असते. निरिक्षणातून मिळालेल्या माहिती पेक्षा जास्त माहिती मिळविण्यासाठी डॉक्टर शारीरिक तपासणी करतात . हात लावून पोट दाबून बघतात , स्टेथोस्कोप लावून आवाज ऐकून बघतात . बोटांनी ठोकून आवाज करून तपासतात . ह्याला पर्कशन म्हणतात . ही पद्धत ब्यारल मध्ये किती पाणी/द्रव आहे हे बघण्यासाठी ते ठोकून बघण्याचा क्लुप्तीवरून आली आहे . ह्या सगळ्या तपासण्या शरीराच्या आत काय चालले आहे हे बघण्यासाठी चाललेली धडपड असते . जे डोळ्यांनी दिसत नाही त्याचा अंदाज इतर ज्ञानेद्रीये वापरून करायचा .
शरीराच्या आत काय चालले आहे ह्याचा जितका चांगला अंदाज डॉक्टर बांधू शकेल तितके निदान चांगले होते . म्हणून डोळ्यांसोबतच कान आणि हात कुशल होणे आवश्यक असते . शरीराचे विच्छेदन करून शरीररचना जाणून घेणे किंवा वेगवेगळ्या अवयवांमध्ये काय दोष आहेत हे बघणे सोपे असते . पण जिवंत माणसाच्या पोटात किंवा छातीत काय सुरु आहे हे कसे बघायचे ह्या धडपडीतून तपासणीच्या वेगवेगळ्या कौशल्यांचा जन्म झाला .
निदान आणि तंत्रज्ञान:
विल्हेम रोएंटजन ह्या जर्मन वैज्ञानिकाने १८९५ मध्ये क्ष किरणांचा (X rays) शोध लावला आणि एका नवीन वैद्यकीय क्रांतीची सुरुवात झाली . क्ष किरणांच्या मदतीने शरीराचा आत बघण्याची एक नवीन दृष्टी आपल्याला मिळाली. शरीरातील हाडांची परिस्थिती , त्यांना झालेली इजा , फुफ्फुसात झालेला न्यूमोनिया , हृदयाभोवती जमा झालेले पाणी , पोटातील आजार ह्यासारख्या बर्याच गोष्टींचे सरळ फोटोच काढता यायला लागले. अर्थातच आपल्या साध्या डोळ्यांना लगेच कळतील असे हे फोटो नसले तरीही थोड्या सरावाने शरीराच्या आतील अवयव व हाडे ह्यांची खुशाली आपल्याला कळू शकते . क्ष किरणांमुळे निदान सोपे आणि बिनचूक होऊ लागले . शतकानंतर आजही क्ष किरण वैद्यकीय निदानाचा अविभाज्य घटक आहे .
क्ष किरणानंतर बऱ्याच कालावधीने सोनोग्राफीच्या किंवा अल्ट्रासाउंड तंत्रज्ञानाचा उपयोग वैद्यक शास्त्रात व्हायला लागला . जे काही अवयव क्ष किरणांनी पुरेसे नीटसे दिसत नव्हते ते सोनोग्राफीने दिसू लागले . क्ष किरणांपेक्षा खुपच सुरक्षित असलेले हे तंत्रज्ञान गरोदर आई आणि बाळांसाठी वरदान ठरले. पोटातील अवयव बघण्यासाठी ह्याचा सढळ उपयोग होऊ लागला . आता शरीराच्या आतील अवयवांचा विडीयो बघणे शक्य झाले . हृदय कसे सुरु आहे हे साक्षात बघणे सहज शक्य झाले .(ह्यालाच इको किंवा इकोकार्डीओग्राफी म्हणतात) . अवयवांची रचनाच नाही तर अवयवांची क्रिया कशी चालते ह्याची बरीचनवीन माहिती ह्या तंत्रज्ञानाने आपल्याला कळली .आजारांचे निदान आणखी सोपे होऊ लागले .
थोडे विचार करण्यासारखे:
विकसित देशांमध्ये सगळ्याच डॉक्टरांना सोनोग्राफीचा वापर करायला प्रोत्साहित केल्या जाते . इंग्लंड मध्ये छोट्या वैद्यकीय प्रक्रिया जसे पोटातून किंवा छातीतून पाणी काढणे किंवा मानेतील शिरेतून नळी टाकणे अशा प्रक्रियांसाठी सोनोग्राफीची मदत घेणे अनिवार्य असते . ह्यामुळे रुग्णाला इजा होण्याचा धोका कमी होतो. अत्यवस्थ रुग्णांच्या तपासणीमध्ये आणि उपचारात सोनोग्राफी मुळे खूप मदत होते . अगदी मृत्युच्या दाढेतून बाहेर येण्याची संधी रुग्णाला मिळू शकते. उदा: रोड अपघातानंतर रुग्णाच्या पोटात रक्तस्त्राव होत असेल तर तो बाहेरून दिसत नाही . अशा वेळी अपघात विभागात सोनोग्राफी असेल तर लगेच निदान होऊन त्वरित सर्जरी झाल्यास रुग्ण वाचू शकतो . नाहीतर तासभर उशिर झाला तर हाच रुग्ण दगावू शकतो .
सोनोग्राफीचा उपयोग जगभरात सर्वत्र रुग्णसेवेसाठी सर्रास केला जात असताना आपल्याकडे मात्र सोनोग्राफी शापित ठरली आहे . गर्भात असताना मुलगी आहे हे ओळखून गर्भपात करण्यासाठी सोनोग्राफीचा वापर करण्यात येतो . हा वेडेपणा आहे . हा वेडेपणा थांबवण्यासाठी शासनाने गर्भाचे लिंगनिदान रोखण्यासाठी कायदा केला . ह्या कायद्यामुळे सोनोग्राफीच्या वापरावर बंधने आली . आज सगळ्याच महत्वाच्या वैद्यकीय शाखांमधील डॉक्टरांना सोनोग्राफीमध्ये पारंगत असण्याची गरज असताना आपल्याला सोनोग्राफी मशिनी बंद करण्याची वेळ आली आहे . प्रश्न गंभीर आहे आणि गुंतागुंतीचा आहे . कायदा करूनही स्त्री भृणहत्या होतेच आहे . मुलीचे आणि स्त्रियांचे हाल होतातच आहेत . मुलगी झाली म्हणून स्त्रीला त्रास देणारे परिवार आपल्याला सगळ्यांना दिसतातच . ह्या लोकांचे प्रमाण कदाचित खूप थोडे असेल . पण अशा लोकांमुळे आपल्या समाजाला मोठा धोका आहे. बऱ्याच देशांमध्ये गर्भाचे लिंगनिदान हवे असल्यास करून मिळते . लोक आपल्या मुलाची किंवा मुलीची नावे जन्माआधी ठरवतात, बाळासाठी त्यानुसार कपडे आणि खेळणी घेतात , बाळाच्या जन्माच्या आधीच स्वागतासाठी मुलगा असेल तर खोली निळ्या रंगात आणि मुलीसाठी गुलाबी रंगात रंगवतात . मुलगा असो की मुलगी ,बाळाचे स्वागत तितक्याच उत्साहाने करतात . आणि आपल्याकडे मुलींना पोटातच मारून टाकल्या जाते .
सोनोग्राफी वर बंधने घालून ह्या मानसिकतेवर त्यामुळे काही बंधने येतील का हा शंकास्पद मुद्दा आहे. सोनोग्राफी वरील बंधनांमुळे रुग्ण सुरक्षितता मात्र नक्कीच धोक्यात येणार आहे . असंख्य रुग्णांना आपण उपचारापासून वंचित ठेवतो आहोत . टाळता येणाऱ्या इजेपासून वाचवण्या ऐवजी धोक्यात टाकतो आहोत .
ह्या मुद्द्यांमुळे कदाचित न्यायालय ह्या कायद्यात सुधारणा करेल आणि गर्भलिंगनिदान सोडून इतर सोनोग्राफीचा वापर सोपा व सहज होईल अशी आशा करूया . सोबतच अशा दिवसाची वाट पाहूया की ज्या दिवशी आपल्याला अशा कायद्याची गरजच पडणार नाही .
डॉ विनायक हिंगणे