Scroll to top

मराठीदिनानिमित्त


vinayakhingane - February 27, 2016 - 10 comments

IMG_20160220_133619

मराठी ही माझी पहिली भाषा. घरची अन शाळेतलीसुद्धा. माझं प्राथमिक शिक्षण पूर्ण मराठीत झालं. त्यानंतर शाळेत इंग्रजी शिकलो. मेडिकल कॉलेज ला वैद्यकीय इंग्रजी शिकलो. ही इंग्रजी नेहमीच्या इंग्रजीपेक्षा जरा वेगळी आहे. त्याला लोक मेडिकल जारगन असे म्हणतात. ही वैद्यकीय इंग्रजी इंग्लंड मधील साधारण लोकांना सुद्धा कळत नाही. अशा किचकट भाषेत शिकायचे म्हणजे एक मजाच असते. इंग्रजी माध्यमात शिकलेले असोत किंवा कुठल्याही प्रादेशिक भाषेत शिकलेले विद्यार्थी असोत, वैद्यकीय इंग्रजी शिकताना सगळ्यांचीच बोबडी वळते. उच्चार, स्पेलिंग त्या शब्दांचा उगम सगळंच चमत्कारिक वाटतं. पुढे चालून हीच भाषा इतकी अंगवळणी पडते की नवीन माणसाला पूर्ण चक्रावून टाकणारी वाक्ये किचकट वैज्ञानिक संकल्पना पटकन समजावून जातात. वैद्यकीय ज्ञान ह्या भाषेमुळे सोपं वाटायला लागतं. शरीररचना, शरीर प्रक्रिया, रोग, आजार , उपचार इत्यादींच्या संकल्पना ह्या वैद्यकीय इंग्रजीत अगदी तोंडपाठ होतात. खरी मजा येते ती तुम्ही रुग्ण किंवा नातेवाईकांशी बोलताना. डॉक्टर आणि पेशंट एकमेकांना आपलं म्हणणं समजवण्याचा आणि एकमेकांचं म्हणणं सजून घेण्याचा खूप प्रयत्न करतात. कधी कधी हे सहज होऊन जातं, तर कधी कधी सगळा जांगडबुत्ता होऊन जातो. काळानुसार जसे जसे  डॉक्टर आणि पेशंट अनुभवी होत जातात तसे संभाषण सुरळीत होऊ लागते. डॉक्टर पेशंट संभाषणाला खूप पैलू असतात. अर्थातच भाषा हा एक फार महत्वाचा पैलू आहे. प्रादेशिक भाषा आणि बोलीभाषा ह्यांची चांगली समज असणे एका डॉक्टरसाठी अनिवार्य असते तर डॉक्टर मंडळीही भाषेला वेगवेगळ्या शब्दांची आणि संकल्पनांची देण करत असतात. मराठीची आवड आणि डॉक्टरकी ह्या दोन्हीमुळे भाषेच्या मजेचे असे काही प्रसंग लक्षात राहतात.

मराठीत काही विलक्षण शब्द आहेत. त्या शब्दांचे समानार्थी आणि समान भावार्थ असलेले शब्द इतर भाषांमध्ये सापडणे कठीण असते. त्यातल्या त्यात इंग्रजीमध्ये असे समानार्थी शद्ब शोधताना आपले इंग्रजी शब्दकोशचाचे थोडके ज्ञान अडचणीत भरच टाकते. पेशंटला माहिती त्याच्या भाषेत विचारायची आणि त्याच्या लक्षणांची नोंद मराठीत करायची अशी कसरत आम्ही डॉक्टर करत असतो. एकदा माझ्या एका वरिष्ठ डॉक्टरांनी मला विचारले की पेशंटला ठसका लागला तर त्याला इंग्रजीत काय म्हणणार? मी म्हटलं cough . ते म्हणाले पण cough म्हणजे खोकला. वाचनाराला कसे कळणार की मला ठसका म्हणायचंय? ह्या प्रश्नाचं नीट उत्तर मला काही देता आलं नाही. दात आणि हिरड्या सळसळणे ही काही लोकांची तक्रार असते. ह्या सळसळणे ला इंग्रजीत काय म्हणायचे? पोटात ढवळणे हा पण असाच शब्द. दुखणं अंगावर काढणे आणि दुखण्याकडे दुर्लक्ष करणे ह्यात जो बारीकसा फरक आहे तो इंग्रजीत दाखवणे कठीण जाते. अशा वेळी मला ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ मधल्या बबण्याची आठवण येते.इंग्लिश जॉनरावला कुंडली, गोत्र आणि बस्ता इत्यादी मराठी गोष्टी समजवताना त्याची जशी तारांबळ उडते तशीच डॉक्टरांचीही उडते.

लक्षणांच्या संकल्पना ही वेगवेगळ्या असतात. त्या समजून घेणे आवश्यक असते. आमच्या बुलडाण्याकडे कडे ‘पोटात गाठ जाणे ‘असा वाक्प्रचार आहे. माझ्या पोटात गाठ गेली म्हणजे पोटात cramp किंवा कळ आली आणि ह्याचा tumor वाल्या गाठीशी संबंध नाही. असे वाक्प्रचार कधीकधी नवीन  डॉक्टरांना चक्रावून टाकू शकतात. ‘ऊन लागणे ‘ म्हणजे फक्त हिट स्ट्रोक नसून हिट इलनेस आहे.  उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांपैकी heat stroke हा सर्वात गंभीर प्रकारचा आजार आहे. उष्णतेमुळे होणारे इतरही त्रास असतात. जसे Heat exhaustionकिंवा थकवा.उन्हामुळे होणाऱ्या कुठल्याही त्रासाला पेशंट ऊन लागले असे म्हणू शकतो.कधी कधी तर उन्हाशी संबंधित नसलेले त्रासही पेशंट ‘ऊन लागले’ म्हणून सांगू शकतात. अशा वेळी नीट चौकशी करून नेमके काय होते आहे हे शोधावे लागते.

रुग्णांशी व नातेवाईकांशी बोलून बोलून नवीन शब्द कळत जातात आणि डॉक्टरांचा शब्दकोश वाढत जातो.  जुलाब होणारा रुग्ण , ढाळ, पडसाकडेला लागणे,हगवण लागणे, संडास लागणे,पोट बिघडणे यासारखा कुठलाही शब्द वापरू शकतो. दुःखाच्या आणि दुखण्याचा जितक्या छटा डॉक्टर ला बघाव्या लागतात तेवढ्या खचितच कुणाला बघाव्या लागत असतील. डॉक्टर वेदनांच्या वेगवेगळ्या प्रकारांचा उपयोग निदान करण्यासाठी करतात. वेगवेगळ्या आजारात वेदनेचा प्रकार आणि तीव्रता वेगळी असते, त्यावरून आजाराचं निदान करता येतं. ह्याचा आणखी फायदा म्हणजे कथा कादंबरी वाचताना किंवा नाटक बघताना त्यातील दुःखाच्या शब्दछटाही चटकन कळतात. एखाद्याचे ठसठसणारे दुःख आणि एखाद्याला आलेली कळ हे कसे वेगळे असतील हे दृश्य अगदी डोळ्यासमोर तरळून जाते. काव्य शास्त्र विनोदप्रमाणे लोकांशी संभाषणही आपल्या अनुभवांना खूप समृद्ध करते यात काही शंका नाही.
रुग्णाशी किंवा नातेवाईकांशी बोलताना वैद्यकीय माहिती त्यांना मराठीत समजावून सांगणे हेसुद्धा तेवढेच आव्हानात्मक असते. काही वैद्यकीय संकल्पना मराठीत सांगताना फक्त भाषांतर न करता कल्पकता वापरून सोपे पण नवीन जोडशब्द तयार करावे लागतात. इतक्यात मी माझ्या सासऱ्यांशी मराठीतील वैद्यकीय लेखावर चर्चा करत असताना त्यांनी shock ह्या संकल्पनेला मराठीत समजवण्यासाठी ‘पेशींना पडलेला दुष्काळ’ असा शब्दप्रयोग सुचवला. तो अतिशय चपखल आहे. कधी कधी इंग्रजी शब्दच रुग्णांना सोपे वाटतात. यकृत पेक्षा लिवर चटकन समजते. न्यूमोनिया , मलेरिया, कॅन्सर इत्यादी आजारांची नावे मराठीत रुळली आहेत. त्यांना पर्यायी शब्द आहेत. पण सर्वसामान्य रुग्ण बोलताना कर्करोगा ऐवजी कॅन्सरच म्हणतात. अशा वेळी बोलताना मराठी भाषांतर न करता हे रुळलेले शब्द वापरून संभाषण सोपे करणेच योग्य असते. पण आरोग्यविषयक लेख लिहिताना मराठी शब्द वापरायचे की मराठीत रुळलेले इंग्रजी शब्द वापरायचे हा संभ्रम कधीकधी पडतो. मी शक्यतोवर लेख हा संभाषणासारखा असावा म्हणून सोपे आणि रुळलेले शब्द वापरण्याचा प्रयत्न करतो. कधीकधी मराठीतील वैद्यकीय शब्द आणि रुळलेले शब्द असे दोन्ही वापरून घेण्यची संधी मिळते. प्लिहा किंवा स्वादुपिंड अशा अवयवांचे उल्लेख आले कि मी त्यांचे इंग्रजी नाव आणि त्यांचे थोडक्यात वर्णन टाकून ते शब्द सगळ्यांना समजणे सोपे जाईल याची काळजी घेतो.

वैद्यकीय ज्ञान हे मराठीत रूपांतरित करणे हे आज फार आवश्यक आहे. मराठी लोकसंख्या मोठी आहे. वैद्यकीय ज्ञान ह्या लोकसंख्येपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना मराठीत उपलब्ध करून देणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. इंग्लड मध्ये patient.co.uk आणि nhs.uk अशा वेबसाईटवर सोप्या इंग्रजीत वैद्यकीय माहिती उपलब्ध असते. ही माहिती सोप्या शब्दात असली तरीही तिचा दर्जा उत्तम असतो. माहिती सोपी करताना त्यातील सार चुकीचा होऊ नये किंवा गाळल्या जाऊ नये ह्याची खात्री केली जाते. वेळोवेळी बदल करून ही माहिती ताजी ठेवली जाते. ह्या वेबसाईट डॉक्टर सुद्धा वापरतात. आपल्याकडेही मराठीत अशी दर्जेदार वैद्यकीय माहिती असण्याची गरज आहे. ह्यात खारीचा वाटा म्हणून मी मराठीतून आरोग्यलिखान सुरु ठेवण्याचा निश्चय आज मराठीदिनी करतो आहे. आपणही आपल्या क्षेत्रात जमेल तसा मराठीचा वापर करून मराठी अधिक समृद्ध करण्यास हातभार लावावा ही विनंती

Contact Us
close slider

    Discover more from Vinayak Hingane

    Subscribe now to keep reading and get access to the full archive.

    Continue reading

    ×

    Hello!

    Click one of our representatives below to chat on WhatsApp or send us an email to vinayakhingane@gmail.com

    ×