
ताप म्हणजे काय?
ताप म्हणजे शरीराचे तापमान नेहमीच्या तापमानापेक्षा वाढणे. निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान हे सकाळी ९८.९ पेक्षा कमी असते तर संध्याकाळी तापमान ९९. ९ पेक्षा कमी असते. शरीराचे तापमान ह्यापेक्षा जास्त वाढल्यास आपण त्याला ताप म्हणतो .काही वेळेस रुग्णाला ताप नसताना सुद्धा कसकस जाणवते किंवा ताप आल्यासारखे वाटते . अशा वेळी तापमानाची नोंद ठेवलेली असल्यास निदान करणे सोपे होते. तापातील चढ उतारांची ठेवण ह्यावरून सुद्धा बरेचदा आजाराचे निदान होण्यास मदत होते . म्हणून प्रत्येक घरात थर्मामीटर (तापमापक) असणे आवश्यक आहे . व ताप आल्यावर त्याची नोंद ठेवणे आवश्यक आहे . आजकाल वापरायला सोपे असे थर्मामीटर मिळतात . बगलेमध्ये त्वचेच्या संपर्कात ठेऊन किंवा तोंडात जिभेखाली थर्मामीटर ठेऊन तापमान मोजता येते. बगलेमधे तापमान तोंडातील साधारणतः अर्धा ते एक अंश कमी दिसू शकते . एखादा गरम पदार्थ घेतल्यास लगेच तोंडातील तापमान घेणे टाळावे . ५ वर्षाखालील मुलांमध्ये बगलेतील तापमान घेतात व तोंडातील तापमान घेणे टाळतात .