Scroll to top

तापाबद्दल बरेच काही


vinayakhingane - August 6, 2016 - 6 comments

IMG_20160413_072112
ताप हा आजार नसून आजाराचे एक  लक्षण आहे . पण बरेचदा आपण तापालाच आजार म्हणतो.त्याचे कारणही तसेच आहे . रुग्णासाठी तापच त्रासदायक असतो व ताप कमी झाल्याशिवाय रुग्णाला बरे वाटत नाही . ताप बरा होणे हे बरेचदा आजारातून बरे होण्याचे लक्षणही असते. त्याचप्रमाणे ताप बरा न होणे हे बरेचदा आजार बरा न होण्याचे लक्षणही असू शकते . ताप येण्याची बरीच कारणे आहेत व त्यातील काही गंभीर असतात. त्यामुळे ताप हा सगळ्यांच्या काळजीचा विषय असतो.आज आपण तापाविषयी व तापाच्या काही महत्वाच्या कारणा विषयी चर्चा करूया .

ताप म्हणजे काय?

ताप म्हणजे शरीराचे तापमान नेहमीच्या तापमानापेक्षा वाढणे. निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान हे सकाळी ९८.९  पेक्षा कमी असते तर संध्याकाळी तापमान ९९. ९ पेक्षा कमी असते. शरीराचे तापमान ह्यापेक्षा जास्त वाढल्यास आपण त्याला ताप म्हणतो .काही वेळेस रुग्णाला ताप नसताना सुद्धा कसकस जाणवते किंवा ताप आल्यासारखे वाटते . अशा वेळी तापमानाची नोंद ठेवलेली असल्यास निदान करणे सोपे होते. तापातील चढ उतारांची ठेवण ह्यावरून सुद्धा बरेचदा आजाराचे निदान होण्यास मदत होते . म्हणून प्रत्येक घरात थर्मामीटर (तापमापक) असणे आवश्यक आहे . व ताप आल्यावर त्याची नोंद ठेवणे आवश्यक आहे . आजकाल वापरायला सोपे असे थर्मामीटर मिळतात . बगलेमध्ये त्वचेच्या संपर्कात ठेऊन किंवा तोंडात जिभेखाली थर्मामीटर ठेऊन तापमान मोजता येते. बगलेमधे तापमान तोंडातील साधारणतः अर्धा ते एक अंश कमी दिसू शकते . एखादा गरम पदार्थ घेतल्यास लगेच तोंडातील तापमान घेणे टाळावे . ५ वर्षाखालील मुलांमध्ये बगलेतील तापमान घेतात व तोंडातील तापमान घेणे टाळतात .

तापाची कारणे
ताप येण्याची खूप कारणे आहेत . पण नेहमी दिसणारी व महत्वाची काही कारणे आज आपण समजून घेऊ . शरीरामधे जन्तुप्रादुर्भाव किंवा इन्फेक्शन झाल्यास ताप येऊ शकतो . हे इन्फेक्शन वायरस(विषाणू) , जीवाणू किंवा इतर जंतू मुळे होऊ शकते . सर्दी पडसे किंवा त्वचे वरील फोड ह्यासारखी इन्फेक्शन कमी काळजीची असतात तर काही इन्फ़ेक्शन्स जसेकी न्युमोनिया ही जास्त त्रासदायक व गंभीर असतात अशावेळी तापासोबातच इतर लक्षणांकडे सुद्धा लक्ष द्यावे लागते. विशेषतः लहान मुलांमध्ये ताप असल्यास जास्त सजग असावे लागते . ३ महिन्यांपेक्षा लहान बाळांमध्ये ताप असल्यास,मोठ्या मुलांमध्ये खूप जास्त ताप असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा . मोठ्यांमध्ये सुद्धा ३ ते ४ दिवसांपेक्षा जास्त ताप असल्यास , ताप वाढता असल्यास , तापाबरोबर इतर धोक्याची लक्षणे असल्यास डॉक्टरांना भेटणे आवश्यक असते .
धोक्याची लक्षणे
लहान मुलांमध्ये भूक अगदी कमी होणे , लाघवी कमी होणे , मुल मलूल होणे व सारखे झोपणे , श्वास जोरात चालणे  दम लागणे , मुल सतत रडणे इत्यादी लक्षणे धोक्याची समजली जातात. मोठ्यांमध्ये सुद्धा धाप लागणे, चक्कर येणे , अतिशय गुंगी येणे , फिट येणे इत्यादी लक्षणे धोक्याची समजली जातात . तपासोबातच इतर लक्षणे जसे पोट दुखणे , खूप जुलाब व उलट्या होणे , तीव्र डोकेदुखी , लघवी न होणे असे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य. वयस्कर व्यक्तींमध्ये ताप फार तीव्र नसला तरीही वरील लक्षणे  शकतात . अशा वेळी तापाच्या सौम्यतेवर न जाता इतर लक्षणांच्या तीव्रतेवर उपाय करणे योग्य ठरते . या  विरुद्ध सर्दी पडसे  किंवा साध्या फ्लू मुले येणारा ताप हा दोन ते तीन दिवसात आपोआप जातो . ताप कमी करण्यासाठी पॅरासिटामॉल हे औषध पुरेसे असते. अशा वेळी फारशा तपासण्याही कराव्या लागत नाहीत .
शरीराच्या वेगवेगळ्या भागात इन्फेक्शन झाल्यास तापासोबतच वेगवेगळी लक्षणे दिसतात. लघवीला जळजळ होणे  व वारंवार लघवीला होणे अशी लक्षणे तपासोबत असल्यास डॉक्टर लघवी तपासायला सांगतात . अशावेळी लघवीमध्ये इन्फेक्शन आढळल्यास प्रतिजैविक किंवा अँटीबायोटिक औषध घ्यावे लागते . अशाच प्रकारे पोटात  इन्फेक्शन होऊन जुलाब उलट्या व ताप येऊ शकतो . अशा वेळी सुद्धा  डॉक्टर नीट तपासणी करून प्रतिजैविक औषध द्यायचे का ते ठरवतात . फुफ्फुसात इन्फेक्शन झाल्यास त्याला आपण न्युमोनिया म्हणतो . अशा वेळेस रुग्णाला तपासोबत खोकला येतो,बेडका/कफ पडतो व दम लागतो . मेंदू व त्याचा आवरणामध्ये इन्फेक्शन झाल्यास तीव्र डोकेदुखी , फिट येणे , अतिशय गुंगी येणे , उलट्या होणे इत्यादी लक्षणे दिसतात . हा आजार  अतिशयगंभीर असतो. ह्याशिवाय शरीरावर गळू होणे हा सुद्धा इन्फेक्शन चा प्रकार आहे. शरीरांवरील जखमांमध्ये इन्फेक्शन होण्याची बरीच शक्यता असते. त्यामुळे  जखमांकडे विशेषलक्ष देण्याची गरज असते. अस्वच्छ जखमांमुळे धनुर्वात व ग्यास गँगरीन सारखे आजार होण्याचीही भीती असते.काही वेळेस शरीरातील एका भागात किंवा एखाद्या अवयवात  असलेले इन्फेक्शन रक्तातही पसरते व त्याला सेप्सिस असे म्हणतात . असे झाल्यास जीवाला धोका निर्माण होतो. अशा वेळी तत्परतेने उपाय करावे लागतात.
काही इन्फेक्शन अशी असतात कि ज्यामध्ये ताप हेच मुख्य लक्षण असते व शरीराच्या कुठल्या विशिष्ठ भागात इन्फेक्शन झाल्याची चिन्हे दिसत नाहीत . डेंगूताप , मलेरिया व टायफाईड किंवा विषमज्वर हे तापाचे मुख्य आजार आहेत . ह्यापैकी डेंगू व मलेरिया हे ताप डासांमुळे पसरतात तर विषमज्वर हा दुषित अन्न किंवा पाण्यामुळे पसरतो . योग्य काळजी घेतल्यास हे आजार आपल्याला टाळता येऊ शकतात.
डेंगू :
हा आजार डेंगू वायरस मुळे होतो . साचलेल्या पण स्वच्छ पाण्यात वाढणाऱ्या डासांच्या माध्यमातून हा व्हायरस पसरतो. आजारी व्यक्तीच्या शरीरातून निरोगी व्यक्तीच्या शरीरात हा व्हायरस डासाच्या चावण्यामुळे जातो व आजाराचा प्रसार होतो . हे डास शक्यतोवर दिवसा चावतात . आजाराची पहिली लक्षणे म्हणजे तीव्र ताप येणे .  अंगदुखी,पाठदुखी व डोकेदुखी होणे . हा ताप साधारणतः ३ ते ५  असतो व  आपोआप कमी होतो . डेंगी  वायरस च्या विरूद्ध कुठलेही औषध सध्या अस्तित्वात नाही त्यामुळे तापाची औषधे व शरीरातील पाण्याचे प्रमाण नीट ठेवण्याचा प्रयत्न केल्या जातात . बऱ्याचशा रुग्णांमध्ये हे करणे पुरेसे असते . ताप गेल्यावर बऱ्याच रुग्णांना थकवा जाणवतो . काही रुग्णांमध्ये डेंगी मुळे रक्तस्त्रावाची लक्षणे व काही रुग्णांमध्ये रक्तदाब कमी होऊन व शरीरातील इतर अवयवांवर परिणाम होऊन परिस्थिती अत्यवस्थ होऊ शकते . ह्याला डेंगू शॉक सिंड्रोम असे म्हणतात. अशा रुग्णांना  अतिदक्षता विभागात ठेवण्याची गरज असते. पोटात दुखणे, वारंवार उलटी होणे, तीव्र डोकेदुखी, उभे राहिल्यावर चक्कर येणे, अंगावर पुरळ येणे किंवा चट्टे येणे, रक्तस्त्राव होणे इत्यादी लक्षणे ही धोक्याची मानली जातात. अशा रुग्णांना भरती करून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची गरज असते. योग्य उपचारांनी हे रुग्ण बरे होऊ शकतात. अशा रुग्णांवर घरगुती उपचार करण्या वेळ वाया घालवू नये. पपई चा रस किंवा तत्सम उपाय हे फारसे उपयोगी असल्याचा काही पुरावा उपलब्ध नसल्यामुळे त्यामध्ये वेळ दवडू नये .
या आजारापासून वाचण्यासाठी घरामध्ये पाणी साठवून ठेवताना त्यात डासाच्या अळ्या होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. खासकरून कुलर मघे अशा डासांची उत्पत्ती होते असे दिसून येते . छोट्या भांड्यांमध्ये, पडलेल्या टायर मधे  किंवा कुंड्यांमध्ये पाणी साचून राहणार नाही ह्याची काळजी घ्यावी . डेंगू चा रुग्ण आढळल्यास तशी माहिती मुनिसिपालिटीला दिली जाते . ती दिली गेली आहे ह्याची खात्री करावी . खिडक्या व दारांना जाळी  बसवल्यास डासांपासून संरक्षण  होते . झोपताना मच्छरदानी चा वापर करावा . आपल्या घराच्या आसपास डासांचा नायनाट केल्यास डेंगू पासून बचाव होऊ शकतो.
मलेरिया / हिवताप:
मलेरिया किंवा हिवताप हा प्लास्मोडीयम ह्या जंतूंमुळे होणारा आजार आहे . त्यातही प्लास्मोडीयम वायव्याक्स व प्लास्मोडीयम फॅल्सिप्यरम ह्या दोन जातीं जास्त प्रमाणात आढळतात . मलेरिया हा सुद्धा डासांमुळे होणारा आजार आहे . डास चावल्यावर हे जंतू रुग्णाच्या शरीरात वाढतात . रुग्णाला थंडी व हुडहुडी भरून ताप येतो . तीव्र डोकेदुखी होते . काही वेळाने दरदरून घाम येउन ताप कमी होतो . थंडी व ताप येत असेल तर मलेरिया ची तपासणी केल्या जाते . खेड्यामध्ये एम पी डब्ल्यू अशी तपासणी करतात . मलेरिया मध्ये फॅल्सिप्यरम मुळे  होणारा आजार हा जास्त गंभीर असू शकतो व त्यामुळे मेंदूवर परिणाम होण्याचीही शक्यता असते . मलेरियाचा उपचार न केल्यास गुंतागुंत होऊन परिस्थिती अत्यवस्थ होण्याची शक्यता असते. परंतु वेळेत उपचार केले असता लवकर सुधारणा होते . मलेरीयासाठी चांगली औषधे उपलब्ध आहेत.  म्हणून मलेरिया चा ताप हा लवकर ओळखून त्यावर लगेच उपचार करणे आवश्यक आहे . डेंगू प्रमाणेच या आजारात सुद्धा दम लागणे , गुंगी येणे किंवा बरळणे, चक्कर येणे , पोटात दुखणे इत्यादी धोक्याची लक्षणे दिसल्यास त्वरित दवाखान्यात नेणे आवश्यक असते. या आजारापासून वाचण्यासाठी परिसराची स्वच्छता व डासांचा  नायनाट ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत . डासांपासून वाचण्यासाठी वर सांगितल्याप्रमाणे जाळ्या व मच्छरदानी चा उपयोग करणे आवश्यक आहे . डेंगू व मलेरिया च्या विरोधात लसीकरण सध्या उपलब्ध नाही तरीही डासांपासून बचाव व डासांचा नायनाट करण्याचा प्रयत्न करणे हे उपाय आपण अवलंबून ह्या  आजारांपासून आपला बचाव करू शकतो .
टायफॉईड/विषमज्वर :
हा आजार साल्मोनेला नावाच्या जीवाणू मुळे होतो . दुषित पाणी किंवा अन्न पोटात गेल्यामुळे हा आजार होतो . वैयक्तिक स्वच्छता न पाळणे व बाहेरील अन्न व दुषित पाणी ह्यामुळे टायफोईड होण्याची शक्यता असते . तीव्र तापासोबत काही रुग्णांना जुलाब किंवा पोट दुखण्याचा त्रास होतो . उपचाराशिवाय हा ताप लवकर बरा होत नाही . उपचार सुरु केल्यावरही ताप कमी व्हायला ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागू शकतो . उपचार न केल्यास टायफोइड गंभीर स्वरूप धरण करू शकतो. ह्या आजारात सुद्धा धोक्याची लक्षणे दिसल्यास रुग्णाला भरती करावे लागते.या आजारापासून वाचण्यासाठी टायफॉइडच्या विरोधात लस उपलब्ध आहे. तुमच्या डॉक्टरांना भेटून तुम्ही ही लस घेऊ शकता.  त्याचप्रमाणे वैयक्तिक स्वच्छता पाळणे, हात नीट  धुणे तसेच बाहेरील अन्न व पाणी टाळणे ह्याने टायफॉइड  पासून दूर राहता येते .
तापाची इतर कारणे
इन्फेक्शन नसताना सुद्धा ताप येऊ शकतो . संधिवात किंवा त्यासारख्या काही आजारांमध्ये ताप येतो . काही वेळेस कॅन्सर मध्ये सुद्धा ताप येतो . अशा वेळी निदान करण्यासाठी बऱ्याचशा तपासण्या करण्याची गरज पडू शकते . काही औषधांनी सुद्धा ताप येऊ शकतो . ताप येण्याची कारणे कधी कधी खूप तपास करूनही सापडत नाहीत . त्याला पायरेक्सिया ऑफ अननोन ओरिजिन असे म्हणतात.अशा वेळी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेगवेगळे तपास व उपाय केले जातात.
ताप हा अगदी किरकोळ आजाराचे लक्षण असू शकतो तसेच गंभीर आजाराचेही लक्षण असू शकतो . धोक्याच्या लक्षणांवर डोळा ठेवणे  व योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप आवश्यक असते .
Contact Us
close slider

    Discover more from Vinayak Hingane

    Subscribe now to keep reading and get access to the full archive.

    Continue reading

    ×

    Hello!

    Click one of our representatives below to chat on WhatsApp or send us an email to vinayakhingane@gmail.com

    ×