अत्यवस्थ पेशंट बेडवर मध्यभागी होता. नर्सेस आणि डॉक्टरांचा भोवती गराडा. कुणी शिरेत सुई लावत होतं तर कुणी तपासणी साठी रक्त घेत होतं. एकाने कैचीने पेशंटचे उलटीने माखलेले कपडे कापून त्याचे शरीर स्वच्छ करायला सुरुवात केली.पेशंटचा श्वास घरघरत होता आणि नाडीचे ठोके मंद झाले होते. शुद्ध हरपली होती.थोडा उशीर झाला असता तर आम्ही काहीच करू शकलो नसतो. मी लगेच पेशंटच्या श्वासनलिकेत नळी घालून कृत्रिम श्वासोश्वास सुरु केला. लक्षणांवरून पेशंटला किटकनाशकामुळे विषबाधा झालीय हे स्पष्ट होतं. पेशंटच्या उलटीला कीटकनाशकांचा एक विशिष्ट वास होता, ज्यामुळे माझं निदान पक्क झालं. शिरेतून औषधे सुरु झाली. नाकातून एक नळी पोटात टाकली आणि त्यातून पोटात काही विष असेल ते काढण्याचे प्रयत्न सुरु झाले. आपत्कालीन खोलीत चाललेला हा प्रकार वरवर बघता गोंधळच वाटतो पण त्यात प्रत्येकाला आपलं काम माहित असतं. आणि प्रत्येकाने आपलं काम चोख केलं तर पेशंट वाचतात. साधारणतः सहा तासांनी पेशन्ट स्थिरस्थावर झाला. अजूनही परिस्थिती पूर्ण धोक्याबाहेर नव्हती पण मला नातेवाईकांशी बोलायला वेळ मिळाला. पेशन्ट तरुण, कुठलाही आजार नसलेला, नीट नोकरी आणि लग्न झालेला असा नॉर्मल माणूस होता. विष घेऊन जीव द्यायचा त्याने केलेला प्रयत्न हा सगळ्यांसाठीच धक्कादायक होता. नातेवाईकांपैकी कुणालाच तो असं काही करेल असं वाटलं नव्हतं. मी थोडं खोलात जाऊन विचारायला सुरुवात केली. गेल्या काही महिन्यांपासून तो थोडा उदास दिसत होता. जेवण कमी झालं होतं आणि झोपही कमी झाली होती. कामात मन लागत नव्हतं आणि कामावर जायची इच्छा गेली होती. बायकोशी याविषयी तो फार काही बोलला नाही. त्याला गिटार वाजवायचा छंद होता पण गेल्या काही महिन्यात त्याने गिटारला हातही लावला नव्हता. मित्रांशी बोलणं आणि भेटनही इतक्यात बंद होतं. त्याला डिप्रेशन ची लक्षणं होती पण नातेवाईकांपैकी कुणाच्याही लक्षात ती आली नाही. त्याने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करण्याच्या एक दिवस आधी तो त्याच्या भावाकडे गेला होता. त्याने भावाला सांगितलं की त्याला फार उदास वाटतंय आणि आयुष्य व्यर्थ गेलं असं वाटतंय. जीव दिला तर बरं होईल असं वाटतंय. भावाला वाटलं की हा नोकरीच्या ताणतणावाने कंटाळलाय. त्याने त्याला रडूबाई सारखं काय रडतोय म्हणून लेक्चर दिलं. मर्द गडी तू, आयुष्याला समोर जायचं असतं वगैरे सांगून त्याला चिअर अप करण्याचा प्रयत्न केला. आणि दुसऱ्या दिवशी हे घडलं. खरंतर त्याने आपल्याला एक संधी दिली होती. आत्महत्येचा त्याचा हा प्रयत्न टाळता आला असता! आणि ह्याच्यासारखे बरेच आहेत ज्यांना आपण मदत करू शकतो. गरज आहे ती सहानुभूतीपूर्वक ऐकून घेण्याची!
डिप्रेशन हा एक महत्वाचा आजार आहे. एका अहवालानुसार साधारण आजारांमध्ये 4.4 टक्के एकट्या डिप्रेशन चे रुग्ण असतात. ही आकडेवारी मोठी आहे. ओ पी डी मध्ये येणाऱ्या रुग्णांपैकी 5 ते 13 टक्के रुणांना डिप्रेशन असते. डिप्रेशनच्या पेशन्ट मध्ये आत्महत्या तसेच इतर आजार जसे हृदयरोग आणि स्ट्रोक चे प्रमाण जास्त असते. पण खरं म्हणजे डिप्रेशन पेक्षा जास्त घातक आहे ते म्हणजे आपला दृष्टीकोन आणि आपलं डिप्रेशन विषयी अज्ञान.
डिप्रेशन ला मराठीत नैराश्य असा प्रतिशब्द आहे. पण मी डिप्रेशन हाच शब्द या लेखासाठी वापरायचा अस ठरवलं. एक कारण की डिप्रेशन हा नेहमीचा शब्द झालाय सगळ्यांना कळतो आणि बरेच लोक हाच शब्द वापरतात. दुसरं आणि महत्वाच कारण म्हणजे नैराश्य हा शब्द मूड किंवा मनस्थिती दर्शविणारा आहे. सगळ्यांना आयुष्यात कधीतरी उदास वाटतच .पण डिप्रेशन हे यापेक्षा वेगळं आहे. डिप्रेशन हा मूड नसून मुडचा आजार आहे. डिप्रेशन मध्ये उदासी जास्त काळ टिकते आणि ही उदासी खूप जास्त प्रमाणात असते. रुग्ण इतके उदास होतात की त्यांच्या आयुष्यातील रोजचे काम,जेवण, झोप इत्यादीवर वाईट परिणाम होतो. मूड सारखा उदास असतो. कामात लक्ष लागत नाही, चुका होतात. आवडीच्या गोष्टी किंवा छंद ह्यातील रस कमी होतो. काहीच करण्याची इच्छा राहत नाही. वैराग्य आल्यासारखं वाटतं. डिप्रेशनचे शारीरिक परिणाम पण दिसतात. भूक कमी होऊ शकते किंवा वाढू शकते. झोपेचही असंच होत. काही रुग्ण खूप झोपतात तर काहींची झोप उडते. लवकर थकायला होत. उल्हास नसतो. आत्मविश्वास कमी होतो.डिप्रेशनने ग्रस्त व्यक्ती कधी कधी इतके उदास होतात की ही आपल्या ओळखीची व्यक्ती आहे की वेगळीच व्यक्ती आहे अस वाटावं.
डिप्रेशनच्या पेशन्ट ला खरंतर खूप सहन करावं लागतं. पण समाजात त्यांच्याविषयी असलेला समज म्हणजे की हे लोक पळपुटे/भित्रे असतात. डिप्रेशन वगैरे ही थेरं आहेत . ह्याची मुळात सहनशक्तीच नाही इत्यादी! वरील समज डिप्रेशन ची कारणं म्हुणून पुढे केली जातात. ही डिप्रेशन ची कारणं नसून बहुतांशी डिप्रेशन चे परिणाम आहेत. डिप्रेशन ची बरीच कारणे आहेत आणि बरेचदा ह्या कारणांची सरमिसळ होऊन डिप्रेशन चा आजार होतो. मेंदूतील रासायनिक बदल, संप्रेरक किंवा हॉर्मोन्स मधील बदल, जेनेटिक किंवा अनुवांशिक घटक, वातावरण तसेच सामाजिक घटना ह्या सगळ्यांचा वेगवेगळ्या प्रमाणात परिणाम होतो. बरेचदा कॅन्सर किंवा गंभीर शारीरिक आजारांमध्ये डिप्रेशन होऊ शकते. कधीतरी मोठा भावनिक आघात (जसे की अगदी जवळच्या कुणाचा मृत्यू ) ह्यामुळे सुद्धा डिप्रेशन होण्याची शक्यता असते. पण बरेचदा कुठलेही कारण न दिसता डिप्रेशन चा आजार होऊ शकतो. अशा वेळी बरेच लोक “ह्याला काही कारण नसताना टेन्शन घेतो” किंवा “उगाच रडतो” असं म्हणून ह्याकडे दुर्लक्ष करतात. कधी कधी हेटाळणी पण करतात. डिप्रेशन चा रुग्ण आयुष्यातील छोट्या छोट्या अडचणी सुद्धा सोडवू शकत नाही असं वरकरणी दिसतं. ह्या छोट्या अडचणी डिप्रेशन ची कारणं नसून डिप्रेशन मुळे त्यांची अडचणी सोडवण्याची क्षमता कमी होते. अशा वेळी त्यांना समजून घेण्याची गरज असते. ह्याउलट लोक त्यांना आपण स्वतः कसे लढलो, आपण किती बिकट परिस्थितीतून मार्ग काढला, आमच्या वेळी गोष्टी किती कठीण होत्या वगैरे वगैरे सांगतात.यामागे हेतू बरेचदा चांगला असतो पण मदत होण्यापेक्षा नुकसान होण्याची शक्यता असते. पेशंटचा आत्मविशास अधिक खचतो. आपले अनुभव दुसर्यांना बोलून दाखवण्याची इच्छा कमी होते.
कारण न दिसता जे डिप्रेशन होते त्याचं वर्णन बालकवींच्या एका कवितेत त्यांनी चपखल केलं आहे.
“कोठुनि येते मला कळेना
उदासीनता ही हृदयाला
काय बोचते ते समजेना
हृदयाच्या अंतर्हृदयाला ”
अशा डिप्रेशन च्या पेशंटना तज्ञ डॉक्टर आणि औषधींची गरज असते. ही औषधे ‘झोपेची औषधे’ नसून मेंदूतील रसायने नियंत्रित करणारी औषधे असतात. शारीरिक आजारात जशी आपण औषधे घेतो तशी ही औषधे डिप्रेशन मध्ये कामी येतात. ह्या औषधांमुळे डिप्रेशन ची लक्षणे हळूहळू कमी होऊन बरेचशे पेशंट नॉर्मल होताना मी पाहिले आहेत. पण दुर्दैव असं की बरेच पेशंट उपचाराशिवाय त्रास सहन करत राहतात. काही तर आत्महत्ये पर्यंत जाऊन पोहोचतात. असे बरेच त्रास आणि बरेच जीव आपण वाचवू शकतो. गरज आहे ती त्यांना सहानुभूतीपूर्वक ऐकून घेण्याची.डिप्रेशन मध्ये रुग्णांना फार एकटेपणा जाणवतो. त्यांना ऐकून घेणारं कुणीतरी भेटलं तर तो एकटेपणा काही काळ दूर होऊ शकतो. आत्महत्येचे विचार अशा वेळी बोलून दाखवल्या जाऊ शकतात. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि योग्य वैद्यकीय उपचार केल्यास जीव वाचतात.
फक्त डिप्रेशनच नाही तर इतर मानसिक आजाराविषयी आपल्या समाजात अनेक गैरसमज आहेत. त्यापेक्षाही जास्त गंभीर समस्या म्हणजे अशा पेशंट विषयी घृणा आहे. विज्ञानाने हे स्पष्ट झाले आहे की हे लोक वेगळे नसतात, ते झपाटलेले नसतात, ते कमजोर मनाचे किंवा कमकुवत मेंदूचे नसतात. फरक एवढाच असतो की ते आजारी असतात. शारिरीक अजारांसारखेच मानसिक आजार असतात. त्यातील खूप आजार पूर्ण बरे होतात. मानसिक आजार असलेल्या पेशन्ट ला कमी लेखणे, त्यांचा तिरस्कार करणे हे असभ्य आहे. बऱ्याच व्यक्ती आणि संस्था जनजागृती करत आहेत. माझे बरेच मित्र , सहयोगी मानसोपचारतज्ञ लोकशिक्षणात काम करतात. ते अशा पेशंटचा उपचार करतात. मानसोपचार तज्ञ हे निरोगी समाजाचा एक आधारस्तंभ आहेत. वर सांगितलेल्या पेशंटसारखे बरेच पेशंट हॉस्पिटल मध्ये जीव वाचल्यावर मानसोपचार तज्ञांकडे उपचार घेतात आणि बरे होतात. बरे झालेले काही रुग्णही आपले अनुभव जाहीर करून जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न करतात. दीपिका पादुकोनने टीव्हीवर स्वतःच्या डिप्रेशन चे अनुभव मांडले आणि त्याला ती कशी सामोरी गेली हे सांगितले. माझ्या मते ही खूप मोठी गोष्ट आहे. बऱ्याच लोकांना त्याची मदत होईल. आपल्या थोड्या कनवाळू वागण्याने कुणाला मोठी मदत होऊ शकते. आपल्या मित्रांचे आणि नातेवाईकांचे गाऱ्हाणे हे कधी कधी मदतीसाठी मारलेली हाक असू शकते हे लक्षात असू द्या. डिप्रेशन हे नाटक नाही , थेरं नाही तो एक आजार आहे. आपण त्याच्याशी लढू शकतो.
रोलिंगने तिच्या हॅरी पॉटर कादंबरीत डिमेन्टर नावाच्या एका काल्पनिक पात्राची निर्मिती डिप्रेशन च्या आजारावर आधारित केली आहे. हे डिमेन्टर माणसाच्या शरीरातील आनंद शोषून घेतात. अगदी आत्मा सुद्धा. त्यांच्याशी लढण्याचा उपाय म्हणून पेट्रोनस नावाचा जादुई मंत्र असतो. तो डिमेन्टर पासून आपली रक्षा करतो. आपणही कुणासाठी पेट्रोनस होऊया. डिप्रेशनशी लढुया
Excellent
LikeLiked by 1 person
धन्यवाद!
LikeLike
Must read article.
LikeLike
Thank you☺
LikeLike
Khoop chaan aahe lekh .
JK Rowling che naav aale, tenvha, thode tichya baddal, tine eka mulakhateet sangitale hote, eke kali ti swata suddha itkya depression madhe hoti ki atmhatye che vichar tichya manat hote. Pan pudhe tila professional help milali ani lakho lokana “Harry Potter” cha anand 🙂
LikeLiked by 1 person
धन्यवाद!
जे के रोलिंग नी जे डिमेन्टर चे वर्णन केले आहे ते वाचलं तर लगेच कळतं की हे डिप्रेशन च वर्णन आहे! तसंच बालकवींच्या कविताही. तुम्ही म्हणताय ती जेके रोलिंगची मुलाखत मी बघितलीय. योग्य उपचार मिळाल्यावर आयुष्य कसं बदलू शकतो ह्याच ती छान उदाहरण आहे☺
LikeLiked by 1 person
Great work dude
LikeLiked by 1 person
Thank you!
LikeLike
ह्याउलट लोक त्यांना आपण स्वतः कसे लढलो, आपण किती बिकट परिस्थितीतून मार्ग काढला, आमच्या वेळी गोष्टी किती कठीण होत्या वगैरे वगैरे सांगतात.यामागे हेतू बरेचदा चांगला असतो पण मदत होण्यापेक्षा नुकसान होण्याची शक्यता असते. पेशंटचा आत्मविशास अधिक खचतो. आपले अनुभव दुसर्यांना बोलून दाखवण्याची इच्छा कमी होते.
Hi gosht adhik lokana kalali pahije. Traasat asleli vyakti jevha mann halka karnyas bolte tevha keval aikun ghene ha sudhha mitha adhar asto. Pan sahasa he lokana kalat nahi aani kalalyaas, kadachit anavadhaanane, tyakade durlaksha kartat he hi titkech khare.
LikeLiked by 1 person
Thank you Bhagyashree!
LikeLike
शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य देखील तेवढंच महत्वाचं आहे पण आपल्याकडे त्याविषयी अज्ञान आहे खूप असं दिसतं. तुमच्या या लेखामुळे बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतायत,अश्या समस्येतून जाणाऱ्या लोकांबद्दल इतरांचा दृष्टिकोन सकारात्मक असेल तरी खूप फरक पडतो असं वाटतं. बाकी आपला लेख माहितीपूर्ण आहे👍
LikeLiked by 1 person
धन्यवाद! आपल्यासारखे वाचक प्रतिक्रिया देतात त्यामुळे लिहिण्याचा उत्साह वाढतो. आभारी आहे ☺
LikeLiked by 1 person