Scroll to top

चिकनगुनिया: ताप आणि सांधेदुखी


vinayakhingane - October 19, 2016 - 4 comments

img_20160827_000001

 

 

चिकनगुनिया हा एक त्रासदायक आजार आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी चिकनगुनियाची मोठी साथ आली होती. तेव्हा पासून चिकनगुनिया हा शब्द लोकांच्या ओळखीचा झाला. आज ह्या आजाराबद्दल थोडं जाणून घेऊया.

चिकनगुनिया म्हणजे काय? हा काय आजार आहे?

चिकनगुनिया हा व्हायरस किंवा विषाणू मुळे होणारा आजार आहे. चिकनगुनिया चे व्हायरस रुग्णाच्या शरीरातून डासांमार्फत निरोगी व्यक्तीच्या शरीरात जातात. हे व्हायरस किंवा विषाणू निरोगी व्यक्तीच्या शरीरात वाढून त्याला चिकनगुनिया चा आजार होतो. हा आजार बराचसा डेंगू सारखा आहे. या दोन्ही आजारांचे विषाणू ‘एडिस’ ह्या जातीच्या डासांमुळे पसरतात. त्यांना टायगर डास सुद्धा म्हणतात. डेंगू किंवा चिकनगुनिया हे आजार संसर्गजन्य नाहीत. म्हणजेच आजारी व्यक्तीच्या स्पर्शाने पसरणारे नाहीत. डासांचा नायनाट केला तर डेंगू आणि चिकनगुनिया ला दूर ठेवता येईल.

img-20161019-wa0012

 

चिकनगुनियाची लक्षणं काय?

चिकनगुनिया हा तापाचा आजार आहे. ताप हा साधारण तीन ते चार दिवस असतो. ताप थंडी वाजून येऊ शकतो. सोबत डोकेदुखी, अंगदुखी, मळमळ होणे, उलटी होणे, पुरळ येणे इत्यादी लक्षणं दिसू शकतात. पण तापासोबतचे मुख्य लक्षण म्हणजे सांधेदुखी. सांधेदुखी जोरदार असते. हातापायाचे छोटे आणि मोठे सगळेच सांधे दुखू शकतात. सांध्यांवर सूज सुद्धा येऊ शकते. हे दुखणं इतकं त्रासदायक असतं की पेशन्ट हवालदिल होतात. चिकनगुनिया ह्या आफ्रिकन शब्दाचा अर्थ (दुखण्याने)वाकून गेलेला असा होतो. ही सांधेदुखी काही दिवस असते व ताप कमी झाल्यावर हळूहळू कमी होते. पण काही पेशंट मध्ये ही सांधेदुखी बराच काळ टिकू शकते. डॉक्टरांच्या सल्याने औषध घेतल्याने ही सांधेदुखी बरी होण्यासारखी असते.
चिकनगुनियाचं दुखणं हे तीव्र स्वरूपाचं असलं तरी ह्या आजारात जीवाला धोका होत नाही. डेंग्यूत ज्याप्रमाणे रक्तवाहिन्या पाझरून रक्तदाब (बीपी) कमी होउ शकतो किंवा इतर अवयवांवर परिणाम होऊ शकतो तसे गंभीर परिणाम चिकनगुनियात सहसा दिसत नाहीत. त्यामुळे घरी आराम करून इलाज करण्यासारखा हा आजार आहे.
पण
पण हे नेहमी लक्षात ठेवावं की तुम्हाला चिकनगुनिया वाटणारा आजार हा दुसरा ताप असण्याची शक्यता असू शकते. तापाचे बरेच आजार पहिल्या काही दिवसात सारखेच दिसतात. हिवताप(मलेरिया) किंवा टायफॉईड ला विशिष्ट औषध द्यावे लागते. डेंगू मध्ये विशेष लक्ष ठेवावे लागते. त्यामुळे हे आजार नाहीत ना ह्याची खात्री काही पेशन्ट मध्ये आपल्याला करून घ्यावी लागते. पुढील काही लक्षणं दिसल्यास आपण डॉक्टरांना लगेच भेटून तपासणी करून घ्यावी.
धोक्याची लक्षणे
ताप कमी न होणे किंवा वाढत जाणे
चक्कर येणे
पोटात खूप दुखणे
वारंवार उलटी होणे
नाकातून/तोंडातून/लघवी संडास वाटे रक्तस्त्राव होणे
चक्कर येणे
दम लागणे/धाप लागणे
लघवी कमी होणे
गुंगी येणे
हातपाय थंड पडणे, बीपी कमी होणे
लहान मुलांमध्ये मुल सारखे रडणे
मुलांचे खाणे व पिणे कमी होणे
इत्यादी लक्षणं दिसल्यास वेळ न दवडता डॉक्टरांना भेटावं. ही लक्षणं चिकनगुनियाची नसून गंभीर आजारांची असू शकतात.

चिकनगुनियाचे निदान

चिकनगुनिया साठी रक्ताची तपासणी आजाराच्या साधारणतः एक आठवड्यानंतर करतात. अँटिबॉडी ची ही तपासणी चिकनगुनिया आहे की नाही हे सांगू शकते. ही तपासणी डॉक्टरांच्या निदानाला पूरक म्हणून करतात.
इतर तापाच्या आजारांची शक्यता फेटाळून लावण्यासाठी डॉक्टर इतरही काही तपासण्या सांगू शकतात.

चिकनगुनियाचा उपचार
इतर व्हायरल तापांप्रमाणेच चिकनगुनिया हा आपोआप बरा होणारा आजार आहे. ह्या व्हायरस च्या विरोधात कुठलेही औषध सध्या तरी आपल्याकडे नाही. त्यामुळे उपचार हा लक्षणं कमी करण्यासाठी दिला जातो.
आराम करावा.
दुखण्यासाठी व तापासाठी पॅरासीटामॉल व गरज पडल्यास वेदनाशामक औषधे घावी.
भरपूर पाणी व पेये घ्यावीत.
ताप गेल्यावरही दुखणे सुरु राहिल्यास डॉक्टरांना भेटावे. ही सांधेदुखी जवळपास सगळया पेशंट मध्ये ठीक होते.
जर रक्तदाब, डायबेटिस , किडनीचे आजार किंवा हृदयविकार ह्यासारखे काही आजार असतील तर अधिक काळजी घेण्याची गरज असते.
डास हा आपला राष्ट्रीय शत्रू आहे. आपल्या शेजारी राष्ट्रांपेक्षा जास्त नुकसान डास करतात. त्यामुळे डासांचा नायनाट करणं हे प्राधान्य आहे. वैयक्तिक पातळीवर आपल्या घरातील व परिसरातील डासांचा नायनाट करणे व स्वच्छता ठेवणे तसेच नगरपालिका/ ग्रामपंचायत पातळीवर प्रयत्न करून गावातील डासांचा नायनाट करणे आवश्यक आहे.
डासांपासून वाचण्यासाठी मच्छरदाणी, हातपाय झाकणारे कपडे, डास दूर ठेवणाऱ्या क्रीम इत्यादींचा वापर करू शकतो.

डॉ विनायक हिंगणे 

Contact Us
close slider

    Discover more from Vinayak Hingane

    Subscribe now to keep reading and get access to the full archive.

    Continue reading

    ×

    Hello!

    Click one of our representatives below to chat on WhatsApp or send us an email to vinayakhingane@gmail.com

    ×