एका सार्वजनिक ठिकाणी शेजारी उभ्या असलेल्या दोन काकांचा संवाद कानावर पडला.
पहिले काका: काय पंचाईत आहे राव. लघवीला जायची काही सोय नाही इथे.
दुसरे काका: इथेच काय सगळीकडेच बोंबाबोंब आहे. आता काय रस्त्यावर सू करायची काय !
पहिले काका: पण आजकाल बरेचदा नाईलाज होतो. जोरात लघवी येते आणि लवकर गेलो नाही तर लघवी अडकायला होते.
दुसरे काका: प्रोस्टेट का?
पहिले काका: हो. डॉक्टरनी सोनोग्राफी करायला सांगितलं आणि त्यात कळलं.
दुसरे काका: ह्या वयात होतंच म्हणे. मलापण आहे. पब्लिक टायलेटची जरा सोय झाली तर आपल्यासारख्या म्हाताऱ्यांचं किती बरं होईल!
दोन समदुःखी काकांचा संवाद ऐकून जाणवलं की सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव हा आजही मोठा प्रश्न आहे. खासकरून बायका आणि प्रोस्टेट चे पेशन्ट ह्यांना खूपच त्रास होतो. प्रोस्टेटचे पेशन्ट अशा त्रासामुळे सार्वजनिक ठिकाणी जायचं टाळायला लागतात. सारखा लघवीला जातो म्हणून लोक काय विचार करतील असं त्यांना वाटायला लागतं. नकारात्मक विचार आणि नैराश्यही येतं. प्रोस्टेट मूळे होणारे लघवीचे त्रास हे फक्त शारीरिक नसून त्यामुळे होणारी मानसिक कुचम्बना आणि सामाजिक जीवनावर होणारे परिणाम बघता मला ह्या आजाराकडे गंभीरतेने बघावं असं वाटतं.
प्रोस्टेट म्हणजे काय?
प्रोस्टेट ग्रंथी किंवा गाठ ही सगळ्या पुरुषांमध्ये असते. शास्त्रीय मराठीत त्याला पुरःस्थ ग्रंथी म्हणतात. लघवीच्या पिशवीच्या तोंडाशी (म्हणजे लघवीची पिशवी लघवीच्या नळीला जिथे जोडलेली असते तिथे) ही ग्रंथी किंवा गाठ असते. काही रसायने व हार्मोन्स तयार करणे हे प्रोस्टेट चे काम असते. वाढत्या वयासोबत ही गाठ थोडी मोठी होते. काही लोकांमध्ये ती जास्तच मोठी होते. ह्याला इंग्रजी मध्ये Benign Hyperplasia of Prostate म्हणतात. किंवा मराठीत प्रोस्टेटची गाठ वाढली असं म्हणतात. ही गाठ मोठी झाली तर लघवी पिशवीतून बाहेर येताना अडथळा येतो. (प्रोस्टेटची संरचना दाखवणारा छोटा व्हिडीओ जोडतो आहे)
प्रोस्टेटची लक्षणं:
प्रोस्टेट वाढली की लघवीला अडथळा येतो व पुढील लक्षणं दिसतात
लघवी अडकल्या सारखी होणे, हळूहळू होणे
लघवीला ताण करावा लागणे
लघवीला घाई होणे
वारंवार लागावी लागणे
रात्री लघवीला जावे लागणे
लघवीला गेल्यावर लगेच लघवी न होणे
लघवी तुंबून राहणे
लघवी झाल्यावरही लघवी थेंब थेंब होणे
लघवी तुंबल्यामुळे किडनीचे काम कमी होणे किंवा वारंवार इन्फेक्शन (जंतू संसर्ग) होणे इत्यादी त्रास होऊ शकतात.
प्रोस्टेटची गाठ वरून तपासता येत नाही. गुद्द्वारातून बोट घालून ती तपासतात (रेक्टल तपासणी).
काही चाचण्या करण्याची गरज असते का?
डॉक्टर प्रोस्टेटची लक्षणं दिसली तर सोनोग्राफी करायला सांगतात. सोनोग्राफी मध्ये प्रोस्टेटचा आकार किती वाढला आहे व कुठला भाग वाढला आहे इत्यादी आपल्याला कळतं. त्याचप्रमाणे लघवी केल्यावर पूर्ण लघवी मोकळी होते का किंवा काही लघवी तुंबून राहते का अशी माहिती सुद्धा मिळते. पी एस ए (PSA) नावाची एक रक्ताची चाचणी डॉक्टर करायला सांगतात. प्रोस्टेट ग्रंथीमध्ये कॅन्सर ची शक्यता तपासून बघण्यासाठी ही चाचणी केली जाते. जर कॅन्सर ची शक्यता वाटली तर इतर तपासण्या केल्या जातात.
युरोफ्लोमेट्री नावाची एक तपासणी युरोलॉजिस्ट(किडनी व मूत्रमार्गाचे सर्जन) करतात. ह्या तपासणी मध्ये लघवीच्या मार्गात कितपत अडथळा आहे, लघवीच्या पिशवीची ताकद कशी आहे इत्यादी माहिती मिळते.
प्रोस्टेटसाठी उपचार करताना ह्या सगळ्या माहितीचा फायदा होतो. ह्याशिवाय नेहमीच्या रक्त लघवीच्या चाचण्या इतर काही त्रास नाही ना हे बघण्यासाठी डॉक्टर करून घेतात.
प्रोस्टेट गाठ/ग्रंथी वाढणे आणि प्रोस्टेट चा कॅन्सर ह्यात फरक आहे.
प्रोस्टेट ची गाठ वाढणे किंवा Benign Hyperplasia of Prostate ह्यात होणारी प्रोस्टेटची वाढ ही कॅन्सरच्या वाढीपेक्षा वेगळी असते. ह्यामुळे गाठ फक्त मोठी होते. त्यामुळे लघवीचा त्रास होतो पण ही गाठ कॅन्सर सारखी पसरत नाही. Benign चा अर्थ ‘जीवघेणी नसलेली’ असा घ्यावा. प्रोस्टेटच्या कॅन्सर मध्ये बरेचदा लक्षणं दिसत नाही.कधी कधी लघवीच्या त्रासा सोबतच वजन कमी होणे, पाठदुखी , कंबरदुखीइत्यादी लक्षणं कॅन्सर मध्ये दिसू शकतात. जवळच्या नातेवाईकांना प्रोस्टेट कॅन्सर असल्यास ती माहिती डॉक्टरांना सांगावी. तुमचे डॉक्टर प्रोस्टेटच्या कॅन्सर ची शक्यता पडताळून त्यानुसार काय काय तपासण्या करायच्या ते सांगतात.
प्रोस्टेट ग्रंथी वाढल्यास त्याचा उपचार काय?
प्रोस्टेट गाठ वाढल्यास (Benign Hyperplasia of Prostate) साठी औषध गोळ्या देण्यात येतात. अल्फा ब्लॉकर नावाच्या गटातील औषधे (उदा: टॅमसुलोसिन) किंवा फिनास्टेराइड सारखी औषधे प्रोस्टेट चा आकार कमी करण्यासाठी मदत करतात. ह्या औषधांनी लघवीला होणारा त्रास कमी होतो. तुमचे डॉक्टर तुम्हाला योग्य असलेलं औषध त्याचे फायदे आणि तोटे समजावून सुरु करतात. वर सांगितल्या प्रमाणे इतर तापासण्यानी मिळालेल्या माहितीवरून व गोळ्यांनी कितपत फरक पडतो ह्यावरून शस्त्रक्रिया (सर्जरी) करायची गरज आहे का हे ठरवण्यात येते.
शस्त्रक्रिया ही दोन प्रकारची असते. एक म्हणजे पोटावर काप देऊन प्रोस्टेट ग्रंथी पर्यंत पोहोचून ती काढल्या जाते. ही शस्त्रक्रिया कमी प्रमाणात केल्या जाते. नेहमीची /रूढलेली पद्धत म्हणजे लघवीच्या नळीतून दुर्बीण (स्कोप) टाकून प्रोस्टेटची ग्रंथी खरवडून काढल्या जाते. ह्या शस्त्रक्रियेचा उद्देश लघवी मोकळी व्हावी व लक्षणं कमी व्हावी असा असतो. क्वचित ही शस्त्रक्रिया झाल्यावर प्रोस्टेट ग्रंथी परत वाढू शकते. काही वेळेस लघवीचा मार्ग अरुंद होऊ शकतो. शस्त्रक्रिये नंतर लघवीचे नियंत्रण बिघडण्याची शक्यता अगदी क्वचितच असते. कुठल्याही शस्त्रक्रियेत काही धोके असतात तसेच ते या दोन्ही शस्त्रक्रिये मध्ये सुद्धा असतात. चांगला सर्जन आणि अनुभवी चमू असल्यास हे धोके कमी होतात.
काही रुग्णांमध्ये काही कारणास्तव शस्त्रक्रिया करू शकत नाही. अशा वेळी तसेच अचानक लघवी तुंबल्यास लघवीची नळी(कॅथेटर) लावतात. हे कॅथेटर तात्पुरते किंवा खूप दिवसांसाठी सुद्धा लावता येते.
वरील उपचारांपैकी तुमच्यासाठी योग्य उपचार कुठला हे ठरवून त्रासापासून सुटका होऊ शकते. त्रास सहन करण्याऐवजी डॉक्टरांना भेटा.