Scroll to top

सी पी आर


vinayakhingane - June 18, 2017 - 0 comments

IMG_20170618_141028_874.jpg

शंकरराव वय वर्ष ५०. ऑफिस मध्ये काम करताना अचानक कोसळले. हृदयविकाराचा मोठा झटका होता. सहकाऱ्यांनी घाई करत जवळचं हॉस्पिटल गाठलं. अवघ्या 20 मिनिटात शंकरराव हॉस्पिटलच्या बेडवर होते पण उशीर झाला होता .त्यांचा श्वास आणि हृदय बंद पडून किती वेळ झाला हे सांगण कठीण होत. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली. लगेच सीपीआर सुरु केला . अद्ययावत उपचारांच्या मदतीने हृदय सुरु झाले . व्हेंटिलेटरवर कृत्रिम श्वासोच्छ्वास सुरु झाला. बिपी वाढवण्यासाठी औषधे शिरेतून सतत सुरु होती . हृदयविकाराचा झटका मोठा असला तरी हृदय त्यातून सावरत आहे असं इकोच्या तपासणीत दिसलं. ह्या सगळ्या चांगल्या बाबी असूनही डॉक्टर काळजीत होते . शंकररावांच्या हृदयापेक्षा मोठी काळजी आता मेंदूची होती . हृदय बंद पडल्यामुळे मेंदूचा रक्तपुरवठा किती काळ बंद होता ह्याचा अंदाज नव्हता अशा वेळी मेंदूला मोठी इजा होऊ शकते आणि त्याचा परिणाम गंभीर होऊ शकतो. शंकररावांच्या बाबतीत डॉक्टरांची ही भीती खरी ठरली. शंकररावांच हृदय आणि शरीर सावरलं पण मेंदू नाही. ते अंथरुणाला खिळून राहिले. बोलणं, चालणं, खाणं किंवा रोजची कामं ह्यातल काही एक ते करू शकत नव्हते. त्याचं उरलेलं आयुष्य ‘व्हेजिटेटीव्ह स्टेट’ मध्ये गेलं. सगळ्यांसाठीच ही गोष्ट एक शोकांतिका ठरली.
भारतात दरवर्षी लाखो लोक शंकररावांसारखे अचानक हृदय बंद पडून कोसळतात. त्यातील काहीच लोक वाचतात. वाचलेल्यांपैकी बऱ्याच लोकांना मेंदूला इजा होते. सुखरूप वाचण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेत सीपीआर आणि वैद्यकीय मदत मिळणं.
सीपीआर तुम्ही बरेचदा सिनेमात किंवा टीव्हीवर बघितला असेल. दोन्ही हातानी पेशंटच्या छातीवर दाब देऊन हृदयाचं पंपिंग सुरू ठेवायचा प्रयत्न करायचा आणि मध्ये तोंडाने कृत्रिम श्वासोच्छ्वास द्यायचा. असे करण्याचा मुख्य उद्देश हा हृदयाचे पंपिंग सुरू रहावे व मेंदूचा रक्तपुरवठा सुरू रहावा असा असतो. अशा वेळी हृदय पुन्हा सुरू होऊ शकते. हॉस्पिटल मध्ये रुग्ण हृदय बंद पडून कोसळला तर हृदय परत सुरू होईपर्यंत सीपीआर करतात. सीपीआर सोबत मदतीला इतर औषधं आणि डिफिब्रिलेटर सारखी साधनं हॉस्पिटलमध्ये असतात. हृदय सुरू झाल्यावर अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटर व इतर यंत्रांच्या मदतीने उपचार होतो. विकसित देशांमध्ये पॅरामेडिक्स असलेल्या अँबूलन्स असतात. त्यांच्या चमू सीपीआर, औषधं आणि डीफिब्रिलेटर ह्यांचा वापर करून पेशंटला हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत वाचवण्याचा प्रयत्न करतात. सीपीआर ही जीव वाचवणारी उपाययोजना आहे. मृत्यूच्या दाढेतून परत येणं ही संकल्पना सीपीआर मुळे शक्य आहे. सगळे डॉक्टर आणि नर्सेस ह्यांना सीपीआर चं ट्रेनिंग घेणं आवश्यक आहे.
पण असं ट्रेनिंग साध्या नागरिकांनी घेतलं तर ते सुद्धा जीव वाचवू शकतील का? हा प्रश्न जगभरातील तज्ज्ञांना सुद्धा बरेचदा पडला. त्याबद्दल बरेचदा अभ्यासही करण्यात आला. स्वीडनच्या एका मोठ्या अभ्यासात असं दिसलं की अँबूलन्सची तज्ञ चमू यायच्या आधी पेशंटला जर जवळपासच्या लोकांनी सीपीआर दिला तर ज्यांना सीपीआर मिळाला नाही अशा लोकांपेक्षा वाचण्याची शक्यता जास्त असते. लवकर सिपीआर दिल्यावर वाचण्याची शक्यता जवळपास दुप्पट असते. त्याशिवाय लवकर सीपीआर मिळालेल्या लोकांना मेंदूची इजा होण्याची शक्यता कमी होते. डेन्मार्क मध्ये झालेला अभ्यासही अशाच निष्कर्षाला आला आहे. डेन्मार्कच्या अभ्यासात पेशंट कोसळल्यानंतर एक वर्षांनी किती पेशंट जिवंत आहेत हे सुद्धा बघण्यात आलं. ज्यांना लवकर सीपीआर मिळाला असे पेशंट जास्त जगलेले आढळले. सर्वसामान्य जनतेने सीपीआर करणे हे इतके महत्वाचे असल्यामुळे बऱ्याचशा देशांनी नागरिकांना सीपीआर शिकवण्याची सोय केली आहे. स्वीडन मध्ये गेल्या 3 दशकात 3 मिलियन लोकांना सीपीआर प्रशिक्षण देण्यात आलं आहे. (त्यांची लोकसंख्या 9.7 मिलियन आहे). डेन्मार्क मध्ये सगळ्या माध्यमिक विद्यार्थाना सीपीआर शिकविणे बंधनकारक आहे. अमेरिकेतील बऱ्याच राज्यांमध्ये हायस्कुल पदवीसाठी सीपीआर शिकणे अनिवार्य आहे. युके मध्ये शाळा, ऑफिस आणि संस्था मध्ये सीपीआर शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. शाळांना सीपीआर शिकण्यासाठी मोफत संच दिल्या जातो.
भारतात परिस्थिती बरीच वेगळी आहे. सामान्य नागरिकांना सीपीआर बद्दल फार कमी माहिती असते. एखादी व्यक्ती अचानक कोसळल्यानंतर मदत करण्याची खूप इच्छा असते पण नेमकं काय करायचं हे माहीत नसल्यामुळे गोंधळ होतो. मागे एका मित्राने त्याचा अनुभव मला सांगितला. तो बस मध्ये प्रवास करत असताना एक गृहस्थ कोसळले. माझ्या मित्राने ड्रायव्हर ला सांगून बस थेट हॉस्पिटलला पोहोचवली. पेशंटला आडवं करून त्यांना वारा घातला व कुणीतरी चॉकलेट तोंडात टाकलं (शुगर कमी झाली असेल असं समजून). ह्या पलीकडे कुणी काही करू शकलं नाही. गृहस्थ हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याच्या आधीच वारले. त्यांच्यासाठी आणखी काही करता आलं असतं का असं माझा मित्र मला विचारत होता. आपल्या समोर एखाद्या व्यक्तीचा अचानक मृत्यू होणं हा एक मोठा धक्का असतो. असा अनुभव आलेले बरेच मित्र भेटले, रुग्णाचे नातेवाईकही भेटले. आपल्या सभोवती अचानक कुणीतरी कोसळलं तर काय करायचं हा प्रश्न खूप लोकांना असतो. ह्याचं सोपं उत्तर आहे की सिपीआर करायचा.
सीपीआर कधी, कुणाला आणि कसा करायचा ह्याचा प्रशिक्षणवर्ग काही तासांचा असतो. ह्यात पेशंटचा श्वास आणि नाडी कशी बघायची, पुढे काय करायचे हे सगळं शिकवल्या जातं आणि त्याची तालीम सुद्धा घेतल्या जाते. सूचना सोप्या भाषेत असतात आणि सगळं काही प्रॅक्टिकल असतं. त्यामुळे बहुतेक सगळ्यांना दिवसाखेर सीपीआर करण्याचा आत्मविश्वास येतो. वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये काय करायचं ह्याच्या टिप्स असतात. भारतात बऱ्याच ठिकाणी हे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. त्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सुद्धा हे वर्ग घेतात. ज्यांना शक्य आहे त्या सगळ्यांनी सीपीआर शिकणं गरजेचं आहे. ह्यासाठी सरकारी पातळीवर योजना आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. त्याशिवाय आपण वैयक्तिक पातळीवर बरच काही करू शकतो. सीपीआर विषयी जनजागृती करू शकतो. थोडा वेळ काढून सीपीआर शिकू शकतो. रटाळ रुटीन मधून बाहेर पडून काहीतरी एक्ससायटींग शिकण्यासाठी सिपीआरचा वर्ग उत्तम पर्याय आहे.
भारतात आता इमर्जन्सीअंबुलन्स सेवा उपलब्ध होत आहेत. हॉस्पिटलमध्ये आधुनिक उपचार मिळत आहेत. आपण सीपीआर केल्यास पुढील मदत मिळणे शक्य झाले आहे. सगळ्यांनी सीपीआर शिकल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल.

डॉ विनायक हिंगणे

Contact Us
close slider

    Discover more from Vinayak Hingane

    Subscribe now to keep reading and get access to the full archive.

    Continue reading

    ×

    Hello!

    Click one of our representatives below to chat on WhatsApp or send us an email to vinayakhingane@gmail.com

    ×