सध्या सोशल मीडियावर “गहू खूपच वाईट “अशी एक पोस्ट व्हायरल झाली आहे. काही मित्रांनी आणि नातेवाईकांनी हे कितपत खरं आहे हे विचारलं. त्याचं सविस्तर उत्तर आज लिहितो आहे.
मुळात ही पोस्ट विल्यम डेव्हिस ह्यांच्या “व्हिट बेली” ह्या वादग्रस्त पुस्तकावर आधारित आहे. ह्या पोस्ट मध्ये सर्वसाधारण जनतेच्या आरोग्यासाठी गहू किती हानिकारक आहे असं ठसविण्याचा प्रयत्न केला आहे. जीवनशैलीशी निगडित आजार जसे डायबेटीस, बीपी, हृदयरोग इत्यादी सगळे फक्त गव्हामुळे होतात आणि फक्त गहू खाणे बंद केले तर आपण हे आजार बरे करू शकतो असा ह्या पोस्ट चा सारांश आहे. मी “व्हिट बेली” हे पुस्तक तर वाचलेले नाही पण इंटरनेट वर थोडे तपासून बघितले तर हे पुस्तक वादग्रस्त आहे हे लगेच कळले. पुस्तकातील माहिती, दृष्टिकोन, आणि दावे ह्या सगळ्यांवर आक्षेप घेतला गेला आहे. पुस्तकातील विधानांना वैज्ञानिक पाठबळ नाही आणि काही विधानं ही परस्परविरोधी आहेत असेही आक्षेप आहेत. तेव्हा हे पुस्तक वाचताना आणि त्यातील सल्ले घेताना आपण अतिशय सतर्क असायला हवं. मी हे पुस्तक वाचलेले नसल्यामुळे त्याविषयी न बोलता आपण पोस्ट मधील मुद्द्यांकडे वळू.
गहू हे एक महत्वाचे तृणधान्य आहे. गव्हामधून आपल्याला कर्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट मिळतात. कार्बोहायड्रेट हा आपल्या आहारातील महत्वाचा घटक आहे. त्याशिवाय गव्हामध्ये ग्लूटेन नावाचे प्रथिन असते. (ह्या पोस्ट मध्ये ज्याचा उल्लेख आहे ते अमायलोपेकटीन हे सुद्धा कार्बोहायड्रेट आहे आणि ग्लायडीन हा ग्लूटेन प्रथिनांचाच एक भाग आहे) गव्हाला इतर तृणधान्यापासून वेगळे करते ते मुख्यत्वे ग्लूटेन हे प्रथिन किंवा प्रोटीन. गव्हाशिवाय राय, बार्ली आणि ओट्स ह्यामध्ये सुद्धा ग्लूटेन सापडते. ह्याशिवाय काही कार्बोहायड्रेट आणि इतर प्रोटीन्स हे इतर तृणधाण्यापेक्षा वेगळे असतात. साधारण निरोगी जनतेला आहारामध्ये तृणधान्याची गरज मुख्यत्वे उर्जे साठी आणि परिणामी कार्बोहायड्रेट साठी पडते. त्याशिवाय काही प्रमाणात प्रोटिन्स आणि इतर आहारतत्वे सुद्धा मिळतात. ही गरज मोठ्या लोकसंखेमध्ये गहू पुरवतो. असा उपयुक्त असलेला गहू धोकादायक सुद्धा असू शकतो का?
सिलियाक डिसीज नावाचा एक प्रतिकारशक्तीचा आजार आहे.( ह्यात आपली प्रतिकारशक्ती यंत्रणा आपल्याच शरीराच्या विरुद्ध लढते आणि त्रास होतो.) ह्या आजाराने त्रस्त व्यक्तीने ग्लूटेन प्रोटीन असेलेले अन्न खाल्ल्यास त्याला पोटात दुखणे, मळमळ उलटी होणे, जाउलब होणे किंवा बद्धकोष्ठता होणे अशी लक्षणे दिसू शकतात. खूप काळ हे सुरू राहिल्यास आतड्याला जास्त इजा होते आणि जीवनसत्वाची कमतरता व कुपोषण सुद्धा होते. ह्या पेशंटच्या रक्तात विशिष्ट अँटीबॉडी असतात. त्यावरून ह्या आजाराचे निदान होऊ शकते. काही लोकांना ग्लूटेन मुळे अशाच प्रकारचा पण थोडा सौम्य त्रास होतो. पण त्यांच्या रक्तात ठराविक अँटीबॉडी नसतात. ह्यांना नॉन सिलियाक ग्लूटेन सेनसिटीव्हीटी म्हणतात. ह्या दोन्ही ग्लूटेन संबंधित आजारांचे पक्के निदान तज्ञ डॉक्टरांकडून होणे आवश्यक असते. अशा पेशंटना ग्लूटेन विरहित आहार घ्यायला सांगितला जातो. युके मध्ये शंभरामध्ये एका व्यक्तीला असा त्रास असतो. आपल्याकडे हा त्रास कमी लोकांमध्ये दिसतो. फक्त ह्या प्रकारच्या पेशंटना ग्लूटेन किंवा गहू हानिकारक आहे. काही प्रतिकारशक्तीच्या आजारांमध्ये ग्लूटेन विरहित आहाराचा फायदा होतो असेही शोधनिबंध आहेत. पण आजकाल ग्लूटेन विरहित आहार सगळ्यांसाठी चांगला असा गैरसमज पसरत चालला आहे. पाश्चात्य देशांमध्ये बरेच सेलिब्रिटी ग्लूटेन फ्री आहाराची जाहिरात करतात. ग्लूटेन फ्री आहार वजन कमी करायला मदत करतो हे लोकांच्या मनावर ठसवलं जातंय. पण हे चुकीचं आहे. ग्लूटेन फ्री आहाराने वजन कमी होत नाही हे वेगवेगळ्या संशोधनात सिद्ध झालंय. वजन कमी होणे तर सोडाच पण निरोगी व्यक्तींमध्ये ग्लूटेन विरहित आहाराचा कुठलाही विशिष्ट फायदा झाल्याचा सबळ शास्त्रिय पुरावा नाही.
राहिला प्रश्न कार्बोहायड्रेटचा. गव्हाव्यतिरिक्त आपण कुठलेही तृणधान्य खाल्ले तरी कार्बोहायड्रेट चा परिणाम सारखाच होणार. कार्बोहायड्रेट हे सरसकट वाईट हे म्हणणे खूप चुकीचे आहे. कार्बोहायड्रेट किंवा तृणधान्ये खाल्याने जर आरोग्याला अपाय होत असेल तर तो अतिप्रमाणात खाल्याने. निरोगी व्यक्तीला त्याचा आहार संतुलित राहील एवढे कार्बोहायड्रेट रोज खाणे आवश्यक असते. आपण तृणधान्ये, पीठ आणि साखर ह्यांचा अतिवापर करून आपल्या आहारातील संतुलन गमावून बसतो. मग लठ्ठपणा आणि त्याच्यासोबत येणारे इतर आजार आपल्या मागे लागतात. त्यामुळे कार्बोहायड्रेट वर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
आपल्याला गहू किंवा तांदूळ बंद केल्यावर वजन कमी झालं असा अनुभव असलेले लोक भेटतात. त्यांचं वजन कमी झाल्याचे कारण गहू किंवा तांदूळ बंद होणे हे नसून आहारातील कॅलरी कमी होणे हे असते. वजन कमी करण्यासाठी कार्बोहायड्रेट बंद केले किंवा फॅट (स्निग्ध पदार्थ ) बंद केले किंवा जास्त प्रोटिन्स असलेला आहार घेतला तर कुठला सर्वोत्तम? वेगवेगळ्या अभ्यासामध्ये हे दिसून आलं आहे की लांब टप्प्यामध्ये ह्यातील कुठलाही उपाय दुसऱ्या उपायापेक्षा सरस नाही. वजन कमी करण्यासाठी रोजच्या आहारातील साधारण 500 कॅलरी कमी करणे आवश्यक आहे. ते साधलं तर वजन कमी होऊन त्याचा फायदा डायबेटीस व बीपी नियंत्रित व्हायला , दमा , सांधेदुखी व हृदयरोग ह्यांचा त्रास कमी व्हायला होईल. डायबेटीस च्या रुग्णांनी आहारातील कुठलेही मोठे बदल करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ( पोळी किंवा भात पूर्णपणे बंद केल्यावर रक्तातील साखर अचानक कमी होणाची शक्यता असते)
आपल्याकडच्या जेवणात कार्बोहायड्रेट भरपूर असतात. सोबत तेल आणि स्निग्ध पदार्थ असतात. पण प्रोटिन्स आणि कच्चा भाजीपाला कमी पडतो. उदाहरण म्हणून जर तुम्ही फक्त बटाट्याची भाजी आणि पोळी एवढेच जेवलात तर तुमच्या जेवणात कच्च्या हिरव्याभाज्या आणि प्रोटिन्स हे आवश्यक घटक नसतातच. माझे बरेचशे पेशंट असं जेवण जेवतात. त्यामुळे बरेच लोकांनी कार्बोहायड्रेट कमी करून प्रोटीन्स व कच्चा भाजीपाला वाढवण्यासाठी वाव आहे. संतुलित आणि आपल्यासाठी योग्य कॅलरी असलेला आहार कधीही उत्तम! पण त्यासाठी गहू किंवा भात पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. साखर पूर्णपणे बंद केली तर त्यावर आमचा काही आक्षेप नाही.
निरोगी व्यक्तीने गहू पूर्णपणे बंद केला तर त्याच्या पोटातील उपयोगी जिवाणू कमी झाल्याचं अभ्यासामध्ये दिसलं आहे. तृणधान्यातील कार्बोहायड्रेट पोटातील चांगले जिवाणू टिकवून ठेवायला मदत करतात आणि त्याचा आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. ह्याशिवाय निरोगी व्यक्तींमध्ये ग्लूटेन चा सुद्धा चांगला परिणाम दिसून आला आहे. रक्तातील चरबी च्या रिपोर्ट मध्ये ग्लूटेन मुळे चांगली सुधारणा झाल्याचे दिसले आहे. आहारशास्त्रामध्ये वैविध्यपूर्ण आहाराला खूप महत्व दिल्या गेले आहे. जेवणामध्ये एकाच धान्याचा किंवा एकाच प्रकारच्या अन्नाचा भडिमार नको. त्यामुळे गव्हासोबत इतर तृणधान्ये , वेगवेगळी कडधान्ये, तेलबिया ह्यांचा समावेश केला तर ते उत्तमच. काही पोस्ट मध्ये गव्हाच्या ऐवजी ज्वारी वापरा असे जे लिहिलेले असते. ज्वारी किंवा कुठलेही एक धान्य सुपरफूड नसते. त्यामुळे तुम्हाला ग्लूटेन संबंधित आजार नसेल तर गहू पूर्ण बंद करून ज्वारी खायला लागल्यावर तुम्हाला फार काही फायदा होणार नाही. जर तुम्ही गहू , तांदूळ, ज्वारी आणि बाजरी सगळंच खात असाल तर ते वैविध्य तुमच्यासाठी चांगलंच आहे. तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर 500 कॅलरी कमी होतील अशा प्रमाणात खावे.
गव्हाविषयी भीती बाळगण्याची गरज नाही. ग्लूटेन संबंधित आजारांची शंका असल्यास तुमच्या डॉक्टरांना भेटा.
आहाराविषयी अधिक माहितीसाठी वाचा आहाराचं सोपं गणित
डॉ विनायक हिंगणे