Scroll to top

बिईंग मॉर्टल : डॉ अतुल गावंडे


vinayakhingane - July 30, 2017 - 2 comments

IMG_20170730_191402_998.jpg

बिईंग मॉर्टल हे अतुल गावंडे ह्यांचं पुस्तक नुकतंच वाचून संपलं. पुस्तकात म्हातारपण आणि मृत्यु हे दुर्लक्षित मुद्दे खूप सुरेख हाताळलेले आहेत. ‘म्हातारपण कसं सुखकर करायचं आणि मृत्यूला कसं सामोरं जायचं’ ह्याचे सोपे उपाय आणि तत्वज्ञानाचा भडिमार असलेले व्हाट्सएपचे मॅसेज वाचून कंटाळले असाल तर हे पुस्तक एक पर्वणी आहे. मला बऱ्याच लोकांनी हे पुस्तक सुचवलं होतं. त्यांच्याशी ह्या पुस्तकसंबंधी गप्पा म्हणून हा लेख. ज्यांनी पुस्तक वाचलं नसेल त्यांनी रिव्ह्यू समजावा.

म्हातारपण आणि मृत्यू ह्या दोन्हीविषयी आपल्याला भीती असते. कदाचित त्यामुळे आपण म्हातारपण आणि मृत्यू ह्या दोन्ही विषयांकडे उदासीन असतो (कलेच्या बाबतीत हे नेमकं उलटं आहे. म्हातारपण आणि मृत्यू कला व साहित्यात प्रकर्षाने दिसतात). अतुल गावंडे ह्यांनी वाढत्या वयाचे आणि अटळ मृत्यूचे आपल्याला भेडसावणारे मुद्दे स्पष्टपणे पण हळुवार मांडले आहेत. शास्त्रीय अभ्यासांचे दाखले आणि आकडेवारी देत मांडलेली माहिती आपल्याला विचार करायला भाग पाडते आणि सोबतच अनावश्यक भीती सुद्धा कमी करते. त्यामुळे स्वतःच्या म्हातारपणाचे काल्पनिक चित्र समोर उभं राहण्याऐवजी आपलं लक्ष महत्वाच्या मुद्यांकडे ओढल्या जातं. आपलं वय वाढतं म्हणजे नेमकं काय होतं हे समजून घेणं आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. आपण तरुणपणी स्वतंत्र असतो.आयुष्य आपण आपल्या मनासारखं जगू शकतो. पण वयानुसार शरीरात बदल घडतात आणि शारीरिक बंधनं यायला लागतात. आपल्या शारीरिक आणि सामाजिक गरजा बदलू लागतात. वृद्धापकाळात मदत करणारी जेरीयाट्रिक मेडिसिन ही वेगळी शाखा त्यामुळे कशी महत्वाची आहे यावर डॉक्टर गावंडे प्रकाश टाकतात. वयस्कर पेशंटच्या आजारावर उपचार करताना त्यांचा सगळ्या कोनातून विचार केल्यास त्याचा पेशंटला किती फायदा होऊ शकतो ह्याची उदाहरणं बघायला मिळतात. ह्याशिवाय आजकालचं म्हातारपण हे कसं वेगळं आहे ह्याचीही चर्चा पुस्तकात आहे. आधुनिक उपचारांनी आपलं आयुष्यमान वाढलं आहे आणि त्यासोबत बरेच नवीन प्रश्नही. ह्यातील काही प्रश्न वैद्यकशास्त्र सोडवू शकते पण बरेच प्रश्न सोडवण्यासाठी आणखी सखोल विचाराची गरज आहे. विचारांचा हा धागा पुढे नेताना लेखक आपल्याला वृद्धांचा मानसिक दृष्टिकोन समजून घ्यायला मदत करतात. शारीरिक अडचणीपेक्षा जास्त त्रास हा त्या अडचणींमुळे येणाऱ्या परावलंबनातून येतो. आपल्या रोजच्या कामांमध्ये आपण दुसऱ्यावर अवलंबून आहोत ही भावना किती मोठा परिणाम करू शकते ह्याची चर्चा वाचताना आपल्याला वयस्कर लोकांचा दृष्टिकोन समजायला लागतो. शारीरिक बंधनं तर वयानुसार वाढतच असतात पण वृद्धांची काळजी घेताना त्यांच्यावर आपण अधिक बंधन घालतो. ते सुरक्षित रहावेत व त्यांना आणखी त्रास होऊ नये म्हणूनच आपण हे करत असतो. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे एखादी म्हातारी व्यक्ती वारंवार पडू नये म्हणून तिला चालायला बंधन घालून व्हीलचेअर वापरायला सांगणे. आपला चांगुलपणा सुद्धा त्यांच्यासाठी पारतंत्र्य होऊन जातं! आपला दृष्टिकोन कसा असतो ह्याचा सारांश सांगणारं पुस्तकातील एक वाक्य माझं फेव्हरेट आहे.“We want autonomy for ourselves and safety for those we love”.

आपल्याला स्वतः साठी स्वातंत्र्य आणि आपल्या प्रियजनांसाठी सुरक्षितता हवी असते. एका वयानंतर तरुण पिढीला त्यांच्या मोठ्या पिढीतील लोकांसाठी निर्णय घ्यावे लागतात. ते निर्णय घेताना आपण जर ही गोष्ट लक्षात ठेवली तर किती अनावश्यक त्रास वाचेल!

आपल्या आणि मोठ्या पिढीतला दृष्टिकोणातला एक मोठा फरक डॉक्टर गावंडे फार छान मांडतात.साधारण मोठ्या पिढीतील लोक हे अल्पसंतुष्ट आणि समाधानी असतात. त्यांच्या आकांक्षा कमी असतात. ते परिवार आणि जवळच्या मंडळीत रमतात. त्यांच्या सुखाच्या कल्पना छोट्या असतात. रुटीन मध्येही त्यांना आनंद मिळतो. ह्याउलट तरुण पिढीला मोठ्या आकांक्षा असतात. त्यांना नवीन गॊष्टींची आणि नवीन लोकांना भेटायची आवड असते. हा फरक वयानुसार न येता आपल्या हाती किती वेळ शिल्लक आहे ह्या जाणिवेतून येतो. गंभीर आजार असलेल्या तरुण लोकांच्या आवडीनिवडी ह्या सुद्धा वृद्ध लोकांसारख्या असतात असं अभ्यासात दिसलं आहे. त्यामुळे तरुण पिढी आपल्या वडीलधाऱ्यांसाठी सुखाची कल्पना करते ती बरेचदा चुकीची ठरते.आपण आपल्या वडीलधाऱ्यांसाठी काही निवडताना लक्षात ठेवण्यासारखी ही आणखी एक गोष्ट.

वैद्यकीय उपचार आणि अमेरिकेतील यंत्रणा ह्या वृद्ध व्यक्तीच्या सुरक्षिततेचा विचार करताना त्यांच्या स्वायत्ततेचा पूर्ण विचार करत नाहीत आणि त्यातून कसे बिकट प्रश्न निर्माण होतात ह्याचं वर्णन वाचण्यासारखं आहे. अमेरिकन समाज आणि त्यांची सामाजिक यंत्रणा आपल्यापेक्षा बरीच वेगळी आहे. परिवारातील मुले सुजाण झाली की घराबाहेर पडतात. लोक म्हातारपणात एकटे सगळं सांभाळतात. हळूहळू इतरांची आणि मुलांची मदत घ्यावी लागते. जेव्हा स्वंतत्र राहणं अशक्य होतं तेव्हा वैद्यकीय सेवा असलेल्या नर्सिंग होम सारख्या संस्था असतात. पुस्तकातील बराचसा भाग ह्या संस्थांचं स्वरूप आणि त्यांच्या समस्यांची चर्चा करतो. आपल्या कडे संस्थांची अमेरिकेसारखी यंत्रणा नाही तरीही सगळेच मुद्दे आणि चर्चा आपल्याला जवळची वाटते. ह्याचं कारण माझ्यामते असं आहे की आपण घरी सुद्धा वृद्ध व्यक्तींची काळजी घेताना सारख्याच चुका करतो. त्यांना काय हवंय , त्यांच्या स्वातंत्र्यावर आपल्या निर्णयांची गदा तर येत नाही ना , उपचारांमुळे फायदा होण्यापेक्षा त्रास तर होत नाही ना ह्याबद्दल आपल्याला अंतर्मुख करणारं हे पुस्तक आहे.

पुढे अमेरिकेतील वृद्धांच्या सेवेत आणि संस्थांमध्ये झालेले सकारात्मक प्रयोगांबद्दल चर्चा आहे. सुरक्षित आणि पुरेसे उपचार वृद्धांची स्वायत्तता अबाधित राखूनही देता येते हे सिद्ध करणारे प्रयोग मस्त आहेत. निराश आणि विरागी वृद्धांच्या आयुष्यात आनंद आणि नवचैतन्य आणणाऱ्या व्यक्ती खरंच प्रेरणादायी आहेत. आपल्या भारतीय समाजात ह्यातील काही प्रयोग नक्कीच उपयोगी पडतील. आपल्याघरी वडीलधाऱ्यांची काळजी घेताना आपल्याला ह्यातील काही कल्पना आणि तत्व नक्कीच वापरता येतील.

पुस्तकातील अमेरिकी यंत्रणा आणि युके मधील मी बघितलेली वृद्धांसाठी असलेली यंत्रणा बघितली की भारतातील परिस्थिती किती कठीण आहे हे कळते. वृद्धांची काळजी घरातच परिवाराच्या मदतीने केल्या जाते. भारतासाठी हा पर्याय सगळ्यात चांगला आहे. पण गरज पडल्यास दुसरा पर्याय शोधणे खूप कठीण जाते. काही वृद्ध मंडळींना जवळचा परिवार नसतो. बरेचदा वृद्ध मंडळींना त्यांच्या आयुष्यभर ओळखीचा गोतावळा सोडून मुलांकडे अनोळखी ठिकाणी जावं लागतं. त्यांना ते नको असतं. काहींना आपल्या परिवारावर सुद्धा अवलंबून रहायचं नसतं. काही वेळेस आर्थिक प्रश्न असतात. अशा वेळी वृद्धांना दुसरा सोयीस्कर आणि सुरक्षित पर्यायच नसतो. माझ्या बऱ्याचशा पेशंटशी बोलून मला वरील प्रश्न समजले. म्हातारपणाचे अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत. परिवाराबाहेर आणि परिवारातही आपली बरीचशी म्हातारी मंडळी असुरक्षित आहेत. घरी मारहाण होणारे आणि दुर्लक्षित असेही काही वृद्ध असतात. आपल्याकडे वृद्धांच्या सुरक्षिततेवर व संस्थांवर लक्ष ठेवणारी यंत्रणाच नाही. बिईंग मोर्टल वाचल्यावर ही कमतरता अधिकच अधोरेखित होते. ह्यावर मोठ्या पातळीवर यंत्रणा होईल तेव्हा होईल पण आपण सोसायटी आणि कॉलनी च्या पातळीवर प्रयत्न करून आपल्या मोठ्या पिढीचं आयुष्य सोपं करू शकतो.

बिईंग मॉर्टल मधील पुढचा भाग हा बऱ्या न होऊ शकणाऱ्या आजारांनी शेवटच्या घटका मोजणाऱ्या पेशंट बद्दल आहे. उपचारांची लढाई कितपत लढायची आणि कुठे थांबवायची हा खूपच कठीण प्रश्न असतो. त्यातही पेशंट आणि नातेवाईक ह्याची उद्दिष्ट वेगवेगळी असतात. दृष्टिकोन वेगवेगळे असतात. ह्या सगळ्यात उपचारांची मदत होण्याऐवजी त्यांचा त्रासच जास्त होण्याची शक्यता असते. ह्या कठीण परिस्थितीत पेशंटची आणि नातेवाईकांची मानसिकता कशी असते, डॉक्टर काय विचार करतात ह्याविषयी डॉक्टर गावंडे बोलतात. त्यांचे वडील आजारी पडल्यावर ते स्वतः नातेवाईकांच्या भूमिकेत गेले. डॉक्टर म्हणून ते त्यांच्या मरणासन्न रुग्णांवर उपचार करत होतेच. दोन्ही भूमिकांमधून त्यांना काय शिकायला मिळालं ते त्यांनी प्रामाणिकपणे मांडलं आहे. पेशंटच्याआजाराची गंभीरता त्यांना कळली आहे का? मृत्यूची शक्यता त्यांना कळली आहे का? शेवटच्या काळात त्यांच्या काय इच्छा आणि उद्दिष्ट आहेत? त्यांना कितपत त्रासदायक उपचार चालतील? अशा कठीण विषयांवर बोलण्याचे खूप फायदे होतात. आपल्याकडे कमी काळ उरला आहे ही जाणीव झाल्यावर पेशंट तो वेळ त्यांच्यासाठी महत्वाच्या कामी आणू शकतात. कुठलाही मृत्यू हा दुःखदायकच असतो पण त्यातही काही सकारात्मक शोधण्याचा प्रयत्न पेशंट आणि नातेवाईक करतात. त्यांच्याकडून ही संधी हिरावल्या जाऊ नये म्हणून वरवर कठीण व क्रूर वाटणारी चर्चा व्हायलाच हवी. कॅन्सर किंवा जीवघेण्या आजारांवर उपचार करताना पालिएटिव्ह केअरची खूप मदत होते. ह्या उपचाराचा मुख्य हेतू हा आजार बरा करणे नसून रुग्णाला होणारे वेगवेगळे त्रास कमी करणे हा असतो. अशा पालिएटिव्ह उपचारांनी पेशंटसाठी अंत कमी त्रासदायक होतो. नातेवाईक दुःखाला सामोरे जाताना जास्त तयार असतात. शेवटच्या काळात बरेचदा केमोथेरपी सारख्या उपचारांपेक्षा हे उपचार पेशंटसाठी उपयोगी ठरतात. राजेश खन्ना ‘आनंद’ चित्रपटात म्हणतो ना की ‘आदमी की जिंदगी लंबी नही बडी होनी चाहीए’ त्यासारखं पेशंटचा शेवटचा काळ लांबविण्यापेक्षा तो अधिक अर्थपूर्ण करण्याकडे पालिएटिव्ह केअर चा कल असतो. अमेरिकेत आणि युके सारख्या देशात हॉस्पिस ह्या संस्था मरणासन्न लोकांनां पालिएटिव्ह केअर ची मदत करतात. त्यामुळे मृत्यूच्या वेळी पेशंटला सेवा आणि नातेवाईकांना वैद्यकीय मार्गदर्शन मिळत राहते. शेवटच्या वेळी हॉस्पिटलला न्यायची धावपळ आणि मानसिक त्रास कमी होतो. ह्याबद्दल डॉ गावंडे त्यांचा स्वतःचा अनुभव सांगतात. हे सगळे अनुभव आणि लोकांच्या गोष्टी वाचून मला स्वतःच्या प्रॅक्टिस मधील रोजचे प्रश्न दिसले. त्यांच्याकडे बघण्याचे काही नवीन दृष्टिकोनही दिसले. वैद्यकीय क्षेत्रात नसलेल्या व्यक्तींनाही हे प्रश्न जवळचे वाटतील.

मृत्यू आणि म्हातारपण याबद्दल डॉक्टर गावंडे आपल्याला विचार करायला भाग पाडतात. शास्त्रीय माहिती आणि त्यांचे अनुभव आपल्या समोर ठेवतात. कुठलेही ढोबळ सल्ले न देता हे पुस्तक बरंच काही शिकवून जातं.

डॉ विनायक हिंगणे

Contact Us
close slider

    Discover more from Vinayak Hingane

    Subscribe now to keep reading and get access to the full archive.

    Continue reading

    ×

    Hello!

    Click one of our representatives below to chat on WhatsApp or send us an email to vinayakhingane@gmail.com

    ×