Scroll to top

निगेटीव्ह 🎞️


vinayakhingane - November 15, 2017 - 7 comments

माझी आई एक प्रोफेशनल फोटोग्राफर आहे. डिजिटल फोटोग्राफीच्या आधी फोटोग्राफी बरीच वेगळी असायची. त्यातल्या काही गोष्टी आईने मला शिकवल्या. ब्लॅक अँड व्हाईट फिल्म डब्यात मिळायची. ती अंधारात रोल मध्ये गुंडाळायची आणि मग तो रोल कॅमेऱ्यात टाकायचा. फोटो काढला की ती फिल्म अंधाऱ्या खोलीत वेगवेगळ्या केमिकल्स मध्ये वेगवेगळ्या काळापर्यंत बुडवून ठेवायची. हे टायमिंग खूप महत्त्वाचं असायचं. फिल्म कमी किंवा जास्त डेव्हलप झाली तर फोटो बिघडणार! हळूहळू अनुभवातून प्रत्येक केमिकल साठी किती वेळ द्यायचा ते जमायला लागलं. कॅमेरा आणि फिल्म चं थोडं विज्ञान पण कळायला लागलं. पण विज्ञानासोबतच फिल्म डेव्हलप करणं ही एक कला आहे हे कळलं. या डेव्हलप केलेल्या फिल्मला निगेटिव्ह पण म्हणतात. मी शाळेत शिकतअसताना कधीतरी स्टुडिओत जायचो. आमच्या अगदी छोट्याश्या आणि केमिकल्स च्या वासांनी भरलेल्या डार्क रूममध्ये निगेटीव्ह डेव्हलप करताना एक कुतूहल असायचं. आपल्या डोक्यात जशी कल्पना अचानक येते तशी त्या फिल्मवर अंधारातून आकृती उमटायची. ती आकृती पण मजेशीर असायची. हसणारी व्यक्ती असेल तर दात काळे दिसायचे! मग आई त्या निगेटीव्ह कडे बघून नीट डेव्हलप झालीय का ते सांगायची. तिला त्या निगेटीव्ह मध्ये नंतर तयार होणारा फोटो दिसायचा! अनुभवातून तुम्ही निगेटीव्हच्या पुढे बघू शकता. आईच्या त्या कौशल्याने मी फारच इम्प्रेस व्हायचो.

मला हे सगळं एका वेगळ्याच संदर्भात आठवलं. जे के रोलिंग ही माझी आवडती लेखिका आहे. तिला ट्विटरवर फॉलो करताना दिसतं की लोक खूपदा बरेवाईट बोलतात. काही लोक शिवीगाळ करतात. बरेच आरोप होतात. तिची राजकीय मतं काही लोकांना पटत नाहीत. तिला गप्प बसायला सांगणारे आणि तिने काय बोलावे/काय बोलू नये असे सांगणारे खूप लोक दिसतात (त्यावर ती कधी कधी भन्नाट उत्तरं देते!)… तर सांगायचा मुद्दा असाकी ती ट्विटरवर आली की निगेटीव्ह गोष्टींचा भडिमार तिच्यावर होतो. तिला ह्या गोष्टींचा त्रास होतो हे बरेचदा तिच्या ट्विट्स मधून दिसतं सुद्धा. तिच्या सारखे अनेक लोक आहेत. कलाकार, लेखक, संगीतकार, चित्रकार असे बरेच क्रिएटिव्ह लोक नकारात्मक टीका आणि टिप्पण्याना सोशल मीडियावर सामोरे जाताना आपल्याला दिसतात. साधारणपणे आपल्या मेंदूचा रोजच्या निगेटीव्ह गोष्टींना प्रतिसाद हा निगेटीव्ह असतो. चिडचिड, सारखा बचावात्मक पवित्रा घेणे किंवा आक्रमक होणे अशा सगळ्या गोष्टी दिसतात. लोक कधीकधी कंटाळून सोशल मीडिया , बातम्या इत्यादी गोष्टी बंदच करून टाकतात. पण मला ह्या कलाकार मंडळींचं कौतुक वाटतं. ते ह्या सगळ्या निगेटीव्हच्या पुढचं सौंदर्य बघू शकतात. त्यांचा कलेच्या माध्यमात ते सौंदर्य सादर करतात. काही सर्वसामान्य लोक सुद्धा काही इतक्या सुंदर पोस्ट टाकतात की दिवस प्रसन्न होऊन जातो.

आमच्या डॉक्टर पेशात सुद्धा काहीसं असंच आहे. डॉक्टरांकडे नेहमी दुःखी लोक येतात. (प्रसुतीसाठी येणारे अपवाद. पण ते सुद्धा घाबरलेले असतात). आजार आणि वेदना असतात. त्यातच भीती, डॉक्टरांविषयी शंका,हताशा आणि राग हे सगळं बरेचदा सोबतीला असतं. ह्या सगळ्या निगेटीव्ह भावनांना हाताळण हे डॉक्टरांचं व्यावसायिक कौशल्य झालं. काही ठिकाणी ते शिकवलं सुद्धा जातं. पण ह्या प्रोफेशनल गोष्टीच्या पुढे जाऊन बरेचदा काम करावं लागतं. काही सकारात्मक केलं तर पेशंटचं जीवन बदलतं. निगेटीव्ह गोष्टींच्या भडीमारातून पेशंट चं निदान आणि उपचार डेव्हलप करावे लागतात. त्यासाठी कदाचित तीच क्रिएटिव्हिटी लागते जी कलेला हवी असते. निगेटिव्हीटीच्या भोवऱ्यात न अडकता असं काम करणाऱ्या बऱ्याच डॉक्टरांना भेटण्याची आणि त्यांच्या कामाने इम्प्रेस होण्याची संधी मला मिळाली ह्याचं समाधान आहे. सुचलं आणि तुमच्याशी शेअर करावं म्हटलं.

डॉ विनायक हिंगणे

Contact Us
close slider

    ×

    Hello!

    Click one of our representatives below to chat on WhatsApp or send us an email to vinayakhingane@gmail.com

    ×
    %d bloggers like this: