Scroll to top

स्मृतिभ्रंश / डिमेन्शिया


vinayakhingane - February 11, 2019 - 8 comments

डिमेन्शिया हा शब्द आता सगळ्यांना ओळखीचा वाटायला लागला आहे. आपल्या वाढत्या आयुमाना सोबत हे निदान सुद्धा वाढत्या प्रमाणात व्हायला लागले आहे. डिमेन्शियाला आपण स्मृतिभ्रंश किंवा विसरण्याचा आजार म्हणून सुद्धा ओळखतो. सिनेमामध्ये एखाद्याला विसरण्याचा आजार दाखवतात त्यापेक्षा स्मृतिभ्रंश बराच वेगळा आणि गंभीर असतो. खरं म्हणजे स्मृतिभ्रंश हा आजार नसून लक्षण आहे. वेगवेगळ्या आजारांमुळे स्मृतिभ्रंश होऊ शकतो. ह्यात नक्की काय होतं आणि यावर काय उपचार आहेत, प्रतिबंध कसा करायचा हे आपण थोडक्यात बघूया.

स्मृतिभ्रंश म्हणजे फक्त स्मृती किंवा आठवणी विसरणे नाही. यामध्ये आठवणी शिवाय आपली विचार करण्याची शक्ती, निर्णय क्षमता, नियंत्रण इत्यादी वेगवेगळ्या क्षमतांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डिमेन्शिया हा मेंदूच्या एकंदर क्षमतेचा ह्रास असतो. काही ठिकाणी डिमेन्शिया ला पर्यायी शब्द म्हणून मानसिक ह्रास आणि अवमनस्कता हे शब्द वापरलेले सुद्धा दिसतात. स्मृतीभंश हा एक लक्षणांचा समूह आहे. ह्यातील लक्षणे हळूहळू दिसायला लागतात व काही वर्षांनंतर ठळकपणे दिसू लागतात. एखादी व्यक्ती जर अचानक विसरायला लागली किंवा अचानक वागणुकीत बदल झाला तर डिमेन्शिया पेक्षा स्ट्रोक (पक्षाघात) सारखा आजार असण्याची शक्यता जास्त असते. स्मृतिभ्रंश होण्याचा धोका वयाच्या पन्नाशीनंतर हळूहळू वाढत जातो. उतारवयात धोका जास्त असतो.आधी सांगितल्याप्रमाणे डिमेन्शिया वेगवेगळ्या आजारांमुळे होऊ शकतो व डिमेन्शियाची वेगवेगळी लक्षणे वेगवेगळ्या आजारांमध्ये दिसतात. डिमेन्शिया ह्या समुहातील लक्षणे साधारणतः पुढील प्रमाणे असतात.

विसराळूपणा : नवीन आठवणी तयार होणे कठीण होते. त्यामुळे इतक्यात काय घडले, काही वेळेपूर्वी आपण काय केले हे आठवत नाही. सकाळी काय केले, काय खाल्ले इत्यादी गोष्टी संध्याकाळी आठवत नाही. त्यामुळे काही गोष्टी पुन्हा पुन्हा केल्या जातात. नावे विसरायला होतात. चेहऱ्यांची ओळख पटत नाही असे सुद्धा होते. सध्याची तारीख , वेळ ह्याचे भान कमी होते. बरेचदा पत्ता आणि आपण कुठे राहतो ते विसरायला होते. ह्यामुळे काही लोक हरवतात सुद्धा. बरेचदा जुन्या आठवणी टिकून राहतात. स्मृतिभ्रंश झाला तर जुन्या आठवणी आधी विसरायला हव्या असा काही लोकांचा समज असतो तो चुकीचा आहे.

मेंदूची कार्यक्षमता कमी होणे: सलग विचार करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे मुद्यांवरून भरकटण्याचे प्रसंग वारंवार व्हायला लागतात. संभाषणात योग्य शब्द सुचत नाहीत. एकाग्रता खूप कमी होते. एकच प्रश्न वारंवार विचारल्या जातात. संभाषणात अडथडे येतात आणि रुग्ण अंतर्मुख होतात. बोलणे कमी करतात. नवीन वातावरणात संभ्रमित व्हायला होते. नेहमीचे असलेले व्यवहार, नेहमीची खरेदी इत्यादी सुद्धा कठीण होतात. एखाद्या कामाचे नियोजन करून ते पूर्ण करण्याची क्षमता सुद्धा कमी होते.

मूड आणि मानसिक बदल: डिमेन्शिया मध्ये उदासीनतेची लक्षणे दिसू शकतात. काही वेळेला लोक जास्त भावनिक झालेले दिसतात. भाषा बदललेली जाणवते. काही लोकांचे अगदी व्यक्तिमत्व बदलले आहे असेही दिसते. काहींना भास होतात. नसलेल्या गोष्टी दिसल्यासारखे वाटणे इत्यादी भास काही आजारांमध्ये दिसतात. झोप आणि झोपेचा दर्जा खालावतो. अतिशय राग येणे, जास्त चिडचिड, अतिशय काळजी इत्यादी लक्षणे सुद्धा दिसतात. काही लोक सतत व निरर्थक बडबड करताना दिसतात.

इतर लक्षणे : काही लोकांमध्ये स्नायूंची क्षमता कमी होते. हालचाली मंदावतात. चेहऱ्यावर भाव दिसत नाहीत.लघवी आणि शौचावर नियंत्रण राहत नाही. काही लोक वारंवार तोल जाऊन पडतात. आजार बळावल्यावर बरेच लोक एकाच ठिकाणी खिळल्या जातात, बोलणे खूप कमी होते . खाताना आणि गिळताना त्रास होतो.

वरील सगळी लक्षणे एका वेळी दिसतील किंवा सगळ्यांमध्ये दिसतील असे नाही. यातील वेगवेगळी लक्षणे वेगेवेगळ्या क्रमाने दिसू शकतात. लक्षणांची तीव्रता सुद्धा वेगवेगळ्या प्रमाणात दिसू शकते. काही लक्षणे सगळ्या आजारांमध्ये दिसतात तर काही ठराविक आजारांमध्ये दिसतात. मेंदूच्या ज्या भागावर आजाराचा जास्त परिणाम झाला त्या भागाचे काम बिघडते आणि त्यानुसार लक्षणे दिसतात. डिमेन्शिया ला कारणीभूत आजार वेगवेगळ्या प्रकारे मेंदूवर परिणाम करतात. थोडक्यात सांगायचे तर डिमेन्शिया म्हणजे मेंदूचे काम कमी होणे. डिमेन्शिया ला कारणीभूत असणारे काही महत्वाचे आजार पुढील प्रमाणे आहेत

  • अल्झायमर आजार : यात मेंदूतील पेशींमध्ये टाकाऊ पदार्थ हळूहळू जमा होऊन इजा होते
  • वास्कुलर डिमेन्शिया : मेंदूच्या रक्तवाहिन्या खराब होऊन छोटे छोटे स्ट्रोक होतात व मेंदूला इजा होते
  • लेवी बॉडी डिमेन्शिया आणि फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शिया: ह्या आजारांमध्ये मेंदूच्या वेगवेगळ्या भागांना हळूहळू इजा होऊन मेंदूची झीज होते
  • पार्किंसंस आजार : ह्या आजारात सुरुवातीला स्नायू व हालचालींचा त्रास होतो व पुढे स्मृतिभ्रंश सुद्धा दिसतो

हे सगळे आजार जुनाट आजार असून ह्यांची लक्षणे हळूहळू दिसतात. मेंदूला इजा होत जाते व मेंदूची न भरून निघणारी झीज होते. ह्याला इंग्रजी मध्ये neuro-degenerative disease असे म्हणतात. यापैकी अल्झायमर आणि वास्कुलर डिमेन्शिया हे मोठ्या प्रमाणात आढळतात . कमी प्रमाणात दिसणारे इतर काही आजार सुद्धा डिमेन्शिया ला कारणीभूत होतात. ह्या आजारांबद्दल एक महत्वाचे म्हणजे हे आजार झाल्यावर ते पूर्ण बरे करता येत नाहीत. हे आजार हळूहळू पण सतत वाढत जातात. आपल्याकडे हे आजार पूर्ण बरे करण्याचे किंवा मेंदूच्या पेशी पूर्ववत करण्याचे उपचार सध्यातरी नाहीत. पण तरीही आपण पेशंट साठी खूप काही करू शकतो. काही औषधे आजार वाढण्याचा वेग कमी करतात. लक्षणे कमी करायला मदत करणारी औषधे सुद्धा उपलब्ध आहेत. औषधी व्यतिरिक्त त्रास कमी करणारे उपाय, राहणीमानातील बदल, घरातील सोयी इत्यादींनी खूप मोठी मदत होऊ शकते.

उपचार करता येतील असे आजार : वरील आजारांशिवाय इतर काही बाबींमुळे डिमेन्शिया सदृश्य स्थिती होऊ शकते. वेगवेगळी जीवनसत्वे , विशेषतः विटामिन बी १ आणि बी १२ , ह्यांच्या कमतरतेमुळे स्मृतीभंशाची स्थिती होऊ शकते. थायरॉइड चे आजार, दारूचे व्यसन इत्यादी सुद्धा स्मृतीभंश करू शकतात. ह्या सगळ्यांचा पूर्णपणे उपचार होऊ शकतो. मेंदूचे काही आजार असे असतात की ज्यांना शस्त्रक्रियेचा फायदा होतो व लक्षणे बरी होतात. असे काही पूर्ण बरे होणारे आजार डिमेन्शिया सदृश्य स्थिती करू शकतात. त्यांचे निदान झाले तर योग्य उपचार होऊ शकतो. डिप्रेशन (नैराश्य ) किंवा इतर मानसिक आजार सुद्धा स्मृतिभ्रंशासारखे दिसू शकतात . हे आजार योग्य उपचारांनी बरे होऊ शकतात. काही औषधांमुळे विसराळूपणा आणि भ्रमिष्ट व्हायला होऊ शकते. औषधे बदलल्यावर बरे वाटते. त्यामुळे लक्षणे दिसल्यावर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य.

उपचाराचे इतर पैलू: डिमेन्शिया च्या रुग्णांना समजून घेण्याची आणि त्यांना योग्य वातावरण पुरवण्याची गरज असते. त्यांचे वातावरण सुरक्षित असावे लागते. ते धडपडू नयेत पडू नयेत ह्याची काळजी घ्यावी लागते. इतर धोकादायक गोष्टी कमी कराव्या लागतात. अगदी लहान मुलांसारखी काळजी घ्यावी लागते. त्यांचे वातावरण सारखे बदलले तर ते जास्त भ्रमिष्ट होऊ शकतात. त्यांचे नेहमीचे व ओळखीचे वातावरण असेल तर त्रास कमी होतो. अशा पेशंट च्या गरजा बदललेल्या असतात व समान्य लोकांपेक्षा वेगळ्या असतात. बरेचदा फक्त वातावरणात योग्य बदल केला तरी त्याची चिडचिड आणि त्रास कमी होतो. ह्या सगळ्या बाबतीत तज्ञ डॉक्टर योग्य आणि वैयक्तिक सल्ला देऊ शकतात. नातेवाईकांना सुद्धा हे तज्ञ मार्गदर्शन व समुपदेशन करू शकतात. फिजिशियन, न्युरोलॉजिस्ट, सायकीयाट्रीस्ट आणि जेरीयाट्रीशियन असे तज्ञ ह्या बाबतीत मदत करू शकतात. आजाराच्या पुढच्या टप्प्यांमध्ये नर्सेस सुद्धा घरी मदत करू शकतात. आजार जसा वाढत जातो तशी पेशंटला मदतनिसाची गरज वाढत जाते. काही व्यावसायिक मदतनीस सुद्धा असतात. प्रत्येक पेशंटच्या ठराविक त्रासासाठी काही उपाय करून त्रास सुसह्य करता येतात (जसे लघवीवर नियंत्रण नसेल तर वैद्यकीय उपचार करता येतात). असे खूप प्रयत्न करून परिस्थिती काही प्रमाणात बरी करता येते तरीही आजार पूर्णपणे बरा न झाल्यामुळे नातेवाईकांमध्ये हताशा येऊ शकते. अशावेळी भुरळ पाडणारे आणि खर्चिक पण वैज्ञानिक आधार नसलेले उपचार सुचवले जातात. आधुनिक उपचारांचा काही फायदा होत नसल्याने असे उपचार करून बघू असा मोह होतो. बरेचदा अशा उपायांनी पेशंटला त्रासच जास्त होतो. फायदा काही होत नाही. त्यामुळे असे सल्ले, जाहिराती मधील उपचार असे आपल्या डॉक्टरांशी सल्लामसलत करून मगच निवडावेत.

डिमेन्शिया चा प्रतिबंध : डिमेन्शियाला कारणीभूत होणारे आजार हे काही प्रमाणात जनुकीय रचना व काही प्रमाणात वातावरणातील प्रभावांवर अवलंबून असतात. आपल्याला डिमेन्शिया चा धोका पूर्णपणे टाळता येत नाही पण कमी करता येतो. असा प्रतिबंध करायला कुठली लस किंवा कुठले रामबाणऔषध सध्या तरी उपलब्ध नाही. डिमेन्शिया टाळण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे. जीवनशैलीचे आजार टाळण्यासाठी आपण जे उपाय करतो त्यांचा फायदा स्मृतीभंश टाळायला सुद्धा होतो. NICE ह्या युके मधील संस्थेने शास्त्रीय पाठबळ असलेले काही सल्ले सुचवले आहेत :

  • शारीरिक हालचाल वाढवा व नियमित व्यायाम करा
  • दारूचे सेवन कमी करा
  • धुम्रपान करत असाल तर थांबवा
  • निरोगी आहार घ्या – तळलेले,जास्त स्निग्धता असलेले, जास्त साखर व जास्त मीठ असलेले पदार्थ टाळा. हिरवे ,कच्चे , भाजीपाला व फळे भरपूर असेलेले जेवण घ्या. तेलबिया व मासे ह्यांचा फायदा होतो.
  • वजन निरोगी पातळीत टिकवावे . वजन जास्त असेल तर कमी करावे.

याशिवाय नवीन भाषा किंवा कला शिकणे, खेळ , व्यायाम इत्यादींचा फायदा होतो असे सुद्धा मत आहे.

वरील उपाय हे खूप सोपे नसले तरी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. ह्या उपायांचे काही दुष्परिणाम नाहीत. आपल्या उतारवयात आपल्या जीवनाचा दर्जा वाढवायला हे मार्ग फायद्याचे आहेत.आपले विचार, आठवणी आपले व्यक्तिमत्व टिकवून ठेवायला व डिमेन्शिया पासून संरक्षणासाठी मदत करणारी अशी जीवनशैली आपण स्वीकारावी.

Contact Us
close slider

    Discover more from Vinayak Hingane

    Subscribe now to keep reading and get access to the full archive.

    Continue reading

    ×

    Hello!

    Click one of our representatives below to chat on WhatsApp or send us an email to vinayakhingane@gmail.com

    ×