HIIT ही व्यायामाची एक पद्धत आहे. आपण कुठल्याही प्रकारच्या व्यायामात ही पद्धत वापरू शकतो. धावणे , सायकल चालवणे तसेच आपले जिमचे व्यायाम यात आपल्याला हाय इंटेन्सिटी इंटर्वल ट्रेनिंग वापरता येते. डॉ मायकल मोझली ह्यांच्या ‘फास्ट एक्झरसाईज ‘ ह्या पुस्तकात माझी ह्या व्यायाम पद्धतीशी ओळख झाली आणि मला ही व्यायामाची पद्धत फार आवडली. आपल्या हृदय आणि फुफ्फुसाची क्षमता कमी वेळात वाढवण्यासाठी ही पद्धत बरीच उपयोगी पडते. मला ह्याचा वैयक्तिक अनुभव सुद्धा आला.
व्यायामाचे आरोग्याला फायदे कमी वेळात मिळण्यासाठी व्यायामाची तीव्रता वाढवावी लागते. आपण थोड्या कालावधीसाठी जोरात व्यायाम केला आणि काही कालावधी साठी आपल्या हृदय फुफ्फुसाला विश्रांती दिली तर आपल्याला फारसा त्रास न होता आरोग्याला मोठा फायदा मिळवता येतो असे दिसून आले आहे. त्यामुळे बरेचसे खेळाडू आणि धावपटू सुद्धा HIIT चा वापर करताना दिसतात.
व्हिडिओआपल्याला वेळ कमी असेल तर ही पद्धत आपल्याला खूप उपयोगी ठरू शकते. आपण अगदी घरी करू शकू असे व्यायाम सुद्धा आपल्याला ह्या पद्धतीने करता येतात. HIIT चे बरेच व्हिडीओ तुम्हाला यु ट्युबवर बघायला मिळतील. असाच एक व्हीडीओ मी तुमच्यासाठी शेअर करतोय. यात तुम्हाला HIIT बद्दल अधिक कळेल. आपल्याला झेपतील अशा वेगाने व्यायामाची सुरुवात करावी आणि दर आठवड्याला हळू हळू वेग वाढवत न्यावा. पुढच्या काही आठवड्यांमध्ये आपला स्टॅमिना आणि वेग नक्कीच वाढलेला दिसेल. काही व्यायाम आपल्या गरजेनुसार बदलता येतील. (उदा : पूर्ण उठाबशा जमत नसतील तर खुर्चीवर उठबस करता येईल. इतर व्यायाम प्रकार सुद्धा करून बघता येतील )
कुठल्याही व्यायामाची सुरुवात करताना आपल्याला झेपेल अशा प्रमाणात करावी. हळूहळू तीव्रता वाढवत न्यावी. काही त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कुठलाही आजार असल्यास/ कुठली औषधे सुरु असल्यास व्यायाम सुरु करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डॉ विनायक हिंगणे
व्हिडीओ :