Scroll to top

आरोग्यदायी नववर्ष


vinayakhingane - January 1, 2020 - 0 comments

सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

हे वर्ष तुम्हाला आनंदी आणि आरोग्यदायी जावो ही शुभेच्छा. ह्या नवीन वर्षात आपण आरोग्य कसे सुधारावे असा विचार बऱ्याच लोकांच्या मनात असतो. नवीन वर्षाचा निश्चय हा आरोग्याबाबत करणे ही एक चांगली कल्पना आहे . आरोग्यासंबंधी केलेले कुठलेही सकारात्मक प्रयत्न हे फार महत्त्वाचे असतात. आजकाल जीवनशैलीचे आजार फार वाढले आहेत. डायबिटीस, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार यासारखे आजार अगदी तरुण वयात झालेले बघायला मिळतात. हे आजार आपल्या जीवनशैलीशी खूप जवळून संबंधित असतात. आपली जीवनशैली म्हणजे आपला आहार, झोप, व्यायाम, शारीरिक हालचाल आणि ताणतणाव हाताळण्याची क्षमता. आपल्या जीवनशैलीत आपण बदल केले तर आपले आजार  बरे होऊ शकतात. 

नवीन वर्षाची सुरुवात करताना बरेच लोक न्यु-ईयर रिझोल्युशन करतात. आपल्या जीवनशैलीत बदल करण्याची ही एक संधी असते. यात काही लोक यशस्वी होतात तर काहींचे रिझोल्युशन पूर्ण होत नाही. यश-अपयश बाजूला ठेवले तरीही अशा प्रयत्नांचे कौतुक व्हायला हवे असे मला वाटते. जीवनशैलीत बदल करण्याची सुरुवात या निमित्ताने होते.

  • जिम जॉईन करणे 
  • वजन कमी करणे
  • व्यायाम सुरू करणे
  • एखादा खेळ खेळणे सुरू करणे
  • नाच नुत्य शिकणे
  • नवीन भाषा शिकणे
  • आहारात बदल करणे
  • झोप सुधारणे
  • सोशल मीडियाचा वापर कमी करणे
  • व्यसन सोडून देणे

असे ‘अनेक नवीन वर्षाचे संकल्प’ आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. आहार, शारीरिक हालचाल ,व्यायाम आणि पुरेशी झोप हे उत्तम आरोग्याचे आधारस्तंभ आहेत. हे आधारस्तंभ मजबूत झाले तर आपण आजारांपासून दूर राहू शकतो. आजार टाळता येतात व आजार जर झालेले असतील तर त्यातून बरे सुद्धा होता येते.आरोग्याविषयी नवीन वर्षात निर्धार केला तर त्यातुन काहीतरी चांगलेच घडेल. जर नाहीच काही चांगले घडले तर त्यातून वाईटही काही होणार नाही. मग आपण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे?

जीवनशैलीत बदल केल्यामुळे आपल्या आरोग्याला किती मोठा फायदा होऊ शकतो ह्याची उदाहरणे जर आपण बघितली तर आपल्याला खात्री पटते. आपल्याला प्रेरणा मिळावी ह्या उद्देशाने आज आपण दोन गोष्टी वाचणार आहोत.

माझा मित्र ‘दिलीप’ याचे वय फक्त 36 वर्षे ! गेल्या काही महिन्यांमध्ये त्याचा रक्तदाब सतत वाढलेला असायचा म्हणून त्याला औषधे सुरू करावी लागली.औषधे घेऊन सुद्धा त्याचा रक्तदाब 142/ 104 असा जास्त असायचा. त्याला काळजी वाटायला लागली म्हणून तो माझ्याशी बोलला. आम्ही त्याची जीवनशैली कशी हे तपासून बघतले. आजच्या बहुतांशी तरुण सारखी त्याची जीवनशैली सुद्धा बैठी जीवनशैली होती. तो दिवसभर ऑफिसमध्ये बसून काम करायचा . नाश्ता करायचा व दोन वेळा आपल्यासारखं जेवायचा. कधीतरी बाहेरच जेवण व्हायचं. त्याने व्यायाम करण्याचे पण काही प्रयत्न केले पण तो सतत नियमित व्यायाम करू शकायचा नाही. त्याचे बरेच वजन वाढले आणि त्याच्या गुडघा दुखू लागला होता. सगळ्यांसारखेच धकाधकीचे आयुष्य असल्यामुळे त्याची झोपही पुरेशी होत नसे. त्याचा गुडघा वाढलेल्या वजनामुळे दुखतोय आणि त्यासाठी वजन कमी करावे असे त्याला डॉक्टरांनी सुचवले होते.

आपले वजन काही कमी होत नाही आणि रक्तदाब सुद्धा कमी होत नाहीये ह्या विचाराने तो थोडा हताश झाला होता. आम्ही त्याचे वजन कमी करण्यासाठी सगळे प्रयत्न युद्धपातळी वर करायचे आणि झपाट्याने वजन कमी करायचे असे ठरवले.

काय काय केले? दिलीपने त्याच्या आहारातली कर्बोदके(पोळी , भात, बटाटा इत्यादी) कमी केली. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, सलाद, फळे व तेलबिया (नट्स ) यांचे प्रमाण वाढवले. आहार संतुलित करण्यासाठी आपल्याला जेवणातील घटकांकडे नीट लक्ष द्यावे लागते ते त्याने उत्तम केले. त्याने सुचवल्याप्रमाणे रोज दोनदा व्यायाम सुरू केला. सलग बसणे कमी केले. झोप सुद्धा चांगली घ्यायला लागला. अगदी दोन महिन्यांच्या आतच त्याला झपाट्याने फरक दिसायला लागला. दर आठवड्याला त्याचे किलोभर वजन कमी व्हायला लागले आणि रक्तदाब सुद्धा नियंत्रणात यायला लागला. आम्ही त्याचे औषधे कमी करून निम्मी केले आणि यावर त्याचा रक्तदाब 116/70 एवढा नियंत्रित आला. फक्त रक्तदाब आणि वजनच नाही तर त्याच्या आरोग्यामध्ये इतर बदल सुद्धा दिसायला लागल्या. त्याला तरतरीत वाटायला लागले. गुडघेदुखीचा त्रास बंद झाला. आता आपला हा प्रवास असाच सुरु ठेवायचा आणि आपली निरोगी जीवनशैली सांभाळण्यासाठी सतत प्रयत्न करायचा असे तो म्हणतो. त्याचे कमी झालेले वजन टिकवून ठेवायचे हा त्याचा 2020 चा निश्चय आहे! त्याच्या ह्या निश्चयाबद्दल भरपूर शुभेच्छा!!

दिलीपचे शब्द :

My earlier weight was 77.6 Kgs and Blood Pressure was 142/104 . It continuously stayed the same and even with regular medicines, my blood pressure stayed around 132/94. My diastolic BP stayed persistantly high which worried me. I tried to join gym but it didnt help me. My busy schedule and inadequate sleep did not help me either. At times I felt bit lazy and lethargic.

Around 2 months back I suffered from knee pain which was told to be the beginning of the weight related arthritis. I was told to reduce some weight. The arthritis is usually age related and to have it at age of 36 was frustrating for me. It was a wake up call!

I spoke to my friend Dr Vinayak Hingane and discussed my condition. I started following the diet and lifestyle modifications suggested by him. I started exercising in the gym regularly. I started to the results very quickly! Within 2 months , I have reduced 10 Kgs of my weight. Tummy has gone and my BP stays around 115/75 with half the dose of my medicines. The weight reduction also took my knee pain away!!

I feel that I should have done it earlier! But you know, its never late!!


दुसरी गोष्ट :

श्री तुकाराम चौधरी हे माझे पेशंट आहेत. जवळपास चार महिन्यांपूर्वी ते माझ्याकडे आले तेव्हा त्यांची रक्तशर्करा खूपच वाढलेली होती. डायबिटीस चे नुकतेच निदान झाले असल्यामुळे ते थोडे घाबरलेले होते.

टाईप टू डायबिटीस म्हणजेच दुसऱ्या प्रकारचा मधुमेह हा कॉमनली दिसणाराआजार आहे. हा आजार सुद्धा आपल्या जीवनशैलीतील दोषांमुळे होतो. आपल्या शरीरामध्ये चरबी जास्त प्रमाणात जमा झाली की ती आपल्या पोटातील अवयवांमध्ये जमा होते. ह्यामुळे लिव्हर आणि स्वादुपिंड यांच्या कामांमध्ये अडथळा येतो. जर आपण ही वाढलेली चरबी कमी करू शकलो तर डायबीटीस नियंत्रणात येतो. शिवाय आपल्या आहारातील कर्बोदके आपण जर कमी केली तर रक्तातील शुगर नियंत्रित येण्याला सुद्धा मदत होते. आपण नियमित व्यायाम केला तर त्याने सुद्धा शुगर नियंत्रणात येण्यासाठी एखाद्या औषध एवढीच मदत होते. नियमित व्यायाम आणि आहारात बदल हा टाईप टू डायबिटीस चा पहिला उपचार आहे.

श्री चौधरी यांना हे सगळं समजावून सांगितल्यावर त्यांनी आपला आहार बदलण्याचा आणि नियमित व्यायाम करण्याचा निश्चय केला. आपल्या झोपेत सुद्धा योग्य ते बदल करून त्यांनी झोप पुरेशी घ्यायला सुरुवात केली. आहारातील कर्बोदके (पोळी भात बटाटा इत्यादी) कमी केल्यावर अगदी एका आठवड्यातच त्यांची रक्त शर्करा नियंत्रणात आली. सुरुवातीला उपाशीपोटी 269 व जेवणानंतर 420 एवढी राहणारी शुगर एका आठवड्यात 105 व 142 एवढी नियंत्रणात आली. हा फरक त्यांच्यासाठी खूप प्रेरणादायी ठरला. औषधांशिवाय फक्त जीवनशैलीतील बदलांमुळे आपली साखर नियंत्रणात येऊ शकते असा विश्वास त्यांना मिळाला. त्यांनी जीवनशैलीतील बदल सुरू ठेवले. ते अगदी छोट्या चणीचे होते आणि त्यांचे वजन फार नव्हते. पण जीवन शैलीतील ह्या बदलांमुळे त्यांच्या पोटाचा घेर हळूहळू कमी व्हायला लागला. पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये त्यांची रक्तशर्करा अगदी छान नियंत्रणात आली. मग आम्ही त्यांच्या आहारामध्ये मध्ये थोड्या प्रमाणात कर्बोदके(उदा: पोळी) वाढवली आणि त्यांना संतुलित आहार घेण्याचा सल्ला दिला. पुढचा महिना त्यांनी संतुलित आहार घेऊन बघितला. हा आहार घेऊन सुद्धा त्यांची शुगर नियंत्रणात राहिली. आता ते सामान्य पण संतुलित स्वरूपाचा असा आहार घेतात. रोज व्यायाम करतात आणि पुरेशी झोप घेतात.अशा जीवनशैलीमुळे त्यांच्या आयुष्यातला ताण तणाव सुद्धा कमी झाला आहे असे ते म्हणतात.

एका आठवड्यातील बदल
संतुलित सामान्य आहारानंतर (पोळी खाऊन )नियंत्रणात असलेली शुगर

तुम्हाला रक्त उच्च रक्तदाब किंवा डायबीटीज असेल तर जीवनशैलीत योग्य ते बदल केल्यावर बरे होण्याची शक्यता असते. हे आजार फारच अनियंत्रित असतील तर ते नियंत्रणात सुद्धा येऊ शकतात. जीवनशैलीचे बरेचसे आजार आपल्याला टाळता येऊ शकतात ! गरज असते ती आपल्या प्रयत्नांची. या नवीन वर्षात तुम्ही असेच भरपूर प्रयत्न करावे आणि तुमच्या प्रयत्नांना यश द्यावे हीच प्रार्थना !

डॉ विनायक हिंगणे .

Contact Us
close slider

    ×

    Hello!

    Click one of our representatives below to chat on WhatsApp or send us an email to vinayakhingane@gmail.com

    ×
    %d bloggers like this: