Scroll to top

आजारपण आणि डायबेटीसचे नियंत्रण:


vinayakhingane - July 1, 2020 - 1 comment

डायबेटीसच्या पेशंटना इतर आजार बरेच त्रासदायक ठरतात. मधुमेहींची प्रतिकारशक्ती मुळातच थोडी कमी असते. त्यामुळे संसर्ग होणे व वाढणे लवकर होते. जखमा भरायला सुद्धा इतरांपेक्षा जास्त वेळ लागतो असे बरेचदा दिसते. जीवनशैलीचे आजार जसे हृदयरोग आणि स्ट्रोक ह्यांचा धोका सुद्धा मधुमेहींना जास्त असतो. डायबेटीस मुळे जसा इतर आजारांचा धोका वाढतो तसेच इतर आजारांमुळे सुद्धा डायबेटीस अनियंत्रित होण्याचा धोका असतो. इतर आजारांमुळे शुगरची पातळी अचानक वाढू किंवा कमी होऊ शकते. हे कसे होते ते आपण आज बघूया.

आजारात रक्तशर्करा (शुगर लेव्हल) का वाढते ?

वेगवेगळ्या आजारामध्ये ( संसर्गजन्य व अचानक होणारे गंभीर आजार ) शरीर लढा देण्याच्या स्थितीमध्ये जाते. अशा वेळी तणावाशी लढणारे स्ट्रेस हार्मोन ह्यांचे प्रमाण वाढते. तणावाच्या वेळी वाढणाऱ्या ह्या संप्रेरकांचे बरेच प्रकार असतात आणि आपला बचाव होण्यासाठी ही संप्रेरके महत्वाची असतात. पण ह्या स्ट्रेस हार्मोन्स चा साखरेच्या पातळीवर होणारा परिणाम हा इन्सुलिनच्या परिणामाच्या अगदी विरुद्ध असतो. हे हार्मोन्स वाढले की रक्तातील साखरेची पातळी वाढते. डायबेटीस मध्ये इन्सुलिनचे काम आधीच बिघडलेले असते. त्यामुळे हा परिणाम जास्त उठून दिसतो. त्यामुळे संसर्ग झाला किंवा अचानक आजार झाला तर शुगर लेव्हल वाढलेली दिसते. जेवण नेहमीपेक्षा थोडे कमी झाले तरी शुगर वाढली किंवा औषध घेऊनही शुगर वाढली असे चित्र दिसू शकते. काही लोकांना प्री डायबेटीस (डायबेटीस च्या आधीची पायरी) असतो.अशांची शुगर डायबेटीस च्या पातळी एवढी वाढलेली दिसू शकते . डायबेटीस च्या रुग्णांना सुद्धा कधी कधी जास्तीची औषधे आजाराच्या काळामध्ये घ्यावी लागू शकतात.

आजारांमध्ये साखरेची पातळी वाढण्याचे दुसरे एक कारण म्हणजे औषधे व उपचार . काही जीवनावश्यक औषधे अशी असतात की त्यांचा एक परिणाम साखरेची पातळी वाढणे हा असतो. ही औषधे देणे अत्यावश्यक असते आणि त्यांना पर्याय नसतो . डॉक्टर सर्व विचार करूनच ही औषधे देतात. अशा वेळी साखरेची पातळी किती वाढते ते बघून त्यासाठी काही काळाकरिता डायबेटीस ची औषधे वाढवली जातात. शस्त्रक्रिया किंवा इतर काही प्रक्रिया ह्यांचा सुद्धा आपल्या शरीरावर ताण पडतो. ह्याने सुद्धा शुगर वाढू शकते.

हालचाल कमी होणे हे सुद्धा एक महत्वाचे कारण आहे. आजारी व्यक्तीची हालचाल नेहमीपेक्षा कमी होते. स्नायूंची हालचाल मंदावली की इंसुलीनला प्रतिकार वाढतो आणि शुगरची पातळी वाढायला लागते. बरेच आजारी व्यक्ती थोडे बरे वाटल्यावर हालचाल सुरु करतात व हळूहळू साखरेची पातळी नियंत्रणात येताना दिसते.

आहार हा शुगर पातळीवर परिणाम करणारा खूप महत्वाचा घटक नेहमीच असतो. आजारपण सुद्धा याला अपवाद नाही. आजारी व्यक्तीचा नेहमीचा आजार बदलण्याची अनेक कारणे असतात. नेहमीपेक्षा कर्बोदके आणि शर्करा (कार्बोहायड्रेट्स आणि शुगर्स) ह्यांचे प्रमाण आहारात वाढले तर शुगर वाढण्याची शक्यता असते . बरेचदा आजारी व्यक्तींमध्ये बिस्किटे, ब्रेड, ज्यूस इत्यादींचे प्रमाण नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात घेण्याकडे कल असतो. काहींना सलाड , भाज्या ,असे पदार्थ आजारपणात कमी करावे लागतात. आहारातील असे बदल शुगर वाढण्यासाठी कारणीभूत होऊ शकतात. पण काही लोकांमध्ये आहार कमी होऊन सुद्धा शुगर वाढू शकते हे आपण सुरुवातीलाच बघितले आहे. एरव्ही सुद्धा नाजूक असलेला आहाराचा तोल आजारी लोकांमध्ये सांभाळणे जास्तच कठीण असते.

काही आजारांमध्ये शारीरिक बदल घडतात ज्याने साखरेच्या पातळीवर विपरीत परिणाम घडतात. स्वादुपिंड (Pancreas) वर दाह किंवा संसर्ग झाला तर त्याचा परिणाम शुगरची पातळी वाढण्यामध्ये होऊ शकतो. आतडीतील उपयुक्त जीवाणू नष्ट झाल्यास साखरेची पातळी नियंत्रणात येणे कठीण होऊ शकते.

अशा वेगवेगळ्या आणि एकमेकांमध्ये गुंतलेल्या कारणांमुळे आजारी मधुमेहींमध्ये साखरेची पातळी वाढू शकते. काहींमध्ये एखाद दुसरे तर काहींना अनेक कारणे असतात. ह्यातील बहुतांशी लोकांची साखर आजारपण संपल्या नंतर परत पूर्ववत होताना दिसते.

आजारपणात मधुमेहींची शुगर लेव्हल कमी होऊ शकते का?

हो. आजारपणात शुगर वाढू शकते तशीच कमी सुद्धा होऊ शकते . वर सांगितलेली बरीच कारणे ह्यासाठी सुद्धा कारणीभूत असू शकतात. आहार कमी होणे त्यातील महत्वाचे कारण. आहारातील कर्बोदके आणि शर्करा कमी झाली व डायबेटीस ची औषधे नेहमीप्रमाणेच सुरु असतील तर त्याने साखरेची पातळी कमी होऊ शकते. वारंवार उलटी होणे किंवा जुलाब होणे ह्यामुळे खाल्लेले अन्न रक्तात शोषून घेता येत नाही. अशा वेळी कमी खाण्याकडे सुद्धा कल असतो.त्यामुळे उलटी जुलाब झाले तर शुगर लेव्हल खूप कमी होण्याचा धोका असतो.

काही औषधे जशी शुगर वाढवतात तशीच काही उलट परिणाम सुद्धा करू शकतात. इतर आजाराच्या काही औषधांमुळे शुगर कमी सुद्धा होऊ शकते. काही औषधांचा परिणाम डायबेटीसच्या औषधांच्या कामावर होतो व त्यामुळे शुगरची पातळी कमी होऊ शकते. अशी गुतागुंत दुर्मिळ असते पण घडू शकते. अशा वेळी डॉक्टर औषधांचे डोस बदलून ठीक करतात. आजारी असताना औषधात बदल करते वेळी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

किडनी व लिवर (मूत्रपिंड व यकृत) ह्या दोन्ही अवयवांचे काम महत्वाचे असते. किडनी आपल्या शरीरातील औषधे बाहेर टाकते. लिवर सुद्धा औषधांच्या चयापचय क्रियेत मदत करते. लिवर साखरेची पातळी सुद्धा नियंत्रणात ठेवायला मदत करते. किडनी चे काम मंदावले किंवा लिवर खराब झाले तर त्यामुळे शुगर कमी होऊ शकते. अशा आजारांमध्ये जास्त खबरदारी घ्यावी लागते .

साखरेची पातळी कमी -जास्त झाल्यास काय होऊ शकते?

आजारपणात साखरेची पातळी थोड्या प्रमाणात वाढल्यास बरेचदा मोठी समस्या होत नाही. पण काही पेशंट मध्ये साखरेची पातळी खूप जास्त वाढते. असे झाल्यास वाईट परिणाम होऊ शकतात. खासकरून टाईप १ डायबेटीस व ज्यांना इन्सुलिन ची गरज असते अशा पेशंट मध्ये किटोन चे प्रमाण खूप वाढून किटो-ॲसिडोसीस म्हणजे रक्ताची आम्लता वाढू शकते . हे धोक्याचे असते. इन्सुलिनची कमतरता पडल्यामुळे असे होते. अशा वेळी शुगरच्या पातळी सोबत लघवीतील किटोन हे रसायन मोजले तर निदान लवकर होते. लघवीच्या स्ट्रिप्स (मोजपट्टी ) मिळतात ज्यावर आपण किटोन मोजू शकतो. इन्सुलिनची गरज असणारे मधुमेही खूप आजारी पडल्यास ग्लुकोमिटर सोबत ह्याचा सुद्धा वापर करू शकतात.

शिवाय काहींची साखर खूप वाढल्यास किटोन तयार न होता सुद्धा परिस्थिती गंभीर होऊ शकते. शरीरात साखरेचे प्रमाण एवढे वाढते की मेंदूचे काम मंदावते. ह्याला इंग्रजीमध्ये Diabetic Hyperosmolar Syndrome म्हणतात. अशी परिस्थिती टाईप २ डायबेटीस मध्ये दिसते. आजारपणा मध्ये असे होण्याची शक्यता इतर वेळी पेक्षा जास्त असते.

शुगर पातळी कमी होणे (हायपो) खूप धोक्याचे ठरू शकते. शुगरची पातळी खूप कमी झाल्यास दरदरून घाम सुटणे, चक्कर येणे बेशुद्ध पडणे अशी लक्षणे दिसू शकतात. शुगर खूप कमी झाल्यास आकडी येणे व मेंदूला इजा होणे अशी अतिशय गंभीर लक्षणे सुद्धा दिसू शकतात. शुगर कमी झाल्यामुळे शरीरावर पडणारा ताण हा इतर आजारांच्या दृष्टीने सुद्धा हानिकारक ठरू शकतो. उदा : हृदयविकाराच्या त्रासाने आय सी यु मध्ये भरती असलेल्या रुग्णाची शुगर खूप कमी झाल्यास आधीच कमकुवत असलेल्या हृदयावर अधिक ताण पडून परिस्थिती जास्त बिघडू शकते.

अशाप्रकारे आजारपणात साखरेची पातळी खूप कमी किंवा खूप जास्त वाढल्यास गंभीर त्रास होऊ शकतो. अर्थातच हे त्रास सगळ्यांमध्ये होत नाहीत. पण त्यांचे गांभीर्य लक्षात घेता शंका वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

•आजारपणात मधुमेहींनी काय करावे?

पुढील काही बाबींकडे लक्ष ठेवल्यास फायदा होऊ शकतो :

  • घाबरून जाऊ नये . सगळ्यांना गंभीर त्रास होत नाही.
  • साखरेची पातळी नियमित पणे मोजावी. घरी ग्लुकोमीटर असल्यास उत्तम. आपण आजारपणात रोज साखरेच्या पातळीवर लक्ष ठेऊ शकतो. (इन्सुलिनची गरज असणाऱ्यांसाठी हे खूप महत्वाचे )
  • आपली औषधे व इन्सुलिन सुरु ठेवावे. शंका वाटल्यास डॉक्टरांना विचारावे.
  • आहार व पाणी पिणे सुरु ठेवावे. जर आहार व पाणी पिणे खूप कमी झाले तर तातडीने डॉक्टरांना भेटावे.
  • सतत उलटी होत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • इन्सुलिनची गरज असणार्यांनी शुगर वाढल्यास किटोन ची तपासणी केलेली उत्तम.
  • पोटात दुखणे , मळमळ , उलटी,खूप अशक्त वाटणे इत्यादी डायबेटिक किटो-ॲसिडोसीस ची असू शकतात.
  • शुगर कमी झाल्यास किंवा कमी झाल्याची लक्षणे दिसल्यास ग्लुकोज किंवा साखर थोड्या प्रमाणात लगेच घेणे फायद्याचे ठरते. सोबत कर्बोदके असलेले पदार्थ जसे पोळी किंवा बिस्कीट घ्यावे. शुगर दर २ ते ४ तासांनी तपासावी. कारण परत कमी होण्याची भीती असते. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेतलेला कधीही उत्तम!
  • इतर आजारांची औषधे सुद्धा स्वतः बदलू/ बंद करू नये. डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा
  • आजारपणात वाढवून दिलेली औषधे सुचविल्याप्रमाणे घ्यावी . बरेचदा ही औषधे आजारानंतर कमी केल्या जातात.
  • काहीही शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा!

•आजारपणात डायबेटीस च्या पेशंटना बरेचदा इन्सुलिन का देतात?

डायबेटीसच्या ज्या रुग्णांना नेहमी गोळ्या असतात त्यांना इतर आजारात (किंवा हॉस्पिटल मध्ये भर्ती असताना) बरेचदा इन्सुलिनचे इंजेक्शन दिले जाते. इतर आजार कुठला आणि किती गंभीर आहे हे बघून असा निर्णय घेतला जातो. शॉर्ट-ॲक्टिंग इन्सुलिन (म्हणजेच काही तास काम करणारे इन्सुलिन) हे एक प्रभावी औषध आहे. ते नसेतून सुद्धा देता येते व चामडी खाली सुद्धा देता येते. त्याचा प्रभाव लवकर संपत असल्याने शुगर खूप कमी (हायपो) होण्याचा धोका टाळता येतो. काही गोळ्यांचा प्रभाव खूप जास्त राहतो त्यामुळे त्या टाळतात. काही गोळ्या लिवर किंवा किडनीच्या आजारात टाळाव्या लागतात. इन्सुलिन बऱ्यापैकी सुरक्षित असते व बऱ्याच आजारांमध्ये वापरता येते. शिवाय इन्सुलिन चा डोस दर वेळी बदलू शकतो जे गोळ्यांच्या बाबतीत शक्य नसते. अशा सगळ्या गोष्टींमुळे इन्सुलिन आजारांच्या काळात जास्त सोयीस्कर ठरते.

•आपली साखरेची पातळी आजारपणात किती असावी?

प्रत्येक पेशंट साठी साखरेची योग्य पातळी वेगळी असू शकते. डॉक्टर प्रत्येक पेशंट चे वय, आजार, जीवनशैली , वैद्यकीय सोयी विचारात घेऊन एक आदर्श पातळी ठरवत असतात. आजारात सुद्धा नॉर्मलच्या जवळपास असणारी पण त्यामुळे धोका होणार नाही अशी पातळी ठरवावी लागते. काही लोकांमध्ये थोडी जास्त पातळी सुद्धा योग्य ठरते. जेणेकरून हायपो किंवा साखर पातळी कमी होण्याचा धोका कमी असतो. हे सगळे कठीण निर्णय बऱ्याच बाबींचा विचार करून डॉक्टर घेतात. आपण घरी पुढील काळजी घेऊ शकतो:

•आजारपणात आपली शुगर लेव्हल नेहमीपेक्षा खूप जास्त वाढली , सतत वाढत असली किंवा वर सांगितल्या प्रमाणे धोक्याची लक्षणे दिसली तर डॉक्टरांचा सल्ला लगेच घ्यावा. •जर आजारपणात साखरेची पातळी 100 mg/dl पेक्षा कमी राहत असेल किंवा 70 mg/dl पेक्षा कमी झाली किंवा हायपो ची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांना भेटावे.

किटोन बद्दल छोटी टीप: आपल्या शरीरात ग्लुकोज शिवाय चरबी हे इंधन म्हणून वापरल्या जाते. जेव्हा चरबी जळते तेव्हा किटोन हे रसायन बनते. जेव्हा शरीरात वापरण्यासाठी ग्लुकोज नसते तेव्हा आपल्या शरीरात किटोन बनतात. उदा आपण खूप काळ उपाशी राहिलो किंवा किटो डाएट घेतला तर आपल्याही लघवीत थोड्या प्रमाणात किटोन दिसतात. हे काळजीचे नसते. पण डायबेटिस च्या रुग्णांमध्ये वेगळे घडते. त्यांचा शरीरात ग्लुकोज असते पण ते वापरण्यासाठी इन्सुलिन नसते. त्यामुळे चरबी जळून मोठ्या प्रमाणात किटोन वाढतात. इन्सुलिन नसल्याने शरीराची चयापचय क्रिया बिघडते व रक्ताची आम्लता वाढते. हे धोकादायक असते.

डॉ विनायक हिंगणे

Contact Us
close slider

    ×

    Hello!

    Click one of our representatives below to chat on WhatsApp or send us an email to vinayakhingane@gmail.com

    ×
    %d bloggers like this: