“कोव्हीड 19” हा आजार सगळ्यांना ओळखीचा झाला आहे. कदाचित फारच ओळखीचा झाला आहे. माहितीचा महापूर धोकादायक ठरतोय अशी परिस्थिती आहे. अशा वेळी महत्वाच्या मुद्यांकडे दुर्लक्ष होऊन आपण चुकीच्या दिशेने धावतो आहोत का असे बघायची वेळ आहे. या संदर्भात काही सोप्या सरळ गोष्टी मांडल्या आहेत.
कोव्हीड19 विषयी चर्चा मुख्यतः आपण या आजाराला घाबरून जावे किंवा आपण मुळीच घाबरु नये ह्या उद्देशाने सुरू आहेत असे वाटते. घाबरल्याने लोक प्रतिबंधात्मक उपाय पाळतील व कोरोनाचा प्रसार कमी वेगाने होईल असा बऱ्याच लोकांचा समज असतो. काहींचा समज ह्याच्या अगदी विरुद्ध असतो. लोक घाबरून चुकीचे निर्णय घेऊ नये म्हणून लोकांची भीती कमी करण्याकडे त्यांचा कल असतो. आता हे दोन्ही प्रकारचे सल्ले देताना कधी कधी अतिरेक होतो. हे दोन्ही प्रकारचे अतिरेकी सल्ले रुग्णांसाठी आणि जनतेसाठी धोकादायक असतात. ह्या सल्यांमागील भावना कधी कधी प्रांजळ तर कधी नफेखोरी ची असते. भावना कुठलीही असो. पूर्वग्रह दुषित सल्ले (घाबरावे किंवा घाबरू नये ) फायद्याचे ठरत नाहीत.
असाच एक अतिरेकी सल्ला सोशल मीडिया वर फिरतोय तो म्हणजे “कोरोना हा आजार नसून एक षडयंत्र आहे” व “आपल्याला उगीच भीती दाखवत आहेत”. काही ठिकाणी ह्यात भर म्हणून असेही म्हटले आहे की कोरोना वायरस हा साधा फ्लू वायरस आहे. हे सगळे चुकीचे आहे.
वस्तुस्थिती अशी आहे:
- कोरोना व्हायरस नावाचा व्हायरस चा एक परिवार आहे. तो आपल्याला आधीपासून माहीत आहे.
- 2019 त्रासदायक असलेला “नोवेल कोरोना व्हायरस” म्हणजेच “नवीन कोरोना व्हायरस” हा या परिवारातील नवीन सदस्य सापडला.
- ह्या व्हायरस मुळे होणाऱ्या आजाराला कोव्हीड 19 म्हणतात.
- हा आजार बहुतांशी सौम्य व काहींमध्ये मध्यम तीव्रतेचा असतो. कमी प्रमाणात गंभीर आजार व मृत्यू होऊ शकतो.
- हा आजार खरा आजार असण्याचे पुरावे वैद्यकीय जर्नल, जगभरातील खात्रीलायक बातम्या आणि वैयक्तिक अनुभव आहे. ह्या आजाराने मृत्यू होतो ह्याचे सुध्दा भक्कम पुरावे आहेत.
- फ्लू व्हायरस हा व्हायरस चा वेगळा परिवार आहे. त्यातील काही फ्लू व्हायरस मुळे सुद्धा गंभीर आजार व मृत्यू होऊ शकतो.
- कोरोना व्हायरस(विषाणू) शास्त्रज्ञांना दिसला आहे. त्याचे इलेक्ट्रॉन मायक्रो स्कोप मध्ये दिसलेले छायाचित्र आपल्या भारतीय वैज्ञानिकांनी प्रसिद्ध केले आहे

कोव्हीड 19 हा खराखुरा आजार असण्याचा एक युक्तिवाद सुद्धा मला मांडायचा आहे. कोव्हीड 19 हा आजार झालेल्या व्यक्तीचा संपर्क एखाद्या वाहक किंवा रुग्णांशी आलेला असतो. ज्यांना संसर्ग होतो त्यांच्यात एक ठराविक पॅटर्न दिसतो. बहुतेकांना काहीच लक्षणे येत नाहीत किंवा सौम्य लक्षणे दिसतात. काहींना मध्यम तर काहींना गंभीर लक्षणे दिसतात. ज्यांना लक्षणे दिसतात त्यांत ठराविक प्रकारची लक्षणे दिसतात. त्यांच्यातील तपासण्यांमध्ये (फक्त swab नाही इतर सुद्धा) ठराविक दोष दिसतात. फुफ्फुसांवर परिणाम झालेला xray आणि CT scan मध्ये दिसून येतो. सोबतच फुफ्फुसाच्या कामात अडथळा आल्याने शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण कमी होताना दिसते. हे सगळे एकाच ठिकाणी नाही तर जगभर घडत आहे . यात सातत्य आहे. ह्याला योगायोग कसे म्हणता येतील? शिवाय नेहमीच्या साथीच्या आजारांमध्ये डॉक्टर , आरोग्य कर्मचारी व पुलिस नेहमीच काम करत आले आहेत. कोरोना संसर्ग होऊन कोव्हीड 19 हा आजार झाल्याने अनेक डॉक्टर , आरोग्य कर्मचारी व पुलिस ह्यांचे मृत्यू झाले आहेत. असे मृत्यू साधारण आजारात होताना आपल्याला दिसत नाहीत. नवीन कोरोना व्हायरस हा नवीन व्हायरस असल्याने त्याविरुद्ध मनुष्याला विशेष प्रतिकार शक्ती नाही. ह्या विषाणूची लागण होण्याची क्षमता सुद्धा इतर आजारांपेक्षा जास्त आहे. म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांना इतर आजारंपेक्षा जास्त धोका कोव्हीड 19 मुळे आहे. माझ्या स्वतःच्या ओळखीच्या एका डॉक्टरांचा मृत्यू कोरोनाने झालेला आहे. ओळखीच्या काही लोकांना कोव्हीड 19 हा आजार सुद्धा झाला आहे. त्यामुळे कोव्हीड 19 हा खराखुरा आजार आहे असे माझे मत आहे.

टेस्ट विषयी गोंधळ:
कोव्हीड 19 च्या टेस्ट बद्दल खूप चर्चा व तर्कवितर्क लढवले जात आहेत.आपल्याला खरंच अशा चर्चांमध्ये अडकून पडायला हवं का ? माझ्यामते सामान्य जनतेने अशा चर्चांमध्ये अडकून पडायला नको. साथ रोगांमध्ये तज्ञ असलेले लोक व सरकार याकडे लक्ष देतात. आपला रस जर फक्त आपल्या आरोग्यामध्ये असेल तो आपण टेस्ट विषयी पुढील गोष्टी समजून घ्याव्यात:
- बहुतेक तपासण्या 100टक्के अचूक नसतात. त्यामुळे एखादी व्यक्ती आजार असूनही टेस्ट निगेटिव्ह येऊ शकते.कोव्हीड 19 टेस्ट बाबत सुद्धा हे होऊ शकते.
- आजाराची लक्षणे, शारीरिक तपासणी, इतर लॅब टेस्ट व तपासण्या ह्यातून डॉक्टर एक प्राथमिक निदान करतात.त्याला मदत म्हणून कोव्हीड 19 स्वाब टेस्ट असते.(त्यामुळे आधीच्या प्रक्रियेला सुद्धा महत्व असते हे लक्षात घ्यावे)
- साथ रोग प्रतिबंध म्हणून काही लोकांची लक्षणे/त्रास नसताना सुद्धा तपासणी केल्या जाते.
- सगळ्या पॉझिटिव्ह रूग्णांना सारखाच धोका नसतो. काहींना कमी तर काहींना जास्त.
- निगेटिव्ह रिपोर्ट आला तरीही लक्षणे असल्यास इतरांपासून दूर राहिलेले बरे ( इतरांना लागण होण्याचा धोका कमी होतो)
- टेस्ट बद्दल डॉक्टर व आरोग्य यंत्रणा ह्यांचे मार्गदर्शन घ्यावे. अफवांवर विश्वास ठेऊ नये.
प्रतिबंध महत्वाचा:
covid-19 उपचारांबाबत बऱ्याच अफवा पसरत आहेत. रेमदेसिविर सारख्या औषधांची साठेबाजी, नवीन उपचारांच्या संशोधनावरील बातम्या व घरगुती उपायांचा सुळसुळाट हे सगळे आपण बघतोच आहोत. लोक यामध्ये गरजेपेक्षा जास्त रस दाखवतात व जे महत्त्वाचे आणि सोपे आहे त्याकडे दुर्लक्ष करतात. कोव्हीड 19 विरुद्ध प्रतिबंधात्मक उपाय केले तर हा आजार टाळता येतो. ते जास्त सोयीचे योग्य आणि सोपे आहे.
- अतिशय गरज असेल तरच बाहेर पडावे
- दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर (दोन मीटर)ठेवावे
- आपण मास्क लावावा व समोरच्याला मास्क लावण्याचा आग्रह करावा
- हात वारंवार धुवावेत व स्वच्छतेचे नियम पाळावेत
- बाहेर असताना चेहऱ्याला व मास्क ला हात लावू नये
- गर्दीची ठिकाणे टाळावीत
हे एवढे केल्यास आपला धोका खूप कमी होतो. आरोग्य संघटना व तज्ञ हेच सुचवतात.उपचारापेक्षा प्रतिबंध महत्वाचा हे आधुनिक वैद्यकशास्त्रा पासून आयुर्वेदा पर्यंत सगळेच सांगतात. प्रतिबंध करणे म्हणजे आजाराला घाबरणे असे नाही. “चिंता करू नये पण काळजी घ्यावी” .

उपचारांबद्दल संभ्रम:
आधुनिक वैद्यकशास्त्रात कोव्हीड 19 बद्दल प्रभावी उपचार नाही असा प्रचार केला जातो. त्याऐवजी काही घरगुती उपाय किंवा शास्त्रीय मान्यता नसलेले उपाय सुद्धा सुचवले जातात. अशा भूलथापांना बळी पडू नये. उपचारासाठी योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सगळ्यांना उपचाराची सारखीच गरज नसते: ज्यांना लक्षणे नाहीयेत किंवा अगदी सौम्य लक्षणे आहेत त्यांना फारसा उपचार द्यावा लागत नाही. असे लोक लवकर आणि काही त्रास न होता सुद्धा बरे होऊ शकतात. भारतात अशा रुग्णांचे प्रमाण बरेच आहे. अमुक तमुक घरगुती उपचार केल्याने हे रुग्ण बरे झाले असे म्हणणे चुकीचे ठरते. घरगुती उपायांनी दुष्परिणाम होत नाही असे म्हणून त्यांचा सर्रास प्रचार केला जातो. पण ह्याचा दुष्परिणाम असा होतो की लोक आजार गंभीर होईपर्यंत अशा उपायांवर अवलंबून राहतात. हे धोक्याचे ठरू शकते.
काहींना उपचाराची गरज जास्त असते. अशा लोकांच्या आजार मध्यम तीव्रतेचा किंवा गंभीर असतो. अशा लोकांना आधुनिक उपचार पद्धतीने बराच फायदा होतो. अशा रुग्णांना ऑक्सिजन आय सी यु मधील सेवा देता येतात. स्टेरॉईड व इतर काही औषधांचा फायदा अशा रुग्णांना होऊ शकतो असे दिसून आले आहे. अतिशय गंभीर आजार होऊन सुद्धा काही रुग्ण वाचले आहे. आजारावर उपचार फक्त विषाणूंना मारण्याची औषधे देऊन केला जात नाही. उपचाराला अनेक पैलू असतात. त्यांचा विचार डॉक्टर करतात.त्यामुळे मध्यम व जास्त तीव्रतेचा कोव्हीड 19 आजारात सध्या उपलब्ध असलेल्या उपायांपैकी आधुनिक उपचार पद्धती ही सगळ्यात महत्त्वाची आहे.
प्रतिकारशक्ती वाढवायची का?
प्रतिकारशक्ती बद्दल दोन गोष्टी समजून घ्यायला हव्यात:
- प्रतिकारशक्तीचे दोन प्रकार असतात नैसर्गिक प्रतिकारशक्ती व विशेष प्रतिकारशक्ती. नैसर्गिक प्रतिकारशक्ती मुळातच असलेली प्रतिकारशक्ती असते. विषाणू किंवा जीवाणू ला सामोरे गेल्यावर आपल्या शरीरात विशेष प्रतिकारशक्ती तयार होते.
- प्रतिकारशक्ती वाढवण्याचा शॉर्टकट नाही. ती बटन दाबल्यासारखी कमी जास्त होत नाही. प्रतिकार शक्तीची प्रक्रिया थोडी किचकट असते.
नॉर्मल निरोगी व्यक्तीची प्रतिकारशक्ती नॉर्मल असते. त्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. कुठलाही काढा घ्यावा लागत नाही. लठ्ठपणा, डायबिटीज, जीवनशैलीचे आजार किंवा चुकीची जीवनशैली असेल तर प्रतिकारशक्ती कमी पडते असले दिसले आहे. त्यामुळे जीवनशैलीत सुधार करून वरील लोकांची प्रतिकारशक्ती सुधारायला मदत होऊ शकते. जे नियमितपणे चांगली जीवनशैली पाळतात त्यांना खरेतर काहीही नवीन करण्याची गरज नाही. सोपे व फायदा करू शकणारे उपाय:
- संतुलित आहार
- नियमित व्यायाम
- पुरेशी झोप
- ताणतणाव नियंत्रण
- व्यसन असल्यास ते थांबवणे
हे उपाय केल्यावर लगेच प्रतिकारशक्ती वाढेल असे नाही. आपल्याला नेहमी साठी सातत्याने निरोगी जीवनशैली जोपासावी लागते. विषाणू विरुद्ध विशेष प्रतिकारशक्ती साठी त्या व्हायरसची लागण व्हावी लागते किंवा लसीकरण करावे लागते. कोव्हीड 19 विरूद्ध लसीकरण येईल तेव्हा आपल्यासाठी तो एक महत्त्वाचा उपाय ठरेल. वरील दोन्ही मुद्दे लक्षात घेता सद्या कळीचा मुद्दा प्रतिकारशक्ती पेक्षा जास्त प्रतिबंध हा आहे.
राजकारण, वैयक्तिक लाभ आणि संकट काळातील मानसिकता:
कोव्हीड 19 हा फक्त वैद्यकीय आजार नसून अनेक पैलू असलेला सामाजिक व आर्थिक प्रश्न सुद्धा आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राच्या खांद्यावर बंदूक ठेऊन गोळ्या चालवणारेही भरपूर आहेत. अनेक तर्क वितर्क त्यातून जन्माला येतात. मीडिया आणि सोशल मीडिया ह्यामध्ये दर्जेदार व खात्रीलायक वैद्यकीय माहिती किती मिळते ह्याबद्दल सगळ्यांना अंदाज आहेच. तेव्हा सामान्य नागरिक म्हणून आपण काय करावे असा विचार करत असाल तर गोंधळून जाऊ नका. भूलथापांना बळी पडू नका. कोव्हीड 19 विषयी वादविवादात अडकु नका. प्रतिबंधात्मक उपाय करा. धोका कमी होईल. तरीही त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. धोक्याची लक्षणे : त्रास वाढला, चक्कर आली, धाप लागली किंवा अस्वस्थ वाटले तर त्वरित दवाखान्यात दाखवा.
माहिती योग्य मिळावी यासाठी:
- WHO, सरकारी यंत्रणा आणि आरोग्य संघटना यांचे कोव्हीड-19 विषयीचे मार्गदर्शक लेख , व्हिडीओ किंवा सूचना आपण बघू शकतो.
- दुसरा उपाय म्हणजेआपल्या नेहमीच्या डॉक्टरांचा सल्ला आपण घेऊ शकतो.
- इतर ठिकाणी / सोशल मेडिया वर असलेले सल्ले यांचे संदर्भ तपासून बघावेत.
डॉ विनायक हिंगणे (एमबीबीएस, डी एन बी मेडीसिन) फिजीशियन