Scroll to top

दारू आणि लिव्हरचा काय संबंध?


vinayakhingane - August 25, 2020 - 6 comments

दारूमुळे लिव्हर म्हणजेच यकृत खराब होते हे जवळपास सगळ्यांनीच ऐकलेले असते. पण असे का आणि कसे घडते हे सगळ्यांना माहित नसते. यामागचे विज्ञान थोडे चमत्कारिक आहे. जर तुम्हाला ते समजून घ्यायचे असेल तर हा लेख वाचा! दारूमुळे यकृतावर वेगवेगळ्या पातळीचे परिणाम होतात. ते आपण कसे ओळखू शकतो हे सुद्धा मी आज सांगणार आहे.

अनेक प्रसिद्ध लोक , कलाकार आणि गुणी व्यक्ती दारूमुळे रसातळाला गेलेले आपण बघितलेले आहेत. काही तर दारूच्या वाईट परिणामांमुळे कमी वयातच जगाचा निरोप घेतात. अशा लोकांविषयी बातमी वाचताना हळहळ वाटते. बातमीत कोठेतरी उल्लेख असतो की त्यांचे यकृत (लिव्हर) निकामी झाले होते. काही ठिकाणी कावीळ तर काही ठिकाणी सिऱ्होसिस असे आजारांचे उल्लेख असतात. हे सगळे लिव्हर चे आजार आहेत. लिव्हर म्हणजेच यकृत हा एक खूप महत्वाचा अवयव आहे. तो निकामी झाला तर मृत्यू सुद्धा होऊ शकतो. म्हणून यकृताचे आजार महत्वाचे आहेत. दारू आपल्या महत्वाच्या यकृतावर कसा परिणाम करते ते बघू.

दारू काय करते?

दारू मधील मुख्य रसायन ‘अल्कोहोल’ किंवा ‘इथानोल ‘ हे असते. इथानोल हे मद्य वेगवेगळ्या पेयांमधून लोक पितात. ह्या मद्याचा हवाहवासा प्रभाव मेंदूवर होतो . या प्रभावासाठी खरे म्हणजे लोक दारू पितात. दारूचे प्रमाण रक्तात वाढले की नशेची भावना येते. काही काळाने हे प्रमाण कमी होते आणि नशा सुद्धा कमी होते.

रक्तातून ही दारू म्हणजेच इथानोल कुठे जाते? तिचे प्रमाण का कमी होते? तर ह्याचे उत्तर असे आहे की इथानोल यकृता मध्ये जाते. तिथे ते पचवल्या जाते. ह्याला चयापचय क्रिया किंवा मेटाबॉलीझम म्हणतात. लीवरच्या पेशी इथानोल या दारूला ॲसिटलडीहाईड नावाच्या अल्डीहाईड रसायना मध्ये बदलतात. हे अल्डीहाईड रसायन पुढील गोष्टी समजण्यासाठी महत्वाचे आहे.

ॲसिटलडीहाईड एक इंधन: अल्डीहाईड एक प्रकारचे इंधन असते. याचे ज्वलन करून आपल्या पेशी भरपूर उर्जा निर्माण करतात. ही उर्जा चरबीच्या स्वरुपात साठवली जाते. (ज्यांच्याकडे जास्त चरबी आहे त्यांच्यासाठी हे त्रासदायक ठरू शकते). कमी प्रमाणात दारू घेतल्यास शरीर हे अल्डीहाईड इंधन सुरक्षितपणे हाताळू शकते. पण जास्त प्रमाणात अल्डीहाईड जमा झाल्यास शरीरावर त्याचा जास्त भार पडतो आणि पेशींना इजा व्हायला सुरुवात होते. हे कसे होते ते अजून संविस्तर बघू.

चूल आणि इंधन : आपण चुलीवर स्वयंपाक करतो आहोत अशी कल्पना करा. चुलीवरील भांड्यात काही पदार्थ शिजतोय. आता आपण चुलीत अचानक इंधन वाढवले तर काय होईल? तापमान जास्त वाढून ते अन्न जाळून जाईल. असेच काहीसे पेशींमध्ये घडते. पेशींमध्ये जास्त इंधन जळले तर त्यातून फ्री ऑक्सिजन रॅडीकल नावाचे पदार्थ तयार होतात. हे पदार्थ आपल्या पेशिनाच इजा करतात. चुलीतील आग जास्त झाली तर इतर गोष्टी जाळण्याचा धोका असतो तसेच हे घडते. आपल्या शरीरातील इतर इंधन जसे ग्लुकोज (रक्तशर्करा) आणि चरबी हे आपले शरीर अल्डीहाईडपेक्षा जास्त बरे हाताळू शकते. अल्डीहाईड हे इंधन यकृताच्या पेशींसाठी धोकादायक ठरते.

आपल्या घरात आग विझवण्याचे साधन असते. त्यामुळे आग लागल्यावर ती नियंत्रणात आणता येते. तसेच आपल्या पेशीमध्ये फ्री ऑक्सिजन रॅडीकल ला हाताळण्यासाठी एक प्रणाली असते. अल्डीहाईडचे ज्वलन जास्त झाले तर जास्त फ्री रॅडीकल तयार होतात. मग त्यांना हाताळणारी यंत्रणा पूर्णपणे थकून जाते. मग अशा वेळी अजून नवीन फ्री रॅडीकल तयार झाले तर पेशींना इजा जास्त होते. म्हणजे आग लागल्यावर टाकायला पाणीच उरत नाही व आग खूप भडकते. दारूच्या व्यसनात असेच होते. त्यामुळे यकृत खराब होते.

अल्डिहाइडचे इतर त्रास: अल्डिहाइड आपल्या पेशींवर इतर वाईट परिणाम सुद्धा करतात. ते आपल्या पेशींच्या प्रथिनांवर परिणाम करू शकतात. आपल्या जनुकाना सुद्धा इजा पोहचवू शकतात. ह्याने पेशींचे काम बिघडते. काही वेळेस तर अल्डिहाइड कॅन्सरचा धोका निर्माण करतात. खूप काळ अल्डिहाइडचा मारा शरीरावर झाला तर असे परिणाम जास्त प्रमाणात दिसतात. शिवाय सतत अल्डिहाइडचा मारा असेल तर पेशीमध्ये दाह (inflammation) सुरु होते. याचे परिणाम शरीरात इतरत्र सुद्धा दिसतात.

अल्डिहाइड आणि हँग ओवर: दारूचे सेवन केल्यावर काही तासांनी दारूचे रक्तातील प्रमाण कमी होते व नशा सुद्धा कमी होते. अशा वेळी यकृतामधे दारूचे रूपांतर अल्डिहाइड मध्ये झालेले असते. आता रक्तात अल्डिहाइड चे प्रमाण वाढलेले असते. हे जास्त प्रमाणात वाढले तर डोकेदुखी, मळमळ ,उलटी असे त्रास वाटतात. यालाच हँग ओवर च्या नावाने ओळखल्या जाते.

अर्थातच अल्डिहाइड सुद्धा आपल्या शरीरात नेहमीसाठी राहत नाहीत.ते इंधन म्हणून जाळल्या जातात. काही लोकांमध्ये अल्डिहाइड वापरण्याची क्षमता फार कमी असते. (असे जनुकीय कारणामुळे होते). अशा लोकांनी दारू पिल्यावर त्यांना अल्डिहाइड चा त्रास खूप जास्त होतो. चेहरा लाल होणे, डोके दुखणे, अस्वस्थ वाटणे, घाम येणे अशी लक्षणे दिसतात. दारू पिल्यानंतर हवासा आनंद मिळण्यापेक्षा त्रासच जास्त होतो. अशा लोकांमधे दारूचे व्यसन लागण्याचा धोका खूपच कमी असतो. डायसल्फीराम हे औषध सुध्दा असेच काम करते व त्याचा उपयोग तज्ञ डॉक्टर व्यसन बरे करायला करतात. अल्डिहाइड अचानक वाढण्याचा त्रास खूप गंभीर होऊ शकतो म्हणून डायसल्फीरामचा उपयोग फक्त तज्ञांच्या देखरेखीखाली करावा लागतो.

अशा प्रकारे अल्डिहाइड आपल्या यकृताच्या पेशींवर इजा करते. अशी इजा वारंवार होत राहिली तर यकृत खराब होऊ शकते. याचे परिणाम वेगवेगळ्या प्रकारे दिसतात.

यकृतावर होणाऱ्या इजेचे प्रकार: यकृताला इजा व्हायला सुरुवात झाली की ती सुरुवातीला दिसते ती म्हणजे ‘ फॅटी लिव्हर ‘ च्या स्वरूपात. ह्याचा काही त्रास जाणवत नसला तरी इजा होण्याची सुरुवात झालेली असते. सोनोग्राफी मध्ये यकृतात चरबी जमा झालेली दिसते. कधी कधी रक्ताच्या तपासणीत लिव्हर इंझाईम अगदी थोडेसे वाढेलेले दिसतात. असे बदल दिसल्यास धोक्याची घंटी समजावी. दारूचे सेवन बंद केल्यास हे पूर्ण बरे होऊ शकते.

कावीळ व यकृतावर सूज: यकृताच्या पेशींना जास्त इजा झाली तर रक्तातील लिव्हर इन्झाईम चे प्रमाण खूप वाढते. बिलिरुबीनचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे कावीळ दिसू लागते. मळमळ उलटी होणे, अशक्त वाटणे , पोटात दुखणे अशी लक्षणे सुद्धा दिसू शकतात. यकृतावर सूज मोठ्या प्रमाणात आली तर यकृताचे कामच बंद पडू शकते. हे गंभीर असते व यात अगदी जीवाला धोका सुद्धा होऊ शकतो. त्रासाच्या सुरुवातीलाच दारू बंद करून योग्य उपचार केले तर हे बरे होऊ शकते.

सिऱ्होसीस किंवा यकृत कडक होणे: यकृतावर वारंवार सूज आली, वारंवार इजा झाली तर यकृतावर व्रण निर्माण होतात. काही काळानंतर इतके व्रण तयार होतात की यकृत कडक होऊन जाते. सोनोग्राफी मध्ये सुद्धा हे दिसते. यकृतामध्ये काम करणाऱ्या पेशी अगदी कमी उरतात. बाकी सगळे व्रणच असतात जे यकृताचे काम करू शकत नाही. अशावेळेस यकृताचे काम खूपच बिघडून जाते. शरीरातील व्यर्थ पदार्थांचे प्रमाण वाढणे, मेंदूचे काम नीट न होणे, पोटात पाणी जमा होणे असे अनेक दुष्परिणाम दिसायला लागतात. असे व्यक्ती सतत थकलेले असतात. त्यांना वारंवार आजारपण येते. बरेचदा दवाखान्यात भरती करावे लागते. ही आजाराची टोकाची पातळी झाली. अशी परिस्थिती येऊच नये असा प्रयत्न करणे गरजेचे असते.

यकृत आपल्या आरोग्यासाठी का महत्वाचे आहे?

आपल्या शरीरातील चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबोलिजम सांभाळणे मध्ये यकृताचा सिंहाचा वाटा असतो. आपले अन्न औषधे व्यर्थ पदार्थ अशा बऱ्याच गोष्टींचा चयापचय यकृतात घडत असतो.

यकृताची कामे:

 • आपल्या अन्नातून ऊर्जा घेणे व ती योग्य प्रकारे साठवणे
 • आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल सांभाळणे
 • व्यर्थ पदार्थ फिल्टर करणे
 • वेगवेगळी प्रथिने तयार करणे
 • प्रतिकारशक्ती सांभाळणे
 • रक्तपेशी संभाळणे
 • विषारी पदार्थांची विल्हेवाट लावणे
 • औषधांचा चयापचय यकृतात होतो.

लिव्हरचे काम कमी झाले तर आपल्याला आरोग्याचे वेगवेगळे त्रास सुरू होतात . हे आजार अतिशय गंभीर सुद्धा ठरू शकतात. हृदय किडनी यासारखा यकृत सुद्धा आपल्या आरोग्याचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. दुर्दैवाने लोकांमध्ये याविषयी तशी जागृती नाही. दारू आवडी – नावडीचा विषय आहे पण यकृत जीवनावश्यक आहे!

इतर अल्कोहोल व इतर अल्डिहाइड: काही लोक हातभट्टी किंवा अवैध दारू पितात. त्यात इथेनॉल ऐवजी किंवा इथेनॉल सोबत इतर दारूचे प्रकार असतात. त्यातील मिथानोल हे मद्य त्रासदायक ठरते. मिथानोल चे रूपांतर यकृतामध्ये ‘फॉर्मलडीहाईड’ ह्या विषारी अल्डिहाइड मध्ये होते. त्यामुळे आंधळेपणा येणे, प्रकृती अत्यवस्थ होणे व जीव जाणे असे गंभीर प्रकार होऊ शकतात. अवैध दारू मुळे जीव गमावला अशी भयानक बातमी तुम्ही कधीतरी वाचली असेलच.

दारू शिवाय काही अनेक घटक यकृतावर वाईट परिणाम करू शकतात. दारू यकृता शिवाय इतर अनेक अवयवांवर वाईट परिणाम करू शकते. पण त्याविषयी नंतर कधीतरी.

डॉ विनायक हिंगणे ( एमबीबीएस, डीएनबी मेडीसिन) कन्सल्टंट फिजिशियन.

 

Author avatar

vinayakhingane

http://vinayakhingane.com
I am a physician by profession . I love to paint , read and write. Marathi is my mother tongue. I intend to write about health, health related issues and share my experiences through this blog. मराठी मातृभाषा असल्याने जास्त जवळची वाटते. आपल्या भाषेत माहिती लवकर कळते आणि जास्त प्रभावी असते असा अनुभव आहे. मराठी लोकांना आरोग्याविषयी मराठीत बोललेलं उपयोगी पडेल ह्या भावनेने हा ब्लॉग सुरु केलाय. मी एक डॉक्टर आहे आणि मला कलेची आवड आहे. आरोग्य लिखाणातून काहीतरी सकारात्मक करण्याचा प्रयत्न करतो आहे .

Related posts

6 comments

 1. Vijay Laxmanrao Hingane

  खुप खुप सुंदर अगदी साध्या सोप्या भाषेत दारू मुळे आपणास कसा त्रास होतो हे आपण विवेचन केले आहे… बहुतेक मुळात हेच माहिती नसल्यामुळे बरेच जण व्यसनाधीन होतात त्यांचे करीता किंवा व व्यसणाधिन साठी सुद्धा उपयुक्त माहिती आपण सदर लेखात प्रस्तुत केली आहे….
  तसं व्यसन लावणे कठीण आहे,
  सोडण अगदी सोपं आहे…..
  फक्त हे सोपं आहे हे माहीत नाही… हे माहिती करून घेतल्यास स्वतः ला न संपवता आपण व्यसनास संपऊन आनंदी जीवन शैली जगू शकतो….
  प्रस्तुत लेखात फार छान वर्णन केलंय आपण….

 2. Ulhas

  खूपकाही नवीन कळल।
  धन्यवाद।

 3. Ulhas

  खूपकाही नवीन कळल।
  धन्यवाद।

 4. Sohail Khan

  Nice article sir,really helpful information for everyone’s. specially for those are addicted to drinking.

Leave a Reply

%d bloggers like this: