Scroll to top

मधुमेह कुणालाही होऊ शकतो …!


vinayakhingane - December 1, 2020 - 0 comments

ऑलिम्पिअन मिशेल ग्रिफिथ ची गोष्ट…

माझ्यासमोर रिपोर्ट चं जाडजूड पाकीट ठेऊन अबक काका खुर्चीत स्थिरावले. “बघा डॉक्टर साहेब काय करायचं ते !” मी रिपोर्ट्स वर नजर फिरवली. शुगर अनियंत्रित. HbA1C खूप वाढलेले. कोलेस्टेरोल ची औषधे सुरु असूनही पातळी खूप वाढलेली . मी काकांच्या औषधीच्या यादीकडे नजर टाकली. औषधी वाढवण्यासाठी फार वाव नव्हता. त्यांचा दिनक्रम आणि आहार मी तपशीलवार बघितला. माझे वैद्यकीय मत त्यांना शांतपणे सांगितले. “तुम्हाला जीवनशैलीत बदल केल्यास मोठा फायदा होईल.” जीवनशैलीत बदल म्हटल्यावर काकांच्या कपाळावर आठ्या पडल्या. “अहो डॉक्टर ! माझा डायबेटीस अनुवांशिक आहे. माझ्या वडिलांना होता मलाही आहे. यात जीवनशैलीचा काय संबंध?  आणि माझी जीवनशैली म्हणाल तर चांगलीच आहे की. मी माझ्या कॉलेज च्या  दिवसांत खेळाडू होतो. आजही रोज २ किलोमीटर चालतो. आहार थोडा इकडे तिकडे होतो कधीकधी हे मान्य . पण आमची अनुवांशिकता फारच स्ट्र‌‍ॉँग हो. वडिलांकडे सगळ्यांना डायबेटीस. तरुणपणी इतका व्यायाम करूनही मला डायबेटीस झालाच . आता व्यायाम करून काय फायदा ?”

मी त्यांना विचारले की कॉलेज मध्ये खेळाडू असताना त्यांचे वजन किती होते? उत्तर आले ५५ किलो . डायबेटीस चे निदान झाले चाळीशी नंतर. तेव्हा वजन किती होते? तर तेव्हा वजन होते ८० किलो . “खेळ सुटल्यानंतर थोडे वजन वाढले पण नंतर हे वजन स्टेबल आहे ८० . काटा इकडे नाही की तिकडे नाही.” काका अभिमानाने म्हणाले. 

अबक काकांचा डायबेटीस हा टाईप २ डायबेटीस आहे. हा आजार जीवनशैलीशी निगडीत आजार आहे. यात अनुवांशिकतेचा प्रभाव थोड्या प्रमाणात असतो पण मोठा प्रभाव जीवनशैलीचा असतो. चुकीचा आहार , व्यायाम पुरेसा न होणे, बैठी जीवनशैली , अपुरी झोप, सततचा ताणतणाव , व्यसने इत्यादी अनेक कारणांनी हा आजार होतो. या कारणांमध्ये बदल केले तर आजार नियंत्रणात येतो आणि टाळता सुद्धा येतो !

मिशेल ग्रिफिथ ची गोष्ट…

अ ब क काकांना हा मुद्दा पटवून सांगताना काहीतरी उदाहरण देणे आवश्यक होते. त्यांना खात्री झाल्याशिवाय ते मुळीच जीवनशैलीत बदल करणार नाहीत हे मला कळून चुकले.इतक्यात युके च्या वुमेन्स हेल्थ ह्या मासिकात प्रसिद्ध झालेला लेख मला कुणीतरी पाठवला होता. त्यात मिशेल ग्रिफिथ ह्या ऑलिम्पिकपटूची गोष्ट होती. मिशेल ग्रिफिथ रॉबिनसन ह्या ४८ वर्षांच्या आहेत . काही काळापूर्वी त्यांना प्री डायबेटीस असल्याचे निदान झाले होते. त्या ऑलिम्पिक खेळाडू होत्या व खेळ सोडल्यानंतर सुद्धा ऍक्टीव्ह असायच्या. प्री डायबेटीस ही टाईप २ डायबेटीस ची पहिली पायरी! निदान झाल्यावर त्यांना धक्काच बसला . माझ्यासारख्या ऑलिम्पिकपटूला डायबेटीस सारखे आजार होणारच नाहीत असे त्यांना वाटायचे. पण २००६ मध्ये खेळ सोडल्यानंतर त्यांचा व्यायाम थोडा कमी झाला. आहार जरी नियंत्रित असला तरी मध्ये मध्ये पिझ्झा किंवा बाहेरचे खाणे व्हायचे. याचा परिणाम म्हणून त्यांचे ८ते१० पाउंड वजन वाढले. त्यांच्या आईला डायबेटीस होता. अनुवांशिकता, वाढलेले वजन आणि जीवनशैलीत काही चुका यामुळे त्यांना प्री डायबेटीसचे निदान झाले. याचा अर्थ त्यांची शुगर सरासरीपेक्षा जास्त वाढली होती. ही धोक्याची घंटा समजून त्यांनी लगेच जीवनशैलीत सुधार केले. नियमित व्यायाम सुरु केला. स्नायू बळकट करणाऱ्या व्यायामावर भर दिला. आहारात बदल केले. त्यांचे वाढलेले वजन कमी झाले आणि शुगर सुद्धा नियंत्रणात आली. त्या मधुमेह मुक्त झाल्या. आज अनेक मधुमेहींसाठी त्या प्रेरणास्थान आहेत.


आज व्यायाम केल्यास त्याचा  फायदा आज मिळतो. त्याचा फायदा खूप काळ टकून राहत नाही. त्यामुळे आपल्याला नियमितपणे व्यायाम करणे आवश्यक आहे. ऑलिम्पिक खेळाडू ला सुद्धा चुकीच्या जीवनशैली मुळे डायबेटीस किंवा जीवनशैलीचे आजार होऊ शकतात. जीवनशैली सुधारल्यास ते बरे सुद्धा होऊ शकतात. 

 • व्यायामचे दोन प्रकार असतात : स्नायू बळकट करणारे व्यायाम (strength training) व हृदय फुफ्फुसाचे व्यायाम (Cardio )
 • दोन्ही व्यायाम प्रकार करावेत
 • आपल्याला झेपेल असा व्यायाम करावा व हळूहळू वाढवत न्यावा
 • व्यायामासोबतच इतर शारीरिक हालचाल वाढवावी व सलग बसून राहणे टाळावे
 • दर अर्ध्या तासाने उठून थोडे फिरल्यास मदत होते
 • बसून राहणे हे धुम्र्पनाएवढे धोकादायक आहे
 • व्यायाम व शारीरिक हालचाल ह्याने शुगर नियंत्रणात आणायला एका औषधीएवढी मदत होते.
 • फक्त डायबेटीस नाही तर हृदयविकार , उच्च रक्तदाब , स्मृतीभंश व इतर आजार दूर ठेवायला व्यायामाची मदत होते

हे उदाहरण ऐकून अबक काकांचा चेहरा बदलला. त्यांनी विचारले की मला सुद्धा फायदा होईल का व्यायाम करायचा?  मी म्हटले की आपण करून बघूया. आम्ही एक महिना प्रयत्न करून बघायचे ठरवले. सोबत शक्य झाल्यास करायला काही आहारबदल सुद्धा सुचवले. एका महिन्याने अबक काका भेटले तेव्हा त्यांचा आनंद चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्यांच्या शुगरचे रिपोर्ट नेहमीपेक्षा खूप चांगले आले होते. ८० वर स्थिर असलेल्या वजनाला ओहोटी लागली होती. त्यांचे ब्लड प्रेशर सुद्धा सामान्य झाले होते.पण ह्या सगळ्या आकड्यांपेक्षा काकांना जास्त  आनंद ह्या गोष्टीचा होता की त्यांची गुडघेदुखी कमी झाली. शिवाय त्यांना तरतरीत वाटायला लागले. “डॉक्टर, मला एका महिन्यातच तीन चार वर्षे तरुण झाल्यासारखं वाटतंय!”आता अबक काका डायबेटीस च्या अनुवंशिकतेविरुद्ध लढायला सज्ज झाले होते!

वाढलेली चरबी ही अनेक आजारांना जन्म देऊ शकते.. आपल्या प्रत्येकाच्या शरीराची चरबी हाताळण्याची क्षमता वेगवेगळी असते. आपले शरीर निरोगीपणे हाताळू शकेल ह्यापेक्षा जास्त चरबी वाढली की जीवनशैलीचे आजार सुरु होतात. पण आपण जीवनशैली सुधारली तर हे आजार नियंत्रणात येऊ शकतात. यासाठी गरज असते ती आपली जीवनशैली तपासून बघण्याची. जोपर्यंत आपल्या जीवनशैलीतील चुका आपण मान्य करणार नाही तोपर्यंत बरे होण्याची प्रक्रिया सुरूच होत नाही. पण एकदा ही प्रक्रिया सुरु झाली की आजार बरे व्हायला सुरुवात होते. अनुवांशिकता आपल्या विरुद्ध असली तरीही निरोगी जीवनशैलीची सरशी होते!

डॉ विनायक हिंगणे

अशी इतर उदाहरणे बघायची असल्यास पुढील लेख वाचा :

Contact Us
close slider

  ×

  Hello!

  Click one of our representatives below to chat on WhatsApp or send us an email to vinayakhingane@gmail.com

  ×
  %d