आपला समाज कितीही पुढारला तरी अंधश्रद्धा नष्ट होत नाहीत. त्या रूप बदलत राहतात. आरोग्य विषयक अंधश्रद्धा ह्या मला विशेष त्रासदायक वाटतात. आरोग्यविषयक अंधश्रद्धा बरेचदा निरुपद्रवी वाटतात पण त्यांचा दूरगामी परिणाम रुग्णांवर होत असतो. आरोग्यविषयक अंधश्रद्धाची पिके येत असतात. त्यातील इतक्यात सुरू असलेले पीक म्हणजे काविळीची माळ. याबद्दल आपण आज थोडक्यात चर्चा करुया.

काविळीची माळ अंधश्रद्धा का आहे?
कावीळ हे एक लक्षण आहे. यात शरीरातील बिलिरुबिन हे रसायन वाढते व शरीर/ डोळे पिवळे दिसायला लागतात. हे लक्षण वेगवेगळ्या आजारांमुळे दिसते. हे लक्षण बरे करायला मूळ आजार कुठला आहे हे शोधून त्याचा उपचार करावा लागतो. Paracetamol देऊन जसा ताप कमी होतो तसे कुठलेही औषध देऊन कावीळ कमी होत नाही. मूळ आजार सुधारला तर मात्र कावीळ कमी होते. मूळ आजार सौम्य असेल तर तो लवकर सुधारू शकतो व कावीळ आपोआपच बरी होते. काविळीची माळ किंवा नाकात जादुई थेंब टाकल्याने कावीळ (किंवा मूळ आजार) बरे होण्याचे कुठलेही शास्त्रीय पुरावे उपलब्ध नाहीत. त्यात काही औषधी गुणधर्म आहेत किंवा ही माळ कसे काम करते याबद्दल सुद्धा काही शास्त्रीय पाठबळ नाही. अगदी कुठल्याही पॅथी मध्ये याला समर्थन नाही. ही माळ घरगुती उपचार ह्या प्रकारात सुद्धा मोडत नाही. कुठलीही वैद्यकीय पदवी नसलेली स्वतः ला कावीळ मधील तज्ञ म्हणवून घेणारी एखादी व्यक्ती ही माळ देत असते. त्यामुळे ह्या प्रकाराला अंधश्रद्धा म्हणायला काही हरकत नसावी.
नवीन पीक का आले?
कावीळ साठी माळ हा प्रकार तसा जुना आहे. पण त्याचे नव्याने पीक येण्याचे कारण म्हणजे कोविड 19 ची साथ. कोरोना मुळे होणाऱ्या आजारात सर्दी,ताप, खोकला व फ्लू सारख्या लक्षणांशिवाय भूक कमी होणे हे एक महत्त्वाचे लक्षण आहे. कावीळ न होता सुद्धा रुग्णांची भूक कमी होते, मळमळ वाटते व प्रचंड थकवा येतो हे कोविड 19 ह्या आजारात होऊ शकते. त्यामुळे असतो कोविड 19 पण रुग्णांना वाटते की आपल्याला कावीळ झालीय. अशा रुग्णांना वैद्यकीय चाचणी न करता बरेचदा काविळीची माळ घातल्या जाते. डोळे ,लघवी किंवा शरीर पिवळे न पडता, कावीळ नसताना सुद्धा कावीळ झाली आहे असे सांगितल्या जाते. फक्त भूक कमी होणे म्हणजे कावीळ नाही. पण तरीही “ही कावीळ किंवा पांढरी कावीळ आहे” असे सांगून रुग्णांची दिशाभूल केली जाते. यामुळे योग्य उपचारांपासून रुग्ण मुकतो. असे होणे टाळायचे असेल तर भूलथापांना बळी न पडता तज्ञ डॉक्टरांचा सल्ला वेळेत घेणे आवश्यक आहे.
कावीळ काय असते? कावीळ का होते?
आपल्या शरीरातील बिलिरूबिन हे रसायन वाढले तर डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा दिसायला लागतो. त्वचा पिवळी पडायला लागते. कधीकधी लघवी जास्त पिवळी होते. ह्या पिवळेपणाला आपण कावीळ म्हणतो. बिलिरुबिन सामान्य पातळीपेक्षा जास्त वाढण्याची अनेक कारणे आहेत. म्हणजेच अनेक आजारांमध्ये कावीळ हे एक लक्षण म्हणून दिसते. कावीळ दिसल्यास त्यामागे एखादा सौम्य किंवा कधीकधी गंभीर आजार असू शकतो
कावीळ चे लक्षण कुठल्या आजारांमध्ये दिसू शकते?
कावीळ हे लक्षण सहसा लिव्हर/ यकृताच्या आजारांमध्ये दिसते. याशिवाय लिव्हर बाहेरील आजार जसे रक्ताचे आजार किंवा रासायनिक दोष इत्यादींमध्ये सुद्धा कावीळ दिसू शकते. पित्ताशय व त्यातील नलिका यामध्ये अडथडा आल्यास सुद्धा कावीळ होऊ शकते.
लिव्हर चे आजार वेगवेगळ्या प्रकारचे असतात. लिव्हर वर सूज किंवा दाह होणे ( Hepatitis) हे एक महत्वाचे कारण आहे. Hepatitis हा विषाणूमुळे, दारूमुळे किंवा औषधी यामुळे होऊ शकतो. याशिवाय काही जनुकीय आजारांमुळे होऊ शकतो.
काही वेळेस कॅन्सर मुळे सुद्धा कावीळ होते. कॅन्सर चा प्रादुर्भाव लिव्हरला होतो व त्यामुळे कावीळ दिसायला लागते. पित्ताशय व स्वादुपिंड यांच्या कॅन्सर मुळे सुद्धा कावीळ होते.
विविध जनुकीय दोषांमध्ये शरीरात विपरीत असे रासायनिक बदल घडतात व त्यामुळे कावीळ दिसू शकते.
आपल्यला कावीळ हे लक्षण वारंवार दिसणारे आजार म्हणजे विषाणूंमुळे होणाऱ्या hepatitis (यकृत /लिव्हर वर येणारी सूज ) . याशिवाय नवजात बाळांमध्ये सुद्धा कावीळ आपल्याला बघायला मिळते. या दोन्ही प्रकारचे आजार शक्यतोवर सौम्य असतात व बरे होतात, पण या आजारातील काही रुग्ण गंभीर होऊ शकतात. म्हणून त्यांच्यावर लक्ष ठेवणे आवश्यक असते. याशिवाय दारूच्या व्यसनामुळे लिव्हर खराब होऊन कावीळ होणे हे सुद्धा बरेच कॉमन आहे.
वरील आजारांपैकी काही आजार सामान्य व बरे होणारेआहेत. काही आजार खूप गंभीर व जीवघेणे आहेत. सखोल वैद्यकीय चाचणी केल्याशिवाय साधा व गंभीर आजार यात फरक करता येत नाही .
कावीळ / यकृताचे आजार गंभीर ठरू शकतात का ?
यकृत/लिव्हरला इजा कमी प्रमाणात झाली तर ती भरून निघण्याची शक्यता जास्त असते. पण काही वेळेस इजा मोठ्या प्रमाणात होते व लिव्हरचे काम कमी होते. अशावेळी रुग्णाची परिस्थिती गंभीर होऊ शकते. असे झाल्यास लिव्हरचे काम / गंभीर लक्षणे यावर बारीक लक्ष ठेवावे लागते. बरेचदा रुग्णाला भर्ती कर करून उपचार केल्या जातो. खूपशा औषधींचा चयापचय लिव्हर मध्ये होत असल्याने खूप विचारपूर्वक व निवडक अशी औषधी दिल्या जातात.
लिव्हरला खूप मोठी इजा झाल्यास लिव्हर निकामी होऊ शकते. असे झाल्यास जीवाला धोका निर्माण होतो. काही रुग्णांना तातडीने यकृत प्रत्यारोपण (लिव्हर ट्रान्सप्लांट ) करावे लागते.
लिव्हरचे गंभीरआजार हे मृत्यूचे कारण ठरू शकतात. काही आजार जसे कॅन्सर हे लगेच गंभीर होत नाहीत पण असे आजार लवकर निदान न झाल्यास पुढे गंभीर ठरू शकतात.
सांगायचा मुद्दा असा की कावीळ किंवा यकृताच्या आजाराचे कुठलेही लक्षण दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. असे आजार झपाट्याने खराब होऊ शकतात. म्हणून यांचे योग्य निदान व उपचार होणे आवश्यक असते. काविळीची माळ वगैरे सारखे उपाय करत बसल्यास मूळ मुद्याकडे दुर्लक्ष होते. महत्वाचा वेळ दवडल्या जातो. त्यामुळे अशा उपायांच्या मागे लागू नये !
माळ घातल्याने काही दुष्परिणाम होत नाही, तर मग इतर उपचारासोबत माळ सुद्धा घातली तर काय बिघडते?
माळ घातल्याने त्याचा सरळ सरळ दुष्परिणाम होत नसला तरी बरेचदा रुग्ण योग्य उपचारा पासून मुकतो. रुग्ण व नातेवाईक ह्यंचा कल तपासण्या व उपचार टाळण्याकडे असतो. माळ घातल्यावर फायदा होईल, न झाल्यास उपचार घेऊ अशी भावना वाढते. अमुल्य वेळ वाया जातो. अशा वेळी आजार वाढल्यास त्याला माळेचा दुष्परिणाम समजावे. शिवाय किती काळ आपण ‘दुष्परिणाम होत नाही’ या नावाखाली अंधश्रद्धांना खतपाणी घालायचे ? शास्त्रीय आधार नसलेल्या उपायांना भाबडे पणे गोंजारत बसल्याने आपला समाज आजही अंधश्रद्धांनी ग्रासलेला आहे. सुशिक्षित लोक सुद्धा अंधश्रद्धांना बळी पडण्याचे कारण म्हणजे असल्या उपायांना समाजाने दिलेले अभय. अंधश्रद्धांचे दुष्परिणाम ह्या ना त्या प्रकारे आपण भोगत असतोच. त्यामुळे तज्ञांचा सल्ला घेऊन ज्या उपचारांना शास्त्रीय पाठबळ आहे तेच उपाय निवडावेत असे मला वाटते!
- डॉ विनायक हिंगणे (MBBS, DNB Medicine)कन्सल्टंट फिजिशियन