ह्रदयविकारामुळे होणारे आकस्मित मृत्यू? एखादा व्यक्ती चालता फिरता असतो, तो अचानकपणे कोसळतो. त्याला रुग्णालयात नेण्याची संधी सुध्दा मिळत नाही, त्याचा मृत्यू होतो. हे अतिशय गंभीर असतं. हे असं कुठल्या कारणांमुळे होऊ शकतं आणि त्याबद्दल आपण काही करू शकतो का? त्याच्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत.
यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे ह्रदयाच्या रक्त वाहिनीला होणारे आजार. आपल्या ह्रदयाला ज्या धमन्या रक्तपुरवठा करत असतात. त्या आजारी पडून खराब होतात. त्याच्यामध्ये कधीही रक्त गोठू शकतं. अचानकपणे रक्त गोठलं तर ह्रदयाची धमनी बंद पडते. आणि ह्रदयांच्या स्नायूंना होणारा रक्त पुरवठा बंद पडतो. असं जर झालं तर गंभीर परिस्थिती निर्माण होते. आणि मृत्यू सुध्दा होऊ शकतो. ह्याच आजाराला आपण ह्रदयविकार किंवा हार्ट अँटक असं म्हणतो.

हा आजार बहुतांशी लोकांना होत असतो. हा आजार उतरत्या वयात होणारा असा समजला जायचा. पण आजकाल कमी वयामध्ये सुध्दा ह्रदयाच्या धमनीचे आजार बघायला मिळतात. हा आजार मुख्यत्वे जीवनशैलीशी संबंधित आहे. आपला आहार चुकीचा, व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली, सततचा ताणतणाव, अपुरी झोप या गोष्टीमुळे अशा आजारांचा धोका वाढतो. एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे धुम्रपान.
एखादा व्यक्ती जास्त धुम्रपान करत असेल तर त्याचा धोका जास्त वाढतो. जरी तुम्ही धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या शेजारी असाल तरी धोका वाढू शकतो. काही लोकांमध्ये अनुवांशिकता सुध्दा महत्त्वाची असते. याच्यासाठी आपल्याला काही तपासण्या करुन घेता येतात. तसेच आपल्याला कितपत धोका आहे हे सुध्दा पडताळून पाहता येतो. आपल्याला ह्रदयविकाराची रिस्क मोजून बघता येते. हि रिस्क कितपत आहे. त्याच्यानुसार औषधोपचार किंवा काही जीवनशैलीत बदल करता येतो.

तसेच इतरही ह्रदयाचे विकार असतात. त्याच्यामुळे ही आकस्मित मृत्यू होण्याची शक्यता असते. ह्रदयाचे स्नायू असतात ते बनतानाचं चुकीचे बनतात. त्याच्यामुळे ह्रदयाच्या कार्यक्षमतेमध्ये फरक पडतो. त्यामुळे पेशंटला आकस्मित मृत्यू होऊ शकतो. हे ह्रदयाची सोनोग्राफीवर ह्रदयाच्या स्नायूंची संरचना चुकीची आहे हे बघता येतं. हा आजार अनुवांशिक असतो, गुणसुत्रांमध्ये दोष असेल तर हा आजार होतो.
आपल्या परिवारामध्ये जवळ व्यक्तीचा परिवारामध्ये आकस्मित मृत्यू झाला असेल तर आपण आपल्या ह्रदयाची तपासणी करुन घेतली पाहिजे. तसेच आपल्या ह्रदयाच्या विद्यूत प्रवाहामध्ये दोष असू शकतात. हे पण अनुवांशिक असतात गुणसुत्रांच्या दोषांमुळे घडत असतात. तसेच काहींना धोक्याच्या सुचना आधीच मिळालेल्या असतात. छातीत दुखणं, दम लागणे, भोवल येणं ही धोक्याची लक्षण असतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरीत वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.