जे वर्क फ्रॉम होम करत आहेत त्यांना ताणतणाव येतोय. तो ताणतणाव नीट हाताळता येत नाही आहे. काही लोकांना नैराश्य आले आहे. काही लोकांना चिंतेचा आजार होतोय. तर असे बरेचसे मानसिक ताणतणाव आणि आजार बघायला मिळत आहेत.

घरी बसून राहिल्यामुळे शरीराची हालचाल कमी होते. बसून राहणं वाढतं. व्यायाम कमी आणि झोप सुध्दा कमी झाली आहे. या सगळ्या गोष्टींचा शरीरावर जसा परिणाम होतो तसाच मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. आपलं मानसिक आरोग्य तरतरीत ठेवण्यासाठी जे काही हार्मोन्स आणि रसायन असतात. त्याच्यावर विपरित परिणाम शारीरिक हालचाल कमी झाल्यामुळे होतो. जर आपण नियमितपणे व्यायाम केला, शारीरिक हालचाल वाढविली. तर काही रसायनं आपल्या मेंदूमध्ये स्त्रावतात. त्यामुळे नैराश्य दूर व्हायला मदत होते.

याच्याशिवाय आपण झोप सुधारली. सलग आठ तास झोप घेतली तर आपल्याला ताणतणाव हाताळणं सोपं होऊन जातं. म्हणून व्यायाम, शारीरिक हालचाल आणि झोप याचा फायदा फक्त शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी नाही, तर मानसिक आरोग्य टिकविण्यासाठी होणार आहे. याच्याशिवाय आपण जर आहारावर लक्ष दिले. जंकफूड कमी केले. आणि संतुलित आहार घेतला. याचा सुध्दा फायदा मानसिक आरोग्याला होतो. कारण आहाराचा आणि मानसिक आरोग्याचा अगदी जवळचा संबंध आहे. प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्यामुळे मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो.
मनुष्य प्राण्याला सवयीमुळे फायदा होतो. ऑफिसला जाऊन काम केल्याने जास्त ताणतणाव शरीराला होत नाही. पण घरुन काम करत असताना ताणतणाव वाढण्याची शक्यता जास्त असते. घरातून काम करत असताना एक शेड्यूल बनवलं, तर त्यातून ही फायदा होऊ शकतो. तसेच घरातील मंडळी सोबत गप्पा गोष्टी मारल्या तर फरक पडतो. याशिवाय मधे मधे सोशल मीडिया सुध्दा आपण वापरू शकतो.

छंद जोपासण्याचा प्रयत्न केला पाहिजे. घरातून काम करतेवेळी कामाच्या ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी छंद जोपासले तर फायदा होऊ शकतो. समजा, काही करून ही ताणतणाव कमी होत नसेल, तर त्वरीत मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.