काही वर्षांपूर्वी गुढ आणि चमत्कारी केसेस डॉक्टरांकडे येऊ लागल्या होत्या. अगदी निरोगी व्यक्ती, त्यात काही तरुण असायचे. या व्यक्तींना दवाखान्यात आणले जायचे कारण ते बाथरुममध्ये बेशुध्द अवस्थेत सापडलेले असायचे. त्यांना कोणताही मार लागलेला नाही, ह्रदयाचा आजार नाही, ह्रदय किंवा मेंदूच्या सगळ्या तपासण्या नॉर्मल यायच्या. तसेच या व्यक्तींना आधीचे पण कुठले आजार नसायचे. काही वेळाने या व्यक्ती अतिशय नॉर्मल होऊन जायचे. पण लोकांना समजायचेचं नाही, काय झालं ते.

मग हळूहळू जशा केसेस वाढू लागल्या आणि डॉक्टरांनी त्याच्या विषयी अभ्यास केला. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की, या सगळ्या केसेसमध्ये समान दुवा आहे. हे सगळे व्यक्ती बंद व हवा खेळती नसलेल्या बाथरुममध्ये अंघोळ करत होते. आणि त्या बाथरुममध्ये गॅस गिझर चालू असायचा. गॅस गिझर आणि खेळती हवा नसलेला बाथरुम हा एक समान दुवा होता. तर यावर अभ्यास करून बऱ्याचशा भारतीय डॉक्टरांनी त्याचं संशोधन मांडलेलं आहे.
गॅस गिझर हा जिथे हवा खेळती नाही आहे, अशा बाथरुममध्ये गॅस गिझर जळतो. तेव्हा त्या एलपीजीचं अपुरं जळणं होतं. जिथे अपुरं जळणं होतं, तिथे कार्बन मोनोक्साईड जास्त प्रमाणात तयार होतो. कार्बन मोनोक्साईड सोबतच नायट्रोजन डायऑक्साईड आणि इतर गॅसेस सुध्दा तयार होतात. यामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. एकतर लोकांना आकडी येते नाहीतर कार्बन मोनोक्साईडची विषबाधा होते. ही जर विषबाधा झाली तर त्याने व्यक्ती बेशुद्ध पडू शकतो. हे एलपीजीचं अपुरं जळणं झाल्यामुळे होत असतं. म्हणून आपल्याला गॅस गिझर योग्य पध्दतीने वापरणं गरजेचे असतं. वेगवेगळ्या विकसित देशांमध्ये यासाठी कडक नियमावली आहे.

बऱ्याच ठिकाणी अशी ताकीद दिली जाते की, गॅस गिझर बंद रूममध्ये वापरू नये. अशा उपकरणांचा वापर हा त्याच्यावरील मापदंडानुसार व्हायला पाहिजे. उपकरणाच्या आजूबाजूने इतर वस्तू ठेवू नये. ते मोकळं असलं पाहिजे. जिथे हवा खेळती आहे, तिथेचं हे उपकरण लावावं. ज्यांना श्वसनाचे आजार आहेत, त्यांना या उपकरणाचा जास्त त्रास होऊ शकतो. अशा प्रकारचा माहिती देणारा मजकूर हा त्या उपकरणावर लिहिलेला असला पाहिजे. जर का वेळेवर उपचार मिळाला नाही तर कार्बन मोनोक्साईडच्या विषबाधेमुळे एखाद्याचा जीव सुध्दा जाऊ शकतो.