डायबेटीस म्हणजे आपल्या रक्तातील शुगर वाढणे. पण ही शुगर का वाढते त्याच्या मागची प्रक्रिया काय आहे? हे जर आपण लक्षात घेतलं तर डायबेटीसचे वेगवेगळे प्रकार पडतात. त्यातील महत्त्वाचा प्रकार म्हणजे ‘टाइप वन डायबेटीस.’
टाइप वन डायबेटीस नेहमी दिसणाऱ्या टाईप टू डायबेटीस पेक्षा वेगळा आहे. कॉमनली जो आजार दिसतो तो टाईप टू डायबेटीस आहे. तो वयाच्या ५० ते ६० नंतर दिसायचा. आजकाल तो तरुण वयामध्ये सुध्दा दिसतो. कधी कधी किशोरवयीन मुलांमध्ये सुध्दा दिसतो. पण टाईप टू डायबेटीस हा जीवनशैलीशी निगडीत आहे. त्याचा संबंध लठ्ठपणाशी आहे. जीवनशैली सुधारली आणि औषधे घेतली तर तो टाइप टू डायबेटीस नियंत्रणात येतो. पण टाइप वन डायबेटीस हा त्याच्या पेक्षा वेगळा आहे.

टाइप टू डायबेटीसमध्ये जो मुळ आजार आहे तो म्हणजे इन्शुलिनला प्रतिकार. आपल्या शरीरामधील इन्शुलिन हार्मोन्स ज्या पध्दतीने काम करतात त्याला प्रतिकार शरीरामध्ये तयार होतं आणि सुरुवातीच्या काळामध्ये इन्शुलिनची लेव्हल वाढलेली असते. त्यातून पुढे चालून टाईप टू डायबेटीस होत असतो. परंतु टाइप वन डायबेटीस हा वेगळा आहे, याच्यामध्ये इन्शुलिनची पातळी कमी होऊन गेलेली असते. इन्शुलिनची कमतरता शरीरामध्ये निर्माण होते, त्यामुळे वेगवेगळे प्रोब्लेम तयार होतात.

आपल्या शरीरामध्ये महत्त्वाचा अवयव असतो, तो म्हणजे स्वादुपिंड. स्वादुपिंडामध्ये बीटा पेशी नावाच्या पेशी असतात. काही जनूकीय दोष असतील किंवा प्रतिकार शक्तीत दोष असतील. तर त्याच्यामुळे आपली प्रतिकार शक्तीचं स्वादुपिंडावर हल्ला करते आणि बीटा पेशींना नष्ट करते. बीटा पेशी नष्ट झाल्यामुळे आपल्या शरीरात इन्शुलिन बनत नाही. आणि त्याची कमतरता तयार होते. इन्शुलिन हे शरीराची चयापचय क्रिया सुध्दा चालवत असते. आपल्या रक्तामधील ग्लुकोज किंवा शुगर हे आपल्या पेशींमध्ये नेण्यासाठी इन्शुलिन काम करत असतं. ही शुगर पेशींमध्ये पोहोचते. पेशी इंधन म्हणून त्याचा वापर करतात. जेव्हा इन्शुलिनची कमतरता भासते. त्यावेळी पेशींना ग्लुकोजचं इंधनचं सापडत नाही.
आपल्या शरीरामध्ये किटोन नावाचे रसायनं तयार व्हायला लागतात. जेव्हा आपलं शरीर चरबी जाळायला लागतं, तेव्हा किटोन्स तयार होतात. हे किटोन्स गरजेपेक्षा जास्त तयार झाले तर आपले शरीर त्यांना हाताळू शकत नाही. आणि रक्तांची आम्लता वाढायला लागते. रक्ताची आम्लता वाढली तर रक्त एसिड सारखे होतं. हे आपल्या शरीरासाठी खूपच हानिकारक होतं. म्हणजे अगदी आपला जीव सुध्दा जाऊ शकतो.

पण हे टाईप टू डायबेटीसमध्ये फार कमी वेळा घडतं. पण टाइप वन डायबेटीसमध्ये नेहमी घडत असतं. त्याच्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो. जीवनशैलीचा संबंध हा टाइप टू डायबेटीसमध्ये असतो. हा जनूकीय दोष असतो. याचा उपचार ही वेगळा असतो. टाईप टू डायबेटीस लहान मुलांमध्ये दिसतो. कधी कधी याचं निदान तरुण वयामध्ये सुध्दा होतं. यामध्ये पेशंटला खूप भूक लागणे, वजन कमी होणं. वारंवार तहान, सारखी लघवी होणे, तब्बेत खूप बिघडणे, मळमळ, उलट्या व पोटात दुखणे अशी लक्षणं दिसायला लागतात. इन्शुलिन देणे हा या आजाराचा उपचार आहे. इन्शुलिनचा प्रभाव झाला तर ही व्यक्ती सामान्य जीवन जगू शकतात.