नवीन व्यायाम सुरू केला की, दुसऱ्या दिवसांपासून स्नायू दुखायला लागतात. हा अनुभव सगळ्यांनी घेतला असेल. तर हे का घडत. आणि हे आपल्यासाठी काळजीचं आहे की सामान्य आहे? तसेच यासाठी काय करायला पाहिजे? या सगळ्या विषयी आपण माहिती घेणार आहोत.
व्यायामानंतरचं स्नायूचं दुखणं जे असतं, त्याला डिलेड ऑनसेट मसल्स सोरनेस (डॉम्स) असे म्हणतात. तसेच उशीरा सुरू झालेलं स्नायूचं दुखणं असे देखील म्हटले जाते. हे अतिशय सामान्य आहे. जेव्हा आपण नवीन प्रकारचा व्यायाम करतो, त्यावेळी आपल्या स्नायूंवर ताण येतो. याला सुक्ष्म स्वरुपामध्ये इजा होत असते. याला मायक्रो इंज्युरी असं म्हणतात. आपल्या स्नायूंना त्या व्यायामाची सवय नसते. म्हणून ही इंज्यूरी घडते.

इजा झाल्यानंतर आपले शरीर त्याला ठीक करतं. हे दुखणं साधारणतः व्यायाम केल्यानंतर १२ किंवा २४ तासानंतर सुरू होतं. कधी कधी ४८ ते ७२ तासापर्यंत जास्त दुखतं. आणि नंतर हे दुखणं हळूहळू कमी होत. मग एका आठवड्यानंतर दुखणं निघून जातं. ज्यांना अशा प्रकारचं दुखणं येत असेल तर समजाचं की आपला व्यायाम हा प्रभावी होत आहे.
आपल्या स्नायूला मोठी इजा झाली असेल तर त्याच्याकडे त्वरीत लक्ष देणे गरजेचे आहे. आराम करावा लागतो किंवा डॉक्टरांना दाखवावं लागतं. तर ही इंज्यूरी कशी ओळखायची. तीव्र स्वरुपाचं दुखणं असेल. व्यायाम करताना दुखायला सुरुवात झाली. ते दुखणं कमी होत नसेल. याशिवाय मोठ्या प्रमाणात सुज आली असेल किंवा लघवी गडद रंगाची होत असेल, तर मात्र आपण त्वरीत वैद्यकीय सल्ला घेण्याची आवश्यकता असते.

डोम्स हा एखाद्याला त्रासदायक असू शकतं पण हे एक लक्षण असतं की यातून आपले स्नायू मजबुत होत आहेत. तर हे टाळता येतं का? तर हो… काही अंशी ते टाळता येऊ शकतं. आपण जो व्यायाम सुरु करणार आहोत. तो जर का सौम्य प्रमाणात केला आणि हळूहळू वाढवत नेला तर स्नायूचे दुखणं काही अंशी टाळू शकतो. व्यायाम केल्यावर स्नायूंचा मसाज केला तर दुखणं टाळता येतं.
याच्याशिवाय काही पेन किलर घेतली तरीही दुखणं टाळता येतं. परंतु पेन किलर घेण्याची गरज भासत नाही. आणि पेन किलर घेऊ नये. कारण की, हा जो सोरनेस असतो तो आपोआप कमी होत असतो. स्ट्रेचिंग, थंडपाण्याने आंघोळ करणे, क्षार असलेले पाणी पिणे असे काही उपाय सुचवले जातात. परंतु याचा फारसा काही उपयोग दुखणं कमी करण्यासाठी होत नाही.

व्यायाम करताना वॉर्म अप करणे, स्ट्रेचिंग करणे आणि भरपूर पाणी पिणे. तसेच व्यायाम झाल्यानंतर स्नायूंना आराम देणे. याशिवाय आजारी असताना व्यायाम टाळणे. अशा काही गोष्टी आरोग्यासाठी चांगल्या असतात. आणि त्या पाळायला पाहिजे. दुखणं जरी कमी नाही झालं. तरी ह्या गोष्टी स्नायूंच्या आरोग्यासाठी चांगल्या असतात. व्यायाम करताना वेगवेगळ्या स्नायूंचा व्यायाम करणे उत्तम असते. त्यामुळे स्नायूंचे दुखणं कमी होतं.