Scroll to top

मृत्युच्या पलीकडे….


vinayakhingane - November 27, 2022 - 0 comments

वैद्यकीय शिक्षण घेताना एक महत्वाचा विषय आम्हाला शिकवण्यात येतो तो म्हणजे मृत्यूचे निदान . जेवढे महत्व आजारांच्या निदानाला आहे तेवढेच मृत्युच्या अचूक निदानाला आहे. जर जीवन शिकायचे असेल तर मृत्यू ही संकल्पना समजून घेणे फार महत्वाचे आहे. एखाद्या मृत व्यक्तीवर उपचार करत राहणे चुकीचे आहे व जिवंत व्यक्तीला मृत समजून उपचार नाकारणे सुद्धा ! व्यक्ती मृत्यू पावली आहे हे तर कोणीही सांगू शकेल असे वाटणे स्वाभाविक आहे. परंतु मृत्यूचेही अचूक शास्त्रीय निदान करावे लागते. हे निदान चुकल्यास किती मोठा प्रसंग उभा राहू शकतो याची अनेक उदाहरणे आहेत. सर्पदंश झाल्यावर ( नाग किंवा मण्यार) रुग्णाचे स्नायू लुळे पडतात. श्वास इतका मंदावतो की नातेवाईकांना वाटते की श्वास थांबला आहे. रुग्ण हालचाल न करता निपचित पडून असतो. रुग्ण मृत्यू पावला आहे असे वाटू लागते. पण तज्ञ डॉक्टर लगेच निदान करतात की रुग्ण अजून जिवंत आहे . उपचार केले जातात आणि काही दिवसांत रुग्ण हसू खेळू लागतो. अशी उदाहरणे नेहमी चर्चेचा विषय ठरतात. आजाराचे निदान चुकीचे होणे क्षम्य असू शकते पण मृत्यूचे निदान होताना चूक व्हायला नको! आजारांचा उपचार करताना सुद्धा आपण मृत्यू विरुद्ध लढतो आहोत ही भावना सतत येते. बहुतेकदा उपचारांचा प्रथम उद्देश मृत्यू टाळणे हाच असतो. आरोग्य आणि जीवन ह्या दोन्ही सकारात्मक चित्रांना मृत्यूची चौकट असते. वैद्यकीय शिक्षणात म्हणूनच मृत्यूला योग्य स्थान देण्याचा प्रयत्न नेहमीच केल्या जातो.

मृत्यू टाळणे हा वैद्यकीय उपचारांचा मोठा विजय समजल्या जातो. रुग्ण वाचवणे महत्वाचे असले तरी ते दरवेळी शक्य नसते. उपचारांची कक्षा फक्त मृत्यूशी झुंज एवढीच सीमित नाही. रुग्णाच्या वेदना कमी करणे हा उपचारांचा महत्वाचा उद्देश असतो. अतिदक्षता विभागातील क्लिष्ट उपचार जेवढे महत्वाचे आहेत तेवढेच पॅलीएटीव्ह केअर म्हणजेच मृत्युपूर्वी वेदनाशमन करणारे उपचार सुद्धा महत्वाचे असतात. जेव्हा मृत्यू अटळ असतो तेव्हा उपचारांची दिशा आजार बरा करण्याऐवजी रुग्णाचा त्रास कमी करण्याकडे वळविण्यात येते. रुग्णाला त्रासदायक ठरणाऱ्या नळ्या, सुया इत्यादी उपचार टाळले जातात. कृत्रिम श्वासोच्छवास व कृत्रिम जीवनप्रणाली वापरल्या जात नाहीत. मृत्यू अटळ असलेली व्यक्ती जवळच्या लोकांच्या सानिध्यात व वेदनारहित स्थितीत जावी अशी अपेक्षा खरेतर रास्त आहे. असे करण्याचा प्रयत्न पॅलीएटीव्ह केअर करत असते. अशा प्रकारच्या उपचारांसाठी वैद्यकीय शास्त्राची एक वेगळी शाखाच विकसित झाली आहे. ह्या शाखेविषयी व एकंदरीत मृत्युच्या वैद्यकीय पैलूंविषयी चर्चा फारशी घडत नाही. रुग्ण आजारी पडला की दवाखान्यात न्यावे व त्याचा जीविताचा धोका कमी होईपर्यंत त्याला दवाखान्यात ठेवावे असे नेहमी घडते. पण जर आजार असाध्य असेल तर काय? मृत्यू अटळ असेल तर काय? पेशंटला पूर्ण बरे करणे शक्य नाही हे माहित असताना कितपत उपचार करावेत? शेवटचे उपचार भर्ती न करता घरी करता येऊ शकतात का? पेशंटच्या इच्छांना कितपत महत्व द्यावे? असे अनेक अवघड प्रश्न अनुत्तरीत राहतात. मृत्यूविषयी मोकळेपणे चर्चा काही प्रसंगी आवश्यक असते. यातील काही मुद्यांवर आपण थोडेसे बोलूया.ई

डॉ शंतनू अभ्यंकर हे एक प्रसिद्ध डॉक्टर आणि लेखक आहेत. इतक्यात त्यांचा एक लेख व्हॉट्स ॲपवर फिरतो आहे. त्यांना ताप आला व तो बरा होईना. पुढे तपासण्या झाल्यावर कर्करोगाचे निदान झाले. ही धक्कादायक बाब व पुढील कठीण वाटचाल अगदी प्रामाणिकपणे त्यांनी लिहिली आहे. आजाराच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांची मानसिकता कशी झाली , काय अडचणी आल्या हे त्यांनी सांगितले. तर्कनिष्ठ व विवेकवादी विचार ठेऊन त्यांनी निर्णय घेतले. त्यांची ही बाब खरेच वाखाणण्यासारखी आहे. विवेकवादी विचारांमुळे त्यांना परिस्थितीचे खरे गांभीर्य कळले. त्यांनी गरजेपेक्षा जास्त गंभीर समजून गोंधळून गेले नाहीत किंवा गांभीर्य कमी लेखून बेसावध सुद्धा राहिले नाहीत. उपचार कुठल्या प्रकारे व कितपत प्रभावी ठरतील याचा शास्त्रीय आढावा घेतला. तसेच उपचाराचा आर्थिक आढावा सुद्धा त्यांनी घेतला. उपचारा बद्दल असा सर्वांगीण विचार होणे चांगले ठरते. उपचारांचे साईड इफेक्ट्स व आर्थिक ताण सहन करताना त्या उपचारमागील विचारप्रक्रिया माहीत असणे उपचार सुसह्य करते. ‘रुग्ण बरा होईल ‘ एवढीच परिकल्पना आजारांशी लढताना पुरेशी नसते.

हृदय /किडनी/लिव्हर /मेंदू इत्यादी महत्वाच्या अवयवांचे काही आजार बरे ने होणारे असतात. काही कॅन्सर सुद्धा घातक असतात. अजूनही कुठलेच प्रभावी उपचार नसलेले अनेक दुर्धर आजार आहेत. काही आजारांचे निदान हे मृत्युदंडाच्या सुनावणी सारखे असते. अशा धक्यातून सावरणेच रुग्ण व नातेवाईकांना कठीण असते. जर सावरले तरीही पुढे काय करावे ह्याबद्दल योग्य चर्चा होताना बरेचदा दिसत नाही. म्हातारपणात सुद्धा जीवनाचा अंत समोर असताना आजारपणाचा उपचार कसा असावा यात बरेचदा नातेवाईक व रुग्ण ह्यांचे एकमत नसते. नातेवाईकांना सगळे अत्याधुनिक उपचार करायचे असतात तर वृद्ध रुग्णाला शेवटचा काळ आपल्या घरात , जवळच्या व्यक्तींसोबत घालवायचा असतो. अशा वेळी काय योग्य आहे? हा प्रश्न पडतो.

अर्थातच वरील कुठ्ल्याली प्रश्नाचे उत्तर सोपे नाही. पण काही मुद्दे आपल्याला निर्णय घेण्यासाठी मदत करणारे असतात. आपल्या रुग्णाला गंभीर आजार असेल तर त्या आजाराचे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करावा. आपण आशावादी असण्यास मुळीच हरकत नाही पण वास्तव डोळसपणे बघण्याचा प्रयत्न करावा. तज्ञ डॉक्टरांना त्या आजाराचे स्वरूप किती गंभीर आहे असे वाटते हे समजून घेण्याचा प्रयत्न करावा. जीविताला धोका किती आहे? हा आजार मुळातून बरा होण्याची किती शक्यता आहे? मुळातून बरा होतो का नियंत्रणात ठेवता येतो? अशा आजाराचे रुग्ण किती काळ जगतात? साधारण किती खर्च लागेल? असे प्रश्न आपल्याला आजाराचे स्वरूप समजण्यासाठी महत्त्वाचे असतात. काही आजार जिवितासाठी धोकादायक असले तरीही पूर्णपणे बरे होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ न्युमोनिया. पण काही आजारांत जीवाला लागलेच धोका नसतो पण आजार चिवट/ किचकट व जुनाट असतात. रुग्ण किंवा नातेवाईक म्हणून निर्णय घेताना असे बारकावे महत्वाचे ठरतात. उपचारांचे सुद्धा असेच आहे. एखाद्या आजारावर कितपत प्रभावी उपचार उपलब्ध आहेत हे समजणे आवश्यक असते. उपचारांना मर्यादा साईड इफेक्ट्स असतात हेही ध्यानात ठेवावे लागते. उपचार महाग किंवा किचकट आहेत म्हणून प्रभावी असतीलच असे नाही. त्या विषयातील तज्ञ व विश्वासू डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गरज पडल्यास सेकंड ओपिनियन सुद्धा घेऊ शकतो. बऱ्याच आजारांमध्ये उपचारांचे एक मानक ठरवलेले असते. शिवाय वेगवेगळ्या परिस्थिती साठी मार्गदर्शक तत्वे असतात. त्यामुळे उपचारांमध्ये एकसंधता येण्यात मदत होते. त्यामुळे एक किंवा दोन तज्ञ डॉक्टर जर सारखे उपचार सुचवत असतील तर त्यापेक्षा खूप जास्त वेगळे उपचार बरेचदा उपयोगी ठरत नाहीत.

आजार व उपचारांचे स्वरूप समजल्यावर आपण जास्त चांगले निर्णय घेऊ शकतो. उपचाराचा अपेक्षित फायदा जर आपल्याला पुरेसा समाधानकारक वाटत नसेल तर आपण उपचार नाकारू सुद्धा शकतो. हो! उपचार नाकारण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला असते. उपचार नाकारण्याचे संभावित धोके जास्त असतील तर त्यानुसार आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. उपचारांचे दुष्परिणाम आपल्याला चालतील का ह्याचा आढावा आपण घेऊ शकतो. दुष्परिणामांना सामोरे जाण्याची मानसिक तयारी ठेऊ शकतो. ह्याने पुढील वाटचाल सोपी होते. माझ्या एका मित्राचे वडील अचानक आजारी पडले व त्यांना शरीरात पसरलेला कर्करोग आहे असे निदान झाले. उपचार करूनही फार फायदा होणार नाही व काकांकडे कमी वेळ उरलाय असे तज्ञांचे मत पडले. शिवाय उपचारांचे दुष्परिणाम बरेच होते. काकांच्या एकंदर तब्येतीला ते झेपतील की नाही अशी परिस्थिती होती. काका व संपूर्ण परिवाराने मग धाडसी निर्णय घेतला. काकांचा संपूर्ण उपचार त्यांच्या राहत्या घरी करण्यात आला. वेदनाशामक उपचार, त्यांना झेपतील अशी औषधी व त्रास कमी करणारे उपचार देण्यात आले. सगळे नातवाईक भेटून गेले. संपूर्ण परिवार व नातवंडे सभोवती असत. काकांचे शेवटचे दिवस सुसह्य करण्याचे सगळे प्रयत्न करण्यात आले. प्रत्येक रुग्णाला दवाखान्यातच न्यावे व प्रत्येक मृत्यू दवाखान्यातच व्हावा असे नाही. कधी कधी आजार असाध्य असतात. मृत्यू अटळ असतो. रुग्णाचे मत , त्याच्या इच्छा व सर्वांगीण विचार करून निर्णय झाला तर तो योग्य ठरतो.

उतारवयात उपचार करताना फक्त जीवन/ मृत्यू हाच विचार केल्या जात नाही. रुग्णाची एकंदर शारीरिक स्थिती कशी आहे, त्याला किती प्रकारचे व किती गंभीर आजार आहेत हे बघितल्या जाते. रुग्ण कितपत स्वावलंबी आहे आणि त्याच्या जीवनाचा दर्जा कसा आहे ह्याचा आढावा घेतल्या जातो. रुग्णाला उपचार झेपतील का? बरे झाल्यावर रुग्णाच्या जीवनाचा दर्जा कसा असेल? अशा प्रश्नांवर चर्चा अपेक्षित असते. कधी कधी सत्तरीतील रुग्ण अगदी जीर्ण झालेला, स्मृतिभ्रंशाने ग्रासलेला व अगदी दुखःद जीवन जगत असतो . त्याविरुद्ध एखादी रुग्ण नव्वदीतही स्वावलंबी आयुष्य जगते. या दोन्ही रुग्णांचा उपचार वेगळ्या पद्धतीने केल्या जातो. यात वयाचा विचार न करता सर्वांगीण विचार केल्या जावा. कुठल्याही सज्ञ व सक्षम व्यक्तीचा उपचार करताना ( ज्याला स्मृतिभ्रंश नाही किंवा गंभीर मानसिक आजार नाही ) त्या व्यक्तीची परवानगी घेऊनच केल्या जातो. शिवाय रुग्णाच्या इच्छांना प्राथमिकता असते. उतारवयातही ह्या गोष्टीना महत्व देण्यात यावे. उतारवयात रुग्णांच्या गरजा व प्राथमिकता वेगळ्या असतात. जबरदस्ती उपचार करण्याऐवजी त्यांना काय हवे काय नको याची चर्चा व्हावी. .

अतिदक्षता विभागात आम्ही आक्रमक उपचार करतो. हे उपचार अत्यावश्यक असतात. हे उपचार केले नाहीत तर मृत्यूचा धोका असतो. शिरा आणि धमन्यांमध्ये नळ्या टाकण्यात येतात. श्वसनमार्गात नळी टाकून व्हेन्तीलेतर लावण्यात येतो. हृदय बंद पडल्यास दाब देऊन ते पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. असे उपाय जिकीरीचे सुद्धा असतात. रुग्णांसाठी त्रासदायक असतात पण जर आजारातून बरे होण्याची शक्यता असेल तर असे उपाय अनिवार्य असतात. अनेकदा रुग्ण केवळ अशा उपचारांमुळे वाचतात. पण जेथे रुग्ण बरा होण्याची शक्यता फारच कमी असते किंवा जीव वाचूनही फारसा फायदा होत नाही अशा वेळी असे अतिदक्षतेचे उपाय टाळता येतात. उदाहणार्थ : एखाद्या रुग्णाचा कॅन्सर खूप पसरलेला असेल व अनेक अवयव खराब झाले असतील तर रुग्ण वाचूनही पुढील आयुष्यमान कमी व दुखःद असते. एखादा नव्वदीतील रुग्ण अगदी क्षीण झालेला व अंथरुणाला खिळलेला असेल तर तो वाचूनही पुढील आयुर्मर्यादा व जीवनाचा दर्जा कमी असतो. शिवाय वरील दोन्ही रुग्णांची अतिदक्षतेचे उपचार करूनही वाचण्याची शक्यता कमी असते. अशा वेळी जिकीरीचे उपाय टाळून वेदनाशामक उपचार देणे योग्य ठरते. असे अनेक रुग्ण किंवा नातेवाईक DNR म्हणजेच ” रुग्णाला सीपीआर देऊ नये” अशी लेखी मागणी करतात. याशिवाय प्रसंगी व्हेंटिलेटर लावू नये / जिकीरीचे उपाय करू नये / डायलिसीस सारखे उपाय टाळावे इत्यादी निर्णय सुद्धा घेता येतात. ह्यात रुग्णाची मानसिक स्थिती निर्णय घेण्यास योग्य आहे हे बघून निर्णयाची वैधता ठरवता येते. वैद्यकीय दृष्ट्या योग्य असल्यास रुग्णाच्या इच्छेला मान देऊन फक्त वेदनाशमन उपचार केले जातात. असे मार्ग माहित असल्यास बरेचदा रुग्ण व नातेवाईक ह्यांना निर्णय घेण्यास मदत होते.

आजकाल शस्त्रकलेचे शास्त्र एवढे प्रगत झाले आहे की प्रत्यारोपण म्हणजे ट्रान्सप्लांट सर्जरी शक्य झाली आहे. ह्यामुळे मृत्यू नंतर सुद्धा आपले अवयव इतर व्यक्तींना जीवनदान देऊ शकतात. ह्या शक्यतेमुळे मृत्युनंतरही व्यक्तीचे शरीर फक्त कलेवर न राहता एखाद्याचे तारणहार ठरू शकते. कधीकधी मेंदूचे अचानक झालेले आजार जसे मोठा स्ट्रोक, मेंदूत रक्तस्त्राव किंवा मेंदूला झालेली इजा हे घातक ठरतात. रुग्ण कृत्रिम जीवनप्रणाली वर असतो पण मेंदू मृत पावतो. ह्याला ब्रेनडेड असे सुद्धा म्हणतात. कृत्रीम प्रणाली बंद केल्यावर व्यक्ती पूर्ण मृत होणार असतो. ह्या परिस्थितीचे निदान डॉक्टरांची तज्ञ समिती करते. अशा परिस्थितीत जर अवयव काढले तर ते प्रत्यारोपण म्हणजे ट्रान्सप्लांट साठी वापरता येतात. अशा वेळी नातेवाईकांची परवानगी घेतात. नातेवाईकांसाठी हा एक कठीण प्रसंग असतो. आपल्या रुग्णाच्या मृत्युच्या धक्क्यातून सावरत नाही तोच असा प्रश्न पुढे येतो. पण इथे वेळेला महत्व असते. आपला रुग्ण जरी गेला असला तरी तो जाताना इतर अनेक व्यक्तींना जीवन देऊन जाणार आहे या उदात्त भावनेने अनेक नातेवाईक स्वतःला सावरून परवानगी देतात. अनेक लोक तर अवयवदानासाठी अर्ज करून ठेवतात . अवयवदानाविषयी जागरूकता हळूहळू वाढते आहे. एका व्यक्तीच्या देहातून जवळपास आठ व्यक्तींना जीवनदान मिळू शकते. एका रुग्णाला हृदय, दोन रुग्णांना किडनी, दोन रुग्णांना फुफ्फुस, दोन रुग्णांना लिव्हर तर एकाला स्वादुपिंड प्रत्यारोपित करता येते . याशिवाय इतर प्रत्यारोपण क्रियांसाठी संशोधन सुरु असते. वैद्यकीय संशोधन तसेच वैद्यकीय शिक्षणासाठी सुद्धा देहदान करता येते. आपण जातानाही या जगाला काहीतरी देऊन जावे या भावनेने अवयवदान व देहदान ही एक चळवळ बनली आहे .

काळाच्या सोबत वैद्यकीय क्षेत्र सुद्धा बदलत आहे.पूर्वी बहुतेक वृद्ध शेवटचा निरोप स्वतःच्या घरातच घेत असत. शहरी विभागात आजकाल बरेचशे वृद्ध शेवटचा काळ रुग्णालयात असतात. ह्यामागे रुग्णाला चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात ही गरज व घरी मनुष्यबळाची कमतरता ही अडचण सुद्धा आहे. अशा वेळी जेष्ठांना त्यांच्या प्राथमिकतेनुसार उपचार, वेदनाशमन व शुश्रुषा ह्यांची गरज वाढली आहे. पॅलीएटीव्ह केअर व जेरीऍट्रीक मेडिसिन ह्यासारख्या वैद्यकीय शाखा ह्यासाठीच विकसित होत आहेत. समाजातही अशा उपचारांविषयी जागरूकता वाढायला हवी असे मला वाटते. ह्या लेखातून काही मुद्द्यांना स्पर्श केला आहे. तुमच्या काही शंका , प्रश्न किंवा सूचना असतील तर नक्की कळवा.

डॉ विनायक हिंगणे

Contact Us
close slider

    ×

    Hello!

    Click one of our representatives below to chat on WhatsApp or send us an email to vinayakhingane@gmail.com

    ×
    %d bloggers like this: