Scroll to top

Allopathy चे गुणदोष


vinayakhingane - June 19, 2023 - 0 comments

डॉ विनायक हिंगणे

आधुनिक वैद्यकशास्त्र ह्या संकल्पना फार मोठी आहे. यात अनेक वेगवेगळे पैलू येतात. बघायला गेले तर यात विज्ञान, कला , वाणिज्य आणि समाजकारण हे सगळं अंतर्भूत आहे. नवीन उपचारांचे विज्ञान , रसायने, औषधी असे अनेक विज्ञानाचे भाग आहेत.रुग्णांशी बोलण्याची कला, संभाषण कौशल्य, निदान करण्याची कला, शस्त्रक्रियेचे कौशल्य असे अनेक कला-कौशल्याच्या क्षेत्रात मोडणारे पैलू आहेत. आर्थिक बाबिंशिवाय आरोग्याविषयी कुठलीच चर्चा होऊ शकत नाही. त्यात आरोग्याची मोठी धुरा आधुनिक वैद्यशास्त्राच्या(allopathy) खांद्यावर असल्याने वाणिज्य हा मोठा गहन विषय ठरतो. परिणामी समाजकारण व राजकारण हेही आलेच. आधुनिक वैद्यशास्त्राच्या अशा एकेका पैलूवर अभ्यासपूर्ण बोलायला खूप वाव आहे. पण आजकाल अभ्यासपूर्ण बोलण्याची फॅशन मागे पडली आहे असे वाटते. आजकाल शिंतोडे उडवून वादंग करायचा आणि प्रसिद्धी मिळवायची अशी रीत पडली आहे. Allopathy म्हणून औषधांचे साईड इफेक्ट्स किती वाईट, allopathy कशी वाईट आणि Allopathy चे डॉक्टर किती भ्रष्ट असे बोलायला लागले, की लोक ऐकतात म्हणून असे बोलणाऱ्यांना लगेच व्यासपीठ मिळते. असे आवाज चढवून बोलले तर बरेचदा खोटेनाटे सुद्धा चालून जाते . असे व्यासपीठ आधी सोशल मीडियावर मिळायचे ते आता वृत्तपत्र आणि टिव्हीवर सुद्धा मिळते. कुणाच्याही भाषास्वातंत्र्यावर मला हल्ला करायचा नाही. कुणी कुठेही काहीही बोलावे. पण अशा व्यक्तींना व्यासपीठ देताना समाजमनावर त्याचा काय परिणाम होईल ह्याचे भान मिडीयाला नसावे ह्याची खंत वाटते.

आधुनिक विज्ञान असो का आधुनिक वैद्यकशास्त्र असो, यांच्यावर टीकेची झोड नेहमीच उठत आली आहे. ह्या टीकेने विज्ञान कधीच कमकुवत झाले नाही उलट ते तावून सुलाखून निघत गेले. अगदी धादांत खोट्या आरोपांचा सुद्धा परिणाम विज्ञानावर होत नाही. ह्याचा खरा फटका बसतो तो रुग्णांना! सगळेच रुग्ण शिकलेले किंवा विज्ञानाचे जाणकार नसतात. बरेचदा खोलात जाऊन चौकशी करणे त्यांना शक्य नसते. त्यामुळे औषधी व उपचारांवरिल खोट्यानाट्या आरोपांमुळे रुग्ण भांबावून जातात. महत्वाचे उपचार टाळतात. अशा अपप्रचाराला बळी पडून जीवनावश्यक औषधी बंद करणारे रुग्ण मी बघितले आहेत. अशा बळी पडणाऱ्या रुग्ण व नातेवाईकांसाठी खरे तर आजचा लेख आहे. हा लेख लिहिण्यामागे दुसरे कारण असे आहे की आधुनिक औषध शास्त्रावर विश्वास ठेऊन असलेले कोट्यवधी रुग्ण आहेत. अपप्रचाराचा मारा यांच्यावर सतत सुरू असतो. त्यांना एक आश्वासक दिलासा देण्याची ही एक संधी मला वाटते. शिवाय डॉक्टर म्हणून आरोग्यविषयक जनजागृती करण्याचा प्रयत्न करणे हे माझे एक काम आहे असे मी समजतो.

आधुनिक वैद्यक शास्त्राची तारीफ करणे किंवा allopathy इतरांपेक्षा किती श्रेष्ठ हे सांगणे हे मला मुळातच करायचे नाही. किंवा allopathy चे डॉक्टर मुळीच भ्रष्ट नाहीत असे सुद्धा मला म्हणायचे नाही. माझे दोन हेतू या लेखात आहेत. पहिला म्हणजे आधुनिक वैद्यकशास्त्रा बद्दल जो अपप्रचार होतो त्यातील काही मुद्यांना मला उत्तर द्यायचे आहे. जेणेकरून रुग्ण व नातेवाईकांना निर्णय घेताना मदत होईल. माझा दुसरा हेतू हा आहे की डॉक्टरांवर जी एकांगी टीका होते त्याविषयी माझे मत मांडणे. हे दोन्ही हेतू हाताळत असताना मी भावनिक न होता शास्त्रीय दृष्टिकोनातून लिहिण्याचा प्रयत्न करीन.

आधुनिक वैद्यकशास्त्राबद्दल टीका होते व अपप्रचार सुद्धा. टीका ठराविक एका मुद्द्याबद्दल असते. ती मोजूनमापून केलेली असते व टीकेला संदर्भ असतो. टीका बरेचदा अभ्यासपर्वक केलेली असते. अशी टीका खरेतर स्वागतार्ह आहे. अपप्रचार हा मोजका नसतो. त्यात संदिग्धपने व कुठलेही संदर्भ न देता आरोप केले जातात. आधुनिक वैद्कशास्त्राबद्दल जो अपप्रचार होतो त्याबद्दल अनेक कारणे आहेत. यातील मला दोन महत्वाची वाटतात. एक म्हणजे आर्थिक स्पर्धा. एखाद्या उपचाराविषयी जाणीवपूर्वक अपप्रचार करून बदनाम करायचे किंवा रुग्णांना घाबरवून टाकायचे व आपला माल विकायचा. हा अपप्रचार हेतुपूर्वक असतो. दुसरे कारण म्हणजे अज्ञान किंवा भीती. ह्यातून होणारा अपप्रचार हा बरेचदा भावनिक असतो. पुढील काही मुद्दे मला अपप्रचाराचे वाटतात. त्याबद्दल थोडक्यात:

आधुनिक औषधी रासायनिक असतात: हा जाणून समजून केलेला अपप्रचार आहे. अर्थात हे खरे आहे की औषधी ह्या रासायनिक आहेत. पण रासायनिक काय नाही? आपले शरीर सुद्धा रासायनिक आहे. आम्ल, अल्कली, क्षार, धातू, कार्बन , प्रथिने इत्यादींपासून ते मेंदूतील केमिकल लोच्या पर्यंत सगळे रासायनिक आहे. रासायनिक म्हणजे धोकादायक असे अस्पष्ट पणे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला जातो. पण हे खरे नाही. आधुनिक वैद्यकशास्त्र हे कुठलीही औषधी पुरेशी सुरक्षित असल्याशिवाय त्याला मान्यता देत नाहीत. पुरेशी सुरक्षित याकरिता म्हटले कारण ती योग्य तज्ञांच्या हाती सुरक्षित असतात. बेसावधपणे कुठलेही औषध (कुठल्याही pathy चे) सुरक्षित नसते. उदाहरण म्हणून आपण एरंडाचे बी किंवा धोत्रा लहान बाळाला खाऊ देऊ का? अगदी जेवणातली मिरची तरी बाळाला देऊ का? नक्कीच नाही. योग्य व्यक्तीच्या हाती मिरची अन्न असते पण अयोग्य व्यक्तीच्या हाती धोकादायक. तसेच आधुनिक औषधीचे आहे. योग्य व्यक्तींच्या हाती आधुनिक औषधी पुरेशी सुरक्षित आहे. या औषधांची नियमितपणे तपासणी होत असते व त्यात भेसळ, घातक रसायने नाहीत ना हे सुद्धा तपासल्या जाते. याशिवाय आपले अन्न व इतर pathy ची औषधे ही सुद्धा रासायनिक प्रक्रियेने बनवल्या जातात. सगळ्याच रासायनिक प्रक्रिया काही धोकादायक नसतात. त्यामुळे आधुनिक औषधी सरसकट धोकादायक आहे हे म्हणणे चुकीचे आहे. अनेक आधुनिक औषधी ( allopathy) अनेक वर्षे रोज खाण्यास सुरक्षित असल्याचे दिसते. पण हा औषधोपचार तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्हावा.

Allopathy ही अनैसर्गिक आहे: Allopathy असेल अनैसर्गिक पण त्यामुळे ती चुकीची ठरत नाही.आजचा समाजच अनैसर्गिक आहे व समाज अनैसर्गिक असण्यात काही चूक नाही. आपण निसर्गाचा मान राखावा व निसर्ग टिकविण्याचा प्रयत्न करावा. पण आजच्या गाव खेड्या पासून शहरापर्यंत सगळे काही अनैसर्गिक आहे हे जाणून घ्यावे. आम्हाला वाहने कृत्रिम, रस्ते कृत्रिम, फोन कृत्रिम , खाद्य कृत्रिम सगळे काही कृत्रिम असूनही ते आपल्याला हवे आहे. मग औषधी कृत्रिम म्हणून नावे ठेवणे ही केवळ दांभिकता आहे. आपल्या देशाचे सरासरी आयुष्मान ५० च्या दशकात चाळीशीतच होते. ८० च्या दशकात पन्नाशीत व आजकाल ते सत्तरीत गेले आहे. आधुनिक औषधशास्त्र आणि तंत्रज्ञानाची प्रगती ह्यानेच ते शक्य झाले. एस रामानुजन खूप कमी वयात वारले ह्याची आपल्याला खंत वाटते. ते आजच्या काळात असते तर निश्चित वाचू शकले असते. जंतुसंसर्गाने मृत्यूशय्येवर पडलेल अनेक रुग्ण आज वाचतात. शिवाय आधुनिक वैद्यकशास्त्रात वेदनाशमन खूप चांगले करता येते. इतरांचे दुखणे कमी करणे हा माणुसकीचा गाभा आहे. आधुनिक औषधी माणुसकीला पूरकच आहे. आपण आज गेल्या शतकापेक्षा जास्त व सुखकर आयुष्य आधुनिक औषधांमुळे जगतो पण त्याच औषधांना उगाच नावे ठेवत बसतो. तुम्ही डॉक्टर लोक रुग्णांना जगवून त्यांना म्हातारपण सोसायला लावता हे बोलायला खूप छान वाटते. पण एखादा नातेवाईक जेव्हा रुग्णाला वाचवण्याची कळवळून विनंती करतो तेव्हा तुम्ही डॉक्टर असाल तर काय करणार ह्याचा एकदा विचार करून बघावा एवढेच मी म्हणेल.

आधुनिक वैद्कशास्त्राची विचारसरणी आपल्या संस्कृती पेक्षा वेगळी आहे: आधुनिक वैद्यक शास्त्र हे एक विज्ञान आहे. त्यातील औषधी, उपचार व शस्त्रक्रिया यांचे विज्ञान सार्वत्रिक असते. भारतीयांचे वेगळे व पाश्चात्य देशांचे वेगळे विज्ञान असे काही नसते. गुरुत्वाकर्षणाचे नियम भारतात व विदेशात सारखेच असतात. आरोग्याच्या विज्ञानाला धर्म, देश, विचारसरणी यांच्या सीमा नसतात. देशागणिक फरक पडतो तो विज्ञानाच्या उपयोगात. भारतातील “प्रॅक्टिस” व विदेशातील “प्रॅक्टिस” ह्यात फरक असतो. आपल्या देशातील सेवांची उपलब्धता, आर्थिक सुबत्ता व सामाजिक घटक ह्यानुसार अनेक फरक भारतीय प्रॅक्टिस मधे दिसतात. ह्यात आपल्या संस्कृतीचा समावेश सकारात्मक पद्धतीने केलेला मला दिसतो. रुग्णांच्या धार्मिक व वैयक्तिक आवडी निवडींवर आधुनिक वैद्यक शास्त्र कधीच बंधन घालत नाही. कुठलीही बळजबरी ही तर आधुनिक वैद्यक शास्त्राच्या नैतिकतेच्या विरुद्ध आहे. त्यामुळेच प्रत्येक उपचाराची माहिती देऊन रुग्णांची संमती घेऊन उपचार केले जातात. खासगी क्षेत्रात तर लोकांची सोय ही प्रामुख्याने बघितली जाते. डॉक्टरांची वाढती संख्या व त्यातील स्पर्धेचा फायदा रुग्णांना होतोय. आता परिस्थिती अशी झाली आहे की शस्त्रक्रिया किंवा सिझर सुद्धा मुहूर्त बघून त्या वेळेवर करावी अशी विनंती डॉक्टरांना केली जाते आणि बरेचदा अशी विनंती मान्यही केल्या जाते. संस्कृती समाज घडवत आणि बदलत असतो. त्यात वैद्यकीय संस्कृती सुद्धा आलीच. पण भारतीय वैद्यकीय संस्कृती ही समाजाला समांतर अशीच विकसित झाली आहे. जो काही संघर्ष आपल्याला दिसतो तो मुळात अज्ञान आणि जागरूकता ह्यातील संघर्ष आहे. पण हा संघर्ष आपल्या संस्कृतीचाच भाग सुद्धा म्हणावा लागेल. अनेक समाज सुधारकांच्या संघर्षाने आपली संस्कृती समृद्धच झाली आहे.

आधुनिक औषधांनी किडन्या खराब होतात: हा सगळ्यात मोठा गैरसमज पसरवण्यात आला आहे. अनेक रुग्ण अशा अफवांना बळी पडून औषधी बंद करतात व तब्येत खराब करून घेतात. आधुनिक औषधीमधील काही किडनी साठी त्रासदायक आहेत. पण अनेक औषधी सुरक्षित आहेत. रुग्णांना कुठलेही औषध देताना त्याचा धोका कितपत होईल व फायदा कितपत आहे हे बघूनच औषध दिल्या जाते. शिवाय ज्या औषधांनी किडनी ला त्रास होण्याची शक्यता असेल व ते औषध देणे अनिवार्य असेल तर नियमितपणे किडनीचे काम तपासल्या जाते.आवश्यक ती काळजी घेतल्या जाते. आजही भारतात औषधांमुळे किडनी खराब होण्याचे प्रमाण कमी आहे. किडनी खराब होण्याची सगळ्यात महत्वाची दोन कारणे म्हणजे डायबेटिस व उच्च रक्तदाब. हे दोन आजार अनियंत्रित असतील तर किडनी चा धोका खूप वाढतो. म्हणजे औषधे न घेऊन हे आजार अनियंत्रित होत असतील तर किडनीची धोका वाढतो.औषधे खरेतर किडनी वाचवतात असे म्हणावे लागेल. पण एखाद्या औषधाचा संभाव्य धोका सगळ्या औषधांना लावून त्यांना बदनाम केल्याने रुग्ण घाबरतात व काही व्यावसायिकांना त्यांचा माल विकता येतो. अशा अपप्रचाराला बळी पडू नये.

आधुनिक वैद्यकशास्त्र हे जीवनशैली सुधारणेला महत्व देत नाही: हा आरोप अगदीच बिनबुडाचा म्हणायला हवा. आधुनिक वैद्यकशास्त्र जीवनशैलीला अनन्यसाधारण महत्व देते. आहार, व्यायाम, झोप, ताण तणाव, शारीरिक व मानसिक आरोग्य ह्या सगळ्या विषयात मोठे व महत्त्वाचे अभ्यास सद्या आधुनिक वैद्यशास्त्रात घडत आहेत. खरे तर जीवनशैली व आहाराबद्दल आज उपलब्ध माहितीचा मुख्य स्त्रोत आधुनिक वैद्यकशास्त्र आहे. व्यायाम, आहारातील घटक,झोप, शरीरावरील व आतील उपयुक्त जिवाणू या बद्दल अमुलाग्र संशोधन सुरू आहे. या सगळ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते ते केवळ दोषारोपण करण्यासाठी. प्रतिबंधात्मक आणि सामाजिक वैद्यक शाखा ही Allopathy ची एक स्वतंत्र शाखा विकसित झाली आहे. जीवनशैलीचे आजार व संसर्गजन्य आजार दोन्हींचा प्रतिबंध करण्यासाठी उपाय व संशोधन ह्या शाखेत निरंतर सुरू आहे.

आधुनिक विज्ञान व आधुनिक वैद्यकशास्त्र हे ज्ञान आहे. निरीक्षण, तर्क, प्रयोग व पडताळणीच्या भट्टीत त्याला नेहमीच अग्नीपरिक्षा द्यावी लागते. हे ज्ञान वापरून विविध समाजातील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी आपापल्या विवेकाला साजेसे काम करतात. आधुनिक वैद्यकशास्त्र तात्विक दृष्ट्या विज्ञाननिष्ठ व माणुसकी जपणारे आहे. इथे रुग्णाचे वेदना निवारण करण्याला प्राधान्य आहे. निदान व उपचार करताना सर्वांगीण दृष्टिकोन ठेवण्यास प्रोत्साहन दिल्या जाते. जात पात, धर्म, आर्थिक – सामाजिक परिस्थिती ह्यांना टाळून रुग्णाकडे एक माणूस म्हणून बघण्यास शिकवण्यात येते. नातदृष्ट लोक सगळ्याच क्षेत्रात असतात पण म्हणून आपण प्रत्येक पेशाला नवे ठेवत नाही. आधुनिक वैद्यक शास्त्राच्या डॉक्टरांवर त्यांनी काही चूक केल्यास कठोर टीका व्हावी. पण ॲप्रचाराचा ससेमिरा काही नेफेखोर मंडळींनी सुरू केला आहे तो नक्कीच चुकीचा आहे. आपल्या समाजात आरोग्य विषयक जागृती कमी असल्याने अशा अपप्रचाराचा फटका रुग्णांना जास्त बसणार आहे!

डॉ विनायक हिंगणे

Contact Us
close slider

    ×

    Hello!

    Click one of our representatives below to chat on WhatsApp or send us an email to vinayakhingane@gmail.com

    ×
    %d bloggers like this: