घोरण्याचा आजार

काही लोकांना बसल्या बसल्या डुलकी लागते. काहींना दिवसा झोप आवरता आवरत नाही. टीव्ही समोर मालिका बघताना चक्क घोरायला लागतात. काही तर अगदी जेवणाच्या ताटावर झोपी जातात. यापैकी बऱ्याच लोकांची रात्रीची झोप अपुरी असते. यापैकी काही लोकांना घोरण्याचा त्रास असतो. रात्री घोरण्याचा त्रास व दिवसा खूप झोप येते असे दोन्ही घटक असतील तर त्याला इंग्रजी मध्ये Obstructive sleep apnea (ऑबष्ट्रक्टीव स्लीप ऍप्नीया) असे म्हणतात. यालाच आपण घोरण्याचा आजार म्हणू शकतो.

नेमके काय होते?

घोरण्याचा या आजारात आपला श्वसन मार्ग आपण झोपी गेलो असताना अरुंद होतो. आपण झोपी गेलो की वरच्या श्वसन मार्गातले स्नायू शिथिल पडतात व जीभ सुद्धा शिथिल पडते. यामुळे झोपेमध्ये श्वास घेताना थोडा अडसर येतो. त्यातूनच घोरणे सुरू होते. काही लोकांमध्ये हा अडसर खूप जास्त असतो. काही काळासाठी श्वसन थांबते व झोप मोडते. हे रुग्णाच्या नकळत होते. परत झोप लागते व घोरणे सुरू होते. हे रात्रभर वारंवार होते. ह्यामुळे झोपेचा दर्जा खूपच खालावतो. रात्रीची झोप पुरेशी होत नाही व दिवसभर थकवा येतो. दिवसा झोप येते. काही लोकांची शारीरिक रचना व आनुवंशिकता अशी असते की त्यांना ह्या आजाराचा धोका असतो. लठ्ठपणा मुळे सुद्धा ह्या आजाराचा धोका वाढतो.

ह्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो?

झोपेचा दर्जा खराब झाल्याने आरोग्यावर बरेच वाईट परिणाम होतात. ह्या आजाराचा लठ्ठपणा, टाईप2 डायबेटिस व उच्चरक्तदाब ह्यांच्याशी जवळचा संबंध आहे. शिवाय हृदयरोगाचा धोका वाढतो.

निदान कसे होते?

ह्याचा निदानासाठी “स्लीप स्टडी” नावाची तपासणी केल्या जाते. रात्री पेशंट झोपलेला असताना त्याचा श्वासोच्छ्वास, ऑक्सिजन चे प्रमाण , झोप इत्यादींचा अभ्यास केला जातो. ही चाचणी रात्रभर चालते. थोड्या काळासाठी श्वास कमी झाल्यास किंवा बंद पडल्यास या तपासणीत दिसून येतो.

उपचार:

ह्या आजाराचा उपचार करायला CPAP नावाचे यंत्र वापरतात. एक मास्क नाकावर किंवा चेहऱ्यावर लावून त्यात थोड्या दाबाने (प्रेशर ने) हवा श्वसन मार्गात सोडल्या जाते. ह्या दाबामुळे श्वसनमार्ग मोकळा राहतो. यामुळे झोप सुधारते v आरोग्य सुद्धा सुधारते. याशिवाय जीवनशैलीत बदल करून वजन कमी केल्यास सुद्धा खूप फायदा होतो. जीभेचा आकार कमी होणे व श्वसन मार्ग मोकळा होण्यास ह्याने मदत होते.

जीवनशैलीत बदल केल्याने व वजन कमी केल्याने हा आजार सधरतो असे दिसले आहे. काही लोकांमध्ये वजन पुरेसे कमी केले तर हा आजार बरा होतो असे सुद्धा दिसले आहे.

अधिक माहिती आणि पेशंटचे अनुभव ऐकण्यासाठी हा एक छोटा व्हिडिओ बघा. कृपया लिंकवर क्लिक करा:

डॉ विनायक हिंगणे

गव्हाची शहानिशा

IMG_20170716_175230_108

सध्या सोशल मीडियावर “गहू खूपच वाईट “अशी एक पोस्ट व्हायरल झाली आहे. काही मित्रांनी आणि नातेवाईकांनी हे कितपत खरं आहे हे विचारलं. त्याचं सविस्तर उत्तर आज लिहितो आहे.

मुळात ही पोस्ट विल्यम डेव्हिस ह्यांच्या “व्हिट बेली” ह्या वादग्रस्त पुस्तकावर आधारित आहे. ह्या पोस्ट मध्ये सर्वसाधारण जनतेच्या आरोग्यासाठी गहू किती हानिकारक आहे असं ठसविण्याचा प्रयत्न केला आहे. जीवनशैलीशी निगडित आजार जसे डायबेटीस, बीपी, हृदयरोग इत्यादी सगळे फक्त गव्हामुळे होतात आणि फक्त गहू खाणे बंद केले तर आपण हे आजार बरे करू शकतो असा ह्या पोस्ट चा सारांश आहे. मी “व्हिट बेली” हे पुस्तक तर वाचलेले नाही पण इंटरनेट वर थोडे तपासून बघितले तर हे पुस्तक वादग्रस्त आहे हे लगेच कळले. पुस्तकातील माहिती, दृष्टिकोन, आणि दावे ह्या सगळ्यांवर आक्षेप घेतला गेला आहे. पुस्तकातील विधानांना वैज्ञानिक पाठबळ नाही आणि काही विधानं ही परस्परविरोधी आहेत असेही आक्षेप आहेत. तेव्हा हे पुस्तक वाचताना आणि त्यातील सल्ले घेताना आपण अतिशय सतर्क असायला हवं. मी हे पुस्तक वाचलेले नसल्यामुळे त्याविषयी न बोलता आपण पोस्ट मधील मुद्द्यांकडे वळू.

गहू हे एक महत्वाचे तृणधान्य आहे. गव्हामधून आपल्याला कर्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट मिळतात. कार्बोहायड्रेट हा आपल्या आहारातील महत्वाचा घटक आहे. त्याशिवाय गव्हामध्ये ग्लूटेन नावाचे प्रथिन असते. (ह्या पोस्ट मध्ये ज्याचा उल्लेख आहे ते अमायलोपेकटीन हे सुद्धा कार्बोहायड्रेट आहे आणि ग्लायडीन हा ग्लूटेन प्रथिनांचाच एक भाग आहे) गव्हाला इतर तृणधान्यापासून वेगळे करते ते मुख्यत्वे ग्लूटेन हे प्रथिन किंवा प्रोटीन. गव्हाशिवाय राय, बार्ली आणि ओट्स ह्यामध्ये सुद्धा ग्लूटेन सापडते. ह्याशिवाय काही कार्बोहायड्रेट आणि इतर प्रोटीन्स हे इतर तृणधाण्यापेक्षा वेगळे असतात. साधारण निरोगी जनतेला आहारामध्ये तृणधान्याची गरज मुख्यत्वे उर्जे साठी आणि परिणामी कार्बोहायड्रेट साठी पडते. त्याशिवाय काही प्रमाणात प्रोटिन्स आणि इतर आहारतत्वे सुद्धा मिळतात. ही गरज मोठ्या लोकसंखेमध्ये गहू पुरवतो. असा उपयुक्त असलेला गहू धोकादायक सुद्धा असू शकतो का?

सिलियाक डिसीज नावाचा एक प्रतिकारशक्तीचा आजार आहे.( ह्यात आपली प्रतिकारशक्ती यंत्रणा आपल्याच शरीराच्या विरुद्ध लढते आणि त्रास होतो.) ह्या आजाराने त्रस्त व्यक्तीने ग्लूटेन प्रोटीन असेलेले अन्न खाल्ल्यास त्याला पोटात दुखणे, मळमळ उलटी होणे, जाउलब होणे किंवा बद्धकोष्ठता होणे अशी लक्षणे दिसू शकतात. खूप काळ हे सुरू राहिल्यास आतड्याला जास्त इजा होते आणि जीवनसत्वाची कमतरता व कुपोषण सुद्धा होते. ह्या पेशंटच्या रक्तात विशिष्ट अँटीबॉडी असतात. त्यावरून ह्या आजाराचे निदान होऊ शकते. काही लोकांना ग्लूटेन मुळे अशाच प्रकारचा पण थोडा सौम्य त्रास होतो. पण त्यांच्या रक्तात ठराविक अँटीबॉडी नसतात. ह्यांना नॉन सिलियाक ग्लूटेन सेनसिटीव्हीटी म्हणतात. ह्या दोन्ही ग्लूटेन संबंधित आजारांचे पक्के निदान तज्ञ डॉक्टरांकडून होणे आवश्यक असते. अशा पेशंटना ग्लूटेन विरहित आहार घ्यायला सांगितला जातो. युके मध्ये शंभरामध्ये एका व्यक्तीला असा त्रास असतो. आपल्याकडे हा त्रास कमी लोकांमध्ये दिसतो. फक्त ह्या प्रकारच्या पेशंटना ग्लूटेन किंवा गहू हानिकारक आहे. काही प्रतिकारशक्तीच्या आजारांमध्ये ग्लूटेन विरहित आहाराचा फायदा होतो असेही शोधनिबंध आहेत. पण आजकाल ग्लूटेन विरहित आहार सगळ्यांसाठी चांगला असा गैरसमज पसरत चालला आहे. पाश्चात्य देशांमध्ये बरेच सेलिब्रिटी ग्लूटेन फ्री आहाराची जाहिरात करतात. ग्लूटेन फ्री आहार वजन कमी करायला मदत करतो हे लोकांच्या मनावर ठसवलं जातंय. पण हे चुकीचं आहे. ग्लूटेन फ्री आहाराने वजन कमी होत नाही हे वेगवेगळ्या संशोधनात सिद्ध झालंय. वजन कमी होणे तर सोडाच पण निरोगी व्यक्तींमध्ये ग्लूटेन विरहित आहाराचा कुठलाही विशिष्ट फायदा झाल्याचा सबळ शास्त्रिय पुरावा नाही.

राहिला प्रश्न कार्बोहायड्रेटचा. गव्हाव्यतिरिक्त आपण कुठलेही तृणधान्य खाल्ले तरी कार्बोहायड्रेट चा परिणाम सारखाच होणार. कार्बोहायड्रेट हे सरसकट वाईट हे म्हणणे खूप चुकीचे आहे. कार्बोहायड्रेट किंवा तृणधान्ये खाल्याने जर आरोग्याला अपाय होत असेल तर तो अतिप्रमाणात खाल्याने. निरोगी व्यक्तीला त्याचा आहार संतुलित राहील एवढे कार्बोहायड्रेट रोज खाणे आवश्यक असते. आपण तृणधान्ये, पीठ आणि साखर ह्यांचा अतिवापर करून आपल्या आहारातील संतुलन गमावून बसतो. मग लठ्ठपणा आणि त्याच्यासोबत येणारे इतर आजार आपल्या मागे लागतात. त्यामुळे कार्बोहायड्रेट वर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

आपल्याला गहू किंवा तांदूळ बंद केल्यावर वजन कमी झालं असा अनुभव असलेले लोक भेटतात. त्यांचं वजन कमी झाल्याचे कारण गहू किंवा तांदूळ बंद होणे हे नसून आहारातील कॅलरी कमी होणे हे असते. वजन कमी करण्यासाठी कार्बोहायड्रेट बंद केले किंवा फॅट (स्निग्ध पदार्थ ) बंद केले किंवा जास्त प्रोटिन्स असलेला आहार घेतला तर कुठला सर्वोत्तम? वेगवेगळ्या अभ्यासामध्ये हे दिसून आलं आहे की लांब टप्प्यामध्ये ह्यातील कुठलाही उपाय दुसऱ्या उपायापेक्षा सरस नाही. वजन कमी करण्यासाठी रोजच्या आहारातील साधारण 500 कॅलरी कमी करणे आवश्यक आहे. ते साधलं तर वजन कमी होऊन त्याचा फायदा डायबेटीस व बीपी नियंत्रित व्हायला , दमा , सांधेदुखी व हृदयरोग ह्यांचा त्रास कमी व्हायला होईल. डायबेटीस च्या रुग्णांनी आहारातील कुठलेही मोठे बदल करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ( पोळी किंवा भात पूर्णपणे बंद केल्यावर रक्तातील साखर अचानक कमी होणाची शक्यता असते)

आपल्याकडच्या जेवणात कार्बोहायड्रेट भरपूर असतात. सोबत तेल आणि स्निग्ध पदार्थ असतात. पण प्रोटिन्स आणि कच्चा भाजीपाला कमी पडतो. उदाहरण म्हणून जर तुम्ही फक्त बटाट्याची भाजी आणि पोळी एवढेच जेवलात तर तुमच्या जेवणात कच्च्या हिरव्याभाज्या आणि प्रोटिन्स हे आवश्यक घटक नसतातच. माझे बरेचशे पेशंट असं जेवण जेवतात. त्यामुळे बरेच लोकांनी कार्बोहायड्रेट कमी करून प्रोटीन्स व कच्चा भाजीपाला वाढवण्यासाठी वाव आहे. संतुलित आणि आपल्यासाठी योग्य कॅलरी असलेला आहार कधीही उत्तम! पण त्यासाठी गहू किंवा भात पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. साखर पूर्णपणे बंद केली तर त्यावर आमचा काही आक्षेप नाही.

निरोगी व्यक्तीने गहू पूर्णपणे बंद केला तर त्याच्या पोटातील उपयोगी जिवाणू कमी झाल्याचं अभ्यासामध्ये दिसलं आहे. तृणधान्यातील कार्बोहायड्रेट पोटातील चांगले जिवाणू टिकवून ठेवायला मदत करतात आणि त्याचा आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. ह्याशिवाय निरोगी व्यक्तींमध्ये ग्लूटेन चा सुद्धा चांगला परिणाम दिसून आला आहे. रक्तातील चरबी च्या रिपोर्ट मध्ये ग्लूटेन मुळे चांगली सुधारणा झाल्याचे दिसले आहे. आहारशास्त्रामध्ये वैविध्यपूर्ण आहाराला खूप महत्व दिल्या गेले आहे. जेवणामध्ये एकाच धान्याचा किंवा एकाच प्रकारच्या अन्नाचा भडिमार नको. त्यामुळे गव्हासोबत इतर तृणधान्ये , वेगवेगळी कडधान्ये, तेलबिया ह्यांचा समावेश केला तर ते उत्तमच. काही पोस्ट मध्ये गव्हाच्या ऐवजी ज्वारी वापरा असे जे लिहिलेले असते. ज्वारी किंवा कुठलेही एक धान्य सुपरफूड नसते. त्यामुळे तुम्हाला ग्लूटेन संबंधित आजार नसेल तर गहू पूर्ण बंद करून ज्वारी खायला लागल्यावर तुम्हाला फार काही फायदा होणार नाही. जर तुम्ही गहू , तांदूळ, ज्वारी आणि बाजरी सगळंच खात असाल तर ते वैविध्य तुमच्यासाठी चांगलंच आहे. तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर 500 कॅलरी कमी होतील अशा प्रमाणात खावे.

गव्हाविषयी भीती बाळगण्याची गरज नाही. ग्लूटेन संबंधित आजारांची शंका असल्यास तुमच्या डॉक्टरांना भेटा.

आहाराविषयी अधिक माहितीसाठी वाचा आहाराचं सोपं गणित

डॉ विनायक हिंगणे

छातीची पट्टी

IMG_20160402_174920

मराठीत ईसीजी ला काय म्हणायचं? अगदी शास्त्रीय भाषांतर म्हणजे “हृदयाचा विद्युत आलेख” वगैरे काहीतरी किचकट होईल. म्हणून सर्वसामान्यांना कळावं म्हणून “छातीची पट्टी”. सिनेमा ,टीव्ही किंवा चित्रात हमखास चुकीचा दाखवला जाणारा हा आलेख आहे. “फ्लॅट लाईन झाली म्हणजे संपलं!” हे मात्र खरं आहे! तेवढं दाखवायला चित्रपटात ईसीजी पुरेसा असतो. पण ह्यापेक्षा जास्त सर्वसामान्य जनतेला कळणं कठीण असतं. ईसीजी मधील बारकावे ओळखणे आणि त्यावरून निदान करणे हे फक्त तज्ञ डॉक्टरांना शक्य असतं. अश्या वेळी ईसीजी ही सामान्यांसाठी गूढ बनून राहतो. ईसीजी विषयी लोकांना म्हणूनच कुतुहलही वाटतं. माझे डॉक्टर नसलेले बरेच मित्र मला नेहमी ईसीजी विषयी विचारत असतात. त्यामुळे आज ईसीजी ची संकल्पना सोप्या भाषेत सांगावीशी वाटते आहे.

ईसीजी म्हणजे आपल्या हृदयात सुरु असलेल्या विद्युत प्रवाहाचा आलेख. हृदय हे एक अद्भुत इंजिन आहे. हृदयातील पेशी विद्युतप्रवाह तयार करतात आणि वाहून पण नेतात. हाच विद्युतप्रवाह छातीवर आणि हातापयांवर इलेक्टरोड किंवा वायर लाऊन मोजला जातो आणि त्याचा आलेख काढल्या जातो. हा आलेख बघून हृदयात विद्युतप्रवाह कसा सुरु आहे हे कळते. त्यावरून हृदयाचे काम कसे सुरु आहे ह्याचा अंदाज लावता येतो. त्यामुळे हृदयाच्या तपासणी मध्ये जास्त माहिती मिळून निदान आणि उपचारात मदत होते. कुठलाही शारीरिक त्रास किंवा दुष्परिणाम नसलेली ही वैद्यकीय चाचणी महत्वाची निदाने करून जाते.

आपल्याला रुग्णालयात दोन प्रकारचे ईसीजी साधारणतः दिसतात. पहिला म्हणजे कागदावर छापलेला. आधी हा छापलेला ईसीजी लांब पट्टीवर छापून यायचा . आजकाल ए4 साईज वर छापून येतो. ह्या ईसीजी मध्ये 12 लीड्स किंवा 12 वेगवेगळे आलेख असतात. म्हणून ह्याला 12 लीड ईसीजी म्हणतात. ह्या 12 लीड वेगवेगळ्या दृष्टीकोनातून हृदयाचा आलेख काढतात. त्यामुळे हृदयाच्या वेगवेगळ्या भागांची माहिती मिळते. ह्या प्रकारचा ईसीजी निदानासाठी उत्तम असतो. दुसऱ्या प्रकारचा ईसीजी म्हणजे मॉनिटर वर सतत दिसणारा ईसीजी. रुग्ण भरती असला की त्याच्या हृदयाच्या गतीवर डोळा ठेवण्यासाठी असा मॉनिटर वापरतात. हृदयाचे ठोके खूप मंद झाले किंवा खूप वेगात झाले तर कळावे म्हणून अशा इसीजीचा वापर होतो. ह्यात साधारणतः एकाच लीड चा वापर पुरेसा असतो. अशा मॉनिटर वर ईसीजी सोबतच रक्तदाब(बीपी), श्वासाचा दर आणि रक्तातील ऑक्सिजन प्रमाण हे सुद्धा दिसतात.

छातीत दुखल्यावर ईसीजी का काढतात?
छातीत दुखण्याची बरीच कारणे असू शकतात. त्यातील एक सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे हृदयविकार किंवा हार्ट अटॅक. हृदयाला रक्तपुरवठा कमी पडला तर हृदयाचे स्नायू दुखावतात. त्यामुळे छातीत दुखू लागते. अशा वेळी ईसीजी मध्ये सामान्य ईसीजी पेक्षा वेगळे असे काही ठराविक बदल दिसून येतात. पेशंट ची लक्षणे हृदयरोगाची असतील आणि ईसीजी मध्ये हृदयरोगाची चिन्हे असतील तर डॉक्टर लगेच महत्वाची पाऊले उचलून इलाज सुरु करतात. जर लक्षणे किंवा ईसीजी मधील बदल ह्यात काही शंका असेल तर ईसीजी पुन्हा करून बघणे किंवा ट्रोपोनिन नावाची रक्ताची तपासणी करणे असे काही आणखी मार्ग असतात. ईसीजी हा हृदविकाराच्या प्राथमिक तापसणीमधील एक अविभाज्य घटक आहे.
ह्याशिवाय फुफ्फुसात रक्ताची गाठ अडकणे (इंग्रजीमध्ये प्लमोनरी एम्बोलीसम) सारख्या आजारात सुद्धा छातीत दुखते. त्यातही ईसीजी मध्ये काही विशिष्ट बदल दिसून येतात. त्यामुळे हृद्यविकाराशिवाय इतर काही छातीत दुखण्याचा आजारांमध्ये ईसीजी मुळे निदान होण्यास मदत होते. जर पुन्हा पुन्हा केलेल्या ईसीजी मध्ये काही दोष आढळत नसेल तर हृदयविकार असण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे छातीत दुखत असेल तर ईसीजी करणे आवश्यक असते.

छातीत दुखत नसेल तरीही डॉक्टर ईसीजी का काढतात?
एखादा रुग्ण गंभीर आजारी असेल तर छातीत दुखत नसतानाही त्याचा ईसीजी काढला जातो. कुठल्याही गंभीर आजारात हृदयावर परिणाम होऊ शकतो. गंभीर आजारात हृदय कसे काम करते आहे ह्यावर उपचाराचे बरेच निर्णय ठरतात. उपचारानंतर त्याचा कसा परिणाम झाला आहे हे कळण्यासाठी ईसीजीची मदत होऊ शकते. उदा: किडनी निकामी झाल्यास शरीरातील पोटॅशिअम खूप वाढू शकते. त्याचा हृदयावर परिणाम होऊन रुग्ण दगाऊ शकतो. अशा वेळी ईसीजी वर काही चिन्हे दिसतात. पोटॅशिअम नियंत्रणात आल्यावर ही चिन्हे जातात. अशाच प्रकारे हृदयरोगतील काही रुग्णांमध्ये छातीत दुखत नाही. फक्त दम लागतो. ईसीजी मुळे अशा पेशंट चे निदान करणे सोपे होते.
हृद्यविकाराशिवाय हृदयाचे इतरही बरच आजार असतात. ह्या सगळ्यात ईसीजी मुळे बरीच माहिती मिळून निदान होण्यास मदत होते. ह्यातील हृदयातील विद्युतप्रवाहाचे आजारही असतात. हृदयाची गती कमी किंवा जास्त होणारे आजार ओळखण्यासाठी ईसीजी अत्यावश्यक आहे.
ईसीजीच्या अशा विविध आजारातील निदानक्षमतेमुळे ईसीजीचा वापर सढळ झाला आहे. त्यामुळे फक्त छातीत दुखल्यावरच ईसीजी काढतात असे नाही.

ईसीजी नॉर्मल नसेल तर?
ईसीजी मधील काही दोष हे विशिष्ट प्रकारात बसणारे असतात. ज्यामुळे पेशण्टला कधी कधी काहीही त्रास होत नसतो. पण डॉक्टर त्यावर उपचार सुचवतात. उदाहरणार्थ स्ट्रोक किंवा अर्धांगवायू झालेल्या रुग्णाचा ईसीजी केला. त्यात असे आढळले की हृदयाची गती अनियमित आहे. पेशंट ला हृदयाची कुठलीही लक्षणे नव्हती पण हृदयाच्या अनियमित ठोक्यांमुळे स्ट्रोक झाला. अशावेळी डॉक्टर उपाय सुचवतात. काही दोष हे ठराविक प्रकारात बसणारे किंवा ठरीव आजाराशी संबंधित नसतात. अशा वेळी ईसीजी मधील या बदलांना दोष म्हणणे पण अतिशयोक्ती होऊ शकते. ईसीजी मधील हे बदल त्या व्यक्तीची ठेवण असू शकते. अशा वेळी खात्री झाल्यावर डॉक्टर अशा बदलांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे ईसीजी हा नेहमी पेशंटची लक्षणे व तपासणी ह्यांच्या सोबत पडताळून बघावा लागतो. बरेचदा वरकरणी ऍबनॉर्मल दिसणारा ईसीजी त्या पेशंट साठी नॉर्मल असू शकतो. आणि वरकरणी साधे वाटणारे बदल त्या पेशंटसाठी गंभीर असू शकतात.

बरेचदा डॉक्टर जुना ईसीजी मागतात तो का?
वर सांगितल्या प्रमाणे प्रत्येकाची ईसीजी ची ठेवण थोडी वेगळी असू शकते. अशा वेळी ईसीजी आधीच्या इसीजीशी पडताळून बघितल्यास बदल नवीन आहेत का नेहमीच्या ठेवणीतला आहे हे बघता येते. काही बदल किंवा दोष हे जुन्या हृदविकारामुळे झालेले असू शकतात. ईसीजी मधील दोष बघून डॉक्टर हृयविकाराची तपासणी व उपचार सुरु करायचे का असा विचार सुरु करतात.अशा वेळी आधीचा ईसीजी बघून नवीन बदल नाही ना ही खात्री करता येते. ईसीजी मधील नवीन बदलांकडे विशेष लक्ष द्यावे लागते. जर बदल नवीन नसतील तर चिंता कमी होते. हेच हृदयाच्या गतीबद्दल सुद्धा होते. म्हणून आपला जुना ईसीजी डॉक्टरांकडे जाताना सोबत असल्यास बरीच मदत होते.

दोन डॉक्टरांचे एकाच ईसीजी बद्दल निदान वेगळे असू शकते का?
ईसीजी मधील काही दोष हे अगदी विशिष्ट व ठळक असतात. त्यांचे निदान हे फक्त ईसीजी वर करता येते. अशा निदानांमध्ये शक्यतोवर फरक आढळत नाही. पण ईसीजी मधील काही दोष हे निदान करण्यास कठीण असतात. त्यात पेशंट ची लक्षणे व तपासणी ह्यांच्याशी पडताळणी करावी लागते. अशावेळी डॉक्टरांच्या निदानांमध्ये / मतांमध्ये फरक पडू शकतो.

ईसीजी विषयी मला पेशंट किंवा मित्रांनी  विचारलेले नेहमीचे प्रश्न मी निवडले आहेत. तुम्हालाही काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. लेख आवडला तर नक्की शेअर करा.