Scroll to top

परिणाम आणि दुष्परिणाम!


vinayakhingane - June 25, 2016 - 8 comments

IMG_20160625_124642
अन्न वस्त्र आणि निवारा ह्या मुलभूत गरजांशिवाय औषधोपचार सुद्धा एक महत्वाची गरज झाली आहे. आजार बरा करण्यासाठी औषधांना काही पर्याय नाही. तरीही औषध घ्यायला बरेच लोक घाबरतात. औषधाची न आवडणारी चव किंवा इंजेक्शन ची भीती इत्यादी अनेक कारणांशिवाय  साईड इफेक्ट ची भीती सुद्धा याचे कारण असू  शकते. दुष्परिणामांची भीती ही अनाठायी नाही. परंतु त्याचा बाऊ करणेही योग्य नाही. औषधांच्या दुष्परिणामाविषयी माहिती नसल्यामुळे बरेच लोक गंभीर परिणामांना सामोरे जातात तर दुसऱ्या बाजूला दुष्परिणामांच्या अतिरेकी भीतीमुळे कित्येक लोक उपयोगी व जीवनावश्यक उपायांना मुकतात. वेदनाशामक औषधांच्या दुष्परिणामांकडे कानाडोळा करून वर्षानुवर्षे वेदनाशामक औषधे घेऊन किडनी खराब झालेली उदाहरणे आपल्या समोर असतात.  तसेच औषधांच्या भीतीमुळे उपचार टाळून अत्यवस्थ झालेले रुग्णही आपण बघतो. त्यामुळे औषधांच्या परिणामांकडे व दुष्परिणामांकडे संतुलित दृष्टीकोनातून बघणे आवश्यक ठरते.
औषधांचे दुष्परिणाम काय असतात हे आपण थोडक्यात बघूया. औषध घेतल्यानंतर त्याचे आपल्या शरीरावर काही परिणाम होत असतात. किंबहुना आपल्या शरीरावर परिणाम करणाऱ्या घटकांना निवडून आपण त्यांचा औषध म्हणून उपयोग करत आलोय. हे परिणाम विविध प्रकारचे असतात. ह्यातील काही परिणाम हे आपल्याला अपेक्षित असतात. अशा अपेक्षित परिणामांचा आपण निरनिराळ्या आजारांच्या उपचारासाठी उपयोग करून घेतो. याविरुद्ध काही परिणाम हे आपल्याला अनपेक्षित असे असतात. अशा प्रकारे औषधांचे दुष्परिणाम हे ढोबळमानाने अपेक्षित  व अनपेक्षित ह्या दोन गटात विभागता येतील. अपेक्षित दुष्परीनामातील  एक म्हणजे अपेक्षित परिणाम जास्त तीव्रतेने दिसणे. उदा:  पोट साफ होण्यासाठी रेचक दिल्यास कधी कधी परिणाम जास्त होऊन जुलाब होतात . ह्याला आपण दुष्परिणाम म्हणू शकतो. ह्याचप्रमाणे औषधाचा एक अपेक्षित परिणाम आपल्याला हवासा असतो तर इतर अपेक्षित असे परिणाम नकोसे असतात. उदा: एखाद्या रुग्णाचा मधुमेहाचा उपचार करणाऱ्या औषधाचा वजन वाढवणे हा अपेक्षित असा परिणाम असतो पण तो आपल्याला नको असतो. तेव्हा त्याला आपण दुष्परिणाम म्हणतो .
औषधांचे काही परिणाम हे अनपेक्षित असतात . आपल्याला औषध घेताना अशा परिणामांची पूर्वकल्पना नसते . हे परिणाम सौम्य ते तीव्र  अशा वेगवेगळ्या दर्जाचे असू शकतात .नवीन औषधांच्या बाबतीत असे अनपेक्षित परिणाम होण्याची शक्यता जास्त असते . औषधाच्या आपल्याला माहित नसलेल्या गुणधर्मामुळे असे परिणाम दिसतात .  ह्याशिवाय प्रत्येक शरीराची एकाच औषधाला वेगवेगळ्या प्रकारची प्रतिक्रिया येऊ शकते . कधी तीव्र प्रकारची प्रतिक्रिया आल्यास ती त्रासदायक ठरते . ह्याला आपण अलर्जी म्हणतो . तसेच काही औषधांचे काही दुष्परिणाम हे फक्त काही रुग्णांमध्ये दिसून येतात . त्यांना इडिओसिंक्रसी असे म्हणतात . ह्या दोन्ही प्रतिक्रिया त्या रुग्णास स्पेसिफिक अशा असतात .  अशा रुग्णाला तेच औषध पुन्हा देणे टाळावे लागते . याशिवाय दुष्परिणाम वेगवेगळ्या परिस्थितीत दिसतात . वेगवेगळ्या वयामध्ये ( जसे लहान मुले आणि वयोवृद्ध ) औषधांचे परिणाम वेगळे होऊ शकतात . तसेच गरोदारावस्थेत व  ब्रेस्ट फीडिंग च्या काळात औषधे देताना फार काळजी बाळगावी लागते . कारण औषधांचा बाळाच्या वाढीवर व शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो .
कधीतरी दोन वेगवेगळी औषधे सोबत घेतल्यास त्यांच्या आपापसातील प्रतिक्रियेमुळे दुष्परिणाम दिसू शकतात . औषधाचा दर्जा कमी असेल किंवा बनावट औषध असल्याने वेगळेच दुष्परिणाम होऊ शकतात . सामान्य जनतेप्रमाणे डॉक्टरांच्या मनातही औषधांच्या दुष्परिणामांबद्दल काळजी असते . त्यामुळे बहुतांशी डॉक्टर वरील गोष्टींवर विचार करून औषधे देतात व त्यामुळे बरेच दुष्परिणाम टाळता येतात . काही दुष्परिणामांची डॉक्टर पूर्वसूचना देतात व त्यामुळे दुष्परिणाम लवकर ओळखून त्यावर उपचार करता येतात .
एवढी काळजी घेऊनही औषधांचे दुष्परिणाम दिसून येऊ शकतात. अशा वेळी आपण औषधे का घेतो किंवा डॉक्टर औषधे का देतात हा प्रश्न पडतो . औषधे देताना त्यामुळे होणारा फायदा जास्त व अपेक्षित दुष्परिणाम कमी अशी परिस्थिती असल्यासच डॉक्टर औषधे देतात . कधीतरी त्रासदायक दुष्परिणाम असलेली औषधेही डॉक्टर देतात पण त्यावेळी ही औषधे जीवनावश्यक ठरू शकतील अशी असतात . उदा: सर्पदंशासाठी दिले जाणारे औषधामुळे गंभीर अशी अलर्जी होऊ शकते पण ते औषध न दिल्यास विषबाधे मुळे  रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो . अशा वेळी धोका पत्करून औषध देणे योग्य ठरते . पण काही उपचारांमध्ये दुष्परिणामांची कल्पना रुग्णाला व नातेवाईकांना देऊन त्यांच्या कला प्रमाणे उपचार केला जातो . जिथे शक्य आहे तिथे उपलब्ध उपचारांपैकी दुष्परिणाम व किंमत ह्यांचा अंदाज देऊन रुग्ण तसेच नातेवाईकांना निवड करण्याची संधी असते . रुग्णासाठी जास्तीत जास्त सुरक्षित अशी औषधे वापरण्याचा डॉक्टरांचा प्रयत्न असतो व उपचारापेक्षा दुष्परिणाम जास्त असे उपचार टाळावेत असेच वैद्यक शास्त्र सांगते .
काही नमुनेदार दृष्टिकोन:
रुग्ण म्हणून आपण कुठलेही औषध घेताना त्याचे अपेक्षित व अनपेक्षित असे साईड इफेक्ट असू शकतात हे समजून घ्यावे व त्या दृष्टीने वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.  पण बरेचदा काही नमुनेदार असे दृष्टीकोन आपल्याला बघायला मिळतात . साधारणता चाळीशीच्या वयाच्या असलेल्या एक गृहिणी चेहरा वाकडा वाटतो म्हणून हॉस्पिटल मध्ये दाखवायला आल्या . हा प्यारालीसीस  किंवा अर्धांगवायू चा प्रकार नाही ना म्हणून तपासणी सुरु झाली . त्यांची नीट  चौकशी केल्यावर कळले कि त्यांनी चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी  बोटोक्स  चे इंजेक्शन घेतले होते व त्याचा दुष्परिणाम झाला होता . आपल्याला हव्या असणाऱ्या उपचाराच्या दुष्परिणामांकडे आपण कानाडोळा करतो. हे परिणाम कधीतरी उपचारापेक्षा जास्त त्रासदायक ठरायला लागतात तरीही तो उपचार सुरु ठेवण्याकडे आपला कल असतो . खासकरून सौंदर्य विषयक उपचारांमध्ये असे होण्याची शक्यता जास्त असते . ह्याच्या अगदी उलट आपल्याला नको असणार्या उपचारांचे दुष्परिणाम हे जास्त मोठे करून सांगण्याकडे कल असतो . उदा:  काही रुग्ण अँटीबायोटिक  औषधांची गरज असतानाही पूर्ण मात्रा घ्यायला कुरकुर करतात . अशा वेळी छोटे दुष्परिणामही पेशंट ला फार मोठे दिसायला लागतात . कधी तर रुग्ण अत्यावश्यक अशी औषधे साईड इफेक्ट चे नाव पुढे करून टाळताना दिसतात . याचे  उत्तम उदाहरण म्हणजे इंजेक्शन च्या स्वरूपातील औषधे . बरेचशे रुग्ण गरज असतानाही इन्शुलिन सारख्या इंजेक्शनला टाळाटाळ  करतात.
आधुनिक वैद्यकशास्त्र (ऍलोप्याथी )म्हणजे उग्र औषधे व दुष्परिणाम परंतु इतर प्याथी चे उपचार  ही दुष्परिणाम विरहीत असा काही लोकांचा ठाम समज असतो . हा समज खोटा आहे . आधुनिक वैद्यक शास्त्रा मध्ये अतिशय सुरक्षित अशी औषधे सुद्धा असतात . त्याचप्रमाणे जास्त दुष्परिणाम असणारी औषधे बाद करणारी यंत्रणा कार्यरत असते. ह्यामुळे खरोखर त्रासदायक दुष्परिणाम झालेल्या रुग्णांची संख्या ही फायदा झालेल्या रुग्णांच्या तुलनेत फारच कमी दिसते. त्यामुळे अलोप्याथी मधील सगळीच औषधे वाईट असे म्हणता येणार नाही .  तसेच इतर प्याथी मधील औषधे व उपचार हे नेहमीच दुष्परीनामविरहित असतात असे म्हणणे धाडसाचे ठरेल .  म्हणून कुठलाही उपचार घेताना सजग असणे आवश्यक असते . खासकरून विना दुष्परिणाम हमखास यश देण्याची खात्री देणाऱ्या जाहिरातीतील उपचारांबद्दल जागरूक राहावे.  एक गृहस्थ मधुमेहाचे निदान झाल्यावर मला अलोप्याथी ची औषधे सोसणार नाहीत  व  त्यांचे फारच साईड इफेक्ट असतात म्हणून अलोप्याथी  औषधे घेणे टाळत होते. दुसऱ्या प्याथी ची दुष्परिणाम नसलेली औषधे सुरु केली . त्या औषधांनी त्यांना काही दुष्परिणाम तर झाला नाही परंतु काही परिणाम पण झाला नाही . त्यांचा मधुमेह अनियंत्रित झाला व त्यांना गंभीर त्रास झाल्यावर भरती करावे लागले . त्या वेळी अलोप्याथी ची औषधे सुरु केल्यावर त्यांना काहीही दुष्परिणाम न होता त्यांची तब्येत सुधारली. आता त्यांची अवाजवी भीती कमी झाली आहे .
औषधे डॉक्टरांच्या प्रीस्कीप्षण शिवाय मिळू शकणारी  (ओवर द कॉउंटर ) औषधे ही साधारणतः सुरक्षित असतात . परंतु इतर औषधे डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घ्यावी लागतात .ती प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळत नाहीत  पण कधीकधी सैल कारभारामुळे  अशी औषधे प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळतात . अशा वेळी दुष्परिणाम होण्याचा धोका असतो. म्हणून अशी औषधे घेणे टाळावे . तसेच काही लोकांना डॉक्टरांच्या साल्याशिवाय नेहमी स्वतः औषध घेण्याची सवय असते . असे स्वतः औषध घेणे हे घातक ठरू शकते . डॉक्टरांनी एकदा लिहून दिलेली औषधी काही बदल न करता सुरु ठेवणारी मंडळी असते . डॉक्टर दरवेळी तीच औषधे देतात तर मग सारखे डॉक्टरांना काय दाखवायचे असे त्यांचे मत असते . परंतु अशा वेळी हळू हळू होणारे दुष्परिणाम व औषधाची उपयुक्तता बघून डॉक्टर औषधे ठरवतात . त्यामुळे असे करणे टाळावे . आपण कुठलेही औषध घेतल्यावर जर काही त्रास झाला तर त्याची नोंद ठेवावी व लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा . एखाद्या औषधाची अलर्जी आल्यास त्याची कायमस्वरूपी नोंद आपल्या फ़ाइल ला ठेवावी . दर वेळी दवाखान्यात जाताना किंवा डॉक्टर नवीन औषध लिहून देत असताना अशा अलर्जी चा उल्लेख करावा .  डॉक्टरांकडे  व फार्मसी मध्ये आपली औषधे व समजून घावी . हे केल्याने चुकीची औषधे व चुकीचे डोस घेतल्याने होणारा गोंधळ टाळता येतो.
ऍलोप्याथी औषधांबद्दल असलेला एक गैरसमज म्हणजे ही औषधे ‘हाय’ पॉवर ची असतात . जास्त डोस (उदा : ५०० मी ग्रा  किंवा १००० मी ग्रा म्हणजे हाय पॉवर ). अशा औषधांमुळे त्रास होतो व कमी आकडा असलेली औषधे जरा बरी असतात . बरीचशी मंडळी डॉक्टर औषध लिहून देत असताना आम्हाला स्ट्रॉंग औषध देऊ नका अशी विनवणी करतात .  खरं म्हणजे प्रत्येक औषधाचा डोस हा वेगवेगळा असतो . काही औषधे ही मायक्रो ग्राम  मध्ये असतात तर काही मिलीग्राम मध्ये तर काही औषधे ग्राम  च्या डोस मध्ये द्यावी लागतात . त्यामुळे प्रत्येक औषधाचा डोस व हाय डोस वेगळा असतो . त्यामुळे डोस चा आकडा पाहून त्याला घाबरून जाऊ नये . त्याचप्रमाणे औषधेचे एक कार्य अपेक्षित असते ,ते काम करून घेण्यासाठी आवश्यक असे औषध डॉक्टर देतात . त्यात विक किंवा स्ट्रॉंग असा भेदभाव सहसा नसतो . ज्याची गरज आहे तेच औषध घ्यावे लागते . आणि विक म्हणजे कमी दुष्परिणाम व स्ट्रॉंग म्हणजे जास्त दुष्परिणाम असे काही नसते . डॉक्टर नेहमीच जास्त सुरक्षित असलेली औषधे देण्याचा प्रयत्न करत असतात .
औषधे घेतल्यावर शरीरातील हिट किंवा उष्णता वाढते हा एक असाच गैरसमज आहे. वैद्यक शास्त्रातील परिभाषेत असा दुष्परिणाम झाल्याचे आढळत नाही . कदाचित रुग्ण आपल्या वेगवेगळ्या लक्षणांना उष्णता वाढली असे म्हणत असावेत .  पण हिट वाढणे किंवा उष्णता वाढणे हा दुष्परिणाम असण्यापेक्षा भीती आहे. त्यामुळे उष्णता वाढेल म्हणून औषधे टाळणे हे चुकीचे आहे.
औषधांमुळे एखाद्याचे जीवन वाचू शकते तर दुष्परिणामांमुळे होत्याचे नव्हतेही होऊ शकते . पण औषधाइतकाच आपला दृष्टीकोनही उपयोगी किंवा घातक असू शकतो. संतुलित दृष्टीकोन अन सजगता उपचाराच्या बाबतीत आपल्याला खूपच उपयोगी ठरते
Contact Us
close slider

    ×

    Hello!

    Click one of our representatives below to chat on WhatsApp or send us an email to vinayakhingane@gmail.com

    ×
    %d bloggers like this: