इंग्रजी सिनेमात “apocalyptic fiction” असा एक प्रकार आहे. इंग्रजी सिनेमातील ‘झॉम्बी’ तुम्ही बघितले असतीलच . हे झॉम्बी सिनेमे त्यातीलच आहेत. आपण सर्वसामान्य जीवन जगत असताना अचानक मृत लोक उठून जिवंत लोकांना मारू लागतात. अगदी काही काळातच सर्वसामान्य जीवन हरवते आणि लोक मृत्यूच्या भीतीत वावरायला लागतात. प्रत्येक पावलावर मृत्यू दिसतो. ओळखीचे चेहरे भयंकर दिसायला लागतात. “सर्वनाश” ही अशा सिनेमांची थीमअसते!
भीती आणि थरार ह्यातून आपल्याला ऍड्रेनॅलिन ह्या हार्मोनची किक मिळते. काही लोकांना हा अनुभव हवाहवासा वाटतो. म्हणून असे सिनेमे चालतात. पडद्यावर भयंकर सर्वनाश सुरू असताना आपण सुरक्षित असतो त्यामुळे हा थरार आपण मनोरंजन म्हणून अनुभवू शकतो. सर्वनाश करणारी संकटे आणि आजार ह्यांची आपण आज फक्त कल्पना करतो. आपले पूर्वज एवढे नशीबवान नव्हते. झॉम्बी नाही पण तेवढेच गंभीर आजार पिढ्यांना उध्वस्त करायचे! साथीच्या रोगांना महामारी म्हणायचे ते उगीच नाही. स्मॉलपॉक्स किंवा देवी हा आजार सुद्धा अशाच महामारी पैकी एक होता.
देवीच्या आजारामुळे मृत्यू व्हायचे:
हो ! देवीच्या आजाराने लोक मृत्युमुखी पडायचे. अगदी थोडे थोडके नाही तर लोकसंख्येच्या १० टक्के लोक देवीच्या साथीमध्ये मरायचे अशी आकडेवारी आहे. देवीचा आजार झालेल्या लोकांपैकी जवळपास दर तिसरी व्यक्ती दगावायची. फक्त विसाव्या शतकातच जवळपास ५० करोड लोक स्मॉलपॉक्स मुळे दगावले होते. मुलांमध्ये तर धोका आणखी जास्त होता. १९८० मध्ये जग देवीच्या आजारातून मुक्त झाले, भारत त्याआधीच स्मॉलपॉक्स मुक्त झाला होता. त्यामुळे ह्या आजाराचे गांभीर्य माझ्या पिढीने बघितले नाहीये. देवितून वाचलेले आणि शरीर भर व्रण असलेले काही लोक नजरेस पडले असतील पण त्यातून देवीच्या आजाराची भीषणता कळत नाही. आज लोक विसरले आहेत की देवीच्या साथीत मृत्यू सुद्धा व्हायचे! “देवी मुळे मृत्यू होतात का की फक्त काही काळासाठी आपण विद्रूप दिसतो ? आजकाल एवढ्या लसी घ्याव्या लागतात ह्याची गरज आहे का ? “असे प्रश्न लोक सर्रास विचारताना दिसतात .
देवीच्या आजाराने अनेक कुटुंबे उध्वस्थ व्हायची. लोक मृत्युमुखी पडायचे. वाचलेच तर आयुष्यभर व्रण घेऊन जगावं लागे. काहींची दृष्टी जायची. आज हा आजार नष्ट झाल्यामुळे आपण मोठ्या संकटातून वाचलो आहोत!
स्मॉलपॉक्स आजार खूप गंभीर होता ! चित्र: विकिमेडीया कॉमन्स
स्मॉलपॉक्सची खूप जुनी लढाई:
देवीचा आजार हा भूतकाळातील आजार आहे आणि डॉ जेन्नर ह्यांनी लस शोधली होती हे आपल्याला माहित असते. पण ह्या आधीची गोष्ट सुद्धा मोठी आहे. स्मॉलपॉक्स हा आजार खूप पूर्वीपासून धुमाकूळ घालायचा. इतिहासकारांना वेगवेगळ्या ठिकाणी देवीच्या आजाराचे पुरावे मिळत आले आहेत. इजिप्तमध्ये ३००० वर्षांपूर्वी रामसेस पाचवा नावाचा फॅरो (राजा) होता. त्याच्या ममीवर स्मॉलपॉक्स चे व्रण सापडले आहेत. चीन आणि भारतात सुद्धा स्मॉलपॉक्स सदृश्य आजाराचे वर्णन जवळपास इ.स. पूर्व १००० ते १५०० काळात आढळते. ह्या आजाराचा प्रसार जगभर झाला. सगळ्या खंडातील लोकांवर ह्या आजारामुळे संकटांचा डोंगर कोसळला. वेगवेगळ्या देशांमधील राजे-महाराजे सुद्धा ह्या आजाराला बळी पडले आहेत. अमेरिकेतील मूळ निवासी युरोपीय लोकांच्या घुसखोरी नंतर स्मॉलपॉक्स ला बळी पडले. काही लोकांचे गट तर पूर्ण नष्टच झाले.

रामासेस फॅरो च्या ममीवर स्मॉलपॉक्स चे व्रण चित्र: विकिमेडीया कॉमन्स
बरीच शतके (अगदी सह्स्त्रके ) ह्या आजाराने हाहाकार केला. याविरुद्ध लोकांनी वेगवेगळे उपाय शोधून काढण्याचे प्रयत्न वेळोवेळी केले. हा आजार विषाणू (म्हणजेच वायरस ) मुळे होतो. हे विषाणू एका व्यक्तीच्या शरीरातून दुसर्याच्या शरीरात खूप लवकर पसरतात. पुरातन काळात विषाणू किंवा जीवाणू ह्याबद्दल आपली समज कमी होती. तरीही आजार कसा पसरतो ह्याविषयी लोकांना जे समजले त्यातून त्यांनी उपाय शोधून काढण्याचा प्रयत्न केला. आजारी व्यक्तीपासून दूर राहणे, जो आधी आजारातून वाचला आहे त्यांनी आजारी व्यक्तीची काळजी घेणे अशा पद्धती सुरु झाल्या. ज्याला आधी स्मॉलपॉक्स चा आजार झाला आहे त्याला नंतरच्या साथीत स्मॉलपॉक्स होत नाही हे लोकांच्या लक्षात आले . त्याचे कारण त्यांना नेमके कळले नसले तरी त्याचा उपयोग त्यांनी करून घेतला.
स्मॉलपॉक्स चे विषाणू जर शरीरात गेले तर शरीर त्यांना प्रतिकार करते. काही लोक यशस्वीपणे प्रतिकार करू शकतात आणि आजारातून वाचतात. अशा वेळी शरीरात प्रतिकारशक्ती (अँटीबॉडी) तयार होतात. पुढच्या काळात ही प्रतिकारशक्ती स्मॉलपॉक्स पासून संरक्षण देते. विषाणू आणि प्रतिकारशक्ती ह्याबद्दल फारसे ज्ञान नसताना सुद्धा रोजच्या निरीक्षणातून लोकांनी हे समजून घेतले. चीन मध्ये लोक स्मॉलपॉक्स च्या रोग्याच्या फोड-जखमांवरील खपली घ्यायचे. ज्याला सौम्य आजार आहे अशा व्यक्तीकडून हे खपली घेतली जायची. त्याची भुकटी करून जवळपास महिनाभर उबदार ठिकाणी ठेवायचे. खपली मध्ये विषाणू असतात. त्यावर प्रक्रिया केल्याने विषाणूंची संख्या कमी होते. अशी भुकटी निरोगी व्यक्तीच्या शरीरात नाकाच्या वाटे टाकायचे. कधीकधी हाताच्या त्वचेवर छोटी जखम करून त्यावाटे टाकायचे. लहान मुलांमध्ये हे केले जायचे आणि हा एक प्रकारचा सोहळा असायचा. त्या बाळाला मग काही दिवस इतरांपासून वेगळे ठेवले जायचे. ह्या प्रक्रियेला आजच्या भाषेत वॅरीओलेशन असे म्हणतात. अशी प्रक्रिया केली की व्यक्तीला स्मॉलपॉक्स चा आजार व्हायचा. बरेचदा हा आजार सौम्य असायचा पण कधीकधी गंभीर आजार सुद्धा होत असे. ह्या आजारातून वाचलेली व्यक्ती पुढील काळात स्मॉलपॉक्स पासून सुरक्षित राहते असे दिसले. अशाच पद्धती भारतीय उपखंड आणि आफ्रिकेत सुद्धा रूढ होती. स्मॉलपॉक्स पासून बचाव करण्याचा हा आपला प्राथमिक प्रयत्न होता. जवळपास अठराव्या शतकात ही पद्धत युरोप मध्ये पोहोचली.

देवी, विषाणू आणि लस :
देवीच्या आजाराला देवी हे नाव का पडले ह्याची माहिती मला नाही. देवीशी ह्या आजाराचा संबंध कसा जुळला ह्याबद्दल सुद्धा काही माहिती सापडली नाही. ‘ देवी ह्या आजारापासून बचाव करते आणि देवीच्या प्रकोपामुळे हा आजार होतो ‘ असा एक समज दिसतो. आज आधुनिक विज्ञानाच्या मदतीने आपल्याला हे कळले आहे की देवीचा आजार हा स्मॉलपॉक्स विषाणू मुळे व्हायचा. हा आजार विषाणू मुळे व्हायचा आणि त्यापासून बचाव करण्यासाठी सुद्धा तोच विषाणू वापरायचे ( वॅरीओलेशन )! ह्या आजाराविरुद्ध लस तयार झाली आणि क्रांती झाली. आजारी न पडता आपल्या शरीरात प्रतिकार शक्ती तयार व्हायला लागली. जेव्हा जगभरातील पुरेशा लोकांमध्ये प्रतिकार शक्ती तयार झाली तेव्हा स्मॉलपॉक्सच्या विषाणूंना निसर्गात आश्रय राहिला नाही आणि जग स्मॉलपॉक्स मुक्त झाले!
लसीकरणाच्याबाबतीत एक गोष्ट खूप चांगली आहे. लसीकरणामुळे प्रत्येक व्यक्तीसोबत समाजाला सुद्धा प्रतिकारशक्ती मिळते. ह्याला सामुहिक प्रतिकारशक्ती म्हणतात. जेव्हा एखाद्या समुहात लोकांना प्रतिकार शक्ती नसते तेव्हा साथीचा आजार एखाद्याला झाला तर तो झपाट्याने पसरतो आणि मोठी साथ येते. पण जर काही लोकांना प्रतिकार शक्ती असेल तर साथीचा जोर मंदावतो. जर पुरेशा लोकांमध्ये प्रतिकारशक्ती आली तर साथीपासून संरक्षण मिळते.
सुरुवातीच्या काळात लसीकरणाची संकल्पना नव्हती. ‘वॅरीओलेशन’ किंवा स्मॉलपॉक्स चे विषाणू वापरूनच ढोबळपणे प्रतिकारशक्ती मिळवण्याचा प्रयत्न व्हायचा. अठराव्या शतकात एडवर्ड जेन्नर ह्यांनी जे काम केले त्यातून आधुनिक लसीकरणाची संकल्पना तयार झाली. पुढे इतर आजारांच्या विरुद्ध लसी तयार झाल्या आणि जग बदलले.
वॅरीओलेशन हे खूप सुरक्षित नव्हते. कधी कधी मोठे दुष्परिणाम व्हायचे. पण दगडापेक्षा वीट मउ म्हणतात त्याचप्रमाणे मृत्यूपेक्षा वॅरीओलेशन चे दुष्परिणाम फारच किरकोळ वाटायचे. एडवर्ड जेन्नर लहान असताना त्यांना ‘ वॅरीओलेशन ‘ करण्यात आले होते. त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम सुद्धा झाला होता.अठराव्या शतकाच्या सुरुवातीला लेडी मेरी मोन्तीग्यू नावाच्या बाईंनी टर्की(त्या काळीचे ऑटोमन साम्राज्य) मध्ये वॅरीओलेशन बघितले आणि त्याचा फायदा लक्षात घेऊन ती पद्धत इंग्लंड मध्ये रूढ करण्याचा प्रयत्न केला. इंग्लंडच्या राजघराण्याचा पाठिंबा मिळाल्यामुळे ती पद्धत रुजायला फायदा झाला. पण आपण आधी बघितल्या नुसार वॅरीओलेशन हा आदर्श उपाय नव्हता. त्याने लोकांना त्रास व्हायचाच आणि कधी कधी प्रतिकारशक्ती तयार होत नसे. एडवर्ड जेन्नर ह्यांनी अधिक चांगला उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. त्या काळी गाईंचा एक देवी सारखा आजार होता त्याला काऊ-पॉक्स म्हणायचे. गाईचे दुध काढणाऱ्या लोकांना सुद्धा तो होई. पण हा आजार स्मॉलपॉक्स च्या तुलनेत फारच मवाळ होता. विशेष म्हणजे काऊ-पॉक्स झालेल्यांना स्मॉलपॉक्स पासून संरक्षण मिळते असे सुद्धा लोकांच्या लक्षात आले होते. एडवर्ड जेन्नर ह्यांनी एका लहान मुलाच्या हातावर छोटा काप देऊन त्यावर काऊ पॉक्स चे विषाणू टाकले. त्यानंतर ह्या मुलामध्ये प्रतिकारशक्ती तयार झाली हे त्यांनी दाखवून दिले. त्या मुलाला नंतरच्या काळात स्मॉलपॉक्स चे विषाणू देऊन सुद्धा स्मॉलपॉक्स चा आजार झाला नाही. पुढे त्यांनी ह्या पद्धतीचे नाव ‘वॅक्सीनेशन’ ठेवले. त्यांनी काटेकोर नोंदी ठेऊन ही पद्धत सुरक्षित आणि प्रभावी दोन्ही असल्याचे दाखवून दिले. लोकांना फार त्रास न होता प्रतिकारशक्ती मिळायला लागली. स्मॉलपॉक्स पासून लोकांचा बचाव व्हायला लागला.
लसीकरणाला विरोध :
प्रभावी आणि सुरक्षित असा उपाय उपलब्ध असणे आणि तो लोकांपर्यंत पोहोचणे ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. समाजाला प्रतिकारशक्ती मिळण्यासाठी लसीकरण लोकांपर्यंत पोहोचणे आणि लोकांनी ते आपलेसे करणे आवश्यक असते. स्मॉलपॉक्स च्या बाबतीत हे व्हायला बराच काळ लागला. ह्यात खूप कष्ट सुद्धा पडले. एडवर्ड जेन्नर ह्यांना स्मॉलपॉक्स च्या लसीचा शोध लावण्याचे श्रेय देण्याबद्दल काही मतभेद आहेत. पण लसीकरण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले ते सर्वमान्य आहेत.
लोकांनी सुरुवातीला लसीकरणाला खूप विरोध केला. या विरोधामागे काही शंका होत्या, काही खुळचट कल्पना तर काही वेळा तात्विक विरोध. लसीकरण ही नवीन संकल्पना होती. ही नवीन संकल्पना लोकांच्या मनात रुजवायला खूप प्रयत्न करावे लागेल. एडवर्ड जेन्नर आणि लसीकरण ह्यांच्या विरोधात वृत्तपत्रातील व्यंगचित्र पाहून आपल्याला त्या काळातील विरोधाची कल्पना येईल. सुदैवाने आणि लोकांच्या अथक प्रयत्नांनी हा विरोध मोडून काढता आला.
१७९६ मध्ये जेन्नर ह्यांनी लस शोधून काढली. तरीही ही लस जगभरात पोहचवून स्मॉलपॉक्स ला हरवण्यासाठी आपल्याला अडीच शतके प्रयत्न करावे लागले. जागतिक आरोग्य संघटनेने १९८० मध्ये जग स्मॉलपॉक्स मुक्त केल्याचे जाहीर केले तेव्हा माणसाचा स्मॉलपॉक्स विरोधी लढा यशस्वी झाला. ह्यात वेगवेगळी सरकारे आणि संघटना ह्यांनी एकजुटीने प्रयत्न केले. मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाले. असंख्य आरोग्य कर्मचार्यांनी मदत केली. प्रभावी लस सापडल्या नंतरही अडीचशे वर्ष आपल्याला लढा द्यावा लागला . पण ह्या लढ्यानंतर अनेक आजार नष्ट करण्याची आशा निर्माण झाली.

अमेरिकेत लसीकरणाला विरोध करणारी एक संघटनाच होती. तिची जाहिरात बघा !
स्मॉलपॉक्सच्या उच्चाटनानंतर आपण बरेच आजार मुळातून नष्ट करण्याचा प्रयत्न करतोय. भारत २०१४ मध्ये पोलिओमुक्त झाला. वेगवेगळ्या लसीकरणामुळे कधीकाळी धुमाकूळ घालणारे अनेक आजार आज क्वचितच बघायला मिळतात. आजार कमी झाले आणि आरोग्य सुधारले. जीवनमान वाढले. जीवनाचा दर्जा सुधारला. समाजावरील आजारांचा आर्थिक तन सुद्धा कमी झाला. आपले जीवनमान आणि जीवनाचा दर्जा सुधारण्यामागे लसीकरणाचा मोठा हातभार आहे. पण लसीकरण थांबवले तर हे कमी झालेले आजार परत येऊ शकतात. उदाहरण : अमेरिकेत (यु एस ए ) मध्ये गोवर नियंत्रणात आला होता. पण आजकाल अफवेला बळी पडून काही लोक मिझल्स किंवा गोवर विरुद्ध लसीकरणाला विरोध करतात. त्यामुळे तिथे अधून मधून गोवर चा उद्रेक दिसतो.
आपल्याकडे सुद्धा लसीकरणाला काही लोक विरोध करतात. लसीकरण हे नैसर्गिक नसते असा समज पसरवला जातो. लसीकरणाच्या दुष्परिणामांबद्दल गैरसमज पसरवल्या जातात. बरेचदा लसीकरण आवश्यक नाही असे सुद्धा सांगितल्या जाते. पुरेशी शहानिशा न करता लोक अशा अफवांना बळी पडतात. गोवर , पोलिओ , डांग्या खोकला , घटसर्प , गालगुंड(मंप्स) , रुबेला ,टीबी, कावीळ(हेपॅटायटिस), काही न्युमोनियाचे जीवाणू, विषमज्वर(टायफॉईड) हे सगळे भयंकर आजार आहेत. ह्या सगळ्यांमुळे आपल्या देशाचे आरोग्य धोक्यात आहे आणि या सगळ्या आजारांविरुद्ध सुरक्षित लसी उपलब्ध आहेत. भारतात आजही विकसित देशांच्या तुलनेत खूप जास्त मृत्यू हे संसर्गजन्य आजारांमुळे होतात. यातील बरेच आजार टाळता येण्यासारखे आहेत. लसीकरण हे यासाठी महत्वाचे शस्त्र आहे. आपण वर बघितलेच की लसीकरणामुळे सामुहिक प्रतिकारशक्ती सुद्धा वाढते. त्यामुळे आपण लसीकरणाला मदत केली तर आपण सामाजिक बांधिलकी सुद्धा जपत असतो!
लसीकरणाबद्दल जागतिक आरोग्यसंघटनेचा संदेश बघू:
- १ )लसीकरण सुरक्षित असते : वापरापूर्वी सुरक्षिततेची खात्री केली जाते.नंतर सुद्धा नियमित आढावा घेतला जातो
- २) लसीकरणामुळे जीवघेण्या आजारांपासून सुरक्षा मिळते.
- ३) लसीकरणामुळे उत्तम प्रतिकारशक्ती तयार होते जी लसीकरणाशिवाय मिळणाऱ्या प्रतिकारशक्ती पेक्षा चांगली असते.
- ४) तीन किंवा पाच आजारांविरुद्ध एकत्रित लसी ह्या सुद्धा सुरक्षित आणि प्रभावी असतात.
- ५) लसीकरण थांबवले तर समाजात कमी झालेले भयंकर आजार लगेच परत येतात. चांगली स्वच्छता आणि पिण्यायोग्य पाणी असले तरीही लसीकरणाशिवाय आजार पसरत राहतात.

आजार आणि मृत्यू कमी करण्यासोबतच लसीकरणाचे इतर फायदे लहान बाळांना होतात. कुपोषण कमी होते. वाढ सुरळीत होते. सुरुवातीच्या महत्वाच्या काळात आरोग्यसेवा मिळते. अँटिबायोटिक्सला प्रतिकार तयार होण्याची शक्यता कमी होते. समाजिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते. हे सगळे लसीकरणाचे अतिरिक्त फायदे आहेत.

लहान मुलांप्रमाणेच मोठ्यानाही लसीकरणाचे फायदे होतात. काही आजार/इन्फेक्शन वयस्कर लोकांमध्ये होतात ते लसीकरणाच्या मदतीने टाळता येतात. वारंवार दवाखान्यात भरती होणे टाळता येते.
लसीकरण हा खूप महत्वाचा विषय आहे. सोशल मेडिया किंवा समाजातील अफवा ऐकून आपण आपले मत बनवू नये. विश्वासू वेबसाईट किंवा पुस्तके वाचावीत. काही शंका असेल तर तज्ञ डॉक्टरांशी चर्चा करावी. आपण एखादी मोठी आर्थिक गुंतवणूक करतो , घर घेतो किंवा मोठी वस्तू विकत घेतो तेव्हा जेवढे सावध असतो, चौकस असतो तसे लसीकरणाच्या बाबतीत असावे असे मला वाटते.
डॉ विनायक हिंगणे