Scroll to top

आरोग्याची रोजनिशी / Health Diary


vinayakhingane - September 23, 2019 - 1 comment

”Data! Data! Data!” he cried impatiently. ”I can’t make bricks without clay.” शरलॉक होम्स च्या तोंडी असलेलं सर आर्थर कोनन डॉयल ह्याचं हे वाक्य खूप महत्त्वपूर्णआहे. माहिती शिवाय कुठल्याही निष्कर्षावर येणं होम्स ला कठीण वाटते . पुरेशा माहितीवरून निष्कर्ष काढणे हा तर्कशुद्ध विचारसरणीचा पाया आहे. आरोग्यासाठी तर हे जास्तच आवश्यक आहे! आपल्या शरीराबाबत जेवढी जास्त माहिती आपल्याला कळेल तेवढे अचूक निदान होते.

डॉक्टर आपल्याला तपासतात. काही प्रश्न विचारतात. काही तपासण्या सांगतात . यावेळी ते आपल्या आरोग्याविषयी माहिती गोळा करत असतात. ही माहिती चांगली मिळाली की निदान आणि उपचार सोपे होतात. विचार करा, जर ह्या कुठल्याही माहिती शिवाय डॉक्टरांना उपचार करावा लागला तर? अंधारात गाडी चालवण्यासारखे होईल. गाडी खड्ड्यात गेल्यावरच कळेल.

जे डॉक्टरांच्या बाबतीत होईल तेच आपल्या बाबतीत सुद्धा होऊ शकते. जीवनशैलीचे बरेच आजार हे लक्षणांशिवाय येतात. डायबेटीस , उच्च रक्तदाब इत्यादी आजार बरेचदा काहीही शारीरिक लक्षणं दाखवत नाहीत. तपासल्यावरच निदान होते. आपण तपासले नाही तर बरेचदा निदानही होत नाही. अशा वेळी आपल्याला कुठले शारीरिक लक्षण नाही म्हणजे आपण निरोगी आहोत हे म्हणणे चुकीचे ठरते. त्यामुळे आपल्या शरीराबद्दल अधिकाधिक माहिती आपल्याला हवी.

आपले वजन, आपल्या नाडीचे ठोके , आपल्या पोटाचा घेर हे सगळे आपण सहज मोजू शकतो. यावरून आपल्या आरोग्याचा अंदाज येतो. आपली रक्तशर्करा म्हणजेच शुगर ची पातळी, कोलेस्टेरोल , रक्तदाब इत्यादी मोजणे सुद्धा सोपे आहे . आपली शारीरिक क्षमता , हृदय -फुफ्फुसाची क्षमता ह्याचा अंदाज आपल्याला आपल्या शारीरिक हालचालींवरून येतो. हे सगळे आपण तपासून बघितले तर त्यावरून आपल्याला आरोग्याची चांगली कल्पना येते. आपल्याला काही धोका असेल तर तो सुद्धा उघड होतो. पण पुष्कळशा लोकांना ह्यातील काहीच माहित नसते. आरोग्याचे काहीही मोजमाप केलेले नसते आणि केले तरीही नोंद नसते. आपण किती धावू शकतो ह्याचा अंदाज सुद्धा बरेच लोक बांधू शकत नाहीत. कारण बरीच वर्षे ते थोडेही धावलेले नसतात. मेडिकल चेक-अप किंवा ऑपरेशन आधी फिटनेस बघताना असा अनुभव बरेचदा येतो की बरेच लोक निरोगी दिसून सुद्धा अनफिट असतात . बऱ्याच लोकांची शारीरिक हालचाल इतकी कमी असते की त्यांच्या शारीरिक क्षमतेचा आढावाच घेता येत नाही. जीवनशैलीच्या आजारांचा धोका ओळखण्यासाठी आपल्या आरोग्याची माहिती गोळा करून त्याची नोंद ठेवणे आवश्यक आहे!

आपल्या जीवनशैलीचे चार महत्वाचे आधारस्तंभ आहेत : आहार , शारीरिक हालचाल , झोप आणि तणाव निवारण . हे आधारस्तंभ जपले तर आजार टाळता येतात. ह्यालाच आपण प्रतिबंध म्हणतो. शिवाय आजार झाले असतील तर ते बरे करण्यासाठी सुद्धा जीवनशैलीचे उपचार महत्वाचे असतात. आपली जीवनशैली कशी आहे हे समजण्यासाठी आपल्याला वरील चारही गोष्टींच्या नोंदी ठेवल्या तर मोठा फायदा होऊ शकतो. आपण किती आहार घेतो व किती व्यायाम करतो ह्याबद्दल लोकांचा अंदाज बरेचदा चुकीचा असतो. वास्तविक आहारापेक्षा कमी आहार सांगण्याकडे आणि वास्तविक व्यायामापेक्षा जास्त व्यायाम करतो असे सांगण्याकडे लोकांचा कल असतो. आहार आणि व्यायामाबद्दलच्या बऱ्याच अभ्यासांमध्ये हे लक्षात आले आहे. आपल्या आहार व व्यायामाची अचूक नोंद ठेवली तरच आपल्याला जीवनशैली चे खरे चित्र दिसते.

आपल्या आहार आणि व्यायामाबद्दल आपला अंदाज बरेचदा चुकतो

आरोग्याची रोजनिशी किंवा डायरी आपल्याला खूप उपयोगी पडू शकते !

  • १. आपल्या आरोग्याची माहिती एका ठिकाणी गोळा होते.
  • २. आरोग्याची माहिती गोळा झाली की आरोग्याचा / तसेच धोक्याचा अंदाज येतो
  • ३. आहार, व्यायाम, झोप आणि ताणतणाव ह्यांचा हिशोब ठेवता येतो.
  • ४. आपली वाटचाल कुठल्या दिशेने होते आहे ह्याचा अंदाज येतो.

आपण आरोग्याच्या रोजनिशी मध्ये आपले वजन , हृदयाची गती, रक्तदाब (बिपी) , शुगर असे महत्वाचे आकडे नियमित भरावेत. हे जेवढ्या नियमित केले तेवढी चांगली माहिती आपल्याला मिळते. याशिवाय रोजच्या आहाराची नोंद करावी . रोज किती तास व्यायम केला आणि किती तास झोप झाली ह्याची सुद्धा नोंद ठेवावी. ह्या सगळ्या नोंदी ठेवताना एकत्र आपण व्ही /डायरी मध्ये लिहून ठेऊ शकतो किंवा आपण मोबाईल मध्ये या सगळ्यांची नोंद ठेऊ शकतो. मोबाईल मध्ये बरीचशी अप्लीकेशन्स (ऍप्स ) आपल्याला याबाबतीत मदत करू शकतात. आपल्या आहारची नोंद ठेवायला आपण जे काही खाऊ त्याचे फोटो ठेवल्यास मदत होते.

आपल्या जेवणाचा फोटो आहाराची नोंद ठेवायला मदत करतो.

मोबाईल ऍप्स मध्ये व्यायाम आणि झोपेच्या नोंदी सुद्धा चांगल्या ठेवता येतात. वेगवेगळे फिटनेस बँड्स किंवा फिट बीट आपोआप मोबाईल मध्ये नोंदी करतात आणि आलेख देतात . यावरून एका नजरेत आपली शारीरिक हालचाल किती झाली किंवा व्यायम किती झाला हे कळते. झोपेची माहिती सुद्धा आलेखाच्या स्वरुपात दिसू शकते. नवीन नवीन तंत्रज्ञाचा फायदा आपल्याला आरोग्याची माहिती ठेवायला होतो. फिट बीट नसेल तरीही मोबाईल मध्ये आपल्या आरोग्याची बरीच माहिती गोळा करता येते.

आधुनिक तंत्रज्ञांचा फायदा आपण करून घ्यावा

आपल्या आरोग्याचा माहितीचा नेहमी मागोवा घ्यावा . आपल्याला सांगितलेला आहार आपण घेतो आहोत की नाही? आपली शारीरिक हालचाल आणि व्यायाम पुरेसे आहेत की नाही? आपण पुरेसे झोपतो आहोत की नाही ? हे सगळे आपल्याला आपल्या डायरीतील माहितीतून कळते. जर आपले प्रयत्न कमी पडत असतील तर त्यात आपल्याला प्रयत्न वाढवता येतात. आपण कमी का पडतो आहोत या विषयी शहानिशा करता येते. उपाय शोधणे सोपे जाते. हा मोगोवा घेताना आपली वाटचाल कुठे सुरु आहे हे सुद्धा आपल्याला कळते. दर आठवड्याला वजन कमी होताना दिसणे , शुगर लेव्हल आणि बिपी नियंत्रणात येताना दिसणे , पोटाचा घेर कमी होताना दिसणे हे खूप मोठे समाधान देते. जीवनशैलीत बदल करणे खूप कठीण असते. चांगला परिणाम दिसायला लागला की मोठे प्रोत्साहन मिळते.

काय केल्याने आपल्याला फायदा होतो आणि काय केले की आपली शुगर वाढते हे बरेच लोकांना डायरी ठेवल्यामुळे कळते. वजनाच्या बाबतीत सुद्धा तेच. त्यामुळे काय करायचे आणि काय टाळायचे हे लोकांना डायरीचा मागोवा घेतल्याने कळते.

आरोग्याची रोजनिशी ठेवण्याचे हे अनेक फायदे आपण बघितले. माहिती गोळा करणे आणि मागोवा घेण्याने जे फायदे होतात त्यापेक्षा निराळा असा एक फायदा डायरी ठेवल्याने होतो. आपल्या जीवनशैलीकडे आपण जास्त जागरूक होतो. आपण आहार , व्यायाम आणि झोप याबद्दल नकळत निर्णय न घेता जाणीवपूर्वक निर्णय घ्यायला लागतो. “आपली झोपायची वेळ झालीय”. “आजचा व्यायाम झालाच नाही , चला एक चक्कर टाकून येऊया “. “आज आधीच गोड खाल्ले आहे, आता नको ” असे विचार मनात येतात . आरोग्यासाठी चांगले पर्याय निवडायला यामुळे मदत होते. थोडक्यात काय तर आपण स्वतः आपले आरोग्य सुधारण्यासाठी प्रोत्साहित होतो. तर तुम्ही ठेवणार ना तुमच्या आरोग्याची रोजनिशी?

डॉ विनायक हिंगणे

Contact Us
close slider

    Discover more from Vinayak Hingane

    Subscribe now to keep reading and get access to the full archive.

    Continue reading

    ×

    Hello!

    Click one of our representatives below to chat on WhatsApp or send us an email to vinayakhingane@gmail.com

    ×