मासिक पाळी, स्तनपान आणि इतर काही

IMG_20160308_134214

जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा! आज आपण पूर्ण जगासोबत महिला दिन साजरा करतोय. समाजात आणि वैयक्तिक पातळीवर महिलांना समान वागणूक व समान अधिकार मिळावेत म्हणून कितीतरी स्त्रीपुरुष झटत आहेत. तरीही आज स्त्रियांना सामाजिक विषमतेला आणि रुढींना सामोरे जावे लागते. ह्या सामाजिक विषमतेचा आणि जाचक रुढी प्रगतीत आणि आरोग्यात अडथळा ठरत आहेत.

काही दिवसांपूर्वी लोकसत्ता मध्ये ‘होय मी बंडखोरी केली’ हा लेख वाचला. त्यात वेगवेगळ्या स्त्रियांनी आपल्या आयुष्यातील संघर्षाचे आणि बंडखोरीचे क्षण लिहिले होते. त्यातील बरेचशे अनुभव हे मासिक पाळीशी संबंधित होते. गेल्या काही दशकातील हे एकत्रित अनुभव ऐकून आपल्या समाजाची कीव येते आणि स्त्रियांना आजही किती त्रासाला सामोरे जावे लागते ह्याची झलक दिसते. मासिक पाळी बद्दल गैरसमज आणि अज्ञान आजकाल व्हाट्सअप आणि फेसबुक सारख्या सोशल मेडिया वरील पोस्ट मध्ये दिसून येते. घरात वेगळी वागणूक, मंदिरात जाऊ नये इत्यादी बंधने अश्या अनेक प्रकारे मासिक पाळीचा बाऊ केल्या जातो. ह्या पद्धती आणि रीती इतक्या रुजल्या आहेत की  ह्या नैसर्गिक वाटाव्या आणि पाळी हा आजार वाटावा. पाळी ही सामान्य नैसर्गिक प्रक्रिया आहे. तो काही आजार नाही किंवा पाळी मुळे कुठलाही आजार पसरत नाही. जगातल्या सर्वच निरोगी स्त्रियांना मासिक पाळी येते. आणि कुठल्याही खुळचट प्रथा न पळता जगणाऱ्या बायका आणि त्यांची कुटुंब व्यवस्थित जगतात. मग आपल्या समाजात अजूनही स्त्रियांना पाळीच्या वेळी अस्पृश्य किंवा साथीच्या रोग्यांसारखं का वागवल्या जातं तेच कळत नाही. बऱ्याचशा स्त्रियांवर ह्या प्रथा लादल्या जातात. ह्याचा मानसिक ताण सहन करणे किंवा त्यांच्या कम्फर्ट झोन च्या बाहेर निघून बंड करणे असे दोन कठीण पर्याय स्रीयांसमोर उरतात. ह्या प्रथांचा संबंध फक्त शिक्षणाशी किंवा अज्ञानाशी नाही. सुशिक्षित लोक जेव्हा ह्या प्रथा कशा बरोबर आणि शास्त्रोक्त आहेत असे सांगतात तेव्हा काय बोलावे! आपली संस्कृती, देवधर्म इत्यादींशी जोडल्यामुळे मासिक पाळीचा संबंध पवित्रता किंवा शुद्धतेशी जोडला गेला आहे. त्यामुळे पाळी अपवित्र समजण्यासारखे गोंधळ होतात. समजत असून सुद्धा धार्मिक गोष्टी म्हणून ह्या प्रथांना कुणी सहसा विरोध करत नाही.थोडीशी जाणीव ठेऊन आणि वैज्ञानिक विचार ठेऊन बघितल्यास आपल्याला कळेल की मासिक पाळी असलेली स्त्री ही एक सामान्य स्त्री असते आणि ती सामान्य स्त्री प्रमाणे सगळं काही करू शकते. मासिक पाळीविषयी प्रथांना फाटा देऊन आपण समाजाच्या आरोग्यासाठी खूप मोठी मदत करू शकतो.

स्तनपान हासुद्धा एक महत्वाचा विषय. मासिक पाळी पेक्षा ह्या विषयाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन थोडा वेगळा आहे. स्तनपान नैसर्गिक म्हणून ते सहज आणि सोपे आहे असा एक मोठा समज आहे. हा समज कसा चुकीचा आहे ह्याचा अनुभव आम्ही दोघांनी इतक्यातच स्वतः अनुभवला. लहान बाळाला आईची आणि आईला बाळाची सवय होणे, बाळाला स्तनाला लावताना पहिले काही दिवस उडणारा गोंधळ, बाळाला पुरेसे दूध मिळते आहे कि नाही इत्यादी अनेक प्रश्न आणि समस्यांना आम्ही सामोरे गेलो. आमच्या इतर डॉक्टर मित्रमैत्रिणींनाही अशाच समस्यांना सामोरे जावे लागले आहे. स्तनपानाविषयी सगळी पुस्तकी माहिती असूनही प्रॅक्टिकल च्या वेळी होणारा गोंधळ हा स्तनपानातील एक अडथळा आहे. अशा वेळी ब्रेस्ट फिडिंग सपोर्ट ग्रुप ची खूप मदत होते. इथे इंग्लंड मध्ये स्तनपान करणाऱ्या स्त्रियांना मदत करायला स्तनपानाविषयी अभ्यास असल्येला व त्याविषयी मदत करण्याचा अनुभव असलेल्या स्त्रिया असतात. त्या अडचण असल्यास प्रत्यक्ष देखरेखीखाली स्तनपान करायला मदत करतात. मुख्य म्हणजे त्यांचे अनुभव सांगून नवीन आईचा आत्मविश्वास वाढवतात. त्यांचे प्रोत्साहन खूप महत्वाचे ठरते. पुढे त्या आईचा पाठपुरावा ठेऊन काही अडचण येत नाही ना ह्याची खात्री करतात. भारतात असे ब्रेस्ट फिडिंग सपोर्ट ग्रुप आहेत पण त्यांची संख्या कमी आहे. स्तनपान नैसर्गिक असले तरीही नविन मातांना सपोर्ट आणि काळजीची गरज असते.ज्यांना स्तनपानाचा अनुभव आहे त्यांनी आपल्या जवळच्या नवीन मातांना स्तनपान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ब्रेस्ट फिडिंग सपोर्ट ग्रुप ला मदत करता येईल किंवा स्वतः असा ग्रुप सुरु करता येईल.शासनानेही ह्या बाबतीत अधिक लक्ष देण्याची गरज आहे. स्तनपाना बाबत इथल्या ब्रेस्ट फीडिंग सपोर्ट टीम शी बोलताना आणखी एक महत्वाचा मुद्दा लक्षात आला. आपल्याकडे स्तनपान न करणाऱ्या आईकडे फारच नकारात्मक नजरेने बघितले जाते. स्तनपानाचे फायदे आई आणि बाळ दोघांनाही होतात आणि हे फायदे खूप आहेत! स्तनपान हा बाळासाठी सर्वोत्तम आहार आहे. पण काही स्त्रिया स्तनपान न करण्याचा पर्याय निवडतात. त्यामागे बरीच कारणे असू शकतात. येथील ब्रेस्ट फीडिंग सपोर्ट च्या लोकांनीं आम्हाला सांगितले की असा निर्णय घेणाऱ्या स्त्रियांचा निर्णय सुद्धा सहज व पूर्वग्रह न ठेवता मान्य केला जातो. स्त्रियांना त्यांचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य तर आहेच पण त्यांच्या निर्णयाचा आदरही तेवढ्याच सहजतेने होतो.आपल्याकडील मासिक पाळीच्या प्रथांपेक्षा अगदी वेगळी अशी ही संकल्पना सुखद वाटते!

गरोदर अवस्थेपासून तर बाळाच्या संगोपणापर्यंत सगळ्याच गोष्टींमध्ये पुरुषांचा समान सहभाग असणे आवश्यक आहे.गरोदरावस्था आणि स्तनपान ह्यांच्या वेळी नेहमीच्या आहारापेक्षा जास्त कॅलोरी आणि अधिक प्रोटिन्स किंवा प्रथिनांची गरज असते. हार्मोन्स मधील बदलांमुळे शारीरिक आणि मानसिक बदल घडत असतात. त्यांना मानसिक आधाराची गरज असते.छोट्या कुटुंबांमध्ये नवीन आईची काळजी घ्यायला कुणी नसते तर काही मोठया कुटुंबांमध्ये नवीन बाळाकडे सगळ्यांचे लक्ष जाऊन आईकडे मात्र दुर्लक्ष होते. नोकरी , व्यवसाय किंवा इतर काम करणाऱ्या स्त्रियांना बाळासोबत घर आणि त्यांचे काम अशा सर्व पातळींवर लक्ष पुरवावे लागते. अशा वेळी पुरुषांनी पुढाकार घेऊन नवीन आईची काळजी घेणे आवश्यक असते. लहानग्यांच्या  संगोपनात पुरुषांची भूमिका खूप मोठी आणि महत्वाची आहे. माझे मित्र, नातेवाईक इत्यादी बरीच पुरुष मंडळी उत्साहाने मुलांच्या संगोपनात सहभागी होताना दिसतात. चूल आणि मूल ही फक्त महिलांची जबाबदारी न राहता दोघेही मिळून हे काम करताना दिसतात. समानते कडे होणाऱ्या वाटचालीचे हे एक लक्षण म्हणता येईल. आपण केलेले छोटे कामही मोठाले बदल घडवू शकतात. जागतिक महिला दिवसाच्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा!

अंतर्दृष्टी

IMG_20150526_184212
चांगल्या डॉक्टरांना त्यांच्या ज्ञानासोबतच बर्याच कौशल्याची गरज असते . त्यातील एक महत्वाचे कौशल्य म्हणजे निरीक्षण . एखाद्या कुशल नजरेमधून खूप महत्वाची माहिती टिपल्या जाते आणि जितकी जास्त माहिती तितके अचूक निदान ! आर्थर कोनन डोयल ह्यांनी आपल्या एका डॉक्टर गुरूंच्या कौशल्याने प्रभावित होऊन शर्लोक होल्म्स चे पात्र उभे केले . आपल्याला आजही छोट्या छोट्या बारकाव्यावरून क्लिष्ट गुन्हे सोडवणाऱ्या व गुपिते उलगडणाऱ्या शर्लोक होल्म्सचे कौतुक वाटते ! शर्लोक होल्म्स चे निरीक्षण कौशल्य आणि त्या निरीक्षणांवरून तर्कसंगत अनुमान काढण्याची क्षमता जबरदस्त आहे. आर्थर कोनन डोयल ह्यांचे गुरुवर्य असेच प्रतिभावंत होते . ते रुग्णाला फक्त बघूनच त्याचा व्यवसाय, त्याचे सामाजिक व आर्थिक जीवन कसे आहे , त्याला काय व्यसने आहेत इत्यादी अचूक ओळखून सगळ्यांना चकित करत . त्याकाळातील इतर डॉक्टरही अशा निरीक्षण कलेत निपुण असत . आजही वैद्यकीय शिक्षणात निरीक्षणासाठी नजर तरबेज करण्यावर बराच भर दिला जातो . पेशंट खोलीत शिरताना पासून त्याचे निरीक्षण करणे आवश्यक असते . तो कसा चालतो , कसा उभा राहतो , कसा बोलतो ह्यावरून वेगवेगळ्या आजारांची लक्षणे ओळखता येतात . धाप लागून एक वाक्यही बोलू न शकणाऱ्याला श्वास घ्यायला त्रास होतोय किंवा पोटावर हात धरून कळवळनाऱ्या रुग्णाच्या पोटात दुखत असेल हे ओळखणे तसे सोपे असते . पण काही लक्षणे ह्यापेक्षा छुपी असतात . चाणाक्ष आणि अनुभवी डॉक्टरांची नजर अशी लक्षणे हेरतात . पण फक्त अशा निरीक्षणातून निदान नेहमीच अचूक होते असे नाही . निदान अचूक होण्यासाठी जास्तीत जास्त माहितीची गरज असते म्हणूनच डॉक्टर तपासणी करतात . हात लावून पोट दाबून बघतात , स्टेथोस्कोप लावून आवाज ऐकून बघतात . बोटांनी ठोकून आवाज करून तपासतात . ह्याला पर्कशन म्हणतात . ही पद्धत ब्यारल मध्ये किती पाणी/द्रव  आहे हे बघण्यासाठी ते ठोकून बघण्याचा क्लुप्तीवरून आली आहे . ह्या सगळ्या तपासण्या शरीराच्या आत काय चालले आहे हे बघण्यासाठी चाललेली धडपड असते . जे डोळ्यांनी दिसत नाही त्याचा अंदाज इतर ज्ञानेद्रीये वापरून करायचा .
शरीराच्या आत काय चालले आहे ह्याचा जितका चांगला अंदाज डॉक्टर बांधू शकेल तितके निदान चांगले होते . म्हणून डोळ्यांसोबतच कान आणि हात कुशल होणे आवश्यक असते . शरीराचे विच्छेदन करून शरीररचना जाणून घेणे किंवा वेगवेगळ्या अवयवांमध्ये काय दोष आहेत हे बघणे सोपे असते . पण जिवंत माणसाच्या पोटात किंवा छातीत काय सुरु आहे हे कसे बघायचे ह्या धडपडीतून तपासणीच्या वेगवेगळ्या कौशल्यांचा जन्म झाला .
ही चिकित्सेची कौशल्ये निदानाच्या प्रक्रियेत खूप महत्वाची असतात . पण त्यांना बऱ्याच मर्यादाही पडतात . कौशल्य हे व्यक्तीनुसार बदलते . काही लोक कमी तर काही जास्त कुशल असू शकतात . एखादे कौशल्य मिळवण्यासाठी बराच काळ मेहनत करावी लागते. तोपर्यंत त्या व्यक्तीला बर्याच चुकांमधून शिकावे लागते. चिकित्सेच्या कौशल्याचे स्वतः चे अनुभव दुसऱ्याला समजावून सांगणे हे सुद्धा एक आव्हानच असते . वैद्यक शास्त्राने ह्या कलेला एका शास्त्रात रुपांतरीत करण्यासाठी खूप प्रयत्न आणि कष्ट केले . तरीही ह्या पद्धतीने केलेले निदान अचूक होण्याची शक्यता कमी असते . अशा वेळी तंत्रज्ञान उपयोगी पडते . वैद्यकशास्त्राने तंत्रज्ञानाचा सढळ हाताने उपयोग केल्याने आजचे जीवन सोपे झाले आहे .
विल्हेम रोएंटजन ह्या जर्मन वैज्ञानिकाने १८९५ मध्ये क्ष किरणांचा शोध लावला आणि एका नवीन वैद्यकीय क्रांतीची सुरुवात झाली . क्ष किरणांच्या मदतीने शरीराचा आत बघण्याची एक नवीन दृष्टी आपल्याला मिळाली. शरीरातील हाडांची परिस्थिती , त्यांना झालेली इजा , फुफ्फुसात झालेला न्यूमोनिया , हृदयाभोवती जमा झालेले पाणी , पोटातील आजार ह्यासारख्या बर्याच गोष्टींचे सरळ फोटोच काढता यायला लागले . अर्थातच आपल्या साध्या डोळ्यांना लगेच कळतील असे हे फोटो नसले तरीही थोड्या सरावाने शरीराच्या आतील अवयव व हाडे ह्यांची खुशाली आपल्याला कळू शकते . क्ष किरणांमुळे निदान सोपे आणि बिनचूक होऊ लागले . शतकानंतर आजही क्ष किरण वैद्यकीय निदानाचा अविभाज्य घटक आहे . क्ष किरणानंतर बऱ्याच कालावधीने सोनोग्राफीच्या किंवा अल्ट्रासाउंड तंत्रज्ञानाचा उपयोग वैद्यक शास्त्रात व्हायला लागला . जे काही अवयव क्ष किरणांनी पुरेसे नीटसे दिसत नव्हते ते सोनोग्राफीने दिसू लागले . क्ष किरणांपेक्षा खुपच सुरक्षित असलेले हे तंत्रज्ञान गरोदर आई आणि बाळांसाठी वरदान ठरले . पोटातील अवयव बघण्यासाठी ह्याचा सढळ उपयोग होऊ लागला . आता शरीराच्या आतील अवयवांचा विडीयो बघणे शक्य झाले . हृदय कसे सुरु आहे हे साक्षात बघणे सहज शक्य झाले .फक्त अवयवांची रचनाच नाही तर अवयवांची क्रिया कशी चालते ह्याची बरीचनवीन माहिती ह्या तंत्रज्ञानाने आपल्याला कळली .आजारांचे निदान आणखी सोपे होऊ लागले .
क्ष किरण आणि सोनोग्राफी सारख्या तंत्रज्ञानालाही मर्यादा आहेत पण त्या मर्यादांसहितही ते खूपच उपयोगी आहे . त्यांनी निदानाची प्रक्रिया इतकी सोपी झाली की कौशल्यांवर विसंबून राहण्याची गरजच थोडी कमी झाली. आता थोडी कमी कौशल्य असेलेले (पण सारखेच ज्ञान असलेले) डॉक्टर उत्तम निदान करू लागले . निदानामध्ये मतभेद होण्याची शक्यता कमी झाली . निदान लवकर आणि बिनचूक होऊ लागले . शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय प्रक्रिया जास्त सुरक्षित झाल्या.
वैद्यकीय ज्ञान , कौशल्ये व आधुनिक तंत्रज्ञान ह्यांच्या समन्वयातून आपण आज गंभीर आजारांवर मात करू शकतो, जटील शस्त्रक्रिया पार पाडू  शकतो आणि अत्यवस्थ रुग्णाचा जीव वाचवू शकतो . ज्ञान, कौशल्ये आणि तंत्रज्ञान ह्यातील कुठल्याही एका बाबतीत हलगर्जी करून चालणार नाही. उपचार हे रुग्णासाठी सुरक्षित असले पाहिजे ह्यावर सगळ्यांचे एकमत आहे . म्हणूनच अनुभवी आणि कुशल डॉक्टर सुद्धा वेळोवेळी तंत्रज्ञान आणि तपासण्यांचा उपयोग करतात . क्ष किरण आणि सोनोग्राफी हे डॉक्टरांचे नवीन ज्ञानेंद्रिय झाले आहे . विकसित देशांमध्ये सगळ्याच डॉक्टरांना सोनोग्राफीचा वापर करायला प्रोत्साहित केल्या जाते . इंग्लंड मध्ये छोट्या वैद्यकीय प्रक्रिया जसे पोटातून किंवा छातीतून पाणी काढणे किंवा मानेतील शिरेतून नळी टाकणे अशा प्रक्रियांसाठी सोनोग्राफीची मदत घेणे अनिवार्य असते . ह्यामुळे रुग्णाला इजा होणाची शक्यता कमी होते . अत्यवस्थ रुग्णांच्या तपासणीमध्ये आणि उपचारात सोनोग्राफी मुळे खूप मदत होते . अगदी मृत्युच्या दाढेतून बाहेर येण्याची संधी रुग्णाला मिळू शकते. उदा: रोड अपघातानंतर रुग्णाच्या पोटात रक्तस्त्राव होत असेल तर तो बाहेरून दिसत नाही . अशा वेळी अपघात विभागात सोनोग्राफी असेल तर लगेच निदान होऊन त्वरित सर्जरी झाल्यास रुग्ण वाचू शकतो . नाहीतर तासभर उशिराने हाच रुग्ण दगावू शकतो .
सोनोग्राफीचा उपयोग जगभरात सर्वत्र रुग्णसेवेसाठी सर्रास केला जात असताना आपल्याकडे मात्र सोनोग्राफी शापित ठरली आहे . गर्भात असताना मुलगी आहे हे ओळखून गर्भपात करण्यासाठी सोनोग्राफीचा वापर करण्यात येतो . हा वेडेपणा आहे . हा वेडेपणा थांबवण्यासाठी शासनाने गर्भाचे लिंगनिदान रोखण्यासाठी कायदा केला . ह्या कायद्यामुळे सोनोग्राफीच्या वापरावर बंधने आली . आज सगळ्याच महत्वाच्या  वैद्यकीय शाखांमधील डॉक्टरांना सोनोग्राफीमध्ये पारंगत असण्याची गरज असताना आपल्याला सोनोग्राफी मशिनी बंद करण्याची वेळ आली आहे . प्रश्न गंभीर आहे  आणि गुंतागुंतीचा आहे . कायदा करूनही स्त्री भृणहत्या होतेच आहे . मुलीचे आणि स्त्रियांचे  हाल होतातच आहेत . मुलगी झाली म्हणून स्त्रीला त्रास देणारे परिवार आपल्याला सगळ्यांना दिसतातच . ह्या लोकांचे प्रमाण कदाचित खूप थोडे असेल . पण अशा लोकांमुळे आपल्या समाजाला मोठा धोका आहे.बर्याच देशांमध्ये गर्भाचे लिंगनिदान हवे असल्यास करून मिळते . लोक आपल्या मुलाची किंवा मुलीची नावे जन्माआधी ठरवतात, बाळासाठी त्यानुसार कपडे आणि खेळणी घेतात , बाळाच्या जन्माच्या आधीच स्वागतासाठी मुलगा असेल तर खोली निळ्या रंगात आणि मुलीसाठी गुलाबी रंगात रंगवतात . मुलगा असो की मुलगी ,बाळाचे स्वागत तितक्याच उत्साहाने करतात . आणि आपल्याकडे मुलींना पोटातच मारून टाकल्या जाते . सोनोग्राफी वर बंधने घालून  ह्या मानसिकतेवर त्यामुळे काही बंधने येतील का हा शंकास्पद मुद्दा आहे. सोनोग्राफी वरील बंधनांमुळे रुग्ण सुरक्षितता मात्र  नक्कीच  धोक्यात येणार आहे . असंख्य रुग्णांना आपण उपचारापासून वंचित ठेवतो आहोत . टाळता येणाऱ्या इजेपासून वाचवण्या ऐवजी धोक्यात टाकतो आहोत . ह्या मुद्द्यांमुळे कदाचित न्यायालय ह्या कायद्यात सुधारणा करेल आणि गर्भलिंगनिदान सोडून इतर सोनोग्राफीचा वापर सोपा व सहज होईल अशी आशा करूया . सोबतच अशा दिवसाची वाट पाहूया की ज्या दिवशी आपल्याला अशा कायद्याची गरजच पडणार नाही .

डायबेटीस व स्त्री आरोग्य .

IMG_5200

मधुमेह हा म्हणावं तर आपल्यासाठी परिचित अन म्हणावं तर अगदी अपरिचित असा आजार आहे . काही वर्षांपूर्वी सधन समाजात किंवा विकसित देशांचा समजला जाणारा हा आजार आज भारतात अगदी सर्रास आढळतो. आज प्रत्येक घरात किंवा निदान शेजारी तरी मधुमेहाचा रुग्ण असतोच. फक्त माधुमेह्च नाही तर त्याच्याशी संबंधित असे बरेचशे प्रश्न आज आपल्याला भेडसावत असतात . मधुमेहामुळे होणारी शारीरिक व आर्थिक हानी  वैयक्तिक पातळीवर न बघता राष्ट्रीय किंवा सामाजिक पातळीवर बघायला गेलो तर मधुमेह हा एक सामाजिक प्रश्न होऊन आपल्या समोर उभा ठाकलाय हे जाणवते. आपल्या ह्या समाजाचा एक मोठा व महत्वाचा भाग म्हणून या संदर्भात  स्त्रियांची एक महत्वाची भूमिका आहे . मधुमेहाने ग्रस्त रुग्णांमध्ये स्त्रियांची संख्या ही जवळपास निम्मी आहे . त्यातही मधुमेहग्रस्त स्त्रीवर्गाचे काही स्वतंत्र असे प्रश्न आहेत व त्यांच्याकडे विशेष लक्ष पुरवण्याची गरज आहे. गरोदरपणातील मधुमेह हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. पण केवळ मधुमेहाचे बळी म्हणूनच स्त्रियांचा ह्या बाबतीत उल्लेख होऊ शकत नाही. प्रत्येक घरात अन प्रत्येक व्यक्तीच्या जीवनशैलीवर स्त्रीचा एक महत्वाचा प्रभाव असतो . मधुमेह हा बहुतांशी जीवनशैलीशी निगडीत आजार आहे . तेव्हा मधुमेहाच्या प्रतिबंधासाठी स्त्रियांचा सहभाग हा अनिवार्य आहे .

मधुमेहाच्या स्त्री आरोग्यातील प्रश्नाकडे बघताना काही पैलू प्रकर्षाने जाणवतात . गरोदरपणातील मधुमेह हा एक तसाच पैलू आहे . हा मधुमेह आपल्या ओळखीच्या माधुमेहापेक्षा जरा वेगळा असून ह्याचे प्रमाण बरेच आहे . पण काही वेळा गरोदरपणातील ह्या महत्वाच्या समस्येकडे खूप दुर्लक्ष् झाल्याचे दिसते . गरोदारावास्थेतील मधुमेह( Gestational Diabetes) ही संकल्पना नेहमीच्या माधुमेहापेक्षा थोडी वेगळी आहे . नेहमीचा मधुमेह (type 2 Diabetes Mellitus)  हा एक जुनाट आजार आहे . एखाद्या व्यक्तीला मधुमेह झाला की तो पूर्ण बरा होत नाही . जीवनशैलीतील बदल व औषधांनी त्याला नियंत्रणात ठेवावे लागते . पण गरोदरपणातील मधुमेह हा फक्त गरोदरपणात दिसतो व बाळंतपनानंतर ठीक होतो व औषधांशिवाय साखरेचे रक्तातील प्रमाण नियंत्रणात राहते . हा या दोन माधुमेहांमधील महत्वाचा फरक आहे . असे असले तरीही गरोदर अवस्थेतील मधुमेहामध्ये साखरेच्या प्रमाणाचे नियंत्रण जास्त काटेकोर ठेवणे हे अत्यंत गरजेचे असते .(कारण बाळाच्या योग्य विकासाचा प्रश्न असतो).गरोदरपणातील मधुमेहाच्या काही रुग्णांना पुढील आयुष्यात नेहमीचा मधुमेह होण्याची शक्यता असते . म्हणून अशा रुग्णांनी जास्त सतर्क राहण्याची गरज असते . गरोदर अवस्थेतील ह्या मधुमेहाविषयी आपण अधिक जाणून घेऊया .

गरोदरपणात स्त्रियांच्या शरीरात बरेच बदल घडतात . ह्यातील काही रासायनिक बदल व संप्रेरका मधील बदल हे गरोदरपणातील इन्सुलिन व साखर ह्यांच्यावर परिणाम करतात . अशा वेळी शरीरातील साखर व इन्सुलिन ह्यांचे संतुलन अगदी नाजूक होऊन जाते . काही वेळा हे संतुलन ढळते आणि इन्सुलिनचा प्रभाव कमी पडू लागतो . अशा वेळी रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्यपातळी  पेक्षा जास्त वाढते व आपण त्याला मधुमेह म्हणतो . आईच्या रक्तातील साखरेचे अशा प्रकारे वाढलेले प्रमाण हे बाळाच्या आरोग्यासाठी घातक असते . ह्यामुळे बाळाच्या शरीरात व्यंग निर्माण होऊ शकते. बाळाचा आकार व वजन जास्त वाढून त्यामुळेही त्रास होण्याची शक्यता असते. असे बाळ जरी गुटगुटीत दिसत असले तरी ते निरोगी नसून अशक्त असते . कधी कधी तर आईच्या पोटातच बाळाचा मृत्यू होण्याचा धोका अशा स्थितीत असतो. आईच्या रक्तातील साखरेचे वाढलेले प्रमाण हे आईच्या आरोग्यासाठी सुद्धा त्रासदायकच असते. म्हणून आईच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहणे हे आवश्यक असते . ह्या साठी गरोदर स्त्रियांची नियमित तपासणी होणे आवश्यक असते  . डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे रक्ताची तपासणी करून आजारांचे निदान करून घेणे कधीही उत्तम . गरोदरपणातील मधुमेहाचे निदान करण्यासाठी ग्लुकोज टोलरंस  टेस्ट नावाची तपासणी केली जाते . ज्या गरोदर स्त्रियाचे वय हे पंचवीस वर्षांपेक्षा जास्त आहे, ज्या लठ्ठ आहेत  किंवा ज्यांच्या जवळच्या नातेवाईकांना मधुमेह आहे त्यांनी अशी तपासणी आवर्जून करावी .(कारण अशा स्त्रियांमध्ये गरोदरपणातील मधुमेहाचे प्रमाण जास्त आढळते)

गरोदरपणातील मधुमेह हा जरी त्रासदायक असला तरी त्याला फार घाबरून जाण्याचे कारण नाही. जर ह्या मधुमेहाचे योग्य वेळी निदान झाले तर वेळीच साखरेचे नियंत्रण करून धोका पूर्णपणे टाळता येतो . बरेचदा तर आहारातील पथ्य व व्यायाम अशा जीवनशैलीतील बदलही साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेसे ठरतात . जर ह्या बदलानंतरही साखर नियंत्रणात आली नाहीतर औषधींचा वापर करता येतो .बाळाची वाढ बघण्यासाठी आजकाल अद्ययावत अशा सुविधा उपलब्ध झाल्या असून त्याची आपल्याला अशा वेळी फार मदत होते. वेळीच निदान झाल्यास अशा रुग्णांची बाळंतपणे अगदी सामान्य स्त्रियांप्रमाणे होतात . आपल्याकडे गरोदरस्त्रीला सल्ला देणारी बरीच मंडळी असते . ह्यातील बर्याच लोकांना गरोदरपणातील मधुमेहाविषयी काहीच कल्पना नसते . त्यामुळे निदान होऊनही त्याकडे दुर्लक्ष होते किंवा उपचारात दिरंगाई होते . अशा वेळी मात्र बरेचशे दुष्परिणाम रुग्णाला व बाळाला भोगावे लागू शकतात . म्हणूनच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, आहाराची पथ्ये काटेकोर पाळणे , नियमित व्यायाम व औषधे ह्यांना पर्याय नाही हे लक्षात ठेवावे .

गरोदर अवस्थेतील माधुमेहानंतर आपण वळूया नेहमीचा मधुमेह किंवा कमी वयात येणाऱ्या मधुमेह असणाऱ्या स्त्रियांकडे . आजकालच्या काळात मधुमेहाचे प्रमाण बरेच वाढले असून कमी वयातही स्त्रिया मधुमेहाने  ग्रस्त असतात . त्याचप्रमाणे  काही महिलांमध्ये थोडी उशिरा गर्भधारणा होते . अशा वेळी स्त्रीला मधुमेह आहे व तिला गर्भधारणा होण्याची शक्यता किंवा इच्छा आहे अशी परिस्थिती निर्माण होते . ह्या परिस्थितीत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे . रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात नसेल तर गर्भाच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात अडथाडे येतात . गर्भाच्या वाढीचा सुरुवातीचा काळ हा अतिशय संवेदनशील असतो . साखरेचे अनियंत्रित वाढलेले प्रमाण हे बाळामध्ये व्यंग निर्माण होण्यास कारणीभूत होऊ शकते . म्हणून गर्भधारणे पूर्वी आईच्या शरीरातील साखरेचे प्रमाण काटेकोर नियंत्रित असावे . इच्छुक जोडप्याने डॉक्टरांचा सल्ला घेऊन साखर नियंत्रित असताना बाळाचे प्लानिंग करावे . गर्भ राहिल्यानंतर पहिल्या दिवसांमध्ये नियमित तपासणी करून साखर नियंत्रणात राहते आहे ना याची खात्री करून घ्यावी . सगळ्या माधुमेहाप्रमाणे इथेही आहार , नियमित व्यायाम व औषधे ही त्रिसूत्री महत्वाची ठरते . आईची नियमित तपासणी जशी आवश्यक आहे तसेच पोटातील बाळाची सोनोग्राफी द्वारे तपासणी डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घ्यावी . बाळाला काही गंभीर व्यंग असल्यास त्याची माहिती अशा वेळी कळते .

गर्भावास्थेमध्ये वरील दोन्ही प्रकारच्या मधुमेहात दिली जाणारी औषधे ही तज्ञ डॉक्टरांनी दिलेली असावी . अशी औषधे बाळावर कुठलाही वाईट परिणाम करत नाहीत . बरेचदा गरोदार्पनामध्ये कुठलीही औषधे घेऊ नये अशी समजूत असते व त्यामुळे अत्यावश्यक औषधे  घ्यायला रुग्ण नकार देतात . या औषधांप्रमाणेच फोलिक असिड सारखी काही औषधे बाळामध्ये वाढीसाठी आवश्यक असतात . त्याचप्रमाणे इतर काही आजार किंवा आहार सत्वांची कमतरता आढळल्यास डॉक्टर त्याचाही उपचार करतात . अशी औषधे घेताना कुरकुर करू नये . मधुमेह ग्रस्त आईच्या बाळाला काही काळ जास्त देखरेखीची गरज असते . अशा बाळांमध्ये साखरेचे प्रमाण अचानक कमी होण्याची शक्यता असते . डॉक्टर अशा बालांवर लक्ष ठेऊन असतात व वेळीच उपचार करतात .

गर्भावास्थेशिवाय महत्वाचा दुसरा एक पैलू म्हणजे स्त्रियांमध्ये दिसून येणारे मधुमेहाचे दुष्परिणाम . भारतामध्ये स्त्रियांचे आरोग्य म्हटले की स्त्री रोग हाच एक विषय प्रामुख्याने पुढे येतो . मधुमेहासारखा आजार हा स्त्रि आरोग्यावर एक गंभीर संकट म्हणून उभा आहे ह्याचा आपल्याला विसर पडतो. आज मधुमेहाच्या रुग्णांपैकी पन्नास टक्के महिला असतात . पण तरीही हा काही बायकांचा आजार नाही असा समज महिलावर्गात काहीसा दिसतो . साधारण वयाच्या चाळीशी नंतर काही तपासण्या नियमित करून घेणे उत्तम .(जसे की साखरेची तपासणी,बी पी , ई सी जी , कोलेस्तेरोल इत्यादी ). ह्या तपासण्याही करून घेण्यास स्त्रियांचा सहभाग कमी असल्याचे बरेच ठिकाणी दिसून येते.

मधुमेह हा कुठल्याही एका कारणामुळे होणारा आजार नाही. बरीचशी गुंतागुंतीची कारणे एकत्र येऊन मधुमेह होतो . आपल्याला  कळलेल्या कारणांपैकी काही महत्वाची कारणे किंवा धोक्याची लक्षणे  म्हणजे चुकीची जीवनशैली, स्थूलता, शारीरिक व्यायामाचा अभाव, उच्च रक्तदाब  व काही प्रमाणात अनुवांशिक दोष . यातील बरेचशी  धोक्याची लक्षणे आज महिला वर्गात दिसून येतात. स्त्रियांचे काम हे कष्टाचे नसून घरकाम आहे असा एक अतिशय चुकीचा समज  काही ठिकाणी प्रचलित असल्यामुळे स्त्रियांना शारीरिक व्यायामाची गरज असते ह्याकडे दुर्लक्ष होते. आज पुरुषांच्या व्यायामाच्या अभावाकडे जेवढे लक्ष वेधले गेले  तेवढे कदाचित स्त्रीयाच्या  व्यायामाच्या अभावाकडे गेले नाही. व्यायामा व्यतिरिक्त स्त्रियांच्या आहार आणि ताणतणाव ह्या बाबतीत घरातील सगळ्यांचेच दुर्लक्ष होते .कधी कधी स्त्रियांची जीवनशैली ही त्यांच्या स्वतःसाठी दुय्यम असते व त्यांची प्राथमिकता  घरातील इतरांची जीवनशैली सुधारण्यासाठी असते की काय  असे वाटते. आपल्या जीवन शैलीतील हे दोष मधुमेहाला आमंत्रण ठरू शकतात. स्त्रियांच्या बाबतीत पी सी ओ डी हा आजार किंवा गरोदरपणातील मधुमेह ही सुद्धा धोक्याची लक्षणे असतात . आपण भारतीय एक सकट बाकी (युरोपिअन किंवा अमेरिकन ) लोकांपेक्षा जास्त मधुमेहाला बळी पडतो . ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपल्या आजूबाजूच्या कितीतरी स्त्रियांना मधुमेह होण्याचा धोका आहे हे आपल्या लक्षात येईल! पण असा विचार करून काळजी घेणाऱ्या महिला आणि पुरुष अगदी विरळ .

मधुमेहामुळे स्त्रियांच्या आरोग्यावर बरेच दुष्परिणाम होतात . त्यातील सगळ्यात काळजीचा म्हणजे हृदयरोग . मधुमेही रुग्णांपैकी स्त्रियांना पुरुषांपेक्षा हृदयरोगाचा धोका जास्त असतो . कधी कधी अशा महिला रुग्णांमध्ये हृदयविकाराची लक्षणे सौम्य प्रकारची दिसतात व त्याकडे दुर्लक्ष होते . लक्षणे सौम्य असली तरीही आजार गंभीरच असतो व उपचार उशिरा झाल्यामुळे किंवा न झाल्यामुळे गंभीर परिस्थिती ओढवते . मधुमेही महिला रुग्णांमध्ये हृदयाशी संबंधित इतर आजारही बर्याच प्रमाणात आढळतात . बैठेकाम किंवा घरकाम करताना बरेचदा शारीरिक मेहनत होत नाही . अशा वेळी हृदयविकाराची लक्षणे दिसत नाहीत .  मला फक्त मधुमेह आहे आणि साखर नियंत्रित राहते म्हणून मी डॉक्टरांकडे जात नाही अशी वृत्ती घातक ठरू शकते . मधुमेहामध्ये फक्त साखरेची तपासणी न करता डॉक्टरांच्या सल्याने बाकी तपासण्याही नियमित करून घेणे जरुरीचे असते .

मधुमेहाच्या स्त्री रुग्णांना होणारा आणखी एक महत्वाचा त्रास म्हणजे वारंवार होणारा जंतुसंसर्ग . योनीमार्गात किंवा लघवीच्या मार्गात वारंवार जळजळ किंवा सूज येणे व ती लवकर बरी न होणे, ताप येणे   अशी लक्षणे काही महिलांमध्ये दिसतात . ह्या लक्षणांची  लगेच काळजी घेतल्यास निदान होऊन उपचार होण्यास मदत होते . फंगल किंवा बुरशीजन्य संसर्ग होण्याचे प्रमाणही मधुमेहाच्या रुग्णांमध्ये खूप असते . त्वचेचा जंतुसंसर्ग किंवा जखमेत होणारा जंतुसंसर्ग हे सुद्धा बरेचदा दिसून येतात .ह्या सगळ्या जन्तुसंसार्गावरचा उपचार प्रारंभिक अवस्थेत  सहज शक्य असतो . पण जंतुसंसर्ग पसरल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते . म्हणून त्रास अंगावर काढणे टाळावे . मधुमेही गरोदर स्त्रियांच्या बाबतीत तर ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते . कारण योनीमार्गात किंवा लघवीच्या मार्गातील जंतुसंसर्ग उपचार न केल्यास गर्भाशयापर्यंत जावू शकतो व आई आणि बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो.

मधुमेह हा जीवनशैलीशी संबंधित आजार आजार आहे तसेच तो पूर्णपणे बरा होणारा आजार नसून त्याला नियंत्रणात ठेवावे लागते .हे करताना जीवनशैलीतील बदल खूपच महत्वाचे  असतात . स्त्रियांचा ह्या संदर्भातील दृष्टीकोन हा आपया चर्चेचा शेवटचा पण कदाचित सगळ्यात महत्वाचा पैलू आहे . स्त्री चा परिवारातील इतर व्यक्तींच्या जीवनशैलीवर बराच प्रभाव असतो .  आहार हा मधुमेहाच्या उपचारातील तसेच प्रतिबंधातील महत्वाचा दुवा आहे . आणि म्हणूनच स्वयंपाकघर हे मधुमेहाच्या उपचाराचे खूप महत्वाचे साधन आहे . इथेही स्त्री ची भूमिका फार महत्वाची आहे . एक जागरूक स्त्री केवळ स्वतःचा नाही तर संपूर्ण परिवाराचा मधुमेहापासून बचाव करू शकते . घरातील जेवण समतोल असल्यास मधुमेहींना पथ्य पाळणे सोपे जाते तसेच परिवारातील इतरांच्या आरोग्यासाठी ते उत्तम असते . आहाराप्रमाणे औषधांबाबत उदासीनता ही एक मोठी गोष्ट आहे .  ही उदासीनता कधी आर्थिक कारणांमुळे येऊ शकते . काही घरांमध्ये स्त्रियांना आजही आर्थिक स्वातंत्र्य नाही हि आपल्यासाठी खेदाची गोष्ट आहे . कधी कधी समाजातील मधुमेहाच्या पगड्यामुळे स्त्रिया उपचार घ्यायला कचरतात . शहरात ही परिस्थिती कमी असली तरी ग्रामीण अशा गोष्टी सरार्स घडताना दिसतात . औषधांची भीती , त्यातल्या त्यात इन्सुलिन विषयीची भीती व गैरसमज हा एक फार मोठा घटक असतो .मधुमेहातील आहार व औषधांविषयी अधिक माहिती ह्या लेखात देणे शक्य नाही ह्या बाबतीत दिलगीर आहे. पुढील काही लेखांमध्ये त्या विषयावर चर्चा करूया .

मधुमेहाविषयी व त्याच्या उपचाराविषयी समाज म्हणून आपण अंधारातच आहोत . आणि अंधाराची जशी भीती वाटते तशी तसेच आपण मधुमेहाला घाबरून आहोत . मधुमेहाविषयी थोडी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आहे . कदाचित मधुमेहाचा रुग्ण म्हणून किंवा रुग्णाचे नातेवाईक म्हणून सामना करताना जरा धीर येईल अशी आशा करतो . तुमच्या प्रतिक्रिया किंवा शंका असल्यास आवर्जून पाठवा .