नववर्षाचा संकल्प


दरवर्षी डिसेंबर अखेरीस आरोग्यासाठी “न्यू इयर रिझॉल्युशन” करणाऱ्यांची संख्या मोठी असते. आरोग्याचे हे संकल्प  पूर्ण होणारे नसतात असा एक समज रूढ आहे. हा समज काही प्रमाणात खरा असला तरी असे संकल्प महत्वाचे असतात असं माझं मत आहे. आहारात बदल  किंवा नियमित व्यायाम करणं सोपं नाही. बऱ्याच अपयशी प्रयत्नांनंतर काही लोक यशस्वी होतात. आपली जीवनशैली सुधारण्यासाठी ‘संकल्प’ ही पहिली पायरी आहे. असा संकल्प करणाऱ्यांना प्रोत्साहन आणि सकारात्मक उदाहरणांची मदत होते. यासाठी  गेली दोन वर्षे मी माझ्या माहितीतील काही उदाहरणं देण्याचा प्रयत्न केला आहे. यावर्षी सुद्धा हा प्रयत्न मी सुरु ठेवणार आहे.  जीवनशैलीतील बदल केल्याने लोकांना फायदा कसा झाला ह्याबद्दल पुढील दोन गोष्टी आहेत. नवीन वर्षासाठी काही संकल्प करायचा असेल तर सुरुवात कुठून करायची हा प्रश्न बरेचदा पडतो. जीवनशैलीतील तीन महत्वाचे घटक म्हणजे आहार , शारीरिक हालचाल आणि झोप. ह्या तिन्ही बाबतीत आपल्याला सुधारणा करता येऊ शकतात. तुम्ही तुमच्या जीवनशैलीचा आढावा घेऊन गरजेनुसार आवश्यक ठिकाणी बदल करू शकता. मला ज्या दोन व्यक्तींच्या गोष्टी सांगायच्या आहेत त्या गोष्टी सुद्धा मी तीन भागात सांगणार आहे.

आपल्या गोष्टींचे दोन नायक आहेत विजय हिंगणे आणि प्रशांत भटकर. हे दोघेही आपल्यासारखेच सामान्य आहेत. विजय हिंगणे हे वयाच्या चाळीशीत असलेले ,आरोग्य विभागात काम करणारे . सर्वसाधारण भारतीय  जेवण आणि शिस्तबद्ध दिनचर्या. नियमित योगा करण्याची सवय. नेहमीच्या लठ्ठपणाच्या व्याख्येनुसार ते लठ्ठ नाहीत. वडिलांना टाईप २ डायबेटीस असल्यामुळे डायबेटीस होण्याचा धोका थोडा जास्त आहे हे त्यांना माहित होतं. त्यामुळेच काही वर्षांपूर्वी डायबेटीसचे निदान झाल्यावर मोठा धक्का बसला नाही. त्यांनी वैद्यकीय सल्यानुसार आहारात बदल केले. जेवण विभागून ३ वेळा सुरु केले आणि गोड पदार्थ बंद केले. योगा नियमित सुरु होता. रक्तातील साखरेची पातळी ह्यामुळे काही काळ नियंत्रणात आली. पण तीन महिन्यांपूर्वी केलेले HbA1C ७.८ असे दिसले. रक्तातील ट्रायग्लीसेराइड ह्या वाईट कोलेस्टेरोल ची पातळी खूप जास्त ४१३ एवढी दिसली. हे घटक काळजीचे होते. याशिवाय काही त्रास सुद्धा व्हायचे. खूप कडाडून भूक लागायची. जेवणाची वेळ झाली की अगदी थोडा उशीरही सहन होईना. दिवसभर थकवा जाणवायचा. शरीरात काही शक्ती नाही असे त्यांना वाटायचे. सतत आळस वाटायचा. अशी सगळी परिस्थिती बघितल्यावर मी त्यांच्या जीवनशैलीतील घटक सखोल तपासून बघितले.

प्रशांत वयाने अधिक तरुण. वय ३१. पोटाचा घेर वाढला आणि वजन वाढत चालले म्हणून त्याला काळजी वाटायला लागली. सॉफ्टवेअर मध्ये नोकरी म्हणजे ताणतणाव आणि अनियमित दिनचर्या. शारीरिक व्यायम कमी. वाढलेल्या वजनासोबत रक्तात वाईट कोलेस्टेरोल ट्रायग्लीसेराइड ३३२ एवढं  वाढलेलं दिसलं. शारीरिक त्रास जाणवत नसला तरी आपल्याला वजन तातडीने कमी करायला हवं हे त्याला समजत होतं. नोकरी आणि रुटीन मध्ये आरोग्यासाठी वेळ मिळणे अशक्य आहे असं त्याला वाटायला लागलं होतं. गुलाबजाम, गाजराचा हलवा आणि पेढे हे प्रशांतचे अगदी आवडीचे पदार्थ! इतर आवडीचे पदार्थ सुद्धा लठ्ठपणा वाढवायला कारणीभूत होतील असे होते. त्यामुळे वजन कमी करायला जास्तच त्रास. प्रशांतला वजन कमी करायला आहारासोबत इतर घटकांमध्ये सुद्धा बदल करण्याची गरज आहे असं मला दिसलं.

दोघांचेही प्रश्न वेगवेगळे होते. दोघांचेही ध्येय वेगवेगळे होते. विजय ह्यांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करायची होती. प्रशांतला वजन म्हणजेच पोटावरील चरबी कमी करायची इच्छा होती. ह्या दोन्ही ध्येयांसाठी आपण त्यांना औषधी देऊ शकलो असतो. पणऔषधी देण्याआधी जीवनशैलीत पुरेसे बदल करायला हवे. विजय आणि प्रशांत ह्या दोघांनाही मी काही बदल सुचवले. यातून जर फायदा झाला नाही तर औषधीची मदत घेऊ असं ठरलं. दोघांनीही बदल करण्याचा निश्चय केला. आपल्यापैकी काही लोकांना आरोग्याचे असेच छोटे-मोठे प्रश्न भेडसावत असतात. यातील बरेच प्रश्न जीवनशैलीत बदल केल्यावर सुटतात. आहार , शारीरिक हालचाल आणि झोप ह्याबद्दल नवीन वर्षात आपण काय बदल करू शकतो ते आपण बघू.

आहार :

आरोग्यासाठी आहारात बरेच वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करता येतात. वेगवेगळ्या ध्येयासाठी वेगवेगळे उपाय वापरता येतात. प्रत्येक व्यक्तीला एकाच उपायाने वेगवेगळ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. म्हणून आपल्याला एक उपाय किंवा मार्ग निवडून त्याने फायदा होतो का हे तपासून बघायला हवं. आहाराचे असे वेगवेगळे अनेक उपाय तुम्ही ऐकले असतील. त्यातून तुम्हाला आवडणारा आणि सोयीचा असेल असा मार्ग निवडावा.

 • माझ्या आवडीचे काही मार्ग:
 • आहारातील उर्जा (कॅलरी )कमी करणे
 • आहारातील प्रक्रिया केलेली कर्बोदके (प्रोसेस्ड कार्बोहायड्रेट) कमी करणे, प्रथिने व इतर चांगले घटक वाढवणे . ह्याने आहाराचे संतुलन सुधारता येते
 • कच्चे, हिरवे आणि कमी प्रक्रिया केलेले पदार्थ वाढवणे
 • मध्ये मध्ये खाणे (स्नॅकिंग ) टाळणे किंवा नाश्त्यासाठी चांगले पदार्थ निवडणे
 • तळलेले पदार्थ, शीतपेय, मिठाई फास्टफूड असे पदार्थ टाळणे.

वरील पैकी एक किंवा सगळे मार्ग तुम्ही निवडू शकता. जर काही ठराविक ध्येय असेल तर वैयक्तिक नियोजन करता येते. विजय आणि प्रशांत ह्यांच्यासाठी आम्ही सोयीनुसार आहार ठरवला. दोघांचेही ट्रायग्लीसेराइड हे वाईट कोलेस्टेरोल वाढले होते. त्यामुळे आहारातील कर्बोदके कमी केल्याने फायदा होईल अशी अपेक्षा होती. शिवाय डायबेटीस नियंत्रणात आणायला सुद्धा कर्बोदके कमी केल्याने फायदा होतो. विजय ह्यांच्या आहारात बाहेरचे पदार्थ जवळपास नव्हतेच. रोजचं जेवण जेवून सुद्धा साखरेची पातळी आणि कोलेस्टेरोल नियंत्रणात नव्हते. त्यामुळे रोजच्या जेवणात कर्बोदके कमी करायची असं ठरलं. पोळ्या आणि भात खूप कमी करून मोड आलेली कडधान्ये वापरायला सुरुवात केली. प्रशांतने बाहेर जेवण आणि गोड पदार्थ कमी केले. त्याच्या रोजच्या जेवणात सुद्धा पोळी , भात आणि बटाटा असे पदार्थ कमी झाले. दोघांच्याही रोजच्या जेवणात कच्च्या पालेभाज्या , फळभाज्या , मोड आलेली कडधान्ये, दही आणि उसळी ह्यांचे प्रमाण वाढले. वरण नियमित खायला लागले. ह्यातून कर्बोदकांचा अतिरिक्त ताण कमी झाला आणि आहाराचे संतुलन सुधारले. प्रथिने वाढली, जीवनसत्वे वाढली आणि आहारतील विविधता वाढली. विजय हे आधी तीन वेळा जेवायचे. त्यातील एक जेवण त्यांनी बंद केलं आहे. आता दोन वेळा जेवतात व मध्ये इतर काही खाणे टाळतात. प्रशांत नाश्त्यामध्ये फळे खातो. जेवणात कर्बोदके कमी केली आहेत आणि चांगले पदार्थ वाढवले आहेत.

दोघांच्याही आहारात केलेले बदल ढोबळ नाहीत. ठरवून केलेले विशिष्ट बदल आहेत . दोघांनाही असा आहार पाळणं शक्य आहे असं वाटल्यावरच हा आहार सुरु केला. त्याआधी काही शंका होत्या त्याबद्दल चर्चा करून त्या शंका सोडवल्या. (उदा: कर्बोदके तर आवश्यक असतात मग पोळी भात कमी केली तर त्रास होणार नाही का ? ह्याचं उत्तर आहे की पोळी भात कमी केल्याने आरोग्याला त्रास होत नाही. या जेवणात आपण डाळी , उसळी, मोड आलेली कडधान्ये , फळे इत्यादींच्या स्वरुपात कर्बोदके घेतोच. पण ही कर्बोदके पोळी भात बटाटा ह्यापेक्षा बरी कशी असतात ह्याची चर्चा केली.) या सोबतच बाहेर खायची वेळ आली तर काय खाता येईल , मध्येच भूक लागली तर काय करता येईल अशा प्रश्नांवर चर्चा झाली. दोघांनीही त्यांचा आहार काटेकोरपणे पाळला. त्यांना आहार पळताना कुठलाही त्रास जाणवला नाही. भूक अनावर होणं किंवा थकवा येणं असं काहीही झालं नाही. उलट भूक कमी लागायला लागली आणि उत्साही वाटायला लागलं असं दोघेही सांगतात.

शारीरिक हालचाल:

शारीरिक हालचाल हा आरोग्याचा मोठा महत्वाचा भाग आहे. आपण पुरेशी हालचाल करत नाही आणि सलग खूप वेळ बसून राहतो. सलग बसून राहणे हे धुम्रपाना इतकेच धोकादायक आहे. विजय आणि प्रशांत ह्या दोघांनाही शारीरिक हालचाल वाढवण्याची गरज होती. दोघांनीही त्यांच्या दैनंदिनी मध्ये सहज बसवता येतील असे व्यायाम सुरु केले सलग बसून राहणे टाळण्यासाठी काही उपाय केले.

विजय ह्यांनी सकाळी धावणे सुरु केले व योगासने सुरु ठेवली. योगासनांमुळे स्नायू बळकट व्हायला मदत होते तर धावल्याने हृदय व फुफ्फुसाचा व्यायाम (कार्डीओ ) होतो. याशिवाय ऑफिसला जाण्यासाठी मोटरसायकलऐवजी सायकल चा वापर सुरु केला. कम्प्युटरवर काम करताना उभे राहून काम करायला सुरुवात केली. दर जेवणानंतर थोडा वेळ शारीरिक हालचाल होईल याकडे लक्ष दिले. यामुळे दिवसभर थोड्या थोड्या वेळाने काहीतरी शारीरिक हालचाल होऊ लागली. एवढी शारीरिक हालचाल वाढल्यावर त्यांना अजून उत्साही वाटायला लागलं.

प्रशांतचा व्यायम पूर्णपणे बंद होता. वजन कमी करायचं असं ठरवल्यावर नियमित व्यायम सुरु केला. सध्या तो आठवड्यातील ३ दिवस योगासने शिकतो. बाकी दिवस व्यायाम करतो. यासाठी तो स्मार्टफोन वर असलेलं एक अॅप वापरतो. ऑफिस मध्ये बैठे काम असते पण तो दर अर्धा तासाने उठतो. सलग बसून राहणे टाळायचा तो पूर्ण प्रयत्न करतो. व्यायामासाठी प्रशांतला रोज वेळ काढावा लागतो पण त्यामुळे त्याची ‘एनर्जी लेव्हल वाढली ‘ असं तो म्हणतो. व्यायामासाठी एवढा वेळ देणं हे नक्कीच फायद्याचं आहे असं तो म्हणतो.

प्रशांत ऍप ने सुचवलेला असा व्यायाम करतो

झोप:

झोप हा बरेच लोकांच्या आयुष्यातला दुर्लक्षित विषय असतो. आपल्याला साधरणतः आठ तास झोपेची गरज असते. झोप अपुरी पडली तर लठ्ठपणा आणि डायबेटीस चा धोका वाढतो असं शास्त्रीय अभ्यासात दिसून आलं आहे. आपण जर दिवसा पलंगावर आडवं झालो आणि लगेच झोप लागली तर समजायचं की आपली झोप अपुरी होतेय. विजय आणि प्रशांत ह्या दोघांशी बोलल्यावर माझ्या असं लक्षात आलं की दोघांनाही जास्त झोपेची गरज आहे.

विजय ह्यांचा असा समज होता की लवकर उठणे हे आरोग्यासाठी चांगले असते. पण झोप अपुरी झाली तर त्याचा जास्त वाईट परिणाम होऊ शकतो हे कळल्यावर त्यांनी कधी उठायचं ह्यापेक्षा झोप पूर्ण होऊ देण्यावर भर दिला. आता ते ७ ते ८ तास झोप होण्यासाठी लवकर झोपतात. प्रशांतने सुद्धा झोप पुरेशी होण्याकडे काटेकोर लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. झोप अपुरी झाली तर आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो ह्याची त्याला अधो जाणीव नव्हती.

आहार झोप आणि नियमित व्यायाम ह्यांचा परिणाम विजय आणि प्रशांत ह्यांच्या आरोग्यावर कसा झाला ते आता आपण बघू. गेल्या चार महिन्यात विजय ह्यांचे वजन ५ किलो कमी झाले आहे पोटाचा घेर ६ सेमी कमी झाला आहे. त्यांचे HbA1C ७.८ वरून कमी होऊन ५.१ झाले आहे. याचाच अर्थ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आली आहे. triglyceride ४१३ वरून १६८ एवढे कमी झाले आहे. हिमोग्लोबिन आधी १३.५ होते ते आता १४.३ आहे.प्रशांतचे वजन सहा महिन्यात ७ किलो वजन कमी झाले आहे. पोटाचा घेर ४ सेमी इतका कमी झाला. trigycerides ३३२ वरून १८२ झाले.


दोघांनाही आधीपेक्षा जास्त उत्साही आणि तजेलदार वाटायला लागले. विजय ह्यांना आधी जे त्रास होते ते बरे झाले. हे सगळे जीवनशैलीतील बदल केल्यामुळे झाले. त्यांच्या जीवनशैलीतील बदलांचा काही त्रास सुद्धा झाला नाही.

आपल्या जीवनशैलीत सकारात्मक बदल केले तर खूप मोठे फायदे होतात. हे फायदे आपण मोजून बघू शकतो. नवीन वर्षात तुम्ही सुद्धा हे करू शकता. यशस्वी उदाहरणांतून आपल्याला बरंच काही शिकता येतं. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण आपलं आरोग्य सुधारू शकतो. नवीन वर्षात आरोग्यासाठी संकल्प नक्की करा. हे संकल्प पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. हा संकल्प अगदी छोटा असला तरी चालेल. आपल्या प्रयत्नांचा काही फायदा होतो आहे का हे तपासून बघा! नवीन वर्ष तुम्हाला आरोग्यदायी आणि भरभराटीचे जावो ही शुभेच्छा!


डॉ विनायक हिंगणे

या लेखासारखे काही लेख
https://wp.me/p5MKAn-iS

https://wp.me/p5MKAn-cN

https://wp.me/p5MKAn-iC

जीवनशैलीचे आजार: एक चित्र

लठ्ठपणा आणि जीवनशैलीचे आजार ह्यांचा संबंध फार घनिष्ट आहे. डायबेटीस, उच्च रक्तदाब, हृदयरोग ह्या सगळ्यांसाठी धोकादायक असलेले जीवनशैलीचे घटक आणि लठ्ठपणासाठी धोकादायक घटक सारखेच आहेत. चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली , अपुरी झोप, अखंड ताणताणाव इत्यादी महत्वाचे धोक्याचे घटक आहेत. लठ्ठपणा म्हणजेच वाढलेली चरबी ! ही कधी कधी दिसते तर कधी अदृश्य (म्हणजे पोटात लपलेली )असते . ही वाढलेली चरबी जीवनशैलीचे आजार होण्यासाठी मोठा हातभार लावते. चरबी ही फक्त उर्जा साठवणारी पेशी नाही. चरबी हा एक अवयव आहे. शरीरातील हार्मोन आणि रसायनांवर ती परिणाम करते. यातूनच बिपी वाढते, इंसुलीनला प्रतिकार निर्माण होतो. डायबेटीस व हृदयरोग होण्याचा धोका वाढतो. शरीरातील चरबी (मुख्य म्हणजे पोटातील अवयवांमध्ये जमा झालेली चरबी) कमी झाली की ह्या सगळ्या बाबतीत सुधारणा दिसते. डॉ रॉय टेलर ह्यांच्या युके मधील प्रयोगात १५ टक्के वजन कमी झाल्यावर लोकांचे बिपि आणि डायबेटीस औषधांशिवाय नियंत्रणात आल्याचे दिसले होते.

जीवनशैलीचे हे घटक आपला लठ्ठपणाचा आणि आजारांचा धोका वाढवतात. हे एखाद्या चोरीसारखे असते. घर जर वस्तीपासून दूर असेल, अंधाऱ्या ठिकाणी असेल, घराला बराच काळ कुलूप असेल , कुलूप कमकुवत असेल तर अशा ठिकाणी चोरी होण्याची शक्यता जास्त असते. चोरी जरी चोरच करत असले तरी कुठल्या घरी चोरी होईल हे घरफोडी कुठे सोपी आहे यावरून ठरते. आपल्या आरोग्याचेही असेच आहे. आपली जनुकीय व शारीरिक रचना आजार होण्यासाठी महत्वाची असली तरी आपल्या जीवनशैलीतले धोक्याचे घटक आपल्याला आजार होईल की नाही हे ठरवतात. एकदा चोरी झाली की आपण चोरी का झाली ह्याचा विचार करून कमकुवत दुवे शोधून ते मजबूत करतो. सुरक्षिततेचे अधिक उपाय वापरतो व घर अधिक सुरक्षित करतो. आरोग्याच्या बाबतीत सुद्धा हेच आहे. आपल्या पोटातील चरबी वाढली किंवा जीवनशैलीचा आजार झाला तर आपल्या जीवनशैलीत कमकुवत दुवे शोधायचे. पण त्यासोबतच इतर दुवे अधिक मजबूत करायचे. उदा: एखाद्याची शारीरिक हालचाल कमी असेल व तेच लठ्ठपणाचे कारण असेल तर आपण शारीरिक हालचाल वाढवणे योग्य. सोबतच व्यायाम करणे, आहाराचा उपचार म्हणून वापर करणे आणि झोप सुधारणे हे सगळे केल्यास लठ्ठपणा लवकर बरा होतो व इतर आजार टळतात. आपल्या नाकातोंडाशी पाणी आल्यावर आपण आपल्याला उपलब्ध सगळे उपाय आपण वापरायला हवेत.

(येत्या आरोग्यज्ञानेश्वरी मधील थोडासा भाग. हे चित्र जीवनशैलीचे आजार सोप्या पद्धतीने समजाऊन सांगण्याचा प्रयत्न आहे )

चित्रकला: माझे वडील ,चित्तरंजन हिंगणे

डॉ विनायक हिंगणे

पोटाचा घेर : एक जीवनावश्यक माप

आरोग्याच्या बाबतीत काही तपासण्या ह्या अगदी सोप्या असतात आणि त्या काहीही खर्च न करता होऊ शकतात. आपल्या पोटाचा घेर ही सुद्धा अशीच एक तपासणी आहे. तपासणी म्हणण्याचं कारण म्हणजे हे मोजमाप आपल्याला आरोग्याबद्दल एका तपासणी एवढी महत्वाची माहिती देते. एवढं महत्वाचं असूनही हे मोजमाप थोडं दुर्लक्षिलेलं आहे . पोटाचा घेर मोजावा अशी जाणीव फारशी पॉप्युलर नाही. पोटाचा घेर किती असावा ह्याबद्दल सर्वसाधारण जनतेला फारशी कल्पना नसते असं क्लिनिकमध्ये बरेचदा दिसून येतं. पोटाचा घेर आणि आरोग्याचा काही संबंध नाही अशी खूप लोकांची कल्पना असते. तर काही लोक असं समजतात की ढेरी दिसणं हे आरोग्याचं आणि समृद्धीचं लक्षण आहे. ह्या सगळ्या बाबतीत वैद्यकीय दृष्टीकोन कसा आहे ते आपण थोडं समजून घेऊया.

(पोटाचा घेर म्हणजेच waist circumference. ह्याला बरेचदा कमरेचा घेर सुद्धा म्हटल्या जाते.)

 • पोटाची चरबी आणि आजार ह्यांचा संबंध:

आपल्या शरीरात चरबीचं प्रमाण वाढलं की बऱ्याच आजारांचा धोका वाढतो. उच्च रक्तदाब , डायबेटीस, हृदयरोग , स्ट्रोक आणि कॅन्सर हे काही महत्वाचे आजार आहेत जे होण्याचा धोका चरबी वाढली की वाढतो. आपल्या शरीरात चरबी बऱ्याच ठिकाणी वाढू शकते. पोटाभोवती वाढलेली चरबी ही त्यातल्या त्यात धोक्याची समजली जाते (ह्यात पोटातील अवयव जसे लिव्हर , आतडी आणि स्वादुपिंड ह्यात साठवलेली चरबी सुद्धा आलीच). जगभरातील संशोधनात हा मुद्दा वारंवार स्पष्ट झाला आहे. त्याशिवाय पोटाची चरबी कमी झाली की आजारांचा धोका कमी होतो आणि आजार नियंत्रणात येतो हे सुद्धा संशोधनात दिसून आलं आहे. प्रो रॉय टेलर ह्यांनी केलेल्या एका महत्वाच्या अभ्यासात शास्त्रज्ञांनी असं दिसलं आहे की लिव्हर आणि पॅनक्रीया (स्वादुपिंड) ह्यांच्यातील चरबी कमी झाली की डायबेटीस नियंत्रणात येतो.

चरबी ही फक्त साठलेली उर्जा नसून तो एक अवयव आहे. चरबीच्या पेशी आपल्या शरीरातल्या हार्मोन्स आणि रसायनांवर परिणाम करतात. वाढलेल्या चरबीमुळे हार्मोन्स आणि रसायनांच्या कामात अडथळा निर्माण होऊ शकतो. एक उदाहरण म्हणजे इन्सुलिनच्या कामात अडथळा निर्माण होतो. ह्याला इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात. ही डायबेटीसच्या आधीची पायरी असते. भारतीय वंशाच्या लोकांमध्ये असा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. आपली शारीरिक आणि जनुकीय रचना अशी आहे की युरोपीय वंशाच्या लोकांपेक्षा आपल्या शरीरातील आणि त्यातल्या त्यात पोटातील चरबीचं प्रमाण अधिक असते. युके मध्ये झालेल्या एका अभ्यासात त्यांना असं दिसून आलं की वय ८ ते ११ च्या गटात पोटाचा घेर सारखा असला तरी युरोपीय वंशाच्या मुलांपेक्षा भारतीय वंशाच्या मुलांमध्ये इन्सुलिन ची पातळी खूप जास्त होती. म्हणजेच आपण वाढलेल्या चरबीच्या वाईट परिणामाला लवकर बळी पडतो. अर्थातच भारतीय जनतेत सुद्धा काही लोकांना वाढलेल्या चरबीचा धोका इतरांपेक्षा जास्त असतो.

 • पोटाचा घेर:

पोटाची चरबी वाढली की पोटाचा घेर वाढतो. त्यामुळे धोकादायक चरबी मोजण्याचा अगदी सोपा उपाय म्हणजे पोटाचा घेर मोजायचा. पण हे शास्त्रीय दृष्ट्या खरं आहे का? पोटाचा घेर इतर कारणांनी सुद्धा वाढू शकतो. बऱ्याच आजारांमध्ये वेगवेगळ्या कारणांनी पोटाचा घेर वाढतो. गरोदर अवस्थेत पोटाचा घेर वाढतो. पण असे काही अपवाद सोडले तर निरोगी व्यक्तीच्या पोटाचा घेर हा वाढलेल्या चरबीचं लक्षण असतो हे खरं आहे.

भारतीय लोकांमध्ये पोटाची चरबी आणि आजार ह्यांचा संबंध तपासून बघणारे अभ्यास भारतात आणि विकसित पाश्चात्य देशांमध्ये सुद्धा झाले आहेत. अशा अभ्यासांमध्ये शरीरातील चरबी मोजण्यासाठी शास्त्रीय दृष्ट्या अचूक पण थोड्या महागड्या अशा तपासण्या केल्या जातात. (उदा डेक्झा स्कॅन , एम आर आय इत्यादी ). ज्यांच्या पोटाची चरबी जास्त असते त्यांच्या शरीरात इन्सुलिन रेझिस्टन्स आणि आजारांचं प्रमाण सातत्याने जास्तआढळलं आहे. पोटाचा घेर आणि आजारांचा संबंध सुद्धा असाच घनिष्ट असल्याचं दिसलं आहे. त्यामुळे किचकट आणि महाग तपासण्या करण्याऐवजी पोटाचा घेर मोजण्याचा उपाय सोपा आणि स्वस्त आहे.

वजन आणि बॉडी मास इंडेक्स (बी एम आय ) ही इतर महत्वाची मोजमापं आहेत. ही सुद्धा वाढलेल्या चरबीचा अंदाज देतात. पोटाचा घेर हा जास्त धोकादायक चरबी विषयी अंदाज देतो म्हणून तो विशेष आहे. पोटाचा घेर हा एक स्वतंत्र सूचक आहे. चरबी शी संबंधित आजारांचा धोका तो इतर मोजमापांशिवाय सांगू शकतो. उदा : बॉडी मास इंडेक्स नॉर्मल असेल पण पोटाचा घेर जास्त असेल तरीही आपल्याला आजारांचा धोका जास्त असतो. अशा वेळी बॉडी मास इंडेक्स वाढायच्या आधीच आपण धोका ओळखून सावध होऊ शकतो.

 • पोटाचा घेर किती असावा ?

प्रत्येक व्यक्तीसाठी निरोगी असा पोटाचा घेर वेगळा असू शकतो. म्हणजे एखाद्यासाठी ९५ सेमी हा घेर निरोगी असू शकतो तर एखाद्यासाठी तोच घेर त्रासदायक ठरू शकतो. मग आपण कसं ठरवायचं की आपल्यासाठी पोटाचा घेर किती असेल तर चांगला?

भारतात आणि परदेशात झालेल्या अभ्यासांमध्ये मिळालेल्या माहितीतून तज्ञांनी भारतीय वंशाच्या स्त्री आणि पुरुषांसाठी पोटाचा सामान्य घेर ठरवला आहे. हे ठरवताना घेर किती वाढला की धोका मोठ्या प्रमाणात वाढतो हे लक्षात घेऊन कट-ऑफ ठरवले गेले. जागतिक पातळीवरच्या संघटना आणि भारतीय तज्ञ सगळ्यांनी एकमताने मान्य केलेले आकडे म्हणजे :

 • पुरुषांच्या पोटाचा घेर ९० सेमी पेक्षा कमी हवा
 • स्त्रियांच्या पोटाचा घेर ८० सेमी पेक्षा कमी हवा

भारतीय तज्ञांच्या समितीने एक पत्रक २००९ मध्ये प्रकाशित केलं. त्यात त्यांनी वरील आकड्यांपेक्षा जास्त पोटाचा घेर असल्यास वैद्यकीय सल्ला घेण्यास सुचवले आहे. चरबी शी संबंधित आजार आणि धोक्याचे घटक तपासून घ्यावेत आणि गरज असल्यास उपचार घ्यावा असे ते सुचवतात. ह्यासोबतच ते आणखी एक सल्ला देतात.

ज्या पुरुषांचा पोटाचा घेर ७८ सेमी पेक्षा जास्त आहे आणि ज्या स्त्रियांचा पोटाचा घेर ७२ सेमी पेक्षा जास्त आहे त्यांनी आपले वजन आणि पोटाचा घेर अधिक वाढी नये यासाठी काळजी घ्याची. आहार नियंत्रित ठेवावा आणि नियमित व्यायाम करवा .ह्याबाबतीत अधिक संशोधनाची गरज आहे असे ते म्हणतात.

अशाप्रकारे धोक्याच्या दोन पातळ्या आहेत. पोटाचा घेर थोडा वाढला (पुरुष ७८ सेमी च्या वर आणि स्त्रिया ७२ सेमी च्या वर ) तर सतर्क व्हायला हवं. पण जर पोटाचा घेर जास्त वाढला (पुरुष ९० सेमी आणि स्त्रिया ८० सेमी ) तर आपण जास्त काळजी घ्यायला हवी व वैद्यकीय सल्ला घ्यावा. वर उल्लेख केल्या प्रमाणे काही भारतीय लोकांना इतर भारतीय लोकांपेक्षा आजारांचा धोका जास्त असतो (उदा आपल्या आई-वडील किंवा भावंडाना डायबेटीस असल्यास आपल्याला डायबेटीस होण्याचा धोका इतरांपेक्षा जास्त असतो). अशा वेळी आपण पहिल्या पातळीवर सतर्क झालेलं उत्तम. आपल्या जीवनशैलीत इतर धोक्याचे घटक असतील (उदा बैठी जीवनशैली , व्यायामाचा अभाव, धुम्रपान , चुकीचा आहार इत्यादी ) तरी सुद्धा आपण लवकर सावध झालेलं योग्य.

पोटाचा घेर हे मोजमाप ‘मेटॅबॉलिक सिंड्रोम’ ह्या परिस्थितीचं निदान करण्यासाठी वापरण्यात येणारा एक मापदंड आहे. मेटॅबॉलिक सिंड्रोम असेल तर हृदयरोगाचा धोका जास्त असतो. पुढील मापदंडा पैकी ३ किंवा जास्त असतील तर त्याला मेटॅबॉलिक सिंड्रोम म्हणतात.

 1. पोटाचा घेर पुरुष ९० सेमी पेक्षा जास्त , स्त्रिया ८० सेमी पेक्षा जास्त
 2. उपाशीपोटी रक्तातील ग्लुकोजची पातळी १०० पेक्षा जास्त
 3. रक्तदाब >१३५/>८५
 4. रक्तातील triglyceride पातळी १५० mg/dl पेक्षा जास्त
 5. रक्तातील HDL हे चांगले कोलेस्टेरॉल पुरुष ४० mg/dl पेक्षाकमी आणि स्त्रिया ५० mg/dl पेक्षा कमी

ह्यावरून पोटाचा घेर हा धोक्याचा किती महत्वाचा सूचक आहे ते लक्षात येईल. थोडक्यात म्हणायचं झालं तर आपल्याला धोक्याचे इतर घटक असतील तर आपल्याला पोटाच्या घेराकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे.

 • अतिरेक नको:

पोटाचा घेर आपण शरीरातील जास्तीची चरबी आणि आजार ह्यांच्या संबंधात बघतो आहोत. आदर्श शरीरयष्टी कशी असावी ह्याबद्दल ही चर्चा नाही. पोटाचा घेर खूप कमी म्हणजे आपण खूप निरोगी असा त्याचा अर्थ नाही. शरीरातील चरबी खूप कमी करणे, डायट फॅड किंवा जास्त उपास करणे ह्यांचे दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतात. कुपोषण आणि जीवनसत्वांची कमतरता ह्यांचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे पोटाच्या घेराबाद्द्ल विचार करताना ह्या गोष्टी लक्षात घ्याव्यात. वजन कमी करताना वैद्यकीय सल्ला घेतल्यास उत्तम. विशेषतः तरुण मुलामुलींनी पोटाचा घेर, चरबीचे प्रमाण , शरीरयष्टी अशा गोष्टींकडे कॉस्मेटिक म्हणून न बघता संपूर्ण आरोग्याचा विचार करावा.

 • पोटाचा घेर कमी कसा मोजावा?

पोटाचा घेर म्हणजेच waist circumference. ह्याला बरेचदा कमरेचा घेर सुद्धा म्हटल्या जाते. हा घेर मोजताना आपल्या कमरेच्या हाडाच्या थोडं वर (आकृतीत दाखवल्या सारखं) मोजावा. माप घेताना व्यक्ती उपाशी पोटी असावी. व्यक्ती सरळ उभी राहून समोर बघत असायला हवी. माप घेणारी व्यक्तीने समोर बसून नजरेच्या पातळीवर माप घ्यावं. माप घेताना ताणला न जाणारा टेप वापरावा. असं केल्यास अचूक माप घेता येईल.

 • पोटाचा घेर कमी करण्यासाठी काय करता येईल?

पोटाचा घेर कमी करायला टीव्ही किंवा सोशल मेडिया वर ज्या काही जाहिराती येतात त्यातल्या बहुतेक दिशाभूल करणाऱ्या असतात. काही व्यायाम केल्यावर ढेरी लगेच गायब होईल, ४ आठवड्यात ढेरी घालवा इत्यादी सुचवणारे उपाय सुद्धा उपयोगी ठरत नाहीत.

पोटाचा घेर कमी करण्यासाठी योग्य उपाय म्हणजे जीवनशैलीत योग्य ते बदल

 1. आहार नियंत्रण, योग्य आहार
 2. नियमित व्यायाम
 3. शारीरिक हालचाल वाढवणे
 4. पुरेशी झोप
 5. ताणतणाव नियंत्रण

ह्या सगळ्यांचा फायदा होऊ शकतो. शरीरातली वाढलेली चरबी कमी होताना पोटाचा घेर कमी होतो आणि तेच आपल्याला अपेक्षित आहे. वैद्यकीय सल्ला घेऊन आपण इतर धोक्याचे घटक आहेत का ते तपासून बघू शकतो. वजन कमी करताना आपल्याला कुठल्या उपायाची गरज आहे हे डॉक्टर आपल्याला सुचवू शकतात. प्रश्न जास्त गंभीर असेल तर औषध उपचार किंवा बॅरीअॅट्रीक सर्जरी इत्यादी सुद्धा मदत करू शकतात.

जीवनशैलीशी निगडीत आणि चरबीशी निगडीत आजार हे लवकर ओळखल्या गेले तर त्यातून होणारी गुंतागुंत टाळता येते.त्यामुळे अगदी सोपा, फुकट तपासता येणारा आणि महत्वाचा मापदंड आपण वापरायला हवा या मताचा मी आहे. मोठी ढेरी हे आरोग्याचं प्रतिक नाही असं वैद्यकीय दृष्टीकोन सांगतो.

(लहान मुलांसाठी आणि किशोरवयासाठी पोटाचा घेराबाबत मापदंड आणि मार्गदर्शक तत्वे वेगळी आहेत. बालरोगतज्ञांकडून सल्ला घ्यावा)

डॉ विनायक हिंगणे

आरोग्याचा निर्धार

आपल्या ओळखीच्या, अगदी जवळच्या व्यक्ती बरेचदा खूप प्रेरणादायी असं काहीतरी करून जातात. आपल्या आयुष्याच्या धकाधकीत आपल्याला ते जाणवतही नाही. पण जेव्हा जाणवतं, तेव्हा मिळालेली प्रेरणा खूप मोठी असते! आरोग्याच्या बाबतीत ही अशी जवळच्या लोकांकडून मिळालेली प्रेरणा खूप महत्वाची असते. आरोग्याविषयी आपली वागणूक आपल्या आजूबाजूच्या लोकांवर अवलंबून असते असं बरेचदा दिसतं. जीवनशैली, आहार, डॉक्टरांची निवड, उपचारशैली इत्यादी अनेक बाबतीतील निर्णयांवर आपल्या जवळील लोकांच्या विचारसरणीचा प्रभाव असतो. आज मी तुम्हाला माझ्या ओळखीच्या दोन व्यक्तींची गोष्ट सांगणार आहे. हे दोघेही सामान्य आहेत आणि त्यांनी केलेलं कामही अगदीच असामान्य आहे असेही नाही. पण त्यांच्या सामान्य असण्यामुळे ते सगळ्याच वाचकांना जवळचे वाटतील असे आहेत. दोघांनीही गेल्या दीड-दोन वर्षांत बरंच वजन कमी केलं आहे आणि कमी केलेलं वजन टिकवून ठेवलं आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक रिझोल्युशन घेतले जातील आणि त्यांची टिंगलही होईल! यातील अनेक निश्चय यशस्वी होतील आणि अनेक बारगळतील. माझ्या मते निश्चय करणे ही बदलाची पहिली पायरी असते. लोक ह्या निमित्ताने सुरुवात तरी करतात. त्यांचं मनोबल टिकून राहावं ह्याकरता पुढील दोन गोष्टी. ह्या दोन्ही व्यक्तींकडे बघितल्यावर एक कळतं की वजन कमी करण्यासारखं कठीण काम सुद्धा चिकाटी असली की पूर्ण होऊ शकतं. ते सुद्धा फार खर्च न करता व औषधांशिवाय.

पहिली गोष्ट माझ्या काकांची. गोपाळराव हिंगणे. ते शेगावला राहतात आणि इतक्यातच मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाले. शिक्षक म्हणून ते अगदी मनापासून काम करत व आदर्श शिक्षक होते.पुढे मुख्याध्यापक झाले. कामाचा ताण व रोजच्या जीवनात गुंतून गेल्यामुळे आरोग्यासाठी विशेष लक्ष देता आले नाही. शारीरिक हालचाल कमी झाली व वजन हळूहळू वाढत गेले. पोटाचा घेर वाढला पण आपल्याकडे त्याला सुखी माणसाचं लक्षण म्हणतात म्हणून थोडं दुर्लक्ष झालं. बघता बघता वजन 82 किलो झालं…

जवळपास 2 वर्षांपूर्वी काकांना ह्या वाढलेल्या वजनाचा परिणाम प्रकृतीवर होताना स्वतः लाच जाणवायला लागला. हालचालींचा वेग मंदावला, जिना चढताना एक मजला चढल्यावर धाप लागायला लागली आणि आपल्या पोटावर आपण वजन घेऊन फिरतोय असं जाणवायला लागलं. पोटावरील हा चरबीचा घेर कमी करायलाच हवा हे काकांना कळलं. भावांना डायबेटीस असल्यामुळे तो धोका आपल्याला सुद्धा आहे याची काळजी त्यांना होतीच. आपले त्रास वाढण्याआधीच आपण पावलं उचलायला हवीत असं त्यांनी ठरवलं. वाढलेल्या चरबीसोबत आपल्याला डायबेटीस, बीपी , हृदयरोग असे अनेक आजार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे काका जो विचार करत होते तो अगदी बरोबर होता. एक मुख्य बाब म्हणजे काकांना वाढलेल्या वजनाचा शारीरिक त्रास जाणवला. अनेकांना तो जाणवत नाही. अशा वेळी रक्ताच्या तपासण्या केल्यावर कळतं की प्रोब्लेम होतोय. बरेचदा तर प्रॉब्लेम झाल्यावरच लक्षात येतं की चरबी वाढली आहे.

काकांनी ह्यासाठी काय केलं?

काकांना प्रॉब्लेम वेळेत ध्यानी आला आणि त्यांनी सगळ्यात पहिले डॉक्टरांचा सल्ला घेतला. रक्ताच्या तपासण्या ठीक आल्या. डायबेटीस नव्हता व बीपी सुद्धा नॉर्मल होते. काकांची काळजी थोडी कमी झाली. काकांनी आहारात बदल सुरू केले.

काका शाकाहारी आहेत. आधी त्यांचं रोजचा आहार म्हणजे सकाळी 6 ते 7 पोळ्या आणि भाजी असा ब्रँच करून ते कामाला निघायचे. दुपारचे जेवण नसायचे. त्याऐवजी दुपारी उशिरा हॉटेलमध्ये/कँटीन मध्ये काहीतरी खात असत. संध्याकाळी दोन भाकरी आणि भाजी. दिवसातून दोन तीन वेळा ते कपभर दूध साखर घालून प्यायचे. त्यांच्या जेवणाचं विश्लेषण केलं तर दुपारचं बाहेरचं खाणं हा त्यांच्या आहारातील सगळ्यात घातक भाग होता. बाकी जेवण हे आपल्या नेहमीच्या जेवणासारखे होते. गावाकडे जेवण हे पोळी किंवा भाकरीच्या संख्येत मोजल्या जाते. जेवणातील इतर घटकांकडे हवे तेवढे लक्ष दिल्या जात नाही. काकांच्या बाबतीतही तेच व्हायला लागले. दोन्ही वेळेच्या जेवणात तृणधान्यांचे प्रमाण जास्त होते.

पुढील दीड-दोन वर्षात काकांनी आहारात बरेच बदल केले. एका वेळेच्या खाण्यात पोळ्या, पांढरा भात, भाकरी ह्यांचे प्रमाण अतिशय जास्त असले की खान्यानंतर रक्तातील साखरेचे व इन्सुलिनचे प्रमाण जास्त वाढते. असे जर वारंवार झाले तर शरीरातील चरबी वाढायला सुरुवात होते. काकांनी त्यांचे जेवण विभागून घ्यायला सुरुवात केली. एक वेळी 6ते 7 पोळ्या खाण्याऐवजी ते दोन वेळा 2 पोळ्या खायला लागले. त्याशिवाय त्यांनी सकाळी नाश्त्यासाठी गाजर, गोबी , पालक इत्यादी भाज्या कच्च्या खायला सुरुवात केली. त्यामुळे पोळ्यांचे प्रमाण कमी करून सुद्धा भूक नियंत्रित रहायला मदत झाली. याशिवाय आहारातील विविधता वाढली आणि आहार चौरस झाला. संध्याकाळच्या जेवणात सुद्धा भाकरीचे प्रमाण कमी झाले.2 ऐवजी 1 भाकरी खाऊ लागले. काकांना तर्रीची भाजी (म्हणजे जास्त तेल असलेली भाजी) आवडायची. ती सुद्धा आहारातून वजा केली. दुधात साखर घालणे बंद केले आणि जेवणात वरून मीठ घेणे बंद केले. तळलेले पदार्थ आधी बरेचदा घरी खाण्यात यायचे. त्यांच प्रमाण सुद्धा काकांनी खूप कमी केलं. काकांचा आहार हळूहळू बदलला पण जे बदल झाले त्यामुळे काकांचा आहार संतुलित झाला.

काकांनी आहाराशिवाय इतर काही बदल केले का?

माझे काका दोन वर्षांपूर्वी रोज जवळपास 4 किलोमीटर फिरत असत. पण त्यांच्या चालण्याचा वेग हळू असे. वजन कमी करायचं असं ठरवल्यावर त्यांनी रोजचं फिरणं वाढवलं. आता त्यांचं चालणं हा व्यायाम असतो. ते दम लागेल अशा वेगात चालतात आणि रोज जवळपास 7 किलोमीटर चालतात. ते रोज सूर्यनमस्कार आणि 40 बैठका असे स्नायू बळकट करणारे व्यायाम करतात. वैद्यकीय सल्ल्यानुसार आठवड्यातून कमीत कमी 150 मिनिटं मध्यम तीव्रतेचा व्यायाम व कमीतकमी 3 दिवस स्नायू बळकट करणारे व्यायाम करणे आरोग्यासाठी आवश्यक असते. काका ह्यापेक्षा जास्त व्यायाम करतात व त्याचाच फायदा वजन कमी करण्यासाठी झाला. ह्याशिवाय काकांनी रोजची शारिरीक कामं वाढवली आहेत. त्यांच्या शेतातील छोटी छोटी काम ते स्वतः अधिक प्रमाणात करू लागले आहेत. त्यांच्या मते घरातील व शेतीतील कामं हातावेगळी होतात व शारीरिक हालचाल सुद्धा वाढते. ही शारीरिक हालचाल वाढल्याने दुहेरी फायदा होतो. वैद्यकीय दृष्ट्या सुद्धा दुहेरी फायदा होतो. व्यायामशिवाय जी हालचाल वाढते त्यामुळे ऊर्जा तर जाळल्या जातेच पण स्नायूंचा इन्सुलिनला प्रतिकार कमी होतो. ह्याने वजन कमी व्हायला मदत होते असे आढळले आहे.

काकांचे वजन 82 किलोग्रॅम वरून कमी होत आता 65 किलोग्रॅम झाले आहे. पोटाचा घेरही खूप कमी झाला आहे. स्टॅमिना वाढला आहे व चपळता वाढली आहे. अर्थातच हा पोटावरील चरबी कमी करण्याचा प्रवास अगदी सोपा आणि सरळ नव्हता. काका आवर्जून सांगतात की पहिले 10 किलो वजन अगदी सहज कमी झाले. पण त्यानंतर वजन कमी होताना बराच वेळ आणि प्रयत्न लागले.

हा वेळ देण्याची आणि प्रयत्न सुरू ठेवण्याची चिकाटी काकांना कुठून मिळाली हे मी त्यांना विचारलं. दुसरा एक प्रश्न माझ्या मनात होता की वजन कमी करण्याचे इतके उपाय जाहिराती, व्हाट्सएपच्या माध्यमातून आपल्या समोर येतात. त्यांना बळी पडून आहार व व्यायाम सोडून देण्याची इच्छा काकांना झाली नसेल का? काकांनी मला त्यांच्या वारीची गोष्ट सांगितली. काका पंढरपूर वारी ला निघाले. वारीमध्ये रोज खूप चालावं लागायचं. एक दिवसात सरासरी 20 ते 25 किलोमीटर चालणं व्हायचं. एखाद्या दिवशी तर 30 किलोमीटर. ह्या काळात आहार अगदी कमी होता. पातळ कालवण व पोळी किंवा भाकरी हे जेवण दोन वेळा असायचं. नाश्ता बंद.त्यामुळे उपास घडला आणि शारीरिक श्रम बरेच झाले. काकांचं वजन झपाट्याने कमी झालं. अगदी बघितल्यावर कळेल असा फरक झाला. मग घरी परत आल्यावर घरचे नेहमीचे जेवण सुरू झाले. आता आपण फारच थकून भागून घरी आलोय म्हणून काही दिवस व्यायामाला सुट्टी मिळाली. ह्याचासुद्धा मोठा नाट्यमय परिणाम झाला. 8 दिवसांत वजन 4 किलोग्रॅम ने वाढलं. त्यामुळे आहारावर नियंत्रण + व्यायाम ह्यांचा फायदा आणि ते न करण्याचा तोटा दोन्ही गोष्टी काकांना अतिशय ठळकपणे जाणवल्या. त्यातून त्यांना पुरेसं प्रोत्साहन मिळालं आणि ते अजूनही नियमित व्यायाम करतात व आहारावर नियंत्रण ठेवतात.

17 किलोग्रॅम वजन कमी करण्यासाठी काकांना कुठलंही औषध लागलं नाही व काहीही खर्च लागला नाही. ते काही अतिरिक्त कामं स्वतः करू लागले व बाहेरील खाणं कमी झालं. त्यामुळे झाल्यास थोडी बचतच झाली असं म्हणावं लागेल. आरोग्याला झालेला फायदा मात्र खूप मोठा आहे.

दुसरी गोष्ट:आता आपण सिद्धेश ची गोष्ट बघूया. सिद्धेश पंडित हा माझा मित्र इंजिनिअर आहे. तो सध्या अमेरिकेत मिशिगन येथे काम करतो. त्याची जीवनशैली ही आपल्याकडील बहुतांशी शहरी तरुण लोकांसारखी झालेली. नवीन जॉब अमेरिकेत मिळाला. कामात प्रचंड ताणतणाव होता पण सुरुवातीला उत्साहात 14 ते 15 तास सलग काम करायचा. कामाला दिवसरात्रीची मर्यादा नसायची. झोप कमी व्हायला लागली. ताणतणाव व कमी झोपेचा आहारावर व आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. सिद्धेशच्या बाबतीत सुद्धा हे झालं. व्यायाम बंद पडला. खाण्या-पिण्यावर काहीच नियंत्रण राहिलं नाही. त्याचं वजन 2015 च्या सुरुवातीस 200 पाऊंड(जवळपास 91किलोग्रॅम) झालं. कमरेचा घेर वाढून 38 इंच झाला. बी एम आय 29.4 झाला. याचाच अर्थ सिद्धेश लठ्ठ झाला होता. तो आजारीही पडला. तपासण्या केल्यावर त्याला कळलं की त्याच बीपी 138/90असं आहे. पुन्हा तपासल्यावर सुद्धा ते जवळपास ह्याच पातळीत रहायचं. म्हणजे बीपी थोडसं वाढलेलं होतं.कोलेस्टेरॉल जरी नॉर्मल असलं तरी कोलेस्टेरॉल रेशो 5.1 होता. अगदी 30 वर्षे वयाच्या आत जर अस काही घडलं तर पुढे हृदयविकार व इतर आजार होण्याची शक्यता वाढते. सिद्धेशला हा धोका कळला! आपलं आयुष्य आता आपल्याला नियंत्रित करण्याशिवाय काही पर्याय नाही हे त्याला कळलं. सुरुवात म्हणून त्याने नवीन जॉब शोधला. ताणतणाव कमी झाला आणि झोप सुधारली. यामुळे सिद्धेश च्या आहारावर बराच अनुकूल परिणाम झाला. आहारावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे असं त्याला वाटायला लागलं.

सिद्धेश ने आहाराबाबतीत काय केलं?

जागरण करत असताना सिद्धेशला रात्री भूक लागायची आणि तो रात्री खाण्यासाठी काहीतरी तयारच ठेवायचा. ही जवळपास सवयच झाली होती. स्नॅकिंग म्हणजेच नाश्ता आणि मधेमधे खाणं नेहमीचं होतं. त्याने सगळ्यात पहिले हे खाणं म्हणजेच स्नॅकिंग थांबवलं. त्याने रात्री सिनेमे आणि कंप्युटर इत्यादी बंद केलं. झोप पूर्ण झाली पाहिजे ह्याकडे लक्ष दिलं. झोप सुधरल्यावर रात्रीचं खाणं सुद्धा बंद झालं. सिद्धेशने आहार आखून घेतला व तो पाळायला लागला.

त्याचा आखलेला आहार असा आहे

सकाळी 1 कप ओट्स (ह्या ऐवजी पर्याय म्हणजे पूर्ण दाना असलेली तृणधान्य किंवा कडधान्य)

दुपारचं जेवण: एक प्लेट सॅलड (कच्च्या भाज्या) आणि पांढरे मांस(कोंबडी किंवा मासे इत्यादी)

संध्याकाळचं जेवण: 2 पोळ्या आणि भाजी. प्रोटीन मिल्क शेक

सिद्धेश मांसाहारी आहे. पण तो लाल मांस टाळतो. आरोग्यासाठी लाल मांस व प्रक्रिया केलेलं मांस कमी कराव किंवा टाळावं असा वैद्यकीय सल्ला आहे. सिद्धेश चिप्स, डोनट, बेकरीचे पदार्थ पूर्णपणे टाळतो. आधी आवडीचे असलेले आईस्क्रीम व केक हे सुद्धा बंद आहेत. साखर अतिशय कमी प्रमाणात असते. ह्या सगळ्यामुळे कार्बोहायड्रेट व प्रकिया केलेले तेल ह्यांचे प्रमाण नियंत्रणात आले.

सिद्धेश सोडा असलेली पेय मुळीच पीत नाही. सोडा असलेल्या पेयांमध्ये साखर तर असतेच पण सोड्यामुळे आपल्या पोटातून अन्न आतड्यात जाण्याची प्रक्रिया वेगावते. ह्यामुळे साखर लवकर शोषल्या जाऊन रक्तातील साखर अचानक वाढते. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर अशी पेय टाळणं हे उत्तमच. तसेच फळांचा ज्यूस टाळणे सुद्धा फायद्याचे आहे. एक फळ पूर्ण खाल्ले तर त्यातून अनेक जीवनसत्वे व आवश्यक फायबर मिळते. ज्यूस मधून फक्त साखर मिळते ती सुद्धा लवकर शोषल्या जाणारी. युकेच्या आहारविषयक गाईडलाईन्स मधून त्यांनी चांगल्या पदार्थांच्या यादीतून ज्यूस काढून टाकला आहे.

सिद्धेशच्या ह्या आहारामधील एक महत्वाचा घटक म्हणजे खाण्याचा आकार (पोर्शन साईज). किती खायचं हे सुद्धा सिद्धेश ने काटेकोर नियंत्रणात ठेवलं आहे. यासाठी तो “माय फिटनेस पाल” ह्या ऍप ची मदत घेतो. सिद्धेशने सुरुवात करताना 5 किलो वजन कमी करायचं ध्येय ठेवलं. त्यानुसार दिवसभरातील आहार किती कॅलरी असेल ते ठरलं. मग त्यानुसार रोज जे खाल्लं त्या सगळ्या पदार्थांची नोंद सिद्धेश ऍप मध्ये प्रामाणिकपणे करायचा. त्यानुसार मोजणी करून सिद्धेशच्या किती कॅलरी खाऊन झाल्या आहेत ते कळायचं आणि पुढच्या जेवणात किती खायला हवं ते सुद्धा कळायचं. ऍप मध्ये नोंद असली की आपण रुळावर आहोत की घसरतोय हे लगेच समजतं. अशी इतरही ऍप असतात. सिद्धेश वापरतो ते ऍप फुकट उपलब्ध आहे.

सिद्धेश व्यायाम कसा करतो?

सिद्धेश जिम मध्ये जाऊन वजन उचलण्याचे व्यायाम करतो. शरीराचे सगळे मोठे स्नायू बळकट करणारे व्यायाम तो करतो. दर काही दिवसांनी तो वजन वाढवतो. याशिवाय कार्डियो व्यायाम तो आठवड्यातून 3 ते 4 वेळा करतो. कधी जिम मध्ये तर कधी बाहेर धावून तो हे व्यायाम करतो. जिमला स्विमिंग पूल उपलब्ध आहे त्यामुळे अधून मधून पोहण्याचा व्यायाम सुद्धा तो करतो. उन्हाळ्यात दर आठवड्याला तो क्रिकेट खेळतो. ह्या सगळ्या व्यायामाचा सिद्धेशच्या आरोग्यावर खूप चांगला परिणाम झाला आहे. वजन कमी होण्यासोबतच त्याचे बीपी सुद्धा नॉर्मल झाले आहे. आधी जे बीपी 138/90 च्या आसपास असायचं ते बीपी इतक्यात मोजलेल्यावर 116/84 इतकं आलंय. हे कुठलंही औषध न घेता घडलय.

सिद्धेश व्यायामाच्या बाबतीत सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करतो. तो फिटबीट वापरतो आणि त्यात स्वतःची शारीरिक हालचाल किती होते यावर लक्ष ठेवतो. सिद्धेशच्या ह्या शारीरिक हालचालींची माहिती “माय फिटनेस पाल” ह्या ऍप मध्ये सुद्धा उपयोगात येते. व्यायामाव्यतिरिक्त सिद्धेश रोज जवळपास 6000 पावलं एवढी हालचाल करतो असं त्याच्या फिटबिट वरुन कळलं. व्यायामशिवाय रोज एवढी हालचाल केली तर वजन कमी व्हायला मदत होते.

सिद्धेश वापरतो त्या ऍपमध्ये आपल्या ऊर्जेचे गणित मांडून येते. आपण किती कॅलरी खाल्ल्या आणि आपण किती कॅलरी जाळल्या(शारीरिक हालचाल व व्यायाम) ह्याचा हिशोब येतो. आपण रोज लिहून हा हिशोब करण्याचा त्रास त्यामुळे कमी होतो. आपण आपल्या आहारावर व हालचालींवर जेवढी करडी नजर ठेऊ तेवढं आपलं नियंत्रण घट्ट राहण्यासाठी मदत होते. आपण मोजत नाही त्यामुळे आपले नियंत्रण राहत नाही हे सिद्धेशला कळलं होतं. या ऍपच्या मदतीने सिद्धेशला हिशोब ठेवणं सोपं गेलं. कधी, किती व काय खायचं हे ठरवणं सोपं झालं. आठवडाभरात व्यायाम कमी पडला असेल तर तो भरून काढता आला. आपण एखादे ऍप वापरायलाच हवं असं नाही. मोजमाप महत्वाचं.

सिद्धेश व्यायामासाठी जिम चे पैसे भरतो.फिटबिट चा खर्च एकदाच झाला. पण इतर काही खर्च त्याला लागले नाहीत. तो व्यायामासाठी इन्स्टाग्राम व युट्युब अशा वेबसाईट वरील माहिती वापरून व्यायामाचा आराखडा ठरवतो. नवीन व्यायाम सुद्धा शिकतो. सिद्धेश त्याच्या सगळ्या मोजमापांची नोंद मोबाईल मध्ये ठेवतो. आपली प्रगती प्रत्यक्ष बघितली की त्यापेक्षा मोठी दुसरी प्रेरणा नसते.

सिद्धेशच्या आरोग्यावर झालेले परिणाम त्याने नोंद करून ठेवले आहेत.नोव्हेंबर 2015 पासून आतापर्यंत त्याचे वजन 200 पाऊंड वरून कमी होऊन 176 पाऊंड एवढे कमी झाले. (91 किलो ते 80 किलो म्हणजे जवळपास 11 किलो कमी झाले)

त्याच्या शरीरातील चरबीचे प्रमाण 20.5 टक्क्यांवरून कमी होऊन 17.8 टक्के झाले. कमरेचा घेर 6 इंच कमी होऊन 32 इंच झाला. पोटावरील चरबी कमी झाल्यामुळे बीपी, साखर आणि कोलेस्टेरॉल च्या प्रमाणात सुद्धा सुधारणा झाली. कोलेस्टेरॉल रेशो म्हणजे टक्केवारी सुधारून 3.3 झाली. त्याच्या हृदयाची गती दर मिनिटाला 80 ठोक्यांवरून कमी होऊन 62 वर आली. म्हणजे त्याचं हृदय आणि फुफ्फुस खेळाडूंसारखं बळकट झालं आहे. सिद्धेश आणि त्याची पत्नी अवंती दोघेही नियमित व्यायाम करतात. त्यांचा उत्साह प्रेरणादायी आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा आपल्या आरोग्यासाठी कसा वापर करायचा हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे.

सिद्धेश व माझे काका ह्यांनी कुठलेही मोठे खर्च न करता वजन कमी केलं आणि टिकवले सुद्धा आहे. त्यांनी अवघड असं डायट सुद्धा केलं नाही. त्यांना अडचणी आल्या आणि कधी कधी थोडा सेटबॅक पण आला. तरीही त्यांच वजन यशस्वीपणे कमी झालं. आहार कमी करून आणि हालचाल वाढवून वजन कमी करणं सोपं नाही असं आपण तज्ञांकडून बरेचदा ऐकतो. ते काही अंशी खरं सुद्धा आहे. पण जर खोलात जाऊन बघितलं तर कळतं की हा मंत्र अयशस्वी होण्याचं कारण लोक फार काळ हे पाळू शकत नाहीत असं आहे. सिद्धेश आणि माझ्या काकांनी हे पाळलं आणि ते यशस्वी झाले.

सगळेच एवढे यशस्वी होवोत. पण जर काही अडचण आली तर तज्ञांची मदत घ्यावी. एखादा आजार असल्यास आहारबदल व व्यायामपूर्वी डॉक्टरांना नक्की भेटावं.

आहार आणि व्यायामाचा फायदा फक्त लठ्ठ लोकांनाच होतो असे नाही. सामान्य लोकांनी सुद्धा रोज व्यायाम करणं आणि ऍक्टिव्ह राहणं अपेक्षित आहे. आहार समतोल असल्यास त्याचे अनेक फायदे मिळतात. त्यामुळे तुम्ही नवीन वर्षात काही निश्चय केला नसेल तर निरोगी जीवनशैली पाळणं हा एक उत्तम पर्याय आहे!

डॉ विनायक हिंगणे

मागच्या वर्षी मी कुशलचा वजन कमी करण्याचा प्रवास लिहिला होता:

वजनदार रिसोल्युशन

वजन, आहार व व्यायामविषयी इतर लेख व व्हिडीओ:

बी एम आय बद्दल माहिती

जाडोबा अन रडोबा 

आहाराच्या मदतीने डायबेटीस-मुक्त होणे शक्य आहे का?

आहाराचं सोपं गणित

आहाराच्या मदतीने डायबेटीस-मुक्त होणे शक्य आहे का?

टाईप2 डायबेटीस हा आपल्याला भेडसावणारा एक मोठा प्रश्न आहे. हा आजार जुनाट आजार असून पूर्णपणे बरा होत नाही. 5 डिसेंबर 2017ला लँसेट ह्या वैद्यकीय शोधपत्रकात एक शोधनिबंध प्रसिद्ध झाला आणि सगळ्यांचं लक्ष त्याकडे ओढल्या गेलं. बातम्यांमध्ये ह्या रिसर्च ला बरीच प्रसिद्धी मिळाली. न्यूकासल आणि ग्लासगो येथील डॉक्टर व वैज्ञानिक ह्यांनी वजन कमी केल्यामुळे औषधांशिवाय डायबेटीस नियंत्रित राहू शकतो का हा प्रयोग केला. आपण त्याविषयी थोडसं बघू.

नेमका काय प्रयोग होता?

शास्त्रज्ञांनी युके मधील 49 क्लिनिक्स मधील 306 पेशंट निवडले. ज्यांचा बीएमआय 27 ते 45 आहे (म्हणजे वजन जास्त आहे) व ज्यांचा डायबेटीस फार जुना नाही (म्हणजे निदान होऊन 6 वर्षांपेक्षा कमी कालावधी झाला आहे) असे डायबेटीस चे रुग्ण निवडले पण ज्यांना इन्सुलिन चा उपचार सुरू आहे असे पेशंट टाळण्यात आले. या पेशंट ना दोन गटांत विभागण्यात आलं. यातील एका गटातील लोकांना वजन कमी करण्यासाठी विशिष्ट आहार देण्यात आला. ह्याला आपण “आहार उपचार”म्हणूया.दुसऱ्या गटातील लोकांना नेहमीचा डायबेटीस चा उपचार देण्यात आला.

“आहार उपचारात” लोकांना त्यांचं जेवण पूर्ण बदलून दिवसभरात फक्त 825 ते 850 कॅलरी एवढा आहार 3ते 5 महिन्यांपर्यंत देण्यात आला. सुरुवातीलाच त्यांची सगळी औषधं बंद करण्यात आली. त्यांनतर हळूहळू 2 महिन्यात सामान्य पण निरोगी आहार देण्यात आला. त्यांनंतर वर्षभर वजन स्थिर ठेवण्यासाठी मदत करण्यात आली. आहार, जीवनशैलीचं मार्गदर्शन करण्यात आलं.

औषधांशिवाय एक वर्ष तपासणीनंतर जर एच बी ए वन सी (HbA1C) नॉर्मल म्हणजे 6.5 पेक्षा कमी राहिलं तर त्याला डायबेटीस-मुक्त म्हणण्यात येईल असं ठरवण्यात आलं.

प्रयोगातून काय दिसलं?

जवळपास 24टक्के लोक अपेक्षित वजन कमी करू शकले. म्हणजे दर चौघांत एक जण 15किलोपेक्षा जास्त वजन कमी करू शकले. वर्षभर वजन कमी ठेवण्याच्या बाबतीत हा आकडा उत्तम म्हणावा लागेल. ह्यापेक्षा जास्त प्रभावी निकाल म्हणजे प्रयोगातील 46 टक्के लोक डायबेटीस मुक्त झाले. म्हणजे दर दुसऱ्या व्यक्तीचं HbA1C औषधांशिवाय 6.5पेक्षा कमी आलं. हे सुद्धा उत्तम आहे.

जर आणखी खोलात जाऊन बघितलं तर असं दिसतं की ज्यांचं वजन 15 टक्क्यांपेक्षा जास्त कमी झालं त्या 36 पैकी 31 लोकांचा डायबेटीस औषधांशिवाय वर्षभरासाठी बरा झाला. टक्केवारी 86%आहे. ज्यांचं वजन फारसं कमी झालं नाही त्यांना कमी फायदा झाला. पण फारसा दुष्परिणाम न होता बराच फायदा झाल्यामुळे ह्या पद्धतीने उपचार करण्यासाठी अधिक प्रयत्न व्हायला हवेत असं मला वाटतं.

अर्थात एका वर्षभरानंतर पुढे ह्या रुग्णांचं काय होतं हे बघायला हवं. आहाराचा फायदा काही काळानंतर फारसा होत नाही असे काही निकाल आधी वेगवेगळ्या अभ्यासात बघायला मिळाले आहेत. वजन नेहमीसाठी निरोगी पातळीत टिकवून ठेवणं हे सुद्धा आव्हानात्मक असतं अस दिसतं. ह्या अभ्यासातून पुढच्या काळात ह्या प्रश्नांवर सुद्धा काही उत्तर मिळेल अशी आशा आहे. सध्याच्या परिस्थितीत एक वर्ष औषधांशिवाय डायबेटीस नियंत्रणात ठेऊ शकतो एवढाच निष्कर्ष ह्या अभ्यासातून मिळतो. हा निष्कर्ष सकारात्मक आणि आशा वाढवणारा आहे.

असा कमी कॅलरीचा आहार आपण भारतात घेऊ शकतो का?

इतक्या कमी कॅलरी असलेला आहार कधी कधी दुष्परिणाम करू शकतो. मुख्यत्वे डायबेटीस च्या रुग्णांमध्ये अगदी धोकादायक दुष्परिणाम दिसू शकतात. त्यामुळे तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलाही डाएट किंवा आहारातील बदल करू नये. डायबेटीस नसलेल्या लोकांनीही अगदी कमी कॅलरी असलेले आहार घेण्याआधी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

वर नमूद केलेल्या प्रयोगातून डायबेटीस च्या उपचारात बरेच बदल होण्याची शक्यता आहे. पण ह्यातून सुरक्षित उपचाराची मार्गदर्शक तत्वे (गाईडलाईन्स) तयार व्हायला बराच अवकाश आहे. तोपर्यंत ज्यांना औषधं लागतात अशा रुग्णांचा डायबेटीसचा उपचार सध्याच्या रूढ पद्धतीने सुरू राहील. आहारात व जीवनशैली बदल ह्याला नेहमी पेक्षा जास्त महत्व मिळेल असा माझा अंदाज आहे. ज्यांना डायबेटीस नाही पण डायबेटीस होण्याचा धोका आहे त्यांना वजन कमी केल्याने किती फायदा होऊ शकतो हे या प्रयोगातून आपण शिकू शकतो.

भारतात ह्या प्रयोगावर आधारित प्रयोग करून बघायला खरंतर काहीच प्रॉब्लेम नसावा. आपण योग्य अशा टीम बनवून भारतीय लोकांमध्ये आहारातील बदलांचा डायबेटीस वर परिणाम तपासून बघू शकतो. पण ह्यासाठी तज्ञ डॉक्टरांची टीम हवी. शास्त्रीय पद्धतीने व इथिकल कमिटीच्या संमतीने असे प्रयोग व्हावेत.

(ह्या प्रयोगातील पेशंटवर काटेकोर नजर ठेवण्यात आली. काही त्रास किंवा दुष्परिणाम होत नाही ना ह्यावर लक्ष होतं. अतिशय गंभीर डायबेटीस किंवा गंभीर आजारांचे रुग्ण ह्या प्रयोगात नव्हते. तज्ञ व कुशल तंत्रज्ञ ह्यांच्या सांघिक कामगिरीतून असे कठीण प्रयोग होतात. त्यामुळे आपण स्वतः औषधं बंद करून कमी जेवण करण्याची रिस्क घेऊ नये.)

शोधनिबंधाची लिंक सोबत शेअर करतोय

http://www.thelancet.com/journals/lancet/article/PIIS0140-6736(17)33102-1/fulltext?elsca1=tlpr

ह्या शोधनिबंधावरील चर्चेचे दोन व्हिडीओ सुद्धा शेअर करतोय. तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि काही शंका/प्रश्न असतील तर उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करीन.

-डॉ विनायक हिंगणे

व्हिडीओ लिंक

व्हिडीओ भाग1

व्हिडीओ भाग2

Conspiracy Theories are in vogue

Screenshot_2015-11-30-21-54-09

Diabetes is a common condition. The progressively increasing number of people with diabetes is worrying. Changes in diet and living conditions are some of the reasons behind the rising diabetic population. Better and easily available diagnostic facilities help us to reach more people with diabetes and help them to fight it. Recently I came across one post on social media which claims that the diabetes is being over-diagnosed because of influence by pharmaceutical companies.This post has tried to sound like a fact based  but it is just another conspiracy theory. I felt annoyed with it, because such posts misguide patients and make them feel fooled .

Diabetes is broad term. There are many types of diabetes. Two important types are Type 1 Diabetes Mellitus and Type 2 Diabetes Mellitus. Type1 diabetes is characterized by deficiency of insulin hormone. Insulin is one of the important hormones secreted by the pancreas . Insulin tries to reduce the blood sugar level while other hormones try to increase the  blood sugar level. The balance between these two forces keep the sugar level in control. In type 1 diabetes, secretion of insulin from pancreas is reduced significantly. Due to this the blood sugar level is very high. This diabetes is usually seen in young age and often diagnosed when the patient develops symptoms . The blood sugar level can be so high that it might not be recorded on glucometer. These patients need admission in hospital and diagnosis of diabetes is often made during such admissions. These patients need insulin injections to keep up with the deficiency of insulin in the body.
Now let us look at type 2 diabetes which is more common. This condition develops gradually and has many stages before it can manifest as diabetes.This condition develops because of many factors. Some of these factors are correctable like excess weight, lack of exercise and faulty diet while some of the factors are unavoidable. This condition starts with resistance to the action of insulin on cells of our body. Thus there is unopposed action of other hormones and blood sugar level tend to increase. Body tries to correct this by increasing secretion of insulin. In this early stage, the patient’s blood sugar level remains in normal range and there are no symptoms. Gradually, the resistance to the action of insulin increases to a level where it is not possible for the body to compensate and blood sugar level starts rising. In this stage , fasting blood sugar level could be in between 100 mg/dl to 125 mg /dl . This stage is called as pre-diabetes. This stage is not diabetes but the person is at risk of developing diabetes. Doctors do not prescribe any medication for this stage.
In the next stage, the fasting blood glucose level rises to 126 mg/dl or more. The resistance to insulin continues and pancreas get fatigued by  continuously trying to compensate; due to this the insulin level starts  going down while the sugar levels after meals tends to rise more . If a glucose tolerance test (GTT) is performed at this stage, which involves checking blood sugar levels 2 hours after consumption of 75 gm glucose , then the  results are more than 200 mg /dl. Doctors prescribe a medication called Metformin which helps to reduce the insulin resistance. There are some more tablets which increase insulin secretion and can be used as needed. As diabetes grows older , these medicines cannot keep up the insulin levels and sugar levels are not controlled. This is the next stage of the condition and insulin injections are needed in such situation.
Over last few decades, our understanding of TYPE 2 Diabetes has improved. Obviously, the better understanding of the disease leads to changes in practices by doctors. New approaches and strategies are introduced. Some of these strategies turn out to be excellent and revolutionary while others are discarded over  time. We have understood recently that the pre-diabetes stage is really important. Studies have shown that if people in pre diabetic phase reduce around 7% of their body weight or exercise half an hour daily, then they can reduce the chances of developing diabetes. This is the only possible way of avoiding diabetes and medication. Once the condition is advanced we have to take medication to control it. Why would pharmaceutical companies give us a chance to avoid medication by promoting diagnosis in early phase! As I have mentioned earlier, doctors will not treat pre diabetes with medicines. A diagnosis of pre-diabetes (fasting blood sugar 100mg/dl to 125 mg /dl ) thus does not help pharma companies but helps us to try and avoid or at least slow down the process of diabetes. This social media post has used only partial information to scare and misguide people.
This conspiracy theory post also gives a feel as if doctors diagnose diabetes based only on sugar level. Even the discussion in my post has eventually been about the blood sugar levels. Just to clarify this , the diagnosis of diabetes made by any qualified doctor is usually a combination of patient`s symptoms and laboratory results. If the blood sugar levels exceed the normal limits and the patient has symptoms of diabetes, then the diagnosis is easy. But if the sugar levels are in doubtful range then the doctors weigh the symptoms, signs, family history and  associated conditions. If necessary the doctors can ask for a test called HBA1C which gives an idea about blood sugar level control over the last few months. A glucose tolerance test is conducted to check patient`s response to a glucose load. Sometimes doctors choose to wait for few weeks to re-check sugar levels before starting treatment.
Diabetes has many aspects apart from blood sugar levels. Many patients show great courage and determination to change their diet and lifestyle to fight with diabetes. Social media posts like the mentioned post and advertisements try to portray modern medicine as a villain. They attack doctors for their malpractice, pharma companies for their profit oriented attitude and medicines for their side effects. Many patients have insecurities and such misleading posts add to those those insecurities and fears by quoting half-truths and lies. Products like effortless weight loss remedies and treatments for diabetes without medication are the examples where businesses thrive on the insecurities of patients.
This article is just an attempt to show how truth is twisted in some media posts and advertisements. This also gave me an opportunity to discuss about the basics of diabetes. Please comment, share and discuss any doubts or thoughts you have!

डायबेटीस निदान की षडयंत्र

 

Screenshot_2015-11-30-21-54-09

 

डायबेटीस आणि उच्च रक्तदाब किंवा हाय ब्लड प्रेशर असलेल्या किमान एखाद्या व्यक्तीला तरी आपण ओळखतो . कॉमन असलेल्या ह्या आजारांनी आपणही ग्रासले जाऊ अशी भीती वाटणे देखील साहजिक आहे . इतक्यात एक संदेश सोशल मेडिया वर फिरतो आहे . त्याचा आशय असा आहे की काही वर्षांपूर्वी डायबेटीस चे निदान करण्याचा साखरेचा आकडा आता बदलला आहे आणि ह्यात फार्मा कंपन्यांचे षड्यंत्र आहे . फास्तिंग शुगरचा आकडा कमी केल्याने जास्त लोक डायबेटीस ग्रस्त आहेत असे ठरवता येईल व त्यामुळे जास्तीत जास्त औषधांची विक्री होईल असे ह्या संदेशात भाकीत करण्यात आले आहे .डॉक्टर डायबेटीस चे निदान कसे करतात व डायबेटीस साखरेच्या भाषेत कसा मांडता येतो ह्यावर आपण चर्चा करूया .

डायबेटीस चे बरेच प्रकार आहेत . त्यातील महत्वाचे दोन प्रकार म्हणजे प्रकार १ व प्रकार २. प्रकार १ मध्ये आपल्या स्वादुपिंड किंवा प्यानक्रीयास ह्या अवयवात तयार होणारे इन्सुलिन हे हार्मोन तयार होत नाही किंवा अतिशय थोड्या प्रमाणात तयार होते . ह्याची कारणे अनेक असू शकतात . मुख्य दोष हा इन्सुलिन ची कमतरता हा असतो . त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण हे अतिशय जास्त वाढते . ग्लूको मीटर वर मोजल्या जाणार नाही एवढी शुगर वाढू शकते . बरेचदा दवाखान्यात भरती करावे लागण्या इतकी तब्येत खराब होते व तेव्हा डॉक्टर डायबेटीस झाला आहे असे सांगतात . बरेचदा लहान वयात होणारा डायबेटीस हा प्रकार १ चा डायबेटीस किंवा इन्सुलिन कमतरते मुले होणारा डायबेटीस असतो . अशा मधुमेहींना इन्सुलिन द्यावे लागते . अशा प्रकार १ च्या मधुमेहींची संख्या तशी कमी असते .
आता आपण कॉमन असलेल्या प्रकार  २ डायबेटीस कडे बघू . हा मधुमेह  शरीरात हळूहळू तयार होतो . हा मधुमेह होण्याचीही बरीच कारणे आहेत . त्यापैकी काही कारणे टाळता येण्यासारखी आहेत . जसे शारीरिक व्यायामाचा अभाव किंवा वाढलेले वजन. हा डायबेटीस आजार म्हणून प्रकार १ पेक्षा बराच वेगळा आहे . ह्या आजाराचे टप्पे आहेत . ह्या आजारात इन्सुलिन हार्मोन च्या क्रियेला शरीरातील पेशी विरोध करतात . ही आजारातील पहिला टप्पा . शारीरिक व्यायाम  न झाल्यास किंवा वजन वाढल्यास असे होण्यास सुरुवात होऊ शकते . ह्या टप्प्यात शुगर वाढत नाही किंवा काही लक्षणेही दिसत नाहीत . होर्मोन च्या पातळीवर मात्र काही बदल दिसू शकतात . काही लोकांमध्ये ह्या टप्प्यात इन्सुलिनचे प्रमाण जास्त असल्याचे सुद्धा दिसू शकते . शरीराचा इंसुलीनच्या कामाला विरोध असल्यामुळे शरीर जास्त इन्सुलिन बनवून साखर नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करते . काही काळासाठी शरीर ह्यात यशस्वी होते पण जसा जसा वेळ जातो तसे इंसुलीनला विरोध वाढत जातो व साखरेवरचे इन्सुलिनचे नियंत्रण कमी पडायला लागते . अशा काळात शरीरात इन्सुलिन तर असते पण साखरेचे प्रमाण सामान्य पातळीपेक्षा जास्त असते. ह्याला प्रि-डायबेटीस किंवा डायबेटीस च्या आधीचा टप्पा म्हणतात . अमेरिकन डायबेटीस असोसिएशन ह्या संस्थेने  उपाशीपोटी किंवा फास्तिंग साखर १०० मिग्रा /देसिलीतर  ते १२५ मिग्रा/डेली अशी असल्यास  त्याला प्रि-डायबेटीस म्हटले आहे . तुमची फास्तिंग शुगर ह्या पातळीमध्ये असल्यास तुम्हाला डायबेटीस नसून डायबेटीस असण्याचा धोका आहे असे समजावे . ह्या पातळीवर डॉक्टर तुम्हाला डायबेटीस चे औषध देत नाहीत . जर उपाशीपोटी केलेली शुगर ची पातळी १२६ किंवा जास्त असेल तर त्याला डायबेटीस ची पातळी म्हणतात . हा आजाराचा पुढचा टप्पा आहे . शरीरातील इंसुलीनला विरोध सुरूच असतो व स्वादुपिंड थकून इन्सुलिनचे प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागते . अशा वेळी साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढायला लागते . ह्या वेळी डायबेटीस ची लक्षणे दिसत नाहीत पण साखर वाढलेली सापडते . अशा वेळी जेवणानंतर केलेली शुगर किंवा ग्लुकोज पिल्यानंतर दोन तासांनी केलेली शुगर ची पातळी २०० पेक्षा जास्त आढळते . डॉक्टर अशा टप्या मध्ये इंसुलीनला विरोध कमी करणारी मेटफोर्मीन नावाचे औषध व गरजेनुसार इन्सुलिन वाढवणारी औषधे देतात . ही औषधे गोळीच्या स्वरुपात असतात . जसा मधुमेह जुना होत जातो तसे ह्या औषधांचा प्रभाव कमी पडत जातो व शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण खूपच कमी होते व काही रुग्णांना इन्सुलिन सुरु करावे लागते . हा आजारातील पुढचा टप्पा .
आपण प्रकार २ च्या मधुमेहाचे टप्पे पहिले . गेल्या काही दशकांमध्ये डायबेटीस व मुख्य म्हणजे प्रकार २ डायबेटीस बद्दल आपल्याला थोडे जास्त कळले आहे . हा डायबेटीस कसा होतो व कसा वाढतो ,ह्याचे शरीरावर काय परिणाम होतात आणि त्यांचा उपाय व प्रतिबंध कसा करायचा ह्याचा बराच अभ्यास झाला आहे आणि होतो आहे . त्यामुळे नवीन नवीन माहिती समोर येणे व उपचारामध्ये बदल घडणे अनिवार्य आहे . काही नवीन बदल हे क्रांतिकारी हरतात तर काही औषधे कधीतरी बंद करावी लागतात . भारतातील बहुतांश डॉक्टर हे आधुनिक उपचारातील बदल समजून घेऊन योग्य उपचार करण्यास समर्थ आहे असे माझे मत आहे . पण काही लोक माहिती चुकीच्या पद्धतीने पसरवून भीती वाढवतात . प्रि- डायबेटीस  हा डायबेटीस नसून त्याच्या आधीचा टप्पा आहे . उपाशीपोटी केलेली शुगर १०० ते १२५ असल्यास आपण त्याला प्रि-डायबेटीस म्हणतो . ह्या टप्प्याचे महत्व असे आहे कि वजनाच्या साधारणतः ७ % वजन कमी केल्यास किंवा नियमित ३० मिनिटे व्यायाम केल्यास डायबेटीस होण्याचा धोका कमी होतो . ह्या टप्यात कोणतेही डॉक्टर औषध देत नाहीत . आहार , वजन व व्यायामाबाबत सल्ला देतात . आजाराच्या ह्या टप्यात तुम्हाला निरोगी होण्याची संधी असते .एकदा हा टप्पा पार झाला की ती संधी कमी होत जाते आणि औषध घ्यावे लागते . त्यामुळे ह्या टप्प्याचे निदान होणे हे फार्मा कंपन्यांच्या फायद्याचे नसून आपल्याच फायद्याचे आहे . आणि आपण त्याचा फायदा करून घ्यावा असे माझे मत आहे .
डायबेटीस चे निदान हे फक्त साखरेच्या आकड्यावरून होते असा एक समज ह्या सोशल मेडिया वरील संदेशात झालेला दिसतो . हा लेख वाचल्यावर तो समज दृढ होऊ नये म्हणून हे छोटेसे स्पष्टीकरण . साखर खूप वाढली असल्यास डायबेटीस चे निदान सोपे असते . पण जेव्हा साखर थोड्या प्रमाणात वाढते तेव्हा डॉक्टर डायबेटीस ची काही लक्षणे आहेत का हे सुद्धा बघतात . साखरेच्या पातळीशिवाय ग्लुकोज पिल्यानंतर रक्तातील साखर तपासून बघणे म्हणजेच glucose tolerance test सुद्धा करू शकतात . ह्याशिवाय हिमोग्लोबिन एच बी ए १ सी  नावाची तपासणी सुद्धा डायबेटीस च्या निदानात मदत करू शकते . ह्या तपासण्यांचे निकाल पण संदिग्ध आल्यास डॉक्टर काही महिन्यानंतर पुन्हा तपासण्या करण्यास सांगतात . डायबेटीस म्हणजे फक्त शुगर लेवल नसून आपले वजन , आहार आणि जीवनशैली ह्या सगळ्यांचा परिपाक आहे .
शेवटी डायबेटीस चा उपचार औषधे घेऊन करून घ्यायचा की नाही हा एक प्रश्न आहे . बरीचशी मंडळी वेगवेगळे उपाय सांगून डायबेटीस असलेल्यांकडून पैसे लुबाडत असतात. अशा वेळी फार्मा कंपन्यांपेक्षा औषधे व कुठलाही योग्य उपचार न देता पैसा लुबाडणारी मंडळी ही मला धोकादायक वाटतात .

डायबेटीस च्या आहारी जाताना 

IMG_2555
मधुमेह म्हटला की सगळ्यांच्या जिभेवर येणारा पहिला शब्द म्हणजे शुगर! मधुमेहाचा साखरेशी खूप घनिष्ट संबंध जोडला गेला आहे . मधुमेह म्हणजे शरीरातील साखर वाढते , सारखी रक्तातील साखर तपासावी लागते आणि साखर खाणे बंद ; एवढी माहिती साधारण सगळ्यांना असते . एकंदरच हा आजार वैतागवाणा आहे  पण त्यातल्या त्यात गोड खाण्याच्या बंदीमुळे जरा जास्तच तापदायक आणि किचकट झाला आहे. बर्याच लोकांना गोड आवडते. तसेच कुठल्याही चांगल्या प्रसंगी गोड खाण्याची आपल्याकडे प्रथा आहे .गोड  चहाही  आपल्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग झालाय . अशा परिस्थितीत गोड खाण्यावर बंदी म्हणजे एखाद्या व्यक्तीवर किती अन्याय असा एक दृष्टीकोन आपल्या समाजात रूढ झालाय . मधुमेहाच्या रुग्णाकडे असा अन्याय सहन करणारा, दीनवाणा  व दुर्दैवी असे म्हणून तरी बघितले जाते  किंवा एवढ्याश्या साखरेनी काय होते  असे म्हणून त्याच्या आहार पथ्याची टर  तरी उडवली जाते . असे दोन्ही टोकाचे दृष्टीकोन किती चुकीचे आहेत !आहार हा मधुमेहाचा तसेच त्याच्या उपचाराचा एक खूप महत्वाचा भाग आहे . आहार व जीवनशैलीचे अनेक पैलू मधुमेहात खूप उपयोगाचे असतात . पण त्याविषयीची चर्चा साखरेविषयी / गोड विषयीच्या आपल्या टोकाच्या दृष्टिकोनामुळे मागे पडतात . आज आपण आहार व त्याचा मधुमेहाशी संबंध ह्या विषयी थोडी चर्चा करूया. ही चर्चा फक्त मधुमेही रुग्णांसाठी नसून ह्या रुग्णांचे मित्र , नातेवाईक तसेच मधुमेहाचे संभाव्य रुग्ण म्हणून आपल्या सगळ्यांसाठीच आहे .
गोड खाण्याचा आणि मधुमेह होण्याचा काही संबंध आहे का ह्या शंके पासून आपण सुरुवात करू . ह्यासाठी मधुमेह कसा होतो हे थोडक्यात जाणून घेऊ . मधुमेहाचे महत्वाचे दोन प्रकार .टाएप १ डायबेटीस व टाईप २ डायबेटीस . त्यापैकी  नेहमी दिसणारा मधुमेह हा टाईप २ . शक्यतो चाळीशीनंतर दिसणारा हा आजार आजकाल तरुण वयोगटात सुद्धा दिसू लागला आहे . हा मधुमेह होण्याची कारणे समजण्यास थोडी किचकट अन गुंतागुंतीची असतात . पण  ह्यातील सगळ्यात महत्वाची कारणे म्हणजे चुकीची जीवनपद्धती आणि अयोग्य आहार . वाढलेला मानसिक ताणताणाव , कमी झालेला शारीरिक व्यायाम आणि वाढलेले वजन ह्यांचा शरीरातील साखरेच्या संतुलनावर विपरीत परिणाम होतो . हा परिणाम खरे म्हणजे लहान वयातच सुरु होतो . पण आपले शरीर हा ताण सहन करते. वर्षानुवर्ष जर  शरीरावर हा ताण येत राहिला तर शरीराची सहन शक्ती संपते व रक्तातील साखर अनियंत्रित व्हायला लागते .ह्यालाच आपण मधुमेह म्हणतो . काही रुग्णांमध्ये वेगळ्या काही कारणांमुळे (उदा. अनुवांशिक दोष )सुद्धा  मधुमेह होतो . दिवसभरातील आहारामधील क्यालरीज (उष्मांक ) हे वजनाच्या व शरीरातील साखरेच्या संतुलनाच्या दृष्टीने महत्वाचे असतात . साखरेमध्ये बर्याच क्यालरीज आपल्या पोटात जातात . जर आपण बैठे काम किंवा घरकाम करत असू आणि शारीरिक व्यायाम (ह्यात योगासने येत नाहीत) करत नसू तर ह्या क्यालरीज मेद किंवा fat मध्ये रुपांतरीत होतात .त्याच प्रमाणे साखरेचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो . ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे एखादा पदार्थ खाल्यावर त्यामुळे  रक्तातील साखर किती प्रमाणात वाढते ह्याचे परिमाण . साखर खाल्यावर रक्तातील  साखरेचे प्रमाण जास्त वाढते . त्या मानाने इतर कर्बोदके (उदा . कडधान्ये ) खाल्यावर रक्तातील साखरेचे प्रमाण थोडे कमी वाढते . म्हणून जास्त प्रमाणात साखर / मिठाई खाणे हे फारसे योग्य नाही . पण रोजच्या आहारातील साखर व गोड चहा ह्यांनी मधुमेह होईल असे म्हणणे चुकीचे होईल . साखरेपेक्षा जास्त क्यालरीज आपल्याला मेद युक्त पदार्थ व fast फूड मधून मिळतात . पदार्थ जास्त रुचकर करण्यासाठी हॉटेल्स व उपहारगृहांमध्ये मेदयुक्त जेवण बनविल्या जाते . fast फूड चा आकार लहान अन क्यालरीज जास्त असतात .  अशा पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा जास्त असतो .ह्या सगळ्या गोष्टी नियमित खाणार्यांचे वजन हमखास वाढते . बाहेरचे पदार्थ फारसे न खाणार्यांनी घरच्या तेलाच्या वापराकडे व स्निग्ध पदार्थांच्या सेवनाकडे बारीक लक्ष ठेवणे फार आवश्यक असते . खासकरून जे रोज व्यायाम करत नाहीत, बैठे काम  किंवा घरकाम करतात त्यांनी तर जास्त सतर्क असण्याची गरज असते .  अशा प्रकारे डायबेटीस हा साखरेमुळे होणारा आजार नसून  चुकीचा आहार, वाढलेले वजन,  व्यायामाचा अभाव व ताणताणाव ह्यांनी होणारा आजार आहे .सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या गोष्टी लहान किंवा तरुण वयातच समजणे व योग्य सवयी लागणे आवश्यक आहे . असे झाले तर बर्याच मधुमेहाच्या भावी रुग्णांना आपल्याला वाचवता येईल .
मधुमेहाच्या रुग्णांनी सुद्धा वरील गोष्टी लक्षात घेऊन आपल्या आहारावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे . कारण मधुमेह झाल्यावरही तो नियंत्रित ठेवल्यास त्याचा त्रास  कमी होतो  व मधुमेहाच्या नियंत्रणात आहार  फार महत्वाचा  आहे. आहार व जीवनशैलीतील बदलांनी साखर नियंत्रित ठेवण्यासाठी एका औषधा इतकी मदत होऊ शकते . ह्याचा अर्थ औषधे बंद करता येतील असे नाही पण मधुमेहाची औषधे कमी नक्कीच होऊ शकतात . मधुमेहाच्या सुरुवातीच्या काळात योग्य आहाराने रक्तातील साखर नियंत्रित ठेवणारे बरेच रुग्ण असतात . (पण जसा जसा आजार जुना होत जातो तशी औषधांची गरज वाढते  म्हणून साखर नियंत्रित आहे कि नाही हे नियमित तपासावे व वेळोवेळी वैद्यकीय सल्ला घ्यावा) . योग्य आहार व जीवनशैलीतील सुधाराने मधुमेहींचे आरोग्य लक्षणीय सुधारते .मधुमेहाचे रुग्ण असलेल्या एका काकांचा अनुभव इथे मांडावासा वाटतो . त्यांची साखर उत्तम नियंत्रणात होती व इतर परिमाण जसे वजन लिपीड प्रोफाईल ई सी जी इत्यादी सुद्धा चांगले होते . तरीही काका थोडे काळजीत वाटले म्हणून त्यांना विचारल्यावर कळले कि काकांचे समवयस्क मित्र हृदयविकाराच्या झटक्याने गेले . त्यांना मधुमेह नव्हता  . आपण त्यामुळे कधीही डॉक्टरांकडे जात नाही आणि कुठीलीही तपासणी करण्याची आपल्याला कटकट नाही असे काकांना सांगणाऱ्या मित्राला शेवटी डॉक्टरांना भेटण्याची संधीही मिळाली नाही .मित्र गेला म्हणून काका हळहळले . पण आपण मधुमेहाचे रुग्ण असून आणि हृदयविकाराचा धोका आपल्याला जास्त असूनही आपण इतर अनेकांपेक्षा जास्त  फिट आहोत म्हणून डायबेटीस हा ब्लेसिंग इन डीसगाइस आहे असे सांगून काका गेले . काकांसारखा आशादायी विचार अन वागणूक औषधाच्या एका गोळी पेक्षा जास्त प्रभावी आहे.
पण काकांसारखे रुग्ण अगदी कमी . डायबेटीस व आहाराकडे बघण्याचा दृष्टीकोन कमालीचा उदासीन असतो . मधुमेहातील आहार , पथ्ये , विविध टिप्स ह्या आजकाल बर्याच प्रमाणात उपलब्ध असतात . पण ही माहीति हाताशी असूनही आपण मधुमेहींच्या आहाराकडे कानाडोळा करतो . कधी तर मधुमेहाच्या रुग्णांची तसेच नातेवाईकांची काही स्वभाववैशिष्टे नमुनेदार असतात . ‘काही होत नाही ‘ हा दृष्टीकोन सर्रास बघायला मिळतो . शुगर जास्त आहे – काही होत नाही . व्यायाम बंद , काही होत नाही . थोडसं गोड खाल्याने काय होणार ! काही होत नाही . मी फुल साखर खातो .डॉक्टरकडे गेलो होतो . एक आठवडा औषध घेतलं . त्यानंतर औषध बंद. फक्त प्राणायाम करतो . मला काहीही होत नाही . असे सांगणारे अनेक रुग्ण बघायला मिळतात . खास म्हणजे आपण किती वेगळे आहोत असा अविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर असतो . ह्या अशा आत्मघातकी दृष्टीकोनामागे निव्वळ हलगर्जी नसून आणखी काही करणे आहेत . मधुमेहाची किंवा साखर वाढल्याची लक्षणे लगेच दिसत नाही . त्यामुळे साखर खूप वाढूनही बरेचदा पेशंट ला काहीच त्रास होत नाही व त्याचा अर्थ साखर वाढल्याने काही होत नाही असा काढल्या जातो. पण अनियंत्रित साखर ही आजारांना निमंत्रण. अशा रुग्णांना अत्यवस्थ अवस्थेत आय सी यु मध्ये दाखल होताना , कुणाचा पाय कापावा लागताना तर कोणाला जीव गमावताना बघणे दुखद असते. वाढलेली साखर ही फक्त एक संकल्पना नसून अनियंत्रित आजाराचे लक्षण आहे . टीप ऑफ आईसबर्ग म्हणतो तसे . म्हणून एखाद्या मधुमेहाच्या रुग्णाला आग्रह करून वाढताना आपण आपण त्याला संकटात ढकलतोय हे लक्षात ठेवा . शेवटी ‘फरक तो पडता हे भाई !’ . कधीतरी संयम सुटणे व एखाद्या वेळी आहारनियंत्रण थोडे शिथिल होणे कुणीही समजू शकेल . पण काही रुग्णांना पथ्य मोडण्याची सवयच लागते . मग अशा वेळी ‘हायपो ‘ म्हणजेच हायपो ग्लायसेमिया  किंवा साखर कमी झाल्याची लक्षणे सांगून शुगर न तपासताच साखर खाल्ली जाते . सणवार व ऋतूंचा नावाखाली गोड खाल्या जाते . उन्हाळ्यातील लग्न व आंबे आणि दिवाळीतील फराळ ह्यामुळे शुगर वाढलेली आढळणे  काही नवीन नाही .काही रुग्ण तर यावर कडी म्हणजे साखर तपासणीच्या आठवड्यात कडक पथ्य पाळून चक्क चांगला रिपोर्ट आणून दाखवतात ! मग पुढील तपासणी पर्यंत छातीठोकपणे आपल्याला हवे तसे वागतात.  अशा वेळी डॉक्टर म्हणून आपण ह्या व्यक्तीला जबरदस्ती, त्याच्या इच्छेविरुद्ध उपचार देतोय का असा प्रश्न पडतो. नातेवैकांची स्थिती तर आणखीच बिकट असते. एकीकडे रुग्णाच्या मधुमेहाची चिंता तर दुसरी कडे गोड खायला नाही म्हणावे तर वाद . रुग्ण बरेचदा ‘मला माझ्याच घरात खाण्यावर बंदी’ किंवा ‘ तुम्ही माझं खानं काढता ‘ अस काहीतरी बोलून इमोशनल ब्ल्याक्मेल करतात . पण अशा वेळी डॉक्टर व नातेवाईकांनी रुग्णाला त्याच्या मनासारखे करू देणे म्हणजे त्याला वार्यावर सोडून देण्यासारखे आहे . मधुमेहामध्ये साखरेचे नियंत्रण नियमित असणे आवश्यक आहे . मधेच वाढलेली साखर व अनियमित नियंत्रण त्रासदायक असते . अशा वेळी गेल्या साधारण तीन महिन्यांचे साखरेचे नियंत्रण दाखवणारी ‘ एच बी ए वन सी ‘ ही तपासणी उपयोगी पडते . नेहमीची साखरेची तपासणी नॉर्मल असली तरी ही तपासणी सदोष असल्यास आहारातील अनियमितता लक्षात येऊ शकते  व उपचारात बदल करता येतात .
मी अजिबात गोड खात नाही . चहा पण बिनसाखरेचा पितो . भात तर अगदी बंदच केला आहे . मग तरीही माझी शुगर का वाढते हो डॉक्टर ? हा प्रश्न बरेच रुग्ण विचारतात . मी माझ्या बाजूने पूर्ण योगदान दिले आहे . आता साखर नियंत्रित करण्याची जबाबदारी डॉक्टर आणि मेडिकल सायन्स ह्यांची आहे . ती का वाढते आहे हे डॉक्टरांनी शोधून आम्हाला सांगावे अशी काहीशी पेशंटची मानसिकता असते . अशा केसेस मध्ये थोडी चौकशी केल्यास बहुतांशी रुग्णाचे योगदान कमी पडते असे दिसते(पथ्ये न पाळणे, व्यायामाचा अभाव किंवा औषधे योग्य पद्धतीने न घेणे) . काही रुग्णांचा आजार खूप जुना होतो व त्यांना जास्त औषधांची किंवा इन्सुलिनची गरज असते तर अगदी किरकोळ संखेतील रुग्णांना अधिक तपासाची गरज असते . साखर नियंत्रित राहत नसेल तर आपल्या पथ्य व जीवनशैलीचा आढावा घ्यावा . आहाराची  व  व्यायामाची रोजनिशी ठेवावी . वर चर्चिल्या प्रमाणे फक्त साखर नाही तर आहारातील  इतर घटकांनी सुद्धा शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू शकते हे लक्षात ठेवून असावे . वजन नियंत्रित आहे कि नाही हे बघावे . आहारतज्ञाचा सल्ला अशावेळी उपयोगी पडतो .
काही रुग्ण मधुमेहासाठी आयुर्वेदिक किंवा इतर काही उपचारपद्धती घेण्यासाठी उत्सुक असतात . मी आधुनिक आरोग्यशास्त्राचा अभ्यासक असल्याने मी इतर उपचार पद्धतींवर बोलणे चुकीचे आहे . पण कुठलीही उपचार पद्धती घेताना किमान नियमित चाचण्या व आरोग्यतपासणी आधुनिक पद्धतीने करून घेणे चांगले . कारण मधुमेहाची लक्षणे बरेचदा दिसत नाही व आजाराची तीव्रता जाणून घेण्याची तेवढी एकमेव पद्धत आज आपल्याला आम्हीत आहे . अशा वेळी  आजार नियंत्रित राहत नसेल उपचार पद्धती बदलण्याची संधी मिळू शकते.
डायबेटीस च्या रुग्णांनी उपवास करू नये. आपल्या धार्मिक समजुती उपवासाला खूप महत्व देतात.पण उपवासाचा मधुमेही रुग्णाच्या आरोग्यावर फार विपरीत परिणाम होतो . रुग्ण साखर कमी करण्याच्या औषधांवर असल्यामुळे नेहमीचा आहार घेतला न गेल्यास साखरेचे प्रमाण अतिशय कमी होते . वर्षभरापूर्वी एका महिला रुग्णास नातेवाईक आकस्मिक विभागात घेऊन आले . पन्नाशीचे वय असलेल्या त्या बाईना मधुमेह होता . डॉक्टरांनी तपासणी केली असता त्या बाई बेशुद्ध होत्या व स्वतःची उलटी श्वासंनालीकेत अडकून अत्यवस्थ झाल्या होत्या . त्यांची शुगर लेव्हल २० म्हणजेच अतिशय कमी झालेली होती . नासेतून शुगरची सलाईन दिल्यावर थोडी सुधारणा झाली पण पुढे काही दिवसांनी ह्यातून उद्भवलेल्या संसर्गामुळे त्या आय सी यु मध्ये दगावल्या . चौकशी नंतर कळले की त्यांनी कडक उपवास केला होता व नेहमीची औषधेही घेतली होती . साखर कमी झाल्याची लक्षणे त्यांना रात्री आली असतीलही . पण खोलीत त्या एकट्या असल्यामुळे कदाचित हा अनर्थ ओढवला . ह्याच्या अतिशय उलट म्हणजे उपास करताना इन्सुलिन व इतर औषधे न घेतल्यामुळे शुगर अतिशय जास्त वाढून आय सी यु मध्ये दाखल झालेले रुग्ण सुद्धा असतात . जीवावर बेतण्याचे असे प्रसंग नेहमी येत नसले तरी उपवास प्रसंगी साखरेच्या प्रामाणात होणार बदल हे रुग्णाच्या आरोग्यास घातकच असतात. एका अर्थाने मधुमेहाच्या रुग्णांना उपवास हा रोजच पाळायचा असतो . तो त्यांनी आहाराची पथ्ये , व्यायाम करून व नियमित औषधे घेऊन पाळावा .इतर नातेवाईकांनी सुद्धा उपवास करताना जशी मदत करू तशी त्यांना पथ्ये पाळण्यास मदत करावी . ज्यांना मधुमेह नाही त्यांनी सुद्धा आहार व वजनाचे व्रत पाळल्यास पुण्य नाही मिळाले तरी मधुमेहापासून दूर राहता येईल.

डायबेटीस व स्त्री आरोग्य .

IMG_5200

मधुमेह हा म्हणावं तर आपल्यासाठी परिचित अन म्हणावं तर अगदी अपरिचित असा आजार आहे . काही वर्षांपूर्वी सधन समाजात किंवा विकसित देशांचा समजला जाणारा हा आजार आज भारतात अगदी सर्रास आढळतो. आज प्रत्येक घरात किंवा निदान शेजारी तरी मधुमेहाचा रुग्ण असतोच. फक्त माधुमेह्च नाही तर त्याच्याशी संबंधित असे बरेचशे प्रश्न आज आपल्याला भेडसावत असतात . मधुमेहामुळे होणारी शारीरिक व आर्थिक हानी  वैयक्तिक पातळीवर न बघता राष्ट्रीय किंवा सामाजिक पातळीवर बघायला गेलो तर मधुमेह हा एक सामाजिक प्रश्न होऊन आपल्या समोर उभा ठाकलाय हे जाणवते. आपल्या ह्या समाजाचा एक मोठा व महत्वाचा भाग म्हणून या संदर्भात  स्त्रियांची एक महत्वाची भूमिका आहे . मधुमेहाने ग्रस्त रुग्णांमध्ये स्त्रियांची संख्या ही जवळपास निम्मी आहे . त्यातही मधुमेहग्रस्त स्त्रीवर्गाचे काही स्वतंत्र असे प्रश्न आहेत व त्यांच्याकडे विशेष लक्ष पुरवण्याची गरज आहे. गरोदरपणातील मधुमेह हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. पण केवळ मधुमेहाचे बळी म्हणूनच स्त्रियांचा ह्या बाबतीत उल्लेख होऊ शकत नाही. प्रत्येक घरात अन प्रत्येक व्यक्तीच्या जीवनशैलीवर स्त्रीचा एक महत्वाचा प्रभाव असतो . मधुमेह हा बहुतांशी जीवनशैलीशी निगडीत आजार आहे . तेव्हा मधुमेहाच्या प्रतिबंधासाठी स्त्रियांचा सहभाग हा अनिवार्य आहे .

मधुमेहाच्या स्त्री आरोग्यातील प्रश्नाकडे बघताना काही पैलू प्रकर्षाने जाणवतात . गरोदरपणातील मधुमेह हा एक तसाच पैलू आहे . हा मधुमेह आपल्या ओळखीच्या माधुमेहापेक्षा जरा वेगळा असून ह्याचे प्रमाण बरेच आहे . पण काही वेळा गरोदरपणातील ह्या महत्वाच्या समस्येकडे खूप दुर्लक्ष् झाल्याचे दिसते . गरोदारावास्थेतील मधुमेह( Gestational Diabetes) ही संकल्पना नेहमीच्या माधुमेहापेक्षा थोडी वेगळी आहे . नेहमीचा मधुमेह (type 2 Diabetes Mellitus)  हा एक जुनाट आजार आहे . एखाद्या व्यक्तीला मधुमेह झाला की तो पूर्ण बरा होत नाही . जीवनशैलीतील बदल व औषधांनी त्याला नियंत्रणात ठेवावे लागते . पण गरोदरपणातील मधुमेह हा फक्त गरोदरपणात दिसतो व बाळंतपनानंतर ठीक होतो व औषधांशिवाय साखरेचे रक्तातील प्रमाण नियंत्रणात राहते . हा या दोन माधुमेहांमधील महत्वाचा फरक आहे . असे असले तरीही गरोदर अवस्थेतील मधुमेहामध्ये साखरेच्या प्रमाणाचे नियंत्रण जास्त काटेकोर ठेवणे हे अत्यंत गरजेचे असते .(कारण बाळाच्या योग्य विकासाचा प्रश्न असतो).गरोदरपणातील मधुमेहाच्या काही रुग्णांना पुढील आयुष्यात नेहमीचा मधुमेह होण्याची शक्यता असते . म्हणून अशा रुग्णांनी जास्त सतर्क राहण्याची गरज असते . गरोदर अवस्थेतील ह्या मधुमेहाविषयी आपण अधिक जाणून घेऊया .

गरोदरपणात स्त्रियांच्या शरीरात बरेच बदल घडतात . ह्यातील काही रासायनिक बदल व संप्रेरका मधील बदल हे गरोदरपणातील इन्सुलिन व साखर ह्यांच्यावर परिणाम करतात . अशा वेळी शरीरातील साखर व इन्सुलिन ह्यांचे संतुलन अगदी नाजूक होऊन जाते . काही वेळा हे संतुलन ढळते आणि इन्सुलिनचा प्रभाव कमी पडू लागतो . अशा वेळी रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्यपातळी  पेक्षा जास्त वाढते व आपण त्याला मधुमेह म्हणतो . आईच्या रक्तातील साखरेचे अशा प्रकारे वाढलेले प्रमाण हे बाळाच्या आरोग्यासाठी घातक असते . ह्यामुळे बाळाच्या शरीरात व्यंग निर्माण होऊ शकते. बाळाचा आकार व वजन जास्त वाढून त्यामुळेही त्रास होण्याची शक्यता असते. असे बाळ जरी गुटगुटीत दिसत असले तरी ते निरोगी नसून अशक्त असते . कधी कधी तर आईच्या पोटातच बाळाचा मृत्यू होण्याचा धोका अशा स्थितीत असतो. आईच्या रक्तातील साखरेचे वाढलेले प्रमाण हे आईच्या आरोग्यासाठी सुद्धा त्रासदायकच असते. म्हणून आईच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहणे हे आवश्यक असते . ह्या साठी गरोदर स्त्रियांची नियमित तपासणी होणे आवश्यक असते  . डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे रक्ताची तपासणी करून आजारांचे निदान करून घेणे कधीही उत्तम . गरोदरपणातील मधुमेहाचे निदान करण्यासाठी ग्लुकोज टोलरंस  टेस्ट नावाची तपासणी केली जाते . ज्या गरोदर स्त्रियाचे वय हे पंचवीस वर्षांपेक्षा जास्त आहे, ज्या लठ्ठ आहेत  किंवा ज्यांच्या जवळच्या नातेवाईकांना मधुमेह आहे त्यांनी अशी तपासणी आवर्जून करावी .(कारण अशा स्त्रियांमध्ये गरोदरपणातील मधुमेहाचे प्रमाण जास्त आढळते)

गरोदरपणातील मधुमेह हा जरी त्रासदायक असला तरी त्याला फार घाबरून जाण्याचे कारण नाही. जर ह्या मधुमेहाचे योग्य वेळी निदान झाले तर वेळीच साखरेचे नियंत्रण करून धोका पूर्णपणे टाळता येतो . बरेचदा तर आहारातील पथ्य व व्यायाम अशा जीवनशैलीतील बदलही साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेसे ठरतात . जर ह्या बदलानंतरही साखर नियंत्रणात आली नाहीतर औषधींचा वापर करता येतो .बाळाची वाढ बघण्यासाठी आजकाल अद्ययावत अशा सुविधा उपलब्ध झाल्या असून त्याची आपल्याला अशा वेळी फार मदत होते. वेळीच निदान झाल्यास अशा रुग्णांची बाळंतपणे अगदी सामान्य स्त्रियांप्रमाणे होतात . आपल्याकडे गरोदरस्त्रीला सल्ला देणारी बरीच मंडळी असते . ह्यातील बर्याच लोकांना गरोदरपणातील मधुमेहाविषयी काहीच कल्पना नसते . त्यामुळे निदान होऊनही त्याकडे दुर्लक्ष होते किंवा उपचारात दिरंगाई होते . अशा वेळी मात्र बरेचशे दुष्परिणाम रुग्णाला व बाळाला भोगावे लागू शकतात . म्हणूनच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, आहाराची पथ्ये काटेकोर पाळणे , नियमित व्यायाम व औषधे ह्यांना पर्याय नाही हे लक्षात ठेवावे .

गरोदर अवस्थेतील माधुमेहानंतर आपण वळूया नेहमीचा मधुमेह किंवा कमी वयात येणाऱ्या मधुमेह असणाऱ्या स्त्रियांकडे . आजकालच्या काळात मधुमेहाचे प्रमाण बरेच वाढले असून कमी वयातही स्त्रिया मधुमेहाने  ग्रस्त असतात . त्याचप्रमाणे  काही महिलांमध्ये थोडी उशिरा गर्भधारणा होते . अशा वेळी स्त्रीला मधुमेह आहे व तिला गर्भधारणा होण्याची शक्यता किंवा इच्छा आहे अशी परिस्थिती निर्माण होते . ह्या परिस्थितीत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे . रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात नसेल तर गर्भाच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात अडथाडे येतात . गर्भाच्या वाढीचा सुरुवातीचा काळ हा अतिशय संवेदनशील असतो . साखरेचे अनियंत्रित वाढलेले प्रमाण हे बाळामध्ये व्यंग निर्माण होण्यास कारणीभूत होऊ शकते . म्हणून गर्भधारणे पूर्वी आईच्या शरीरातील साखरेचे प्रमाण काटेकोर नियंत्रित असावे . इच्छुक जोडप्याने डॉक्टरांचा सल्ला घेऊन साखर नियंत्रित असताना बाळाचे प्लानिंग करावे . गर्भ राहिल्यानंतर पहिल्या दिवसांमध्ये नियमित तपासणी करून साखर नियंत्रणात राहते आहे ना याची खात्री करून घ्यावी . सगळ्या माधुमेहाप्रमाणे इथेही आहार , नियमित व्यायाम व औषधे ही त्रिसूत्री महत्वाची ठरते . आईची नियमित तपासणी जशी आवश्यक आहे तसेच पोटातील बाळाची सोनोग्राफी द्वारे तपासणी डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घ्यावी . बाळाला काही गंभीर व्यंग असल्यास त्याची माहिती अशा वेळी कळते .

गर्भावास्थेमध्ये वरील दोन्ही प्रकारच्या मधुमेहात दिली जाणारी औषधे ही तज्ञ डॉक्टरांनी दिलेली असावी . अशी औषधे बाळावर कुठलाही वाईट परिणाम करत नाहीत . बरेचदा गरोदार्पनामध्ये कुठलीही औषधे घेऊ नये अशी समजूत असते व त्यामुळे अत्यावश्यक औषधे  घ्यायला रुग्ण नकार देतात . या औषधांप्रमाणेच फोलिक असिड सारखी काही औषधे बाळामध्ये वाढीसाठी आवश्यक असतात . त्याचप्रमाणे इतर काही आजार किंवा आहार सत्वांची कमतरता आढळल्यास डॉक्टर त्याचाही उपचार करतात . अशी औषधे घेताना कुरकुर करू नये . मधुमेह ग्रस्त आईच्या बाळाला काही काळ जास्त देखरेखीची गरज असते . अशा बाळांमध्ये साखरेचे प्रमाण अचानक कमी होण्याची शक्यता असते . डॉक्टर अशा बालांवर लक्ष ठेऊन असतात व वेळीच उपचार करतात .

गर्भावास्थेशिवाय महत्वाचा दुसरा एक पैलू म्हणजे स्त्रियांमध्ये दिसून येणारे मधुमेहाचे दुष्परिणाम . भारतामध्ये स्त्रियांचे आरोग्य म्हटले की स्त्री रोग हाच एक विषय प्रामुख्याने पुढे येतो . मधुमेहासारखा आजार हा स्त्रि आरोग्यावर एक गंभीर संकट म्हणून उभा आहे ह्याचा आपल्याला विसर पडतो. आज मधुमेहाच्या रुग्णांपैकी पन्नास टक्के महिला असतात . पण तरीही हा काही बायकांचा आजार नाही असा समज महिलावर्गात काहीसा दिसतो . साधारण वयाच्या चाळीशी नंतर काही तपासण्या नियमित करून घेणे उत्तम .(जसे की साखरेची तपासणी,बी पी , ई सी जी , कोलेस्तेरोल इत्यादी ). ह्या तपासण्याही करून घेण्यास स्त्रियांचा सहभाग कमी असल्याचे बरेच ठिकाणी दिसून येते.

मधुमेह हा कुठल्याही एका कारणामुळे होणारा आजार नाही. बरीचशी गुंतागुंतीची कारणे एकत्र येऊन मधुमेह होतो . आपल्याला  कळलेल्या कारणांपैकी काही महत्वाची कारणे किंवा धोक्याची लक्षणे  म्हणजे चुकीची जीवनशैली, स्थूलता, शारीरिक व्यायामाचा अभाव, उच्च रक्तदाब  व काही प्रमाणात अनुवांशिक दोष . यातील बरेचशी  धोक्याची लक्षणे आज महिला वर्गात दिसून येतात. स्त्रियांचे काम हे कष्टाचे नसून घरकाम आहे असा एक अतिशय चुकीचा समज  काही ठिकाणी प्रचलित असल्यामुळे स्त्रियांना शारीरिक व्यायामाची गरज असते ह्याकडे दुर्लक्ष होते. आज पुरुषांच्या व्यायामाच्या अभावाकडे जेवढे लक्ष वेधले गेले  तेवढे कदाचित स्त्रीयाच्या  व्यायामाच्या अभावाकडे गेले नाही. व्यायामा व्यतिरिक्त स्त्रियांच्या आहार आणि ताणतणाव ह्या बाबतीत घरातील सगळ्यांचेच दुर्लक्ष होते .कधी कधी स्त्रियांची जीवनशैली ही त्यांच्या स्वतःसाठी दुय्यम असते व त्यांची प्राथमिकता  घरातील इतरांची जीवनशैली सुधारण्यासाठी असते की काय  असे वाटते. आपल्या जीवन शैलीतील हे दोष मधुमेहाला आमंत्रण ठरू शकतात. स्त्रियांच्या बाबतीत पी सी ओ डी हा आजार किंवा गरोदरपणातील मधुमेह ही सुद्धा धोक्याची लक्षणे असतात . आपण भारतीय एक सकट बाकी (युरोपिअन किंवा अमेरिकन ) लोकांपेक्षा जास्त मधुमेहाला बळी पडतो . ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपल्या आजूबाजूच्या कितीतरी स्त्रियांना मधुमेह होण्याचा धोका आहे हे आपल्या लक्षात येईल! पण असा विचार करून काळजी घेणाऱ्या महिला आणि पुरुष अगदी विरळ .

मधुमेहामुळे स्त्रियांच्या आरोग्यावर बरेच दुष्परिणाम होतात . त्यातील सगळ्यात काळजीचा म्हणजे हृदयरोग . मधुमेही रुग्णांपैकी स्त्रियांना पुरुषांपेक्षा हृदयरोगाचा धोका जास्त असतो . कधी कधी अशा महिला रुग्णांमध्ये हृदयविकाराची लक्षणे सौम्य प्रकारची दिसतात व त्याकडे दुर्लक्ष होते . लक्षणे सौम्य असली तरीही आजार गंभीरच असतो व उपचार उशिरा झाल्यामुळे किंवा न झाल्यामुळे गंभीर परिस्थिती ओढवते . मधुमेही महिला रुग्णांमध्ये हृदयाशी संबंधित इतर आजारही बर्याच प्रमाणात आढळतात . बैठेकाम किंवा घरकाम करताना बरेचदा शारीरिक मेहनत होत नाही . अशा वेळी हृदयविकाराची लक्षणे दिसत नाहीत .  मला फक्त मधुमेह आहे आणि साखर नियंत्रित राहते म्हणून मी डॉक्टरांकडे जात नाही अशी वृत्ती घातक ठरू शकते . मधुमेहामध्ये फक्त साखरेची तपासणी न करता डॉक्टरांच्या सल्याने बाकी तपासण्याही नियमित करून घेणे जरुरीचे असते .

मधुमेहाच्या स्त्री रुग्णांना होणारा आणखी एक महत्वाचा त्रास म्हणजे वारंवार होणारा जंतुसंसर्ग . योनीमार्गात किंवा लघवीच्या मार्गात वारंवार जळजळ किंवा सूज येणे व ती लवकर बरी न होणे, ताप येणे   अशी लक्षणे काही महिलांमध्ये दिसतात . ह्या लक्षणांची  लगेच काळजी घेतल्यास निदान होऊन उपचार होण्यास मदत होते . फंगल किंवा बुरशीजन्य संसर्ग होण्याचे प्रमाणही मधुमेहाच्या रुग्णांमध्ये खूप असते . त्वचेचा जंतुसंसर्ग किंवा जखमेत होणारा जंतुसंसर्ग हे सुद्धा बरेचदा दिसून येतात .ह्या सगळ्या जन्तुसंसार्गावरचा उपचार प्रारंभिक अवस्थेत  सहज शक्य असतो . पण जंतुसंसर्ग पसरल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते . म्हणून त्रास अंगावर काढणे टाळावे . मधुमेही गरोदर स्त्रियांच्या बाबतीत तर ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते . कारण योनीमार्गात किंवा लघवीच्या मार्गातील जंतुसंसर्ग उपचार न केल्यास गर्भाशयापर्यंत जावू शकतो व आई आणि बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो.

मधुमेह हा जीवनशैलीशी संबंधित आजार आजार आहे तसेच तो पूर्णपणे बरा होणारा आजार नसून त्याला नियंत्रणात ठेवावे लागते .हे करताना जीवनशैलीतील बदल खूपच महत्वाचे  असतात . स्त्रियांचा ह्या संदर्भातील दृष्टीकोन हा आपया चर्चेचा शेवटचा पण कदाचित सगळ्यात महत्वाचा पैलू आहे . स्त्री चा परिवारातील इतर व्यक्तींच्या जीवनशैलीवर बराच प्रभाव असतो .  आहार हा मधुमेहाच्या उपचारातील तसेच प्रतिबंधातील महत्वाचा दुवा आहे . आणि म्हणूनच स्वयंपाकघर हे मधुमेहाच्या उपचाराचे खूप महत्वाचे साधन आहे . इथेही स्त्री ची भूमिका फार महत्वाची आहे . एक जागरूक स्त्री केवळ स्वतःचा नाही तर संपूर्ण परिवाराचा मधुमेहापासून बचाव करू शकते . घरातील जेवण समतोल असल्यास मधुमेहींना पथ्य पाळणे सोपे जाते तसेच परिवारातील इतरांच्या आरोग्यासाठी ते उत्तम असते . आहाराप्रमाणे औषधांबाबत उदासीनता ही एक मोठी गोष्ट आहे .  ही उदासीनता कधी आर्थिक कारणांमुळे येऊ शकते . काही घरांमध्ये स्त्रियांना आजही आर्थिक स्वातंत्र्य नाही हि आपल्यासाठी खेदाची गोष्ट आहे . कधी कधी समाजातील मधुमेहाच्या पगड्यामुळे स्त्रिया उपचार घ्यायला कचरतात . शहरात ही परिस्थिती कमी असली तरी ग्रामीण अशा गोष्टी सरार्स घडताना दिसतात . औषधांची भीती , त्यातल्या त्यात इन्सुलिन विषयीची भीती व गैरसमज हा एक फार मोठा घटक असतो .मधुमेहातील आहार व औषधांविषयी अधिक माहिती ह्या लेखात देणे शक्य नाही ह्या बाबतीत दिलगीर आहे. पुढील काही लेखांमध्ये त्या विषयावर चर्चा करूया .

मधुमेहाविषयी व त्याच्या उपचाराविषयी समाज म्हणून आपण अंधारातच आहोत . आणि अंधाराची जशी भीती वाटते तशी तसेच आपण मधुमेहाला घाबरून आहोत . मधुमेहाविषयी थोडी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आहे . कदाचित मधुमेहाचा रुग्ण म्हणून किंवा रुग्णाचे नातेवाईक म्हणून सामना करताना जरा धीर येईल अशी आशा करतो . तुमच्या प्रतिक्रिया किंवा शंका असल्यास आवर्जून पाठवा .